एका सेल्फीने दिली कोल्ड्रींगचा अस्सल देशी ब्रँड तयार करण्याची आयडिया!
‘कॉफीचे ब्रँड होऊ शकतात, कोल्ड्रिंक्सचे ब्रँड होऊ शकतात; मग आपलं देशी पेय असलेल्या उसाच्या रसाचा ब्रँड का होऊ शकत नाही?’ असा प्रश्न किर्ती आणि मिलिंद दातार यांना पडला. पण ते तिथेच थांबले नाहीत. त्यांनी उसाच्या रसाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा, त्याला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचा निर्धार केला. त्यातून ‘केनबॉट शुगरकेन ज्युस’ हा ब्रॅंड उदयाला आला. ही एका इनोव्हेटिव्ह उद्योगाची तसंच अॅग्रीटेक क्षेत्रात केलेल्या न भूतो अशा संशोधनाचीही कहाणी आहे.
किर्ती आणि मिलिंद पुण्यातल्या एका आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत होते. तिथेच त्यांची ओळख झाली. पुढे त्यांनी लग्न केलं. दोघे एकदा ऑफिसजवळ एका रसवंतीगृहात उसाचा रस पित होते. तेव्हा त्यांनी समोर काही मुलांना स्टारबक्सची कॉफी हातात धरून सेल्फी काढताना पाहिलं. ऊसाच्या रसाबाबतीत असं कोणी का करत नाही, ऊसाच्या रसाचा ब्रँड तयार होऊ शकतो का? कॅफे तयार होऊ शकतात का? असे प्रश्न त्यांना पडले. त्या विषयावर दोघांनी पुढे चर्चा सुरू ठेवली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की संपूर्ण भारतात ऊसाच्या रसाच्या बाबतीत कोणीच असे प्रयत्न केले नाहीत.
ऊसाच्या रसाचा ब्रँड करण्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली
मग किर्ती आणि मिलिंद यांनी ऊसावर रिसर्च सुरू केला. त्यांनी उसाचा सखोल अभ्यास करण्यासाठी तमिळनाडूतल्या कोईमतूरमध्ये शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं. उसाच्या रसाचा ब्रँड तयार करणं शक्य आहे की नाही यावर दीर्घकाळ विचार करून त्यांनी या व्यवसायात उडी घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आपली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली.
कॅफे सुरू कुठे करायचं यावर चर्चा झाली. शेवटी त्यांनी कॉर्पोरेट कंपन्यांमध्येच व्यवसाय थाटण्याचा निर्णय घेतला. मिलिंद यांनी आयटीमध्ये ह्युमन रिसोर्स विभागात अनेक वर्षं काम केलं होतं. त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये त्यांची ओळख होती. अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी उसाच्या रसाच्या कॅफेसाठी थोडी जागा मागितली. पण सगळ्या कंपन्यांनीच हायजीनच्या कारणामुळे मिलिंद यांच्या प्रस्तावाला नकार दिला.
कंपन्यांमधल्या डिसिजन मेकर्सना ऊसाचा रस आवडला आणि सात ते आठ कंपन्यांनी हिरवा कंदील दाखवला
पण दातार दांपत्याच्या व्यवसायाची कल्पना पारंपारिक रसवंतीगृहाची नव्हती. या व्यवसायात त्यांना हायजिन मेंटेन करायचं होतं. उसाच्या रसाची पारंपारिक मशिन न ठेवता संपूर्ण बंद असलेलं मशिन ठेवायचं होतं. उस उघड्यावर न ठेवता बंद रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचा होता आणि नैसर्गिकरीत्या थंड असलेल्या उसाचा रस लोकांना द्यायचा होता. ही गोष्ट कंपन्यांना पटवून देण्यासाठी त्यांनी सगळ्या कंपन्यांमधल्या डिसिजन मेकर लोकांना एका प्रदर्शनामध्ये आपल्या उसाच्या रसाचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रण दिलं. तिथे सर्वांनाच उसाचा रस आवडला. पुढे सात ते आठ कंपन्यांनी ‘केनबॉट’ शुगरकेन ज्युस कॅफेला परवानगी दिली. या कॅफेसाठी दातार दांपत्याने सेमीऑटोमॅटिक मशिन्स इम्पोर्ट केल्या.
हायजीन, उत्कृष्ट गुणवत्ता आणि न बदलणारी चव यामुळे केनबॉट कॅफे जोरात चालू लागलं
केनबॉट ज्युसची खासियत अशी होती की त्याची चव अजिबात बदलत नव्हती. पण ही चव मेंटेन ठेवण्यामागे दातार दांपत्याने केलेली खटपट असामान्य होती. चांगला उस वर्षभर मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी पुण्याच्या आसपासची ऊसाचं पिक घेणारी साधारण ९० गावं पालथी घातली. त्यातून चांगला उस वर्षभर पिकवणारं एक गाव शिक्कामोर्तब केलं. हायजीन, उत्कृष्ट गुणवत्ता आणि न बदलणारी चव यामुळे केनबॉट कॅफे जोरात चालू लागलं. लोक अक्षरशः एखाद्या रिच्युअलसारखं रोज ऊसाचा रस प्यायला कॅफेमध्ये यायचे. पुढे १५ ते २० कंपन्यांमध्ये या शुगरकेन ज्युसचे कॅफे सुरू झाले. पुढची सात ते आठ वर्षं केनबॉटने यशस्वी घोडदौड केली.
