Stone Age didn’t end because people ran out of stone. It ended because people kept learning and improving. The desire to improve makes life better and better.
आज ट्रेनिंग, अभ्यासदौरे, वाचन किंवा एखाद्या विषयातील प्रशिक्षण असे शब्द म्हणजे इंजिनियरींग कंपन्यात तरी काही तास किंवा ठराविक दिवसांपुरते उरलेत.
हल्ली कसं सगळं झटपट हवं असतं. दोन मिनिटात मॅगी, तीन मिनिटात बर्गर, १० मिनिटात जेवणाची डिलीव्हीरी. अगदी तसचं कोणालाही कामावर घेताना हवा तो पगार घ्या, पण उद्यापासून रिझल्ट द्या. अजिबातच वेळ नाही कोणाला.
हा आता मेल केला की दुसऱ्या सेकंदाला फोन करायचा, मेल केलाय - उत्तर पाठवा, तिसऱ्या मिनिटाला व्हॅाट्सॲप वर पुन्हा तेच, चौथ्या मिनिटाला - एखाद्या सहकाऱ्याकडे तक्रार आणि पाचव्या मिनिटाला पुन्हा रिमांयडरचा मेल. उसंत नाही, थांबा नाही, सगळ कसं अर्जंट, व्हेरी अर्जंट, व्हेरी व्हेरी अर्जंट!
लाँगटर्म विचार करा
बरं काम करणारा माणूस असो की काम सांगणारा - कोणालाच लाँगटर्म विचार करायचा नसतो. दोघेही दोन-तीन वर्षांचे पाहुणे असतात. बऱ्याचदा तर अगदी बेसिक काही कळायच्या आतच दुसरी कंपनी शोधली जाते. फक्त आणि फक्त झटपट पैसा हे एकमेव ध्येय. बर बहुतांश कंपन्यांना पण यात फार काही वावगं वाटतं नाही, हल्ली तर सिस्टम आणि विविध सॉफ्टवेअर्सच्या नादाने माणसांची किंमत शुन्य करून जिवंत माणसांनाच रोबोटमधे कन्व्हर्ट करायचं काम चालू आहे. कोण आला, कोण गेला, काही फरक पडत नाही. फक्त हेड काऊंट महत्वाचा.
बरं मग त्या ‘हेड’ मधल्या मेंदूच्या विकासाच काय ? भावना, एखाद्या प्रोडक्टवरच्या प्रेमाचं काय? कामाच्या अचूकतेविषयी काय? नव्या सुधारणा, नवे शोध याबद्दल काय? आयुष्यभर पुरेल अशी नवनिर्मिती करायची असेल तर त्याचं काय?
जोपर्यंत आपल्याला नोकरी आणि करियर यातील फरक कळत नाही तोपर्यंत ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण याचे महत्वही कळणार नाही. हल्ली नवतरूण - तरूणी असोत की अनुभवसंपन्न लोकं - त्यांना वाटतं आता अभ्यास पुरे, भरपूर केलाय, आता कशाला उगीचच नसता त्रास.
हल्ली जरी अशी परिस्थिती असली तरी वीसेक वर्षापुर्वीचं आमचं जग वेगळं होतं. त्या काळात सुरूवातीपासून ट्रेनिंग, वाचन, अभ्यास आणि नवनिर्मिती याचे महत्व सांगणारी लोकं, कंपन्या भेटत गेल्या म्हणून आज हा लेख लिहतोय.
कामाचा पहिला दिवस
आम्ही काही मित्र कॉलेजमधून बाहेर पडलो आणि बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून कामाला लागलो. त्या नोकरीतील प्रशिक्षणाचा अनुभव मला अजूनही स्पष्ट आठवतो.
कामाचा पहिलाच दिवस होता, जॉईनिंग डॉक्युमेंटेशन पुर्ण झालं आणि मी खिशात हात घालून फॅब्रिकेशन वर्कशॅापकडे पहात होतो. तेवढ्यात तिथले एक मोठे साहेब मला हातवारे करून खर्जात आवाज काढत म्हणाले ….. “ तुम्ही बागेत किंवा लग्नाच्या फोटोशुट साठी उभे नाहीत, खिशात हात घालून उभे राहू नका, आत जा आणि काम करा!”
