Search

एका टिफीनपासून सुरूवात, आता उभं राहतंय स्वत: मोठं लंच होम

स्नेहल गोसावी आणि त्यांचा बालाजी पार्सल पॉइंट आता बऱ्याच नाशिककरांच्या परिचयाचा आहे. 2019 साली स्नेहल यांनी त्याची सुरूवात केली. चौदा वर्षं नोकरी केलेल्या स्नेहल यांना दोन मुलं झाल्यानंतर त्यांना वेळ देण्यासाठी नोकरी सोडावी लागली. याच दरम्यान त्यांचे वडील गेले. त्यांची दोन्ही भावंडं नाशिकच्या बाहेर स्थायिक झालेली. साहजिकच आईची जबाबदारी स्नेहल यांनी घेतली. शिवाय सासरच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या होत्याच. त्यासाठी काहीतरी आर्थिक हातभार लावला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. पण नेमकं काय करावं हे सुचत नव्हतं. मुलं लहान असल्यामुळे नोकरीसाठी बाहेर पडणं शक्य नव्हतं. काय करता येईल याचा विचार करतानाच एक प्रसंग घडला आणि त्यांना त्यांच्या उद्योगांची दिशा मिळाली. 

त्याचं झालं असं, स्नेहल यांची आई काही दिवसांसाठी आपल्या मुलाकडे अमेरिकेला गेली होती. तिथून नाशिकला परत आल्यानंतर प्रवासाचा शीण जाईपर्यंत जेवणाचा डबा मागवायचा असं त्यांनी ठरवलं. बरीच चौकशी करून स्नेहल यांनी आईकडे घरगुती जेवणाचा डबा पाठवला. पण ते जेवण अगदीच बेचव निघालं. त्यामुळे पैसेही वाया गेले. उद्योग-व्यवसायाचा विचार करणाऱ्या स्नेहल यांना त्यातूनच कल्पना सुचली. घरच्यासारखं चांगल्या चवीचं जेवण आपणच दिलं तर.. या कल्पनेतूनच बालाजी पार्सल पॉइंटची सुरूवात झाली. 

अर्थात सुरूवात केली तरी एका दिवसांत ग्राहक मिळणं शक्य नव्हतं. मग स्नेहल यांनी पॅम्पलेट्स छापले आणि आजूबाजूच्या परिसरात घरोघरी जाऊन वाटले. काही दिवसांतच त्यांना दहा पोळ्यांची ऑर्डर मिळाली. नाशिकच्या द्वारका या भागात राहणाऱ्या स्नेहल घरून चपात्या बनवून इंदिरा नगर परिसरात  आणत आणि पुढे त्यांची विक्री करत. पुढे चपात्यांची मागणी वाढू लागली तशी जागेची गरज भासली. इंदिरा नगर भागात आईचं घर असल्यामुळे ते सोयीचं होतं, पण तरीही कामाच्या ठिकाणचं स्थैर्य गरजेचं होतं. स्नेहल यांची इच्छाशक्ती प्रचंड असल्यामुळे त्यांना त्या भागात भाड्याने गाळा मिळाला. घरून चपात्या करून डब्यात आणायच्या आणि दुकानात विक्रीसाठी ठेवायच्या. चपात्यांची विक्री वाढू लागली तशी त्यासोबत भाजी असावी ही ग्राहकांची मागणी पण वाढू लागली.

सुरुवातीच्या काळात कर्मचारी नेमून त्यांचा पगार देण्याइतके पैसे देखील स्नेहल यांच्याकडे नव्हते. तेव्हा त्यांच्या आईने साथ दिली, ती स्वतः अन्नपूर्णा असल्यामुळे तिने घरून भाज्या बनवून देत खूपच मदत केली. आईने केलेल्या भाज्या आणि स्नेहल यांच्या पोळ्या दुकानात विक्रीला येऊ लागल्या. आठवड्याभरातच याला ग्राहकांचा प्रतिसाद चांगला यायला लागला. घरापासून बाहेर राहणाऱ्या मुलामुलींसाठी आणि वयस्कर आजी आजोबांसाठी स्नेहल यांच्याकडची पोळी भाजी हा आधार झाला. 

