व्यवसायात बदल करताना ग्राहकांचा फिडबॅक विचारात घ्या
यशस्वी उद्योजकच्या माझ्या वाचकमित्रांनो, माझा गेल्या आठवड्यातला लेख तुम्हाला आवडला असेल अशी खात्री आहे. उद्योगाचा अभ्यास करणं कसं गरजेचं आहे हे मी तुम्हाला त्या लेखात सांगितलं. आज तो अभ्यास करायचा कसा हे माझ्या अनुभवावरून सांगणार आहे.
व्यवसायाचे नाव ठरविताना त्या व्यवसायाला साजेसे नाव दयावे. कारण आपण केवळ हौस म्हणून व्यवसाय सुरु करत नाही; तर त्या व्यवसायाला, त्या क्षेत्राला, आपल्या ग्राहकांना आणि स्वत:च्या स्वप्नांना आपण वचनबद्ध असतो. आणि आज तर ब्रॅंडचा जमाना आहे. त्यामुळे नावाचा विचार करताना पुढे त्याचा ब्रॅंड होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी. मी सुद्धा जरा हटके नाव माझ्या व्यवसायाला दिले. तेव्हा कॉम्प्युटर आणि मोबाईल बनवणारी ॲपल कंपनी भारतात इतकी प्रसिद्ध नव्हती. चांगल्या आरोग्यासाठी रोज ॲपल खावे आणि सौंदर्यासाठी चांगले आरोग्य हवे म्हणून माझ्या सलॅानचे नाव मी ॲपल ठेवले.
माझ्या ग्राहकांची संख्या वाढायला लागली तशी मी सलॉनसाठी स्वतंत्र जागा घेतली. मी जेव्हा कमर्शियल जागेत व्यवसाय सुरु केले तेव्हा मार्केटचा अभ्यास सुरु केला आणि माझ्या हे लक्षात आले की सलॅानमधे येणारे क्लाएंट हे १५ वर्षांपासून ते ५० वर्षांपर्यंतच्या एजग्रुपचे होते. त्यातही २० ते ४० हा एज ग्रुप जास्त होता. त्याप्रमाणे मी मार्केटिंग सुरु केले. आजही नवीन शाखा उघडताना आम्ही या सगळ्यावर काम करतो.
आपला ग्राहक कोण आहे आणि त्याला कशाची जास्त गरज आहे हे व्यावसायिकाला समजलेच पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगते रोज किमान एक तास आपल्या इंडस्ट्रीचा अभ्यास करावा. आपण जिथे व्यवसाय करतो त्या ५ किलोमीटर एरियाचा सर्वे करावा, रेसिंडेंशियल प्रॉपर्टी, कमर्शियल प्रॉपर्टी त्या एरियात किती आाहेत, किती लोकसंख्या आहे, कोणती कम्युनिटी आहे, किती भाग डेव्हलप झाला आहे , किती जुनं गावठाण आहे, लोकांची लाईफ स्टाईल कशी आहे, कोणता एज ग्रुप अॅक्टिवअसतो, किती शाळा कॅालेज आहेत, हॉस्पिटल, बाग, भाजी मार्केट किती आहेत, बाहेरुन येणारे लोक किती आहेत, कोणत्या गाड्यांची ये जा असते, तेथील लोकांकडे कोणत्या गाड्या आहेत, कोणते ब्रॅंड्स आहेत जे तिथे व्यवसाय करतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या एरियाची स्पेंडीग कॅपॅसिटी किती आहे, प्रत्येक व्यक्ती साधारण किती पैसे आपल्या व्यवसायात खर्च करते. म्हणजे आपल्याला तिकीट साईज समजते. याच बरोबर आपल्या व्यवसायाच्या जागेचा १०० टक्के वापर होतोय का हे पाहणे महत्वाचे असते.
व्यवसायाची जागा, तिचे भाडे अथवा गुंतवणूक किती आहे व ते खर्च वाढवत नाही ना हे बघावे, आणि जागा मोठी आहे ग्राहक आहेत पर्यंत स्टाफ कमी असल्याने ग्राहकांना सेवा देता येत नाही का? यांवर दर आठवड्यातून एकदा रिव्ह्यू घ्यावा व त्या प्रमाणे बदल करावेत. स्टाफ वाढवावा की कमी करावा अथवा बदलावा किंवा ट्रेनिंग दयावे हे निर्णय घेणे सोपे जाते. तसेच आपल्या अनुपस्थितीत आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा आपला स्टाफ देतोय ना हे पाहण्यासाठी डमी क्लाएंट पाठविणे आणि डमी कॅाल करणे व प्रॉपर रिपोर्ट घेणे जसे की क्लाएंटचे स्वागत केले का? तिथे स्वच्छता होती का? माहिती व्यवस्थित दिली का? सर्विस व्यवस्थित दिली का? आपापसात काही बोलत होते का? बिल दिले का? कारण पुढे याच गोष्टी बिझनेस वाढवायला मदत करतात. तसेच क्लाएंटच्या तक्रारीवर लवकरात लवकर आणि योग्य दखल घेतली जाते का हे पाहिले पाहिजे. परत ते क्लाएंट आपल्याकडे आले का? हे पाहणे गरजेचे आहे. प्रत्येक क्लाएंटचा फिडबॅक घेणे गरजेचे असते. कोणतीही नवीन सर्विस किंवा प्रोड्क्टस आणि व्यवसायातील बदल करताना जुन्या क्लाएंटचे मत विचारात घ्यावे व नंतरच बदल करावा. त्यामुळे नंतरचा वेळ आणि पैसे वाचतात व मनस्ताप टाळता येतो.
deAsra फाउंडेशन उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचं काम करते. deAsraकडे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. अधिक माहिती -Expert consultation
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.
नयना चोपडे