तिथून आम्हा ट्रेनी इंजिनियर्ससाठी एक जागा दिली होती तिथे माझ्या बॉसचा कॉल आला त्यांनी मला त्यांच्या केबिनमधे बोलावले. त्यांनी सांगितले की आता इथूनपुढे सहा महिने मी अजिबात या ऑफीसमधे बसायचे नाही.
त्याऐवजी दररोज सकाळी शॅाप फ्लोअरवर जावून तिथेच काम करायचे. प्रोडक्शन, मटेरिअल, स्टॉक, टेस्टींग आणि प्रत्यक्ष कामगारांच्या सोबत राहून काम करायचे
.
याहूनही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मी जीन्स - टीशर्ट किंवा फॅार्मल ड्रेसच्या ऐवजी दररोज बॉयलर सूट (शॅापफ्लोअर वरील कामगारांचा गणवेश) घालायचा, सेफ्टी शूज, हेल्मेट आणि डायरी कंपल्सरी सोबत असायला हवी.
फक्त काही पुस्तकं, फाईल्स, पेपर्स हवे असतील तरच ऑफीसमधे यायचे तेही ताबडतोब काम झालं की पुन्हा परत जायचे.
क्षणभर मला वाटलं की मी खरंच चांगल्या कंपनीत आहे ना???
बॅायलर सुट घालून दिवसभर हेल्पर आणि कामगारांसारखे काम करताना मी काय डोंबलाचे इंजिनियरिंग शिकणार? हेच करायचे होते तर वेल्डर, फिटर झालो असतं तरी पुरे होतं की. मी इंजिनिअरींग करून हे काय करतोय? आणि माझ्या आयुष्यात काय चालले आहे?
धडपड शिकण्याची
एक ना अनेक भयंकर प्रश्न पडायचे, पहिले दोन-तीन दिवस सरळ सरळ अन्याय वाटायचा, मी उगीचच ही कंपनी जॅाईन केली असं वाटत रहायचं. माझा नक्की रोल काय हेच कळायचे नाही. माझ्यासोबत ते इतर अनेक मंडळी आली होती - एक एक करत निम्याहून अधिक आठ-पंधरा दिवसात सर्व कामावर यायचे बंद झाले. मी आणि एकदोन मित्र मात्र प्रयत्न करत कसेबसे टिकून होतो.
शिकायचा प्रयत्न करत होतो. विविध उत्पादने नक्की कशी बनवली जातात? त्याचा दर्जा कसा ठरतो? वेल्डिंगचे प्रकार नक्की कोणते ? मटेरियल इनवर्ड - आउटवर्ड प्रोसेस, त्याचे महत्व तसेच तांत्रिक संज्ञा हे समजून घेत होतो.
आमचे साहेब आठवड्यातून एकदा तासभर ऑफीसमधे बोलावून त्याबद्दल विविध प्रश्न विचारायचे, डोक्यात काहूर माजवायचे…. मग पुन्हा आत जायचं ते शिकायचं, घरी त्याबद्दलची पुस्तक वाचायची. रोज नवे प्रश्न - नवी उत्तर असायची.
सुरूवातीला कामगार थट्टा करायचे, काही सांगायचे नाहीत. नंतरनंतर बरे बोलायला लागले. एकत्र जेवण, गप्पा, विनोद आणि आपलेपणा आला. ज्या बॉयलरसुटचा तिटकारा वाटायचा तो बॅायलरमधे जावून ॲज बिल्ट ड्रॉईंग काढताना हवा हवासा वाटायचा. मोटार, पुल्ली, फ्लॅंज, पाईप्स, ट्यूब्स, व्हॅाल्व, प्रेशर गेजेस, सेफ्टी फिटींग्स जणू आपल्याशी गप्पा मारताहेत, प्रत्येकजण आपल्याला येऊन ओळख सांगतेय असं वाटायच….. आपणही जावून रोज एका वस्तूशू गप्पा मारतोय आणि रोज एक नवी ओळख वाढवतोय, शिकतोय असं वाटायचं.
