अंध असल्याने IIT ने नाकारलं, US मध्ये शिकून श्रीकांतने उभी केली 100 कोटींची कंपनी
कोणत्याही घरामध्ये मुल जन्माला येणं, हा खूप आनंदाचा क्षण असतो. त्या इवल्याशा बाळाचे इवले हात, इवली बोटं आणि कुतूहलानं जगाकडे पाहणारे डोळे पाहिले की कुणाचंही मन हरखून जातं. त्या छोट्याशा बाळाच्या आगमनानं सगळ्या घराचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण ‘त्या’ दिवशी ‘त्या’ बाळाच्या येण्यानं मात्र घरात वेगळंच वातावरण तयार झालं. कारण त्या बाळाला डोळे नव्हते. जन्मत: अंध होतं ते. बाळ पहायला आलेले नातेवाईक आणि शेजारपाजारचे तर लगेच हिरमुसून गेले. तोंडाला येईल ते बोलू लागले.’ पण या चर्चेत अजिबात सहभागी न झालेले त्या बाळाचे आई आणि बाबा प्रचंड खूष होते. त्या आनंदातच त्यांनी त्याचं नाव ठेवलं ‘श्रीकांत’.
तोच ‘श्रीकांत’ ज्यानं मोठं झाल्यावर संपूर्ण जगाचे डोळे दिपतील अशी कामगिरी करून दाखवली. अनेक मान-सन्मान मिळवले. एका कार्यक्रमात पुरस्कार स्विकारल्यावर भाषण करताना तो म्हणाला, की “ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी माझे आई-वडिल हे जगातले सर्वांत ‘भाग्यवान आई-वडिल’ ठरले आणि मी त्यांचा ‘भाग्यवान मुलगा’ ठरलो. कारण अंध मुलाकडं पाहण्याची ‘दृष्टि’ त्यांच्याकडे होती.” श्रीकांत सहा वर्षांचा झाल्यावर त्याला शाळेत घालायचं ठरलं. तिथूनच त्याच्या आयुष्याला एक नवं पण खडतर वळण मिळालं.
खडतर प्रवासाची सुरूवात :
त्याचा शिक्षणाचा प्रवास पहिल्या दिवसापासून कठीण होता. तो ज्या गावात रहात होता तिथं शाळा नव्हती. पाच कि.मी. अंतरावरच्या गावातील शाळेमध्ये त्याला घालण्यात आलं. वयाच्या सहाव्या वर्षी दररोज पाच कि.मी. अंतर चालत जाऊन तो शाळेत पोचत असे. भारतातल्या अनेक खेड्यांमध्ये एकमेकांना जोडणारे रस्ते आजही खराब अवस्थेत आहेत. रस्त्यावर मोठे खड्डे असतात, पायात मोठे दगड असतात, काटे-कुटे असतात आणि समोरून अंगावर येणारी वाहनंही असतात. शिवाय पावसाळ्यात तर हा प्रवास आणखीनच अवघड बनतो. अशा अवघड वाटेवरून वाटचाल करत श्रीकांत जेव्हा शाळेत पोचायचा तेव्हा त्याचं होणारं ‘स्वागत’ हे डोळ्यांत पाणी आणणारचं होतं.
एका सहा वर्षांचा मुलगा शाळेत पोचतो. शिक्षक त्याला ‘ये बाळा, बस वर्गात’ म्हणण्याच्या ऐवजी ‘ज्याला धड डोळ्यानं दिसत नाही तो काय डोंबल शिकणार’ असं म्हणाले तर त्या मुलाची मन:स्थिती काय होईल? प्रत्येक बाकावर बसलेल्या मुलाला हा आंधळा मुलगा आपल्याजवळ नको असायचा. मग सगळ्यात शेवटच्या बाकावर एकट्यानं बसण्याला पर्याय उरायचा नाही. तास चालू असताना शिक्षक कधी त्याला प्रश्न विचारायचे नाहीत आणि कधी त्याला काही शंका आहे का, याची चौकशी करायचे नाहीत. ‘शिकायचं असेल तर शिक नाहीतर घरी निघ.’
हे वाचलंत का?
