जपानचं हे वर्क कल्चर घ्या आणि वायफळ खर्च टाळा
ताज हॉटेल ग्रुपने जपानमधील श्री मसाकी इमाई यांना हॉटेलच्या स्टाफसाठी एक कार्यशाळा (Workshop) घेण्यासाठी आमंत्रित केले होते. हॉटेलमधे काम करणार्या लोकांच्या मनांत अनेक शंका-कुशंका येत होत्या. त्यांच्या मते ताज ग्रुपमधील सर्व हॉटेल्स उत्तम कामगिरी करीत होती. तसेच श्री मसाकी, यांना हॉटेल व्यवस्थापनाचा कसलाच अनुभव नव्हता. मग ते काय सांगणार, काय शिकवणार असे सगळ्यांना वाटत होते. तरी देखील सर्वजण सकाळी 9 वाजता कॉन्फरन्स हॉलमधे जमा झाले. आधी श्री. मसाकी यांची ओळख करुन देण्यात आली. अत्यंत साधी आणि सरळ राहणी! इंग्रजी सुद्धा जेमतेमच. बर्याच वेळा इंग्रजी मधून बोलताना अडखळत होते.
'गुड मॉर्निंग! चला आपण कामाला सुरवात करु या! मला सांगितले आहे की हे 'वर्कशॉप' आहे. पण येथे मला तर कोणतेही 'वर्क' किंवा 'शॉप' दिसत नाही. तर ज्या ठिकाणी प्रत्यक्ष काम चालते तेथून आपण सुरवात करु या! आपण पहिल्या मजल्यावरच्या पहिल्या रुमपासून सुरूवात करु या!'
हॉटेलचे वरिष्ठ अधिकारी, वर्कशॉपला आलेले सर्व कर्मचारी, व्हिडीओ शुटींगसाठी आलेले कॅमेरामन सगळे श्री मसाकीच्या मागोमाग बाहेर पडले आणि पहिल्या मजल्यावरील पहिल्या खोली जवळ आले. ती लॉन्ड्री रुम निघाली. श्री मसाकी यांनी खोलीत प्रवेश केला. खिडकीतून बाहेर पाहिले आणि म्हणाले' वा! काय सुंदर दृष्य दिसत आहे नाही?' अर्थात हॉटेलच्या सर्वांनाच हे माहीत होते. त्यासाठी एखाद्या जपानी सल्लागाराची काही आवश्यकता नव्हती. 'इतक्या सुंदर रुमचा तुम्ही लॉन्ड्रीसाठी उपयोग करुन तुम्ही ही रुम वाया का घालविता? लॉन्ड्री खाली तळघरामधे नेता येईल आणि या रुमचे रुपांतर गेस्ट रुममधे करा!'
व्यवस्थापक म्हणाले,' होय असे करता येईल!'
'मग चला तसे करु या!' श्री मसाकी म्हणाले.
'होय! मी या वर्कशॉपच्या रिपोर्टमधे हा मुद्दा आवश्यक घालेन.' व्यवस्थापकम्हणाले.
'माफ करा! पण हा मुद्दा नुसताच रिपोर्टमधे लिहिण्याचा नाही! आपणच ही गोष्ट करूया! लगेच! आत्ताच्या आत्ता.' श्री मसाकी म्हणाले.
'काय, आत्ता, लगेच?' व्यवस्थापक म्हणाले.
'होय! लगेच बेसमेन्टमधील जागा निवडा! या खोलीतील सामान ताबडतोब खाली घेवून चला! दोन एक तासांमधे हे काम होऊ शकेल नाही का?' श्री मसाकीनी विचारले.
'होय' व्यवस्थापक म्हणाले.
'आपण दुपारच्या जेवणाआधी येथे भेटू या! तोपर्यंत या खोलीमधील सर्व सामान खाली आणून झाले असेल. तसेच ही रुम फर्निचर, कार्पेट्ससह तयार व्हायला हवी. आज रात्रीपासूनच तुम्ही ही रुम भाड्याने देऊन पैसे कमवायला सुरूवात करायला हवी.'
'ठीक आहे सर!' व्यवस्थापक म्हणाले. कारण त्यांना दुसरा कोणताच पर्याय नव्हता.
नंतर ते सगळे पॅन्ट्रीमधे गेले. तेथे दारातच दोन भले मोठे हौद होते आणि त्यात न धुतलेल्या प्लेट्सचा ढीग पडला होता. श्री मसाकीनी कोट काढला आणि स्वतः प्लेट्स धुवायला सुरूवात केली.
'सर! तुम्ही हे काय करीत आहात?' व्यवस्थापक साहेबांनी विचारले. तो बिचारा पार गोंधळून गेला होता.
'काम? मी प्लेट्स साफ करीत आहे!' श्री मसाकिंनी उत्तर दिले.
