Search

‘स्वतःशी जरा प्रेमाने वागा’

आपण मागच्या भागात समीर आणि त्याच्या उदाहरणातून पाहिलं की समीरच्या अचानकपणे शांत होण्याला किंवा उदास होण्याला मधुरान स्वतःला जबाबदार धरलं. शांत तिला समीर उदास असण्याचा खरं कारण माहीत नव्हतं. मात्र पर्सनलायझेशनच्या या वैचारिक त्रुटीमुळे किंवा आकलनातल्या दोषामुळे तिला स्वतः दोषी आहोत असं वाटलं. तिला तसा का वाटलं असेल? आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव आला असेल.. आपल्यालाही असं का वाटतं? याची अनेक कारणं आहेत. त्याची सुरुवात होते अर्थातच लहानपणापासून. 

आपल्याला आपल्या बालपणी स्वतःबद्दल आलेले अनुभव आणि इतरांनी दिलेली वागणूक किंवा आपल्याला सांगितलेली त्यांची आपल्याबद्दलची मतं यांवरून आपली स्वतःबद्दलची एक संकल्पना तयार होते. आपण मोठे होत असताना देखील या सर्व प्रक्रियेमध्ये विविध अनुभवांची व मतांची भर पडत राहते. आपण जसजसे मोठे होतो, तसं आपली शैक्षणिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातली प्रगती, आपल्या स्वतःबद्दल आपल्या मनामध्ये काही प्रतिमा निर्माण करते. त्यातल्या काही सकारात्मक किंवा निरोगी असतात. तर काही नकारात्मक देखील असतात. आपल्या सर्वांनाच कधी न कधी काही कटू अनुभव येतात. काही अवघड प्रसंग येतात. कधी नकाराशी तर कधी अपयशाशी सामना करावा लागतो. यामुळे आपल्या मनामध्ये अनेक बाबतीत स्वतःबद्दल असुरक्षितता निर्माण होते. 

आपल्या पालकांनी किंवा मोठ्या भावंडांनी घरामध्ये आपल्याला दिलेली वागणूक जर अनावश्यक टीकेची असेल, जजमेंटल असेल, अटींवरचा प्रेमाची असेल तर, किंवा घरामधला वातावरण हे कोलाहलाचं, तंटापूर्ण असेल तर लहानपणी आपण स्वतःला आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींसाठी जबाबदार धरू लागतो. ही असुरक्षितता, आसपासच्या गोष्टींसाठी स्वतःला जबाबदार धरण्याची लहानपणी लागलेली सवय, तसंच लहान मुलांचा मेंदू फारसा प्रगल्भ न असल्यामुळे स्वतः व्यतिरिक्त विविध कारणीभूत घटकांचा विचार करता न येणे, अशा अनेक गोष्टी पर्सनलाईझेशनची सवय आपल्या मनाला लागण्यासाठी योगदान देणाऱ्या ठरतात.
तर आता या सवयीपासून लांब जाण्यासाठी किंवा ती आपल्या मनातून काढून टाकण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी खूप उपयोगी पडतील

इतर सर्व वैचारिक त्रुटींप्रमाणे याही बाबतीमध्ये आपल्याला स्वतःचं निरीक्षण करणे म्हणजेच आपल्या वैचारिक प्रक्रियेमध्ये असं कधी आपल्याकडून होत आहे का त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला आपण करतो आहे ती आकलनातील चूक वा वैचारिक त्रुटी जाणवणं ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. 
ही त्रुटी काढून टाकण्यासाठी आपण आतापर्यंत अनेकदा चर्चा केलेलं ‘स्वसंवाद’ हे तंत्र आपल्या कामी येणार आहे. स्वसंवाद म्हणजे अर्थातच स्वतःशी जाणीवपूर्वक बोलणं. ते मनातल्या मनात असेल, मोठ्यांनी असेल किंवा लिहून असेल. या स्वसंवादामध्ये आपल्याला दोन शक्यता पडताळून पहाव्या लागतील.

