Search

Dog Training: ‘ग्राहकांबरोबरच कुत्राही खुश होणं महत्त्वाचं’

सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि लेखक रॉजर कॅरस म्हणतात, ’डॉग्स आर नॉट अवर होल लाईफ बट दे मेक अवर लाईव्हज होल’. या त्यांच्या वाक्याचा अर्थ ज्यांच्या घरी पाळीव कुत्रे आहेत किंवा ज्यांना प्राणी आवडतात अशा सगळ्यांना नक्कीच लक्षात येईल. कुत्री म्हणजे आपले संपूर्ण आयुष्य नसते पण ते आपले आयुष्य परिपूर्ण बनवतात. या एका वाक्यातच त्यांनी मानवी जीवनातील पाळीव कुत्र्यांचे महत्त्व सांगितले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात घरात कुत्रा पाळणे हे मानसिक आधारासाठी तसेच घराच्या व स्वत:च्या सुरक्षेसाठी आवश्‍यक मानले जाते. कुटुंबात एखादा कुत्रा असेल तर घरातील सर्वांचाच तणाव कमी होतो असे अनेक मानसशास्त्रीय तज्ज्ञांचे मत आहे. परंतु जसे मुल जन्माला आल्यावर त्याला घडवावे लागते, त्याला चांगल्या सवयी लावाव्या लागतात, तसेच कुत्र्यांचेही आहे. जर कुटुंबात राहण्यासाठी किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण कुत्रे पाळणार असू तर त्या दृष्टीने कुत्र्यांना प्रशिक्षण द्यावे लागते. एखाद्या कुटुंबात राहण्यासाठी कुत्र्याला सवयी लावाव्या लागतात. यासाठी खास प्रशिक्षक असतात. आज आपण अशाच एका व्यवसायाने डॉग ट्रेनर असणाऱ्या पुण्यातील मीरा दिलीप ठोसर यांच्याकडून या वेगळ्या क्षेत्रातील त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत.
 

या तरुण उद्योजिका आज संपूर्ण देशभरात डॉग ट्रेनर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्राणीप्रेमाला अगदी शालेय जीवनापासूनच सुरुवात झाली. शाळेत शिकत असताना मीरा डब्याच्या पिशवीतून जखमी पक्षी, मांजराची पिल्ले, कुत्र्यांची पिल्ले घरी घेऊन येत असत. दहावीची बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर त्या पुण्यातील कात्रज सर्पोद्यान येथे स्वयंसेवक म्हणून जाऊ लागल्या. या ठिकाणी जायला लागल्यापासून पशुपक्ष्यांमधील त्यांची आवड अधोरेखित झाली. प्राण्यांची देखभाल कशी व किती प्रमाणात करायची करायची, आपला किती हस्तक्षेप असावा, प्राण्यांवर प्रथमोपचार कसे करायचे, कोणत्या प्राण्याला, पक्ष्याला कशा पद्धतीने हाताळायचे तसेच या क्षेत्रात काम करताना प्राण्यांची किती मोठ्या प्रमाणात जबाबदारी घ्यावी लागते याबद्दल प्रशिक्षण मिळाले. खऱ्या अर्थाने सर्पोद्यानातील शिक्षणात त्यांची जडणघडण झाली. या काळात विविध शाळा, संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, क्लब्ज, सोसायटी यामध्ये जाऊन जनजागृती करणे, लाइव्ह डेमो देणे (सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर नंतर बंदी घातली गेली), कार्यशाळा घेणे, चर्चासत्रे आयोजित करणे असे विविध उपक्रम त्यांचे या वेळी सर्पोद्यानाच्या माध्यमातून चालू होते. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट किंवा जीवो जीवस्य जीवनम्‌‍ या संकल्पनांचे काटेकोर धडे त्यांना या काळात मिळाले. पाळीव प्राणी व जंगली प्राणी या दोन्ही प्रकारात बसणाऱ्या प्राण्यांना तसेच पक्ष्यांना हाताळायची संधी त्यांना मिळाली. याच दरम्यान प्रभात रोड येथील प्राण्यांचे डॉक्टर मिलिंद हाटेकर यांच्याकडे स्वयंसेवक म्हणून काम सुरु केले.    