'पण सर! आमच्या येथे प्लेट्स धुण्यासाठी वेगळा स्टाफ आहे'. व्यवस्थापक म्हणाले. त्याकडे दुर्लक्ष करीत श्री मसाकी म्हणाले, 'हे हौद प्लेट्स धुण्यासाठी आहेत. शेजारीच धुतलेल्या प्लेट्स ठेवण्याचे स्टॅन्ड आहेत. या सगळ्या प्लेट्स धुवून, स्वच्छ होऊन त्या स्टॅन्डमधे गेल्या पाहिजेत.'
अधिकाऱ्यांना वाटले- हे आम्हाला जपानी सल्लागाराने सांगायची वेळ यावी..?
प्लेट्स धुण्याचे काम संपल्यावर श्री मसाकी यांनी विचारले, 'तुमच्याकडे अशा किती प्लेट्स आहेत?'
'पुष्कळ, कमी पडू नयेत म्हणून!' व्यवस्थापक साहेबांनी माहिती दिली .
श्री मसाकी म्हणाले, 'जपानी भाषेत एक शब्द आहे 'मुडा'. मुडा म्हणजे दिरंगाई. मुडा म्हणजे वायफळ खर्च! मुडा म्हणजे वेळेचा आणि पैशांचा अपव्यय! या वर्कशॉपमधे आपण काय धडा शिकायचा आहे तर दिरंगाई आणि वायफळ खर्च कसा कमी करता येईल हा! तुमच्याकडे पुष्कळ प्लेट्स असतील तर प्लेट्ससफाईच्या कामात दिरंगाई होऊ शकते. ही परिस्थिती सुधारण्याचे पहिले पाऊल म्हणजे ज्या प्लेट्स जास्त आहेत त्या काढून टाकणे.'
'होय! मी माझ्या अहवालामध्ये तसे मी नमूद करीन' व्यवस्थापक म्हणाले.
'नाही! अहवाल लिहिण्यामध्ये वेळेचा अपव्यय करणे हे सुद्धा 'मुडा' चेच लक्षण आहे. आपण आत्ताच्या आत्ता ज्या ज्यादा प्लेटस आहेत, त्या एका बॉक्समध्ये घालू या आणि या हॉटेलच्या ज्या इतर डिपार्टमेन्टसना या प्लेट्सची आवश्यकता आहे, त्यांना देऊ या. आता या संपूर्ण वर्कशॉपमधे आपण हा 'मुडा' कोठे कोठे दडून बसला आहे ते शोधून काढणार आहोत.'
त्यांनतरच्या प्रत्येक भागामध्ये सर्वजण हा 'मुडा' शोधण्यात आणि तो कसा काढून टाकता येईल याचा विचार करण्यात दंग होते.
शेवटच्या दिवशी मकाईंनी एक गोष्ट सांगितली.
'शिकारीची आवड असलेला एक जपानी आणि एक अमेरिकन जंगलात भेटले. ते दोघे घनदाट जंगलात शिरले आणि अचानक त्यांच्या लक्षात आले की बंदुकीमधील गोळ्या संपल्या आहेत. तेवढ्यात त्यांना सिंहगर्जना ऐकू आली. दोघांनी पळायला सुरवात केली. पण जपानी मधेच थांबला आणि त्याने त्याचे स्पोर्ट शूज चढविले.
अमेरिकन म्हणाला, 'तू काय करतो आहेस! आधी आपण माझ्या वाहनाजवळ पोहोचायला हवे.'
जपानी म्हणाला, 'मी सतत तुझ्या पुढे असेन याची मी काळजी घेतो आहे.'
कारण जपानी माणसाला ठाऊक होते की जर सिंहाने हल्ला केलाच तर तो मागे राहिलेल्या माणसावर करील. मग त्याची भूक तृप्त झाल्यावर तो पुढे असलेल्या माणसावर हल्ला करणार नाही आणि पुढे असलेला माणूस सुरक्षित राहील.
'या गोष्टीचा सारांश असा ही हल्ली जगात स्पर्धा एवढी तीव्र झाली आहे की तुम्ही इतरांपेक्षा, दोन पावले कां होईना, सतत पुढे राहिलात तरच तुमचा निभाव लागेल. आज तुमच्याकडे भरपूर नैसर्गिक संपत्ती असलेला प्रचंड मोठा देश आहे. तुम्ही जर तुमचे खर्च कमी केलेत आणि सतत उत्कृष्ट ते देण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही इतर देशांच्या तुलने मध्ये कितीतरी पुढे जाल.'
एवढे बोलून श्री मसाकी यांनी या वर्कशॉपचा समारोप केला.
(श्री.प्रभाकर जोशी व श्री. अजित गद्रे यांच्या सौजन्याने)
व्यवसायात अकाउंट्समधील नोंदी व्यवस्थित कशा ठेवाव्यात यासाठी deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. अधिक माहिती- Accounting Services
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.
उल्हास जोशी
joshiulhas5@gmail.com