सगळ्यात पहिली शक्यता किंवा पायरी म्हणजे जेव्हा आपण पर्सनलाईजेशन करतो आहोत तेव्हा स्वतःला या घटनेसाठी इतर कोणते घटक जबाबदार असू शकतात त्यांच्या अनेक शक्यता पडताळून पाहण्यासाठी प्रवृत्त करा. उदाहरणार्थ माझे बॉस आज सगळ्यांवरती चिडचिड करत असतील, तर त्याचं कारण फक्त मी किंवा माझ्या टीमने काही चूक केली आहे इथपर्यंत मर्यादित न असता त्याच्या अनेक शक्यता असू शकतात, हे पाहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करणे. हे करण्यासाठी स्वसंवादामधे ‘बॉसला राग कशाचा आलेला असू शकतो?’ किंवा ‘बॉस सध्या कोणत्या कारणामुळे चिडचिड करत असेल?’ हा प्रश्न नव्याने विचारणं. 

आपल्या लक्षात येईल की त्याची अनेक कारणे असू शकतात. जसं की,
१) त्यांचा बॉस त्याच्यावर चिडलेला असू शकतो
२) त्याचं कोणाशी तरी भांडण झालेलं असू शकतं
३) त्याला कोणतीतरी आर्थिक किंवा वैयक्तिक पातळीवरती एखादी चिंता सतावत असेल
४) त्याच्या घरामधला एखादी समस्या असेल
           किंवा अगदी साधं कारण म्हणजे 
५) ऑफिसला येता येता कोणीतरी त्याच्या गाडीला किंवा त्याला धक्का दिला असेल.
६) त्यांच्या मुलांची वा वयस्कर पालकांची तब्येत चिंताजनक असेल,
अशी अक्षरशः शेकडो कारणे आपल्याला सापडतील. 

तसंच माझा जोडीदार माझ्यावर जर चिडलाय असं मला वाटत असेल, तर त्याच्या उदास असल्याचा मी हा एकच अर्थ लावणं निरोगी नाही. त्याच्या उदास असल्याची अजून काय काय कारण असू शकतात? हा प्रश्न स्वसंवादामध्ये आपण स्वतःला विचारू शकतो.
लक्षात घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, कोणत्याही गोष्टीला फक्त मी जबाबदार आहे किंवा घडलेली घटना ही माझ्याबद्दल आहे किंवा माझ्या दृष्टिकोनातून आहे असा विचार करणे, हे आपल्याला टाळायचं आहे. यासाठी म्हणून आपण इतर शक्यतांना आपल्या विचारांमध्ये अशाप्रकारे जागा देऊन पाहतो आहोत. आता यांपैकी नेमकी कोणती शक्यता खरी हे शोधण्याची फारशी गरज नाही.
जर ही गोष्ट तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत घडत असेल, जर त्याने तुमच्या नात्यांवर काही परिणाम होत असेल, तर मात्र इथे तुम्ही सुसंवादामधून नेमकं काय घडलं आहे, किंवा नेमकी तुमच्या जोडीदाराला तुमची काय मदत उपयोगी पडू शकते, याबद्दल चर्चा सुरू करू शकता.

