Search

दुष्काळी प्रदेशात घाटुळेंनी फुलवलं नंदनवन

‘रोपवाटिका’ हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर नयनमनोहर हिरवेगार दृश्य उभे राहते. सोलापूर जिल्ह्यातील अनगर इथल्या सुनील घाटुळे यांनी या नयनमनोहर दृश्याचे रूपांतर आर्थिक उलाढालीत करून वर्षाला दहा कोटींचा ‘बिझनेस’ सुरू केला आहे. ‘पाणी कमी आहे, शेती कशी करणार’, असे प्रश्न विचारणाऱ्यांना सुनील यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने निःशब्द उत्तर दिले आहे. अनगर येथील त्यांच्या ४५ एकराच्या शेतात ते वेगवेगळी पिके तर घेतातच, पण उपलब्ध पाण्यात त्यांनी ‘नर्सरी’ उद्योग सुरू केला आणि उत्पन्नाचा नवा विक्रम नोंदवला. आजमितीला त्यांच्याकडे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशाच्या विविध प्रांतातून शेतकरी पाहणीसाठी, खरेदीसाठी येत असतात. अर्थात त्यासाठी त्यांनी मेहनतीच्या जोडीला अचूक निरीक्षण, कल्पकता आणि नावीन्यपूर्णता जोपासली आहे.

‘‘कोणत्याही कृषी विद्यापीठात न जाता मी माझी नर्सरी जोपासली, वाढवली. पपई, खरबूज, कलिंगड, टोमॅटो, मिरची, वांगी, झेंडू अशा अनेक रोपांची मागणी माझ्याकडे होत असते. तिची पूर्तता मी करतो. सुरुवातीला अगदी छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या या उद्योगाला आज मोठ्या उद्योगाचे स्वरूप आले आहे. ‘घाटुळे ॲग्रो सर्व्हिस’ असे त्याचे नाव आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना हव्या असलेल्या रोपांचा पुरवठा आम्ही करतो, गेल्या वीस वर्षांत राज्यातील आणि परराज्यातील अनेकांनी उत्सुकता दाखवून पाहणी केली, रोपे नेली,’’ असे सुनील घाटुळे यांनी सांगितले.

नुसती शेती करणे आजकाल अवघड झाले आहे. त्यातही सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये सिंचनाची अत्यल्प सुविधा उपलब्ध असते. साहजिकच शेतीत नवे प्रयोग करण्यावाचून गत्यंतर नसते. बरेच शेतकरी पारंपरिक शेतीत रमतात. त्यामुळे त्यांना त्रास होतो. सुनील घाटुळे यांना शेतीवाचून दुसरा छंदच नाही. शिवाजी विद्यापीठात पदवी घेतल्यानंतर त्यांनी घरच्या शेतीतच लक्ष घातले आणि शेतीचे उद्योगात रूपांतर केले. कष्टातून संशोधन आणि अनुभवातून गुणवत्ता हे ब्रीदवाक्य घेऊन ते काम करतात. आज त्यांच्या कृषी उद्योगात कायमस्वरूपी किमान ५० आणि हंगामी स्वरूपात ५० स्त्री-पुरूष कामगार काम करतात. ऑर्डरनुसार रोपांचा पुरवठा करण्यासाठी त्यांची स्वतःची पाच वाहने आहेत. रोज किमान ५० लोक त्यांच्या उद्योगाला भेट देत असतात. ऑनलाईन ऑर्डर घेतली जाते, मागणीनुसार रोपांचा पुरवठा केला जातो. 

श्री. घाटुळे यांची स्वतःच्या मालकीची पॉलीहाऊसेस आहेत. त्यामध्ये अक्षरशः लाखो रोपांची जोपासना केली जाते. ही पॉलीहाऊसेस अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आहेत. कमीत कमी मनुष्यबळात यांत्रिक मदतीने जास्तीत जास्त काम केले जाते. पॉलीहाऊसमध्ये सर्व रोपांच्या सिंचनासाठी वरच्या बाजूने जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यातून गरजेपुरते म्हणजे ठिबक सिंचन होते. माती, बियाणे, रोपे, सिंचन या सगळ्यांसाठी स्वतंत्र आधुनिक यंत्रणा त्यांनी आणली आहे. बोअर किंवा विहिरीतून पाण्याचा उपसा करून पॉलीहाऊसमध्ये रोपांना पुरवण्यापर्यंत सगळ्या ठिकाणी यांत्रिक व्यवस्था आहे. सिंचनासाठी किती पाणी वापरायचे, ते कितीवेळ पुरवायचे या सगळ्याचे ‘टायमिंग’ दिलेले आहे. एकदा हे ‘सेटिंग’ केले की त्याला पुन्हा हात लावण्याची गरज राहत नाही. हे सगळे काम एकच माणूस करू शकतो. शेतीला अखंड वीजपुरवठा केला जात नाही, त्यामुळे खूपदा पाणी असून सिंचन करता येत नाही. तथापि, श्री. घाटुळे यांनी सिंगलफेज व सौरऊर्जा यंत्रणा राबवल्याने वीजेची अडचण भासत नाही. पाण्याची व्यवस्थाही त्यांनी नेमकेपणाने आणि दूरदृष्टी ठेवून केली आहे, त्यामुळे पॉलीहाऊस, त्याचप्रमाणे रोपांना पाणी योग्य आणि आवश्यक तितकेच मिळते. पाणी अनाठायी वाया जात नाही. सीसीटीव्ही यंत्रणा लावलेली असल्याने कोणत्या प्लॉटमध्ये काय चालले आहे हे त्यांना अगदी सहज कळते.  

