‘व्यवसायाला सुरूवात करण्यापूर्वी त्यातली सर्व कामं स्वत:च करून बघा’
'यशस्वी उद्योजक'च्या माझ्या मित्रांनो, हा पूर्ण मे महिना मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. लंडनमध्ये प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून यंग आंत्रप्रेन्युअर अवॉर्ड 2013 मिळाल्यापासून अनेक उद्योजकांना आणि उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या अनेकांना मी यशस्वी उद्योजक कसा झालो हे समजून घ्यायचं असतं. यशस्वी उद्योजक होण्यासाठी मी नेमकं काय केलं आणि काय केलं नाही हे सांगायला मलाही आवडतं. अगदी माझ्याकडून कोणत्या चुका झाल्या हेही मी वेळोवेळी मोकळेपणाने सांगणार आहे. तर मंडळी या पहिल्या भागात माझ्या उद्योगांची सुरूवात झाली कशी याविषयी सांगतो. आणि मग थोडं फ्लॅश बॅकने आपण मागे जाऊ. माझं लहानपण, शिक्षण, नोकरी याविषयी देखील आपण बोलू. या गप्पांमधून तुम्हाला काही दिशा मिळेल याची खात्री आहे.
तर मित्रांनो, Opportunity dance with those who are already on the dance floor. संधी त्यालाच मिळते ज्यांनी तिच्याबरोबर नाचायची तयारी केली आहे, निश्चय केला आहे. प्रत्येकाला संधी मिळतेच, फक्त ती ओळखता आली पाहिजे. मला त्या कामात संधी दिसली. काही जण 'हे करू', 'ते करू' अशा गप्पा मारतात पण प्रत्यक्षात वेळ आली की त्यात त्रुटी शोधत राहतात. मी ठरवलं, हे काम करायचचं, बघू काय होतय.
कामाची शोधाशोध करत असताना एक दिवस मी महानगरपालिकेतील एका इंजिनीयरला भेटलो तेंव्हा तो म्हणाला. 'एक काम आहे, करशील का?' मी आनंदून "हो, कुठे आहे काम?" असं त्याला विचारलं. त्याने मला कामाबद्दल सांगितलं. ते काम होतं एक ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करायचं. साधारण पंधरा हजाराचं काम होतं. लेबर रेटवर कोणताही क़ॉन्ट्रॅक्टर हे काम करायला तयार नव्हता बहुतेक. माझा होकार येताच त्याने साईट बघायला नेलं. मला ट्रान्सफॉर्मरमधलं काहीच कळत नव्हतं. इंजिनीयरसोबत गाडीवरुन जाताना त्याला म्हंटलं, "मला टेक्निकल जास्त माहीत नाही". "काम सोपं आहे, तुला नक्की जमेल" असा त्याने विश्वास दिला. " ट्रान्सफॉर्मर एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी शिफ्ट करायचा आहे. "फक्त लेबर चांगले घेऊन ये, नाक्यावरचे आणू नको" असं तो म्हणाला.
इलेक्ट्रिकलचं काम करणाऱ्या आनंद गजरमल याला मी भेटलो. माझ्या ओळखीच्या चहावाल्याने त्याच्याशी ओळख करून दिली. तो लेबर घेऊन येतो म्हणाला. लेबर गॅंगचं फायनल झाल्यावर मी इंजिनीयरला कॉल केला आणि उद्याच काम करतो, असं सांगितलं. तो खुश झाला. तो ट्रान्सफॉर्मर रोडच्या मध्ये येत होता, त्यामुळे रोडचं काम थांबलं होतं. त्यातही बरच राजकारण होतं पण मला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. आपण क़ॉन्ट्रॅक्टर होत आहोत. राजकारण आणि समाजकारणात पडायचं नाही आणि विचार पण करायचा नाही हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. दुसर्या दिवशी सकाळीच मी साईटवर आलो. आमच्या आधी आनंद लेबर गॅंग घेऊन साईटवर तयार होता. इंजिनीयरने ट्रान्सफॉर्मर बंद केला. त्याला शटडाउन म्हणतात, क्रेनवाला आला आणि ट्रान्सफॉर्मर शिफ्ट झाला. त्या वेळी ते काम बघायला महापालिकेचे मोठे अधिकारी श्रीनिवास कंदुल हे सुद्धा आले होते. इंजिनीयरने क़ॉन्ट्रॅक्टर म्हणून माझी त्या अधिकार्यांशी ओळख करून दिली. एका दिवसात काम केलं म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं. रोड बनवणार्या क़ॉन्ट्रॅक्टरकडून मला पंधरा हजार रुपये घेऊन दिले.