पण अशातच कोविड आला आणि पुण्यातल्या सगळ्याच आयटी कंपन्यांना टाळं लागलं. व्यवसाय शून्यावर आला. कोविड असला तरी कंपन्यांचं वर्कफ्रॉमहोम सुरू होतं. आपणही वर्कफ्रॉमहोम करून पुन्हा जॉबकडे वळायचं का असा विचार दोघांच्याही मनात येऊ लागला. पण मिलिंद सांगतात, “ऊसाचा रस या सांस्कृतिक पेयाला नवं रूप देऊन त्याला जागतिक स्तरावर घेऊन जायचं हे स्वप्न आणि ध्येय आम्हाला व्यवसाय करण्याकरता ऊर्जा देत राहिलं.”
पॅकेज्ड शुगरकेन ज्युस आणि फुल्ली रोबोटिक ऑटोमॅटिक शुगरकेन ज्युस मशिनची निर्मिती केली
कोविडची लाट ओसरली तरी पूर्वीप्रमाणे आयटी कंपन्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे आयटी कंपनीत केनबॉट कॅफे पूर्वीसारखा चालणार नाही, हे दातार दाम्पत्याला पक्कं माहिती होतं. त्यांनी पुन्हा अभ्यास केला आणि पॅकेज्ड शुगरकेन ज्युस बाजारात आणले. तेही बाजारात चालू लागलं. त्यांच्या असं लक्षात आलं की कॉफीच्या व्हेंडिंग मशिनसारखंचं उसाच्या रसासाठी व्हेंडिंग मशिन बनवता येऊ शकतं. त्यांनी अशाप्रकारच्या मशिनबाबत संशोधन केलं. असंमशिन तोपर्यंत कोणीच बनवलं नव्हतं. त्यांनी फुल्ली रोबोटिक ऑटोमॅटिक शुगरकेन ज्युस मशिनची निर्मिती केली. ऑनलाईन पेमेंट घेऊन उस घालण्यापासून ते ग्लासात रस भरून देण्यापर्यंत सगळंच काम मशिन करणार होतं. महत्त्वाचं म्हणजे या मशिनचं दातार दांपत्याने पेटंटही मिळवले. पॅकेज्ड शुगरकेन ज्युसचा व्यवसाय सुरू असताना त्यांनी ही मशिन अधिकाधिक निर्दोष केली.
स्टार्टअप इंडियाच्या एका योजनेतून काही लाखांची इन्वेस्टमेंट मिळवण्यात यश आलं
किर्ती आणि मिलिंद यांना मॉल्स आणि एअरपोर्ट्स यांसारख्या अनेक ठिकाणी अशी मशिन्स सुरू करायची होती. पण यासाठी बरंच भांडवल लागणार होतं. त्यासाठी ‘शार्क टॅंक इंडिया’च्या स्टेजवर त्यांनी एंट्री मिळवली. शार्क टॅंक इंडिया चांगल्या स्टार्टप्समध्ये पैसे इन्हवेस्ट करते. तिथे पॅकेज्ड ज्युस आणि मशिन हे दोन्ही प्रॉडक्ट्स त्यांनी सादर केले. पण इथे इन्हवेस्टमेंट मिळवण्यात त्यांना यश आलं नाही. पण शार्क टॅंकच्या शार्क्सकडून दोन्हीपैकी कोणत्यातरी एकाच प्रॉडक्टवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांना मिळाला. त्यांनी या सल्ल्याचा गांभीर्याने विचार केला आणि आपलं पॅकेज्ड ज्युस थांबवून पूर्ण फोकस फुल्ली रोबोटिक ऑटोमॅटिक मशिनवर केला. त्यानंतर स्टार्टअप इंडियाच्या एका योजनेतून त्यांना काही लाखांची इन्वेस्टमेंट मिळवण्यात यश आलं.
ऊसाच्या रसाला राष्ट्रीय पेय बनवून जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचं स्वप्न
दातार दांपत्याने फुल्ली ऑटोमॅटिक रोबोटिक मशिनची मॉकटेस्ट घेतली आणि ती यशस्वीपणे पार पडली. ‘केनबॉट’ कंपनीच्या व्यवसायात आतापर्यंत अनेक चढउतार आले, काही बदल झाले. पण इनोव्हेशनच्या पातळीवर कॅनबोटने एक मोठी झेप घेतली. किर्ती आणि मिलिंद यांनी आपला उमेदीचा काळ उसाच्या रसामध्ये नवं काहीतरी करण्यामध्ये खर्च केला. जगभरात उसाचा रस बनवण्याचं कोणीच तयार केलं नाही असं मशिन त्यांनी बनवलं.
ज्या आयटी कंपन्यांमध्ये पूर्वी सेमीऑटोमॅटिक मशिन होतं त्याच कंपन्या आता फुल्ली ऑटोमॅटिक मशिनची वाट बघतायेत. दातार दांपत्याला आता ठिकठिकाणच्या मॉल्समध्ये आणि एअरपोर्ट्समध्ये हे मशिन्स ठेवायचे आहेत. त्याउपरही ऊसाच्या रसाला राष्ट्रीय पेय बनवून त्याला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचं स्वप्न आहे.
संपर्क - ९८५०८३०७५०
deAsra फाउंडेशन उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचं काम करते. deAsraकडे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. अधिक माहिती - Expert consultation
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.
तुषार कलबुर्गी
tusharkalburgi31@gmail.com