मागणी वाढायला लागल्यानंतर घरून बनवून नेणं कठीण जाऊ लागलं. स्नेहल यांनी निर्णय घेतला. दुकानातच स्वयंपाक बनवण्याचे ठरवले. त्यासाठी गरजेच्या वस्तु खरेदीपासून सुरुवात होती. दोन शेगडया, चार गॅस, मोठे पातेले सगळीच खरेदी झाली. पुढच्या सहा महिन्यांमध्ये स्नेहल यांनी आईकडून सगळ्या प्रकारच्या भाज्या, शिकून घेतल्या. पोळी आणि भाकरी पण आता त्या करायला लागल्या. चपात्या बनवण्यासाठी स्नेहल यांना एक मावशी मदतनीस म्हणून भेटल्या. त्यांची साथ महत्वाची ठरते असं त्या सांगतात. पुढे व्याप वाढत गेला तशा आणखी मदतनीस वाढल्या. “वैशाली ताई, नीलम ताई आणि अनिता ताई या मदतनीस महिलांशिवाय हे सगळं चालवणं आता शक्यच नाही.” अस स्नेहल सांगतात. 

आता बालाजी पार्सल पॉइंटमध्ये रोज ३ ते ४ किलो भाज्या तयार केल्या जातात. एक नाही तर चार ते पाच प्रकारच्या भाज्या तयार होतात. पातोडे, भरली वांगी, वांग्याचं भरीत, कडधान्य, तृणधान्य, हिरवी पालेभाजी, फळभाज्या, आमटी, सोयाबीन, मिक्स व्हेज, शेव भाजी अशा सगळ्या प्रकारच्या भाज्यांचा खमंग वास दुकानाच्या आसपासच्या परिसरात पसरतो. मुगाच्या डाळीचं वरण, पंचमेळडाळ, पांढऱ्या उडीद डाळीचं वरण हे वरणाचे प्रकार देखील इथे उपलब्ध असतात. तर शेंगूळे, कढी खिचडी, डाळ बट्टी  हे पदार्थ लक्ष वेधणारे ठरतात. रविवार स्पेशल मध्ये मिसळ पाव, थालीपीठ हे पदार्थ ग्राहकांचा रविवार लज्जतदार करतात. 

 
स्नेहल स्वतः भाजीपाला, किराणा आणायला जातात. भाज्या घरून निवडून आणतात. सात्विक चवीसोबतच पौष्टिक जेवण देण्यावर स्नेहल यांचा विशेष भर असतो. त्या घरचे मसाले वापरतात. उत्तम प्रतीचा गहू चपात्यांना वापरतात. भाताचे विविध प्रकार, साधा जिरा राईस, मसाले भात, डाल तडका यासाठी देखील उत्तम तांदूळ वापरतात. लग्न, डोहाळेजेवण, वाढदिवस, महिलांची भिशी पार्टी, दिवाळी फराळ, गणपती या सगळ्याच समारंभांना स्नेहल यांच्याकडे भरपूर ऑर्डर्स असतात. सणासुदीच्या दिवसांत पुरणपोळ्या, उकडीचे मोदक यांची ऑर्डर असते. 

या सगळ्या प्रवासात क्वचित परीक्षा बघणारे प्रसंगही घडतात. त्यातला एक स्नेहल यांनी सांगितला. एकदा ५० लोकांची पातोड्याची भाजी आणि चपाती अशी ऑर्डर देऊन झाली आणि फोन आला की ८० लोक होती, स्वयंपाक कमी पडला. स्नेहल यांनी पुढील १५ मिनिटांत खटाटोप केला.  १५० चपात्या बनवून सोबत वरण भात, रोजच्या तयार असलेल्या ४ भाज्या हे सगळं घेऊन पुढच्या १५ मिनिटात त्या ऑर्डर द्यायला स्वतः गेल्या.   

कोविड काळात संपूर्ण कुटुंबाला कोविड झाल्यामुळे पूर्णपणे दोन महिने दुकान बंद ठेवावे लागले, त्या दरम्यान त्यांना बराच आर्थिक फटका बसला. तरीही पुन्हा सुरूवात करून हळू हळू जम बसत गेला. 

स्नेहल सांगतात, “ मी कधीच क्वालिटीच्या बाबतीत तडजोड करत नाही.  जे मी आनंदाने खाऊ शकते, तेच  माझ्या ग्राहकांना देते. आता स्वतःचं मोठं लंच होम सुरू करण्याच्या प्रयत्नात त्या आहेत. वेबसाइट, यूट्यूब चॅनल, घरपोच सेवा यासाठी कोणत्या नावीन्यपूर्ण कल्पना योजता येतील यावर त्यांचे काम चालू आहे. व्यावसायिक प्रवासातला हा नवा टप्पाही त्या लवकरच यशस्वीपणे पार पाडतील. 

बालाजी पार्सल पॉईंट, नाशिक. 
संपर्क – ८४४६५६४७३१ 

हॉटेल व्यवसायाकरता लागणारे लायसन्स आणि रजिस्ट्रेशन याकरता deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.

Tejashree Godse

g.tejashree11@gmail.com