...आणि वेगळी ओळख मिळाली
जवळपास सहा महिन्यांनंतर मला ऑफिस मधे बसायची परवानगी दिली. एक टेबल आणि खुर्ची मिळाली. प्रॉडक्शन टिमचा मी एक भाग बनलो. इतकचं नाही तर फॅक्टरी मीटिंगमध्येही साहेब मला बसवायचे.
त्या सहा महिन्यात प्रत्येक मशीन ऑपरेटर, प्रत्येक कामगार, नक्की कोणती वस्तू कुठे ठेवलीये याची खडा न खडा माहिती माझ्या मेंदूत फिट झाली होती. प्रत्येक गोष्टींचा स्टॅाक, त्याचा दर्जा चेक करण्याच्या पद्धती यात काही अमुलाग्र बदल मी ट्रेनी इंजिनियर असताना केले आणि त्यामुळेच मला एक वेगळी ओळखही मिळाली.
शॅाप - फ्लोअरवर माणसं असो की मटेरियल तिथे मला नेटवर्क तयार करता आलं, आणि तिच माझी ओळख बनली.
त्या दिवसात मला कामगारांची मानसिकता, भाषा, त्यांच्या अपेक्षा, सबबी, आणि चांगुलपणही कळाले. कंपनीतील मालाच्या त्रुटी, चांगल्या पद्धती, दर्जा तसेच अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिल्या सहा महिन्यात मिळून माझ्या फक्त ५ सुट्ट्या होत्या त्यातही तीन दिवस कंपनी बंद होती म्हणून घेतलेल्या. अगदी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही मी मेंटेनंन्स टिमसोबत काम करत बसायचो.
प्रामाणिकपणाला जगात किंमत आहे
आजकाल कोणत्याही कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण ही अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक आहे. योग्य स्किल्स, अभ्यास करण्याची तयारी आणि काम करण्याची मानसिकता असेल तर नक्कीच कार्यक्षम आणि गुणात्मक करियर घडते.
उद्योग असो, कॉर्पोरेट असो की खाजगी नोकरी आता काळ फार बदलला आहे, स्पर्धा वाढलीये. करियरच्या सुरूवातीच्या काळात कमीतकमी सुट्ट्या आणि जास्तीत जास्त शिकण्यावर भर द्यायला हवा.
विविध कॅान्फरन्सेस, प्रेझेटेशन्स आणि आव्हानात्मक कामे स्विकारण्याकडे ओढा असायला हवा. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यातील विविध मासिके, पुस्तक तसेच संशोधनात्मक लेख सतत वाचायला हवेत. नवनवे शब्द शिकायला हवेत. तसेच विविध तंत्रज्ञ, आपल्या जाणकार व अनुभवी लोकांशी चर्चा करत रहायला हवी. पुस्तक आणि माणसं सोबत असतील तर खुप कमी वेळात चांगल्या प्रकारे अनुभव आणि ज्ञान मिळते.
इतर कोणत्याही प्रकारे राजकारण करत राहिल्याने किंवा पटापट नोकरी बदलल्याने तत्कालिन लाभ मिळू शकतात परंतु दूरगामी यशासाठी आणि प्रगतीसाठी कष्टाला, निष्ठेला, मेहनतीला - ज्ञानार्जनाशिवाय पर्याय नाही. जगातील बलाढ्य - मोठ्या कंपन्याचे लिडर्स हे त्यांच्याकडेच ट्रेनी ते CEO प्रवास केलेले असतात!
निष्ठेला, बुद्धीला आणि प्रामाणिकपणाला या जगात १००% चांगली किंमत आहे, आपले काम चोख करत रहा, यश नक्की मिळते.
औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या केल्विन आणि लिक्विगॅस या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष
...
(यशस्वी उद्योजक’चं बुलेटिन/ लेख/व्हिडीओ / WhatsAppवर मिळविण्यासाठी हा 9156264646 नंबर सेव्ह करा आणि फक्त Yes असा मेसेज करा.)
Notice: This site uses cookies to provide necessary website functionality, improve your experience and analyze our traffic. By using our website, you agree to our legal policies.