दुसर्या दिवशी सकाळीच मी कंदुलसाहेबांना भेटण्यासाठी गेलो. त्यांच्या केबिनच्या बाहेर थांबलो. साधारण १० वाजता साहेब आले. केबिनमध्ये जातानाच त्यांनी मला आत येण्यास सांगितलं. मी आत गेलो. त्यांनी एका इंजिनीयरला बोलावलं आणि त्याला म्हणाले, "हा शरद, काल याने ट्रान्सफॉर्मर शिफ्ट केला. आपली अडलेली सगळी कामं याला दाखव. क़ॉन्ट्रॅक्टरला तसं सांग. हा आता सब-क़ॉन्ट्रॅक्टर म्हणून रखडलेली कामं करेल' आणि माझ्याकडे बघून विचारलं, 'करशील ना?' हो सर म्हणून मी बाहेर पडलो.
दरम्यान व्यवसायाच्या दृष्टीने मला काही लायसन्स काढणं आवश्यक होतं. लेबर लायसन्स, इलेक्ट्रिकल लायसन्स वगैरे. मला कोणीतरी सुचवलं एजंटकडून ही कामं करून घे. पण वडिलांचे शब्द आठवत होते, 'जमीन बटाईनं दिली की उत्पन्न कमी होत असतं.' कोणत्याही व्यवसायास सुरुवात करायची असेल तर त्यासंबंधीची सगळी कामं स्वत:च केली पाहिजेत. त्यामुळे बारीकसारीक खाचखळगे माहीत होतात. काही जण व्यवसाय करताना सोबत मित्र घेऊन फिरत असतात. मग मित्रांना व्यवसायातील कामं सांगतात. मित्रांना एव्हढी काळजी नसते त्यामुळे काही ठिकाणी ते चुकतात किंवा कामास उशीर झाल्याने विनाकारण मित्रांचा राग येतो. दैनंदिन व्यवसायामधील कामं मित्रांना सांगू नये. आपलं काम दुसर्याने करावं, अशी ईच्छा असणं धोकादायक असतं. काही वेळा एजंटकडे काम सोपवून आपण निवांत होतो. व्यवसायाचा पसारा वाढल्यानंतर कामं एजंटकडे दिली तर चालतील, पण काय काम होणार, ते कसं होणार हे आपल्याला माहीत पाहिजे. नाही तर मनस्ताप सहन करावा लागतो. नवीन व्यावसायिकांनी किमान एक वर्षं तरी एजंटकडे आपली कामं सोपवू नये. आपल्या व्यवसायाची जमीन आपणच कसायची. त्यावेळी मी चकरा मारून स्वत:चं लायसन्स काढलं. जरा वेळ लागला, पण प्रशासकीय व्यवस्था समजू लागली.
कॉन्ट्रॅक्टर्सबरोबर व्यवस्थित संवाद ठेवल्याने मला हळूहळू कामं मिळत जाऊ लागली. माझ्याकडील लेबरची संख्या वर्षभरात वाढत वाढत चाळीसपर्यंत गेली. दर दिवशी काम मिळत होतं. कोणत्याही कामाला नाही म्हणालो नाही. फायदा मिळत असेल तरच ऑर्डर घ्यायची हा अॅटीट्यूड सुरूवातीला चांगला नसतो.
व्यवसायात अकाउंट्समधील नोंदी व्यवस्थित कशा ठेवाव्यात यासाठी deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. अधिक माहिती- Accounting Services
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.
शरद तांदळे
उद्योजक आणि लेखक