वडिलांची सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुरूवात, मुलाने उभारला टोलेजंग व्यवसाय
अमेरिकेत सोडली चार लाख डॉलर्सची नोकरी, पुण्यात उभारला वर्ल्ड क्लास ब्रॅंड
सुट्टीत एकत्र डबा खाणाऱ्या मुलांचे गट असायचे. तिथं चेष्टा, मस्करी, दंगामस्ती चालायची. पण या गटांत श्रीकांतला कधी कोणी घेतलं नाही. वर्गातला कोणीही मुलगा त्याचा मित्र झाला नाही. खेळाचा आणि कवायतीचा तास म्हणजे श्रीकांतसाठी अक्षरश: त्रास होता. कारण कबड्डी खेळतानाचे किंवा खो-खो चे आवाज त्याच्या कानावर पडायचे. पण त्या खेळात त्याला कोणी सामील करून घ्यायचं नाही. बाजूला पडल्याची, एकटं टाकल्याची भावना श्रीकांतला खूप त्रास द्यायची.
पाचवीपासून श्रीकांतसाठी शाळा बदलली. ती तालुक्याच्या गावातली अंध मुलांसाठीची शाळा होती. तिथे मात्र श्रीकांत छान रमला. अभ्यासात तर त्यानं प्रगती केलीच पण क्रिकेट आणि बुद्धीबळ. या दोन खेळांत तो पारंगत झाला. त्याचं या खेळातलं प्राविण्य इतकं वाढलं की राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी त्याला मिळाली. दहावीत त्याला उत्तम गुण मिळाले. त्यामुळे त्याला इतर हुशार मुलांप्रमाणे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता. पण इतर हुषार मुलांप्रमाणे त्याला तो सहजासहजी मिळाली नाही. त्यासाठी नको इतका संघर्ष करावा लागला. अंध आहे हे कारण सांगून श्रीकांतला प्रवेश नाकारण्यात झाला. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेमध्ये काचेच्या वस्तूंपासून रसायनांपर्यंत अनेक बाबी हाताळाव्या लागतात, याची त्याला जाणीव करून देण्यात आली.
अन्यायाविरुद्ध आवाजउठवण्याची हिंमत
याच टप्प्यावर श्रीकांतमधला बंडखोर जागा झाला. त्यानं थेट आंध्र प्रदेश सरकारवरच खटला भरला. कोर्टासमोर स्वत:ची बाजू मांडली. नुकत्याच दहावी उत्तीर्ण झालेला एक विद्यार्थी विरुद्ध राज्यशासन यांच्यात चाललेला तो खटला त्याकाळी चर्चेचा विषय ठरला.
विज्ञान शाखेत श्रीकांतला प्रवेश तर मिळाला पण कोर्ट-कचेऱ्या करण्यात पहिले सहा महिने गेले होते. तरीही त्यानं जिद्द सोडली नाही. दररोज सर्व तासांना एकाग्र चित्ताने हजेरी लावली. भरपूर पुस्तकं मिळवली. सलग दीड वर्ष अभ्यास केला. थोडथोडके नाही तर ९८% गुण मिळवत तो वर्गात पहिला आला. बारावीत एवढे चांगले गुण मिळाल्याने त्याने इंजिनिअरिंगला जायचं नक्की केलं. आय.आय.टी. (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) किंवा बिटस् (बिर्ला इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी) अशासारख्या देशातल्या अग्रगण्य संस्थेत त्यासाठी प्रवेश घ्यायचा होता. पण पुन्हा परिस्थिती आडवी आली. पुन्हा त्याला प्रवेश परिक्षाच नाकारली गेली. पुन्हा तो अंध असल्याची जाणीव त्याला करून देण्यात आली आणि पुन्हा एकदा त्याच्यातला बंडखोर जागा झाला.