 
अभ्यासू ट्रेनर
२००५ मध्ये डॉक्टर हाटेकरांनी मीरा यांना या क्षेत्रात शास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्यासाठी भाग पडले. २००६ मध्ये मुंबईच्या शिरीन मर्चंट यांच्याकडून डॉग ट्रेनिंगचं प्रशिक्षण मीरा यांनी घेतले. त्याच वर्षापासून मीरा पुण्यात तिसऱ्या प्रशिक्षित महिला डॉग ट्रेनर म्हणून काम करू लागल्या. त्या वेळी डॉ. हाटेकरांकडेही त्यांचे काम सुरुच होते. या काळात कुत्र्यांची प्रसूती करणे, वेगवेगळ्या प्राण्यांच्या ऑपरेशन्समध्ये मदत करणे अशी सर्व कामे त्यांनी केली. दरम्यान मीरा यांचे ग्राहकही वाढत होते. वेगवेगळ्या लोकांच्या ओळखी होत होत्या. या क्षेत्रात त्यांना आवड निर्माण झाली होती. मग त्यांनी पुढील शिक्षण घ्यायचे ठरवले. कोणत्याही क्षेत्रात पाऊल ठेवताना त्याचे शास्त्रोक्त शिक्षण आपल्याकडे असणे आवश्‍यक असते. आता नवीन नवीन शिकले पाहिजे म्हणून त्यांनी कुत्र्यांच्या बिहेव्हियरल संदर्भात ॲडव्हान्स कोर्स केला. पुढेही दर वर्षी त्या नवीन काही गोष्टी शिकत गेल्या.

 हे वाचलंत का?

२००८-०९ मध्ये मध्ये महाराष्ट्र पोलिसांकडून मीरा यांना कोर्ससाठी विचारणा झाली. पुण्यात महाराष्ट्र राज्याचे डॉग ट्रेनिंगचे मुख्यालय आहे. संपूर्ण राज्यात जे काही डॉग स्क्वॉड आहेत त्यांच्या सर्व ट्रेनर्सना पुण्यातून प्रशिक्षण दिले जाते. एका प्रशिक्षणाचा साधारण ८ ते ९ महिन्यांचा कालावधी असतो. या दोन वर्षात मीरा यांनी महाराष्ट्र पोलिसांसाठी तीन ट्रेनिंग कोर्सेस घेतले. तसेच एक कोर्स राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) यांच्या डॉग स्क्वॉडच्या ट्रेनर्ससाठी घेतला. 

 
कुत्र्यांचं बोर्डिंग 
२०११ साली ’हॅपी टेल्स’ या नावाने भूगाव येथे मीरा यांनी कुत्र्यांसाठी बोर्डिंग व ट्रेनिंग सेंटर सुरु केले. ज्या लोकांचे कुत्रे आक्रमक असतात, ज्यांना घरात ठेऊन प्रशिक्षण देणे शक्य नाही अशा लोकांसाठी त्यांनी हा ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरु केला. जो आजही सुरु आहे. यामध्ये ठराविक काळासाठी कुत्रे मीरा यांच्या सेंटरमध्ये आणले जातात. तेथे त्यांना प्रशिक्षण मिळते. ते पूर्ण झाल्यावर त्यांचे पालक त्यांना घेऊन जातात. आता मीरा या ॲग्रेसिव्ह डॉग स्पेशालिस्ट म्हणून काम करतात. पुन्हा एकदा कॉर्पोरेट प्रेझेंटेशन्स, वेगवेगळ्या ठिकाणी लाइव्ह डेमो सुरु झाले. पूर्वीच्या काळी घरात एखादा पाळीव प्राणी असणे आणि आत्ताच्या काळात असणे यात खूप फरक आहे. त्यासाठीची जनजागृती, माहितीपर कार्यक्रम सुरूच होते. २०१४ मध्ये भाड्याने घेतलेल्या पहिल्या जागेचा करार संपत होता. या जागेचे भाडे परवडत नव्हते. एक एकर जागेवर थाटलेले हे सेंटर बंद करायची वेळ येते की काय अशी भीती त्यांना वाटत होती. त्याच वेळी पहिल्या जागेच्या जवळच त्यांना एक जागा मिळाली. त्यावर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करून काम चालू केले. आता त्यांचा कामाचा पसारा दीड एकरावर आला होता. पुन्हा जशी सुरुवात झाली तसे परत नवीन प्रयोग सुरु झाले. ९ वर्षात साधारण पाच ते सहा हजार कुत्र्यांना मीरा यांनी प्रशिक्षण दिले आहे.  
 

डॉग ट्रेनिंग हे सेवा क्षेत्र असल्याने त्यात ग्राहकांना खूप जपावे लागते. एका घरात डॉग ट्रेनर्सचे दोन ग्राहक असतात. एक मनुष्य ग्राहक व एक प्राणी ग्राहक. त्यांच्या तक्रारी आल्या तर अत्यंत कुशलतेने हाताळाव्या लागतात. सेंटरमधून प्रशिक्षण घेऊन गेल्यावर कुत्र्यांच्या गळणाऱ्या केसांच्या प्रमाणात थोडी जरी वाढ झाली तरी ग्राहकांच्या तक्रारी येतात. परंतु शेवटी ग्राहक आणि कुत्रे खुश होणे महत्त्वाचे व आव्हानात्मक असते, समाधानी असणे महत्वाचे असते. काही वेळेला ग्राहक खुश नसतो पण त्यांचे कुत्रे खुश असते. अशा वेळी काही गोष्टी त्यांना फक्त कुत्र्यांसाठी करणे भाग असते. 
 

