Search

स्टॉलवर मदत करायला जाणारी मुलगी ते प्रसिद्ध उद्योजिका

स्त्रियांनी शिकावं आणि वयात आल्यानंतर संसाराला लागावं, असा सर्वसाधारण समज आपल्याकडे आहे. यापेक्षा काही वेगळं करू पाहणाऱ्या स्त्रीला काहीवेळेला समाजाच्या वाकड्या नजरांना सामोरं जावं लागतं. काही खमक्या स्त्रिया त्याची पर्वा करत नाहीत. रुपाली जाधव आणि आई अनिता जाधव या मायलेकी त्यातल्याच एक. रूपाली यांनी एम.बी.ए.चं शिक्षण असूनही त्यांनी अंडाबुर्जीचा व्यवसाय करण्याचा मार्ग पत्करला. मागच्या १० वर्षांपासून त्यांनी तो व्यवसाय नुसता चालवला नाही, तर यशस्वी करून दाखवला. आज जाधव यांची तीन अंडाबुर्जीचे स्टॉल्स यशस्वीपणे सुरू आहेत. एक लकडी पुलाजवळ कर्वे रस्त्यावर, एक एरंडवणाच्या सेंट्रल मॉलजवळ आणि एक नळस्टॉपजवळ. शिवमल्हारची अंडाबुर्जी आणि अंडाराईस खायला लोक इथे आवर्जून येतात.

रुपाली यांचं बालपण महर्षी कर्वे नगरच्या कामना वसाहतमध्ये गेलं. आई आणि मामा यांच्या छ्त्राखालीच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. रुपाली यांच्या मामाचा कर्वे रस्त्याला अंडाबुर्जीचा स्टॉल होता. त्यांचं घर त्यावरच चालत होतं. मामाने बनवलेल्या बुर्जीला चव होती. पण एकट्या मामाला व्यवसायाचा व्याप आवरत नव्हता. म्हणून रुपाली यांची आई अनिता जाधव मामाला हातभार लावू लागल्या. बुर्जीचा व्यवसाय उत्तम चालू लागला. या व्यवसायामुळे कुटुंबामध्ये आर्थिक स्थैर्य आलं होतं.

रुपाली या अभ्यासात हुशार होत्या. चुणचुणीत होत्या. स्वभावातही बेदरकारपणा होता. कळत्या वयापासून त्याही मामाच्या बुर्जीच्या स्टॉलवर जाऊ लागल्या. मामाला मदत करू लागायच्या. मामा नको म्हणत असला तरी हट्टाने कांदा-टोमॅटो चिरायच्या, हिशोब सांभाळायच्या. रुपाली यांच्या कामातली चपळाई मामालाही थक्क करायची. त्यावेळी रुपाली याचं वय जेमतेम १३ ते १४ वर्षांचं होतं. शाळा सुटल्यावर बुर्जीच्या स्टॉलवर जाणं हा रूपाली यांचा रोजचा कार्यक्रम बनला होता. व्यवसायातले सगळे बारकावे त्यांना माहीत झाले होते. त्यामुळे कधी मामा नसला, तर जाधव मायलेकी अंडा बुर्जीचा स्टॉल समर्थपणे सांभाळायच्या.

अंडाबुर्जीच्या व्यवसायामुळे घराची भरभराट झाली होती. 'शिवमल्हार अंडा बुर्जी'चं बरंच नावही झालं होतं. सगळं व्यवस्थित सुरू असताना मामाचं अचानक निधन झालं. कुटुंबाचा आधारस्तंभ हरवला होता. अंडाबुर्जीचा व्यवसाय कोण सांभाळणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. अंडाबुर्जीचा व्यवसाय चालवणं म्हणजे फक्त तिथे जाऊन थांबणं नव्हतं. मामा गिऱ्हाईकाला जी चव देत होता, त्या चवीचे पदार्थ गिऱ्हाईकाला द्यायचे होते. त्याशिवाय गिऱ्हाईक टिकणार नव्हते. रुपाली यांनी बेधडकपणे ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. हा बेधडकपणा आईचाही हुरूप वाढवणारा होता. दोघींनी मिळून अंडा बुर्जीचा स्टॉल पुन्हा जोमाने सुरू केला.