‘आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची मागणी ग्राहक करतात. काहीजण तर पूर्ण वाढलेले झाड देता का, असे विचारतात. अर्थात मोठ्या सोसायट्या किंवा तत्सम बांधकाम केल्यानंतर वृक्षारोपण केले जाते. मोठ्या शहरांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. आम्ही रोपांचाच पुरवठा करतो. बियाणे, पॉट्स, कंपोस्टची मागणीही होते. तेही आम्ही पुरवतो. आम्ही आतापर्यंत विविध रोपांची विक्री केली. पण त्यातही तैवान जातीच्या पपयांची रोपे आम्ही सर्वाधिक विकली. त्यांना खूप मागणी असते,’ असे श्री. घाटुळे सांगतात.

श्री. घाटुळे यांच्याबरोबर त्यांचा मुलगा स्वानंददेखील या कामात तरबेज झाला आहे. सुनील यांना शेतीखेरीज दुसरा छंदच नाही. ते म्हणाले, ‘मी अनेक देशांचा दौरा केला आहे. पण त्यासाठी मला एक रूपयाही खर्च करावा लागला नाही. इटली, स्पेन, लॅटिव्हिया, चीन, टर्की, श्रीलंका या देशांत मी गेलो. अभ्यास दौरे आणि कंपन्यांच्या दौऱ्यांमध्ये माझी निवड झाल्याने अनेक देश मी फिरू शकलो.’

अनगर येथील आपल्या ४५ एकराच्या क्षेत्रात त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना तर त्यांच्या शेतात राबवली जातेच, पण हवामान अद्ययावत नर्सरी, संगणकीकरण, सौर ऊर्जेचा वापर, स्वतंत्र असे हवामान केंद्र अशा सगळ्याचा वापर ते करतात. त्यांच्या या कार्याची दखल राहुरी कृषी विद्यापीठाने स्वतःहून घेतली. राहुरी विद्यापीठाने ‘आयडॉल’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. याशिवाय रोटरी क्लब, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध संस्थांचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ऊस आणि अन्य धान्यपिकेही त्यांनी घेतली आहेत. भाजीपाला आणि फळपिकेही ते घेतात. 
घाटुळे यांच्या उद्योगाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही रासायनिक खते ते वापरत नाहीत. शेणखत आणि जिवाणू खतांचा वापर ते करतात. त्यामुळे रोपांवर कीड पडणे अथवा तत्सम प्रकार होत नाहीत. शेततळे आणि स्लरीची निर्मितीही ते करतात. मुख्य म्हणजे, सौर ऊर्जानिर्मितीमुळे त्यांना मोठा फायदा झाला आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन हेही त्यांच्या गुणवत्तेचे आणि यशाचे निदर्शक आहे. त्यांचा मुलगा स्वानंद उत्तम काम करीत आहे, त्याला स्व. वसंतराव नाईक कृषी पुरस्कार मिळाला आहे. तर सुनील यांची कन्या मनोरमा ही वनक्षेत्रपाल पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. सुनील यांची पत्नी सुनीता या शिक्षिका होत्या. एकूणच सुशिक्षित आणि प्रयोगशील उद्योजक कुटुंब म्हणून घाटुळे यांचा उल्लेख करावा लागेल.
सुनील घाटुळे – मोबाईल – ९८२२३२८८७९ व ९५४५९५४५०९


व्यवसायात अकाउंट्समधील नोंदी व्यवस्थित कशा ठेवाव्यात यासाठी deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. अधिक माहिती- Accounting Services 
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.

रजनीश जोशी

joshirajanish@gmail.com

संबंधित पोस्ट