पर्सनलायझेशनला मुळापासून बाहेर काढण्यासाठी पुढची पायरी आपल्याला खोलवर जाण्यासाठी जास्त गरजेची असेल. ती म्हणजे जर इतर शक्यता गृहीत घरूनही मला एखादी गोष्ट त्रास देत असेल, किंवा कोणी मला काही वाईट म्हणलं त्याच्याशी जास्त प्रमाणाबाहेर मी स्वतःशी ते जोडत असेन, तसंच एखाद्या गोष्टीला मी माझ्यावरती वैयक्तिक हल्ला म्हणून पहात असेन, तर मात्र दुसरी शक्यता पडताळून पहावी लागेल. ती म्हणजे, माझ्या मनामधल्या काही असुरक्षिततेच्या जागी अशा प्रकारची भावना किंवा अशा प्रकारचे विचार माझ्या मनात निर्माण करायला कारणीभूत आहेत का? कोणत्या प्रकारची असुरक्षितता जाणवते आहे हे मला शोधण्याची गरज आहे. 
मधुरा आणि समीरच्या उदाहरणामध्ये मधुरानं हे तपासून पाहणं नक्की गरजेचं आहे की तिला स्वतःबद्दल काही असुरक्षितता वाटते आहे का? स्वतःचा आत्मविश्वास, स्वाभिमान किंवा सेल्फ एस्टीम यांमध्ये काही कमतरता जाणवते आहे का? जर ते तसं असेल, तर ते कुठून आले? लहानपणीचे काही अनुभव त्याला कारणीभूत आहेत का? ते कसं बाहेर काढता येईल? या सगळ्यासाठी काही तज्ञांचा मार्गदर्शन घेता येईल का? हे तपासून पाहायला हवं. 
आपण स्वतः काय आहोत आणि आपलं मूल्य काय आहे हे जेव्हा आपण मनापासून स्वीकारलेलं असतं, त्या बाबतींमधे जेव्हा आपण सुरक्षितता अनुभवतो, तेव्हा इतर व्यक्तींनी केलेल्या टिपण्यांना आपण पर्सनली घेण्याची शक्यता कमी असते.
काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम वर एक रील पाहायला मिळाला. एका व्यक्तीच्या हातामध्ये पाचशेची नोट होती. त्यांना आसपासच्या गर्दीला विचारलं, "कोणाला हवी ही पाचशे रुपयांची नोट? जवळपास सर्वांनी हात वर केले. त्या व्यक्तीने त्या नोटेला आपल्या मुठीत चुरगळलं. आता कुणाला हवी ही 500 ची नोट? पुन्हा सगळ्यांनी हात वर केले. नंतर तर ती नोट चक्क त्या माणसांना तोंडात टाकून चावून खाण्याची नक्कल केली. ती बाहेर काढून खालती जमिनीवरच्या मातीमध्ये सुद्धा फिरवली. मग पुन्हा विचारलं, "आता कोणाला हवी आहे ही नोट?" पुन्हा सर्वांनी हात वर केले. 
का बरं? 
कारण त्या नोटेला थोडीशी माती लागली काय, किंवा ती थोडी चुरगळलेली असेल काय, त्या नोटेचं मूल्य हे 500 रुपये तर राहणार आहे हे सर्वांना माहिती होतं. तसंच प्रत्येक माणसाचंही आहे खरंतर.
आपल्या आयुष्यात आलेले प्रसंग कितीही चांगले किंवा वाईट असतील, तरी आपलं माणूस म्हणून जे मूल्य आहे, तुमची जी वर्थ आहे, ती तशीच अबाधित राहणार आहे हे लक्षात घ्या. कोणत्याही गोष्टीमुळे आपण कोणापेक्षा कमी किंवा जास्त होत नाही हे जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा मनातली असुरक्षितता थोडी कमी होण्यासाठी मदत होईल. तसं पर्सनलाईजेशन करणंही कमी होईल.
हे सर्व करताना सातत्यानं सराव आणि स्वतःशी प्रेमाने वागणं हे अत्यावश्यक! आपलं मानसिक आरोग्य हे एक ट्वेंटी-ट्वेंटी सामना नसून क्रिकेट कसोटीचा वर्ल्डकप आहे हे कायम लक्षात ठेवा.


नवीन व्यवसाय सुरू केल्यानंतर, बिझनेस च्या website Designing साठी deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.

डॉ.  तेजस्विनी कुलकर्णी

dr.tejaswinikulkarni@gmail.com