रुपाली यांनी जेव्हा व्यवसायाची जबाबदारी अंगावर घेतली होती, तेव्हा त्यांचं एका बाजूला एम.बी.ए. अभ्यासक्रमाचं शिक्षण सुरू होतं. सकाळी कॉलेज आणि संध्याकाळी बुर्जीचा स्टॉल, असं त्यांचं वेळापत्रक होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या चालून आल्या होत्या. पण रुपाली यांना अंडाबुर्जीच्या व्यवसायातच रस होता. त्यांनी 'बिझनेस मॅनेजमेंट'चं घेतलेलं शिक्षण स्वतःच्या व्यवसायातच वापरायचं ठरवलं. आणि शिवमल्हार अंडा बुर्जी सेंटर नावाने आणखी एक स्टॉल थाटला.  

रुपाली सांगतात, ''डेक्कनसारख्या ठिकाणी अंडाबुर्जीचा व्यवसाय चालवायचा म्हटल्यावर दुकान रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवणं आम्हाला भाग होतं

आणि रात्री बारापर्यंत दुकान सुरू ठेवणं पूर्वीपासूनची पद्धतच होती. पण व्यवसाय करत असताना, 'तू एक मुलगी असून हा व्यवसाय का करतेस?', 'रात्री १२ वाजेपर्यंत का थांबतेस?', तू 'एखादी चांगली नोकरी का नाही करत?' असे नाना तऱ्हेचे प्रश्न मला विचारले गेले. पण त्याचवेळी माझं अनेकांनी कौतुक केलं, मला आधारही दिला. 'कोणी तरूणी अंडाबुर्जीचा व्यवसाय करते आहे', या गोष्टीमुळे मला सन्मानही मिळाला.''

या व्यवसायाच्या जोरावर जाधव कुटुंबियांनी आर्थिक प्रगती साधली. त्यांनी आपलं छोटं घर पाडून दुमजली घर बांधलं. त्यांचं राहणीमान सुधारलं. अनेकवेळा परदेशवाऱ्याही केल्या. आजीआजोबांना उतारवयात आपण चारधाम यात्रेला पाठवतो. रुपाली यांनी त्यांच्या आजीला दुबईवारीला पाठवलं. हे सगळं त्यांनी केलं अंडाबुर्जीच्या व्यवसायाच्या जोरावर. आता शिवमल्हार अंडाबुर्जी बऱ्यापैकी प्रसिद्ध झालेलं आहे. अंडाबुर्जी आणि अंडाराईस खायला इथे लांबून लोक येतात.

रूपाली यांनी इतक्यात समाधान मानलं नाही. त्यांनी कर्वेनगर भागात अंडाबुर्जीचं एक प्रशस्त दुकानच थाटलं. पण लॉकडाऊनमध्ये ते दुकान थांबवावं लागलं. जाधव कुटुंबियांनी यात थोडं नुकसानही सोसलं. पण त्यांनी हार मानली नाही. जाधव कुटुंबियांनी एका नव्या संकल्पनेसह नळस्टॉपजवळ एक नवा स्टॉल थाटला. मुंबईसारखं नाईटलाईफ अजून पुण्यात सुरू झालेलं नाही. पण पुण्यातल्या तुरळक भागात नाईटलाईफ सुरू असतं. उदाहरणार्थ नळस्टॉप. तिकडे विद्यार्थीवर्ग, कामगारवर्ग मध्यरात्री नाष्ट्यासाठी गर्दी करतात. अशावेळेसही लोक भुकेले असतात, ही गरज ओळखून जाधव कुटुंबियानी इथे अंडाबुर्जीचा स्टॉल सुरू केला. अल्पावधीतच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

रूपाली सांगतात, ''माझ्या दुकानात अनेक मोठ्या कंपन्यांचे मालक, मॅनेजर लोक येतात. यातल्या अनेकांनी मला सद्भावनेने नोकरीही ऑफर केली. पण, 'मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे' सांगून त्यांना नकार देते.''  त्या पुढे सांगतात, ''शिवमल्हार अंडा बुर्जीचं बऱ्यापैकी नाव झालेलं आहे. पुढे मला 'शिवमल्हार अंडाबुर्जी' या नावाने आणखी शाखा सुरू करायच्या आहेत. 'बुर्जी खायची, तर शिवमल्हारचीच असं लोक म्हणले पाहिजेत' हे माझं स्वप्न आहे. स्वतःच्या पायावर उभं राहू इच्छिणाऱ्या आणि व्यवसाय करू पाहणाऱ्या तरुणींसाठी आणि महिलांसाठी जाधव मायलेकी नक्कीच आदर्श ठरतील. 

संपर्क - ७३५०२ २४६५५

   


हॉटेल व्यवसायाकरता लागणारे लायसन्स आणि रजिस्ट्रेशन याकरता deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.

 तुषार कलबुर्गी

tusharkalburgi31@gmail.com