हेही वाचा-
मराठी माणसाच्या “जर्मन बेकरी”ची जिगरबाज कहाणी
आयुष्य एकदाच मिळतं, जगून घ्या! अमेरिकेतल्या ‘त्या’ प्रवासाने व्यवसायाला मिळाली कलाटणी
‘आय.आय.टी.’ किंवा ‘बिट्स’ जर मला नाकारत असतील तर आता मीच त्यांना नाकारतो. आता मला प्रवेश द्या म्हणून मी त्यांच्या दारात जाणार नाही.” असं म्हणत श्रीकांतनं थेट अमेरिकेचाच रस्ता धरला. तिथे मात्र त्याचं अंध असणं आडवं आलं नाही. जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या एम.आय.टी., बर्कली, स्टॅनफर्ड आणि कानिगी मेलन अशा चार विद्यापीठात त्याला मानानं प्रवेश मिळाला. आता परिस्थिती उलटी होती. चारापैकी कोणत्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा हे आता श्रीकांतनं ठरवायचं होतं. बराच विचार करून त्यानं एम.आय.टी. म्हणजे मॅसॅच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्रवेश घेतला. तिथे त्याला खूप आनंदानं शिकता आलं. अर्थात बाकी अडचणी होत्याच. कारण भारतापेक्षा खूप वेगळा देश, वेगळं हवामान, वेगळे खाद्यपदार्थ आणि सहज न कळणारे इंग्रजी उच्चार या सगळ्याचा सामना इतरांप्रमाणे त्यालाही करावा लागला. पण या सगळ्याशी श्रीकांतनं लवकरच जुळवून घेतलं. अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि इंजिनिअर झाला. तो दिवस एम.आय.टी.सारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेसाठीही महत्त्वाचा ठरला. कारण श्रीकांत हा त्या संस्थेच्या इतिहासातला पहिला आंतरराष्ट्रीय अंध पदवीधर ठरला.
एम.आय.टी.ची पदवी हातामध्ये आल्यानंतर अमेरिकेतल्या अनेक नामवंत कंपन्यांनी श्रीकांतला नोकरीसाठी पाचारण केलं. पण श्रीकांतनं मात्र त्यांना नम्रपणे नकार दिला. कारण तो अमेरिकेत राहण्यासाठी नाही तर फक्त शिक्षणासाठी गेला होता. आयुष्यात जे काही करायचं ते फक्त आपल्या मायदेशात करायचं हे त्याच्या मनाशी पक्कं होतं. त्याप्रमाणे तो भारतात स्वगृही परतला. या दरम्यान आंध्रप्रदेशामध्ये अनेक मोठ्या कंपन्या सुरू झाल्या होत्या. माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने वाढत होता. हैदराबादचा उल्लेख सायबराबाद असा केला जात होता. स्वाभाविकच फॉरिन रिटर्नड श्रीकांतला अनेक कंपन्यातून बोलावणी आली. पण त्यापैकी कोणाहीकडे त्याला नोकरी करायची नव्हती. मग त्याला नेमकं करायचं होतं तरी काय?
दिव्यांग आणि अपंग मुलांसाठी रोजगरनिर्मिती
“माझ्या वाट्याला जे दु:ख आलं ते देशातल्या इतर मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून मला काम करायचं होतं.” एका समारंभात आपलं मनोगत व्यक्त करताना श्रीकांतनं सांगितलं होतं. तो पुढे म्हणाला, “माझी इच्छा आहे भारतात जन्मणाऱ्या कोणत्याही अंध बालकाकडं त्याच्या आई-बाबांचं गेल्या जन्मीचं पाप म्हणून बघितलं जाऊ नये. कोणत्याही अंध विद्यार्थ्यांकडं शिक्षकांनी तुच्छतेनं पाहू नये. केवळ अंध आहे म्हणून कोणालाही विज्ञानशाखेत प्रवेश नाकारला जाऊ नये. देशातल्या दहा टक्के अंध, अपंग व्यक्तींना शिक्षण आणि रोजगाराच्या कक्षेबाहेर ठेवलं जाऊ नये. मुख्य म्हणजे हा आंधळा काय करू शकणार, असं या देशात यापुढे कोणीही कोणाला म्हणू नये. कारण जे विचारतात की अंध व्यक्ती काय करू शकते. त्यांना माझा प्रतिप्रश्न आहे की अंध व्यक्ती काय करू शकत नाही?”
श्रीकांतच्या या बोलण्यानंतर टाळ्यांचा गजर जरूर झाला पण यातलं एकही वाक्य तो टाळ्या वाजाव्यात म्हणून बोलला नव्हता. त्याचं स्वप्नं निश्चित होतं आणि त्याला ते सत्यात उतरवायचं होतं. नोकरी न करता त्याला स्वत:चा व्यवसाय सुरू करून शेकडो भारतीय तरुण-तरुणींना रोजगार मिळवून द्यायचा होता.
हटके पर्यटनाचा भन्नाट फंडा, ‘टेक्स्टाइल आणि क्राफ्ट ट्रेल्स’
Challenge in business: ‘मॅडम सॉरी, बाईंच्या हाताखाली काम करणार नाही’