छंद म्हणून अमेरिकेत सुरूवात, आता भारतात वाढतोय व्यवसाय
स्मिता योगेश ब्रह्मे मुळच्या वाईच्या, कायद्याचे शिक्षण पूर्ण झाले, लग्न करुन त्या पुण्यात आल्या. लगेचच यजमानांबरोबर अमेरिकेत गेल्या. तेव्हा त्यांची मुलगी शर्वरी लहान होती. तिच्या भोवती स्मिता यांचे सगळं जग फिरत होते. तरीही स्मिता यांच्या रक्तात असलेली कला संधी शोधत होतीच मग ती संधी पार विदेशात असताना मिळाली तर काय हरकत आहे? अमेरिकेच्या वास्तव्यात स्मिता यांना अशीच संधी मिळाली. मुलीच्या संगोपनात सगळा वेळ जात होता तरी मुळचा कलाकाराचा पिंड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. स्मिता तिथे चित्रकलेचे क्लासेस घेत होत्या. त्याचजोडीला विविध प्रकारचे केक बनवणे देखील चालू होते.
‘डॅाट पेंन्टिग’ पासून स्मिता यांनी व्यवसायास सुरवात केली असली तरी त्यापूर्वी त्यांनी आवड म्हणून मोराचे पेंन्टिग केले होते, अमेरिकेत ते लगेचच विकले देखील गेले. त्यामुळे त्यांना जितका आनंद झाला तितकाच हुरुप देखील आला. लगेचच त्यांनी ‘डॅाट पेंन्टिग’ पासून कलाकृती करायला सुरवात केली.
डॅाट पेंन्टिग म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे गोल काढणे. असे रंगीबेरंगी डॅाट/गोल काढून विविध गोष्टी सजवायच्या. यासाठी ॲक्रेलिक रंग वापरले जातात. किचेन, कि होल्डर, वॅालपीस, फ्रीज मॅग्नेट, घड्याळ, नेमप्लेट, पेनस्टॅन्ड. अशा कितीतरी सजावटीच्या तसंच उपयुक्त गोष्टी स्मिता तयार करतात आणि यांत सतत नवनवीन गोष्टींची भर पडतच असते.
सुरवातीला याची काही वेगळी टूल्स असतात याची कल्पना स्मिता यांना नव्हती, त्यामुळे काडी, पिना, पेन्सिल असं वापरुन त्यांनी मनातल्या कलाकृती साकारायला सुरुवात केली. इंटरनेटवरचे व्हिडिओ बघून बघून त्या शिकत होत्या. एकदा बेसिक माहिती झाल्यावर मात्र स्मिता यांनी स्वत:ची वेगवेगळी डिझाईन तयार केली. डॅाट पेन्टिंग व्यवसायास स्मिता यांनी सुरवात केली ते साल होते २०१७. यावेळी भारतात ही गोष्ट फारशी माहिती नव्हती. परदेशात काही ठिकाणी स्मिता यांनी यापासून बनवलेल्या गोष्टी पाहिल्या होत्या, ते पाहूनच आपणही असं करुन बघूया असं म्हणत कलाकृती बनवायला सुरवात केली. नंतर स्मिता भारतात परतल्या आणि इथे आपल्या व्यवसायास जोमाने सुरवात केली. ॲमेझॅानवरून डॅाट पेंन्टिग टूल्स मागविली आणि काम सुरु केले. या टूल्स सेट मधे विविध आकाराचे अगदी लहान ते मोठ्या आकाराचे गोल असतात. ते रंगात बुडवून हवी तशी कलाकृती सजवायची असते.
स्मिता यांनी त्यांच्या कलाकृतींची ‘इश्मितयोग’ डॅाट-पेंन्टिग आर्टिकल्स नावाने विक्री करायला सुरवात केली. ‘ईश्मितयोग’ या नावात स्मिता यांच्या दोन मुली ईश्वरी आणि शर्वरी, यजमान योगेश यांची नावे गुंफून हे नाव त्यांची मैत्रिण विभावरी हिने तयार केले आहे.
स्मिता यांच्या क्रियेटिव्ह माइंड मधे सतत वेगवेगळी डिझाईन आकार घेत असतात.त्याप्रमाणे त्या पुण्यातील रविवार पेठेमधल्या एका कारागिराकडून तसं लेझर मशीनवर कटिंग करुन घेतात. वस्तू कोणती आहे यांवर किती जाडीचा बोर्ड वापरायचा ते ठरते. पहिल्यांदा त्यावर वॅाश द्यायचा. तो व्यवस्थित वाळला की मग वेगवेगळ्या आकाराचे डॅाटस् वापरून निरनिराळ्या रंगामधे डोक्यात जशी डिझाईन तयार होतील, ती हाताने यांवर उतरावयाची. हे सगळ्यात कुशलतेचे काम. त्यानंतर सगळ्या वस्तूंवर वॅार्निश द्यायचा, त्यामुळे ती वस्तू/ कलाकृती टिकायला मदत होते आणि अधिक चमकदार दिसायला लागते. बाहेरील हवामानाप्रमाणे वॅार्निश वाळू द्यायचा. फायनल प्रॉडक्ट तयार होईपर्यंत त्यामागे बरीच प्रोसेस आहे, पुढे त्याचे व्यवस्थित पॅकिंग, ग्राहकाच्या योग्य त्या पत्यावर वेळेत डिलिव्हरी करणं. ही कामे मदतनीसांच्या मदतीने केली तरी मूळ काम स्मिता स्वत: करतात. कारण हे काम कुशलतेचे आहे. मदतनीसांमधे मुख्य मदत असते ती त्यांचे यजमान योगेश यांची.. घरचा संपूर्ण सपोर्ट स्मिता यांना कायमच मिळत असतो.