घरच्यांचा सपोर्ट महत्वाचा
या सर्व प्रवासात मीरा यांना घरच्यांकडून मोलाचे सहकार्य आणि पाठींबा मिळाला. 
२०१५ पासून मीरा यांनी स्वत:च्या सेंटरवर इंटर्नशिप प्रोग्रॅम घ्यायला सुरुवात केली. ज्या लोकांनी या क्षेत्रात शिक्षण घेतले आहे परंतु काही कारणाने त्यांना कामाचा अनुभव मिळाला नाही, अश्‍या लोकांसाठी मीरा हे इंटर्नशिप प्रोग्रॅम आयोजित करतात. काहीजणांना या विषयातले काहीही शिक्षण मिळत नाही परंतु त्यांना या क्षेत्रात आवड आहे अशा लोकांसाठी सुद्धा मीरा स्वतः ट्रेनिंग कोर्सेस आयोजित करतात. ज्यामुळे लोकांनाही अनुभव मिळतो व ते त्यांच्या व्यावसायिक भविष्यासाठी तयार होतात. 
 

कोणत्याही इतर क्षेत्रात येण्यासाठी जशी मुलभूत शिक्षणाची गरज असते तशी या क्षेत्रातही आहे. डॉग ट्रेनर म्हणून कोर्सेस उपलब्ध आहेत. भारतात विद्यापीठ मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध नसले तरी व्यावसायिक ट्रेनर्सकडून घेतले जाणारे कोर्सेस उपलब्ध आहेत. भारताबाहेर कुत्र्यांच्या मानसशास्त्रासंबंधी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कुत्र्यांचे बिहेव्हियरल कोर्सेसही उपलब्ध आहेत. त्यामुळे जर कोणी या क्षेत्रात उतरतानाच प्रशिक्षित असेल तर काही प्रमाणात त्यांचा पुढचा प्रवास सोपा होईल. हे क्षेत्र तसे निराळे असल्याने सतत सुधारणा आणि प्रयोग करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या सेन्टरवर सतत काही ना काही प्रयोग सुरु असतात.

 हेही वाचा-

करोनाच्या साथीमुळे अनेक घरात लोकांना विलगीकरणात ठेवले गेले. काही लोक हॉस्पिटलमध्ये होते. अशा वेळी कुत्र्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लोकांनी त्यांच्या कुत्र्यांना बोर्डिंग सेन्टरवर राहायला सोडले होते. त्यामूळे पुणे शहर बंद असतानाही आम्ही काम करतच होतो. जी गोष्ट मी मनापासून स्वीकारली ती पूर्ण करण्याचे बाळकडू मला लहानपणीच मिळाले असल्याने मला या व्यवसायात काम करताना नेहमी मजा आली.’

स्वतःचे काम करताना नेहमी कामाकडे चिकित्सक पद्धतीने पहिले गेले तर आपल्यात सुधारणा होतात. त्याचप्रमाणे मीरा नेहमी स्वतःच्या कामाकडे एक परीक्षक म्हणून पाहतात. यातून दर वेळेला त्या नवीन काहीतरी शिकत असतात. यामुळेच अनेक गोष्टी त्यांना साध्य करता आल्या. पैशांचे व्यवहार त्यांनी अतिशय काटेकोरपणे सांभाळले. कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार त्यांनी कधीच उशिरा दिला नाही. यामुळे त्यांची माणसे टिकून आहेत. मीरा यांच्याकडे स्वत:चे चार कुत्रे आहेत. मिली, माया, मायरा तसेच माही अशी त्यांची नावे आहेत. तसेच त्यांच्या मांजराचे नाव मिस्टर फिस आहे. शिवाय मीरा यांच्या बहिणीचे नाव मधुरा आहे. यांच्या ग्रुपला एकत्रितपणे एम पॉवर, एम गँग किंवा टीम एम म्हणून ओळखले जाते. हेच तीनही हॅशटॅग मीरा यांची ओळख आहेत. आणखी एक त्यांचे मांजर होते त्याचे नाव मणी होते. ऑनफिल्ड, ऑनसाईट आणि ऑनलाईन या तीनही ठिकाणी त्यांची हजेरी आहे.
 


- सानिका घळसासी