Search

सांगा कसं जगायचं? गाणं म्हणत की कण्हत?

 स्वसंवाद याचा शब्दशः अर्थ स्वतःशी बोलणं. मजेचा भाग म्हणजे, पारंपारिक संकल्पनांमधे खरंतर स्वतःशीच बोलणाऱ्या व्यक्तीला वेडा वगैरे समजत असत. मात्र मानसशास्त्रातील अभ्यासानं, संशोधनानं जाणीवपूर्वक केलेला निरोगी स्वसंवाद हा किती सूज्ञपणाचं लक्षण आहे हे दाखवून दिलं.

 

तुमच्यापैकी अनेकांनी स्वसंवादाविषयी वाचलं व ऐकलं असेल. आपला सतत स्वतःशी मनातल्या मनात एक संवाद सुरू असतो. तो कधी वाक्यांच्या स्वरूपात असतो तर कधी फक्त एखाद्या शब्दाच्या वा कधी क्षणार्धात विजेसारख्या चमकून जाणाऱ्या भावनेच्या स्वरूपात. तुम्ही अनुभवला आहे का हा स्वसंवाद?

 

हा स्वसंवाद आपल्या मानसिक कार्यक्षमतेच्या व आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची भूमिका निभावतो. आपल्याकडून येणारी कोणत्याही घटनेवरची प्रतिक्रिया वा प्रतिक्षिप्त भावना, विचार हे या स्वसंवादातून जन्म घेतात. थोडक्यात, आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचा व येणाऱ्या माहितीचा आपल्यासाठी अर्थ लावणं हे काम स्वसंवाद करतो. 

 

आणि तो प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा असू शकतो. आपल्याला पूर्वी आलेल्या अनुभवांनी व वारंवार मिळालेल्या स्वतःबद्द्लच्या व जगाबद्दलच्या माहितीने तो तयार होत जातो. उदाहरणार्थ, परिक्षेत १०० पैकी प्रत्येकी ८५ गुण मिळवणारे दोन विद्यार्थी, रमा आणि विमल, आपल्या स्वसंवादातून या एकाच घटनेचा वेगवेगळा अर्थ कसा लावतात ते पाहूया. 

 

रमाच्या मनातला स्वसंवाद, “मी करते आहे त्या प्रयत्नांना फारसं यश येत नाहीये अजून. मागच्या वेळी ८० पडले होते आता ९० तरी पडायला हवे होते. काय चुकतंय माझं तेच कळत नाही. का मी मुळातच बुद्धू आहे देव जाणे!” असा होता. तर विमलचा स्वसंवाद, “क्या बात है! मागच्या वेळेसपेक्षा ३ गुण जास्त मिळालेत. म्हणजे माझी मेहनत बरोब्बर दिशेने चालू आहे. आता पुढच्या वेळी अजून काही गुण जास्त मिळवूया.” काहीसा असा. यातून तुम्हालाही लक्षात येईल की कोणत्या प्रकारच्या स्वसंवादाने कोण खूष झालं असेल आणि कोण दुःखी. दुःखी होणं हे जरी वाईट नसलं तरी या नकारात्मक स्वसंवादाचा, प्रयत्न करूनही पुरेसं यश मिळत नसल्याच्या असमाधानापोटी प्रयत्नांवर व प्रगतीवर फारसा चांगला परिणाम होणार नाही हे स्पष्ट आहे. शिवाय त्यातून नकारात्मक भावना व कधी नकारात्मक वर्तन होण्याचीही शक्यता असते. जसं की निराशेनं अभ्यासच सोडून देणं, किवा चिडचिड करणं, अपेक्षाभंगाच्या रागात कोणाला काही टोचरं बोलणं, इत्यादी. याऊलट सकारात्मक स्वसंवादाचा उपयोग विमलने जसा सकारात्मक दृष्टीकोनाने केला, स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी केला, तो आपल्याला आनंदी व प्रगतीशील मानसिकता तयार करण्यासाठी उपयोगाचा आहे.

 

अनेक संशोधनांमध्ये सकारात्मक स्वसंवादाचे माणसाच्या विविध क्षेत्रातल्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम पहायला मिळाले आहेत. ग्रीसमधे झालेल्या एका संशोधनात ७२ टेनिसपटूंवर करण्यात आलेल्या संशोधनात हे दिसून आलं की, सकारात्मक स्वसंवाद वापरल्याने खेळाडूंची टेनिसची कामगिरी सुधारली आणि अॅंग्झायटीशी सामना करण्याची क्षमता देखिल सुधारली. स्वसंवादाचा अवलंब न केलेल्या खेळाडूंच्या गटात मात्र काहीही फरक दिसून आले नाहीत. शालेय विद्यार्थी, कॉर्पोरेट्स सारख्या ठिकाणी देखिल झालेल्या अभ्यासांमधे स्वसंवादाचे बरेच फायदे दिसून आले. समस्या सोडवण्यात सुधारणा, शाळा व कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्मिती, प्रत्यक्ष कामामधे व शैक्षणिक प्रगती, मानसिक तणाव कमी होणं, इतरांशी संवाद व नाती सुधारणं, मनात शांतता व आनंदी प्रवृत्ती वाढीला लागणं असे कितीतरी फायदे सकारात्मक स्वसंवादामुळे आपल्याला मिळू शकतात. 

  

कसा आत्मसात करायचा हा सकारात्मक स्वसंवाद तेही पाहू.

हा स्वसंवाद प्रत्येक वेळी आपल्याकडून जाणीवपूर्वक होतो असं नाही तर अनेकदा तो आपल्या नकळत होत असतो. आपल्याला जर ‘स्वसंवाद’ हा सकारात्मक मानसिकता तयार करण्याचं व प्रगतीचं साधन म्हणून वापरायचा असेल, तर मात्र तो जाणीवपूर्वक रुजवावा लागतो. त्यासाठी दोन सोप्या पायऱ्या तुमच्यासोबत शेअर करते.

 

पहिली पायरी म्हणजे आत्ता होत असलेल्या स्वसंवादाकडे डोळसपणे पाहणे. अवघड परिस्थितीत मनात होत असलेल्या संवादाचं, विचारांचं बारकाईनं निरीक्षण करणे. ही गोष्ट लिहून केलीत तर त्यात जास्त स्पष्टता व अचूकता येईल.

 

स्वसंवादाच्या रस्त्यात कुठे आहोत हे कळाल्यावर कुठे जायचंय ते बघूया.

दुसरी पायरी म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी त्या स्वसंवादामधे सकारात्मक बदल करावेसे वाटतात ते लिहून काढा आणि बदललेला, जाणीवपूर्वक वापरण्याचा स्वसंवादही लिहून काढा. आणि जाणीवपूर्वक हा सकारात्मक स्वसंवाद वापरण्याचा प्रयत्न करा.

 

स्वसंवाद हा वर्षानुवर्षे त्याच त्याच पद्धतीनं होत असल्यामुळे ती सवय बदलायला थोडा वेळ लागू शकतो मात्र सरावानं तो चांगल्या प्रकारे रुजवता येतो. तुम्ही कोणत्या ठिकाणी बदलणार आहात तुमचा स्वसंवाद? मला नक्की कळवा.

 

deAsraफाउंडेशन उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचं काम करते. deAsraकडे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. अधिक माहिती - BusinessPlanning and Ideas

 

अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्हीdeAsraसोबतसंपर्ककरू शकता.

 

डॉ. तेजस्विनी कुलकर्णी

dr.tejaswinikulkarni@gmail.com