करोना नंतर बरेचजण डॅाट पेन्टिंग करु लागले, आता या क्षेत्रात स्पर्धा आली आहे. त्यामुळे नवनवीन गोष्टी करत रहाणं, ग्राहकांना आवडतील त्याचबरोबर उपयोगी पडतील अशी डिझाईन बनवणं, सतत करावे लागते.
मागच्या वर्षी गौरी-गणपती, दिवाळी काळात रेडिमेड रांगोळ्या केल्या. घर सजावटीसाठी उपयुक्त असल्याने त्यावर ग्राहकांच्या उड्या पडल्या. यानंतर मात्र स्मिता यांनी मागे वळून पाहिले नाही. बाजारात मिळणा-या प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा विकत आणून त्यातील एकेक फुल सोडवून घ्यायचे. मग आपल्या मनातील छान छान डिझाईन बोर्डावर काढून त्यांवर ही फुले चिकटावयाची, ती व्यवस्थित वाळू द्यायची. रंगसंगती, आकार, साईज ठरवायचा.हे काम कुशलतेचे आहे. ग्राहकांना हव्या त्या आकारात आणि रंगात अशी रांगोळी करुन दिली जाते.
दसरा सणाच्या निमित्ताने स्मिता यांनी बनवलेल्या सरस्वती पाटीचे फ्रिज मॅग्नेट अतिशय फेमस झाले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कदाचित या प्रकारच्या सरस्वतीची सुरवात त्यांनीच सुरु केली असावी. आता अशा प्रकारच्या सरस्वती बाजारात बरेचजण करताना दिसतात. पण स्मिता यांच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या सरस्वती हॅन्डमेड आहेत. स्वत: हाताने त्यावर काम केलेले आहे.
स्मिता यांच्या यशात, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यत पोहचण्यास सोशल मीडियाचा सहभाग आहे. घे भरारी, कलादालनसारखे प्लॅटफॅार्म नवीन व्यवसायाला आणि त्याचं जोडीला व्यवसायिकाला उभारी देतात.
आत्तापर्यत स्मिता यांच्या कलाकृती महाराष्ट्रात बरेच ठिकाणी, महाराष्ट्राच्या बाहेर तसंच परदेशात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी इथपर्यंत गेल्या आहेत. मुख्य म्हणजे आज स्मिता यांच्या कडे तोच ग्राहक पुन्हा पुन्हा त्याची मागणी नोंदवत आहे, हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे त्या मानतात. सण-समारंभ, संक्रांतीचे वाण, वास्तुशांत, वाढदिवस अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमात लोकांना भेटवस्तू देण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप उपयोगी पडतात. परत या सगळ्या कलाकृतीच्या किंमती देखील माफक आहेत. दिवाळी, दसरा, नवरात्र या सारख्या सणांच्या वेळी ग्राहकांकडून अधिक मागणी असते, त्याकाळात जास्त विक्री होते, तरीही वर्षभर काही ना काही कारणाने मागणी सुरु असल्याने महिना बावीस ते पंचवीस हजारांपर्यंत कमाई होत असते.
गणपती उत्सव, दिवाळीचा सणाच्या निमित्ताने करोना नंतर वेगवेगळी प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती. स्मिता यांच्यासारख्या अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांना यामधे संधी मिळाली. प्रदर्शनातून अनेक लोकांपर्यत स्मिता यांनी बनवलेल्या वस्तू पोहचल्या.. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ग्राहक मागणी नोंदवून ठेवतात यामुळे हुरुप येतो आणि मग स्मिता जोमाने कामाला लागतात. फेसबुकवरच्या पोस्ट वाचून लोक कुठूनकुठून फोन करतात, कामाचे कौतुक करतात. त्यांच्या मागणीनुसार त्या त्या गोष्टी त्यांच्यापर्यत स्मिता कुरीयर मार्फत पोहचवतात. यासाठी पुण्यातील काही कुरीयर कंपन्यांची सेवा त्या घेतात.
स्मिता यांना भविष्यात टप्प्याटप्याने व्यवसाय वाढवायचा आहे, मॅालमधे, गिफ्टच्या दुकानात या सगळ्या गोष्टी ग्राहकांच्या सोयीसाठी विक्रीस उपलब्ध करुन द्यायच्या आहेत.त्यांची त्यादृष्टिने हळूहळू तयारी सुरु आहे. तसंच पुढे भविष्यात डॅाट पेंन्टिगची वर्कशॅाप घेण्याचा स्मिता यांचा विचार आहे. जेणेकडून ही कला जास्तीत जास्त लोक शिकून घेतील. डॅाट पेंन्टिग मधे राजस्थानी माणूस स्मिता यांनी केला होता, एका ग्राहकाच्या सांगण्यानुसार मराठी माणूस नुकताच तयार केला आहे. तसंच राजस्थानी माणसाबरोबर राजस्थानी स्त्री देखील आली. यंदा गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने गुढीचे छानसे फ्रीज मॅग्नेट स्मिता यांनी केले. पहिली केलेली मॅग्नेट जाहिरात करायच्या आतच विकली गेली. आता मागणी प्रमाणे पुरवठा करायला स्मिता सज्ज झाल्या आहेत. थोड्याच कालावधीत नावारुपाला आलेल्या ईश्मितयोगच्या विविध कलाकृती ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत, यामागे स्मिता यांची सृजनशीलता तसंच कष्ट करण्याची तयारी दिसून येते.
स्मिता ब्रह्मे संपर्क नंबर-7972649832
व्यवसाय सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल तर त्यासाठी कर्ज घेणं आवश्यक असतं. deAsra फाउंडेशन कर्ज मिळवून देण्यासाठी सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. अधिक माहिती- Business Loan.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.
भाग्यश्री चौथाई
bac100372@gmail.com