Search

या सामील व्हा! MySBA ‘स्वावलंबी भारत अभियाना’ची सुरूवात

पुणे- नवीन रोजगार निर्माण करणं, बेरोजगारी कमी करणं आणि उद्योजकतेला चालना देणं यासाठीच्या महत्वाकांक्षी अभियानाला पुण्यातून आता सुरूवात झालीय. रविवारी (२१ ऑगस्ट) झालेल्या दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय केंद्रीय श्रम, रोजगार व पर्यावरण मंत्री भूपेंद्रसिंग यादव यांच्या हस्ते Mysba या पोर्टलचं लोकार्पणही झालं. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागांमध्येही नवीन रोजगाराची निर्मिती होत आहे. मात्र भारतच नव्हे तर जगभरात कौशल्य तुटवडा म्हणजेच स्कील गॅपची समस्या भेडसावत आहे, असे मत यादव यांनी व्यक्त केलं.

 

deAsra फाउंडेशन या अभियानात सहभागी आहे. या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, पर्सिस्टंटचे संस्थापक आणि deAsra फाउंडेशनचे अध्यक्ष डाॅ. आनंद देशपांडे, स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय संयोजक आर. सुंदरम, स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय संयोजक आर. सुंदरम, स्वदेशी जागरण मंचाचे अखिल भारतीय संघटन मंत्री कश्मिरीलाल व अखिल भारतीय सह संघटन मंत्री सतीशकुमार तसेच स्वावलंबी भारत अभियानाच्या राष्ट्रीय महिला समन्वयक अर्चना मीणा उपस्थित होते. तसेच उपस्थितांमध्ये रा. स्व. संघ आणि अन्य संघटनांचे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

 

यावेळी यादव म्हणाले, की कुठल्याही देशात रोजगाराची स्थिती कालसापेक्ष असते. देशातील आजची रोजगाराची स्थिती जगाच्या संदर्भात बघावी लागते. कोरोना नंतर रिमोट काम व फ्लेक्सिबल अवर या संकल्पना आल्या आहेत. कोरोना आणि नंतर युक्रेन युद्धाच्या परिस्थितीनंतरही आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे. गेल्या सहा महिन्यांत जीएसटी संकलन व पीपीएफ नोंदणी वाढली आहे.आता आपल्याला श्रमिकांना सामाजिक सुरक्षा देण्याचे व असंघटीत क्षेत्राकडून संघटीत क्षेत्राकडे जाण्यास प्रवृत्त करण्याचे काम करायचे आहे. रोजगार तयार होत आहेत मात्र अपेक्षेपेक्षा कमी रोजगार निर्माण होणे हे आव्हान आहे. केंद्र सरकारच्या धोरणांची माहिती देत ते म्हणाले, की, गिग वर्कला कामगार धोरणात जागा देणारा भारत हा पहिला देश आहे. मोठे शहरच नव्हे तर अस्पायरेशनल डिस्ट्रिक्टवरही आपल्याला लक्ष केंद्रीत करावे लागेल.

 

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशातील १२ कोटी लोकांना त्यांच्या रोजगारातून पुरेशी प्राप्ती होते नाही, त्यामुळे विकासात असमतोल निर्माण होतो. पारतंत्र्याच्या काळात लोकांना केवळ कारकून बनण्याचे शिक्षण देण्यात आले. सरकारी नोकरी म्हणजेच रोजगार ही मानसिकता आपल्याला दूर करायला हवी. संघाकडे असलेले जाळे, जिद्द आणि मेहनतीची तयारी अन्य कोणाकडेरी नाही, असेही त्यांनी नमूद केले.

 

deAsra फाउंडेशनचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे म्हणाले, “स्वावलंबी व सशक्त भारतासाठी उद्योजकता हा महत्त्वाचा घटक आहे. व्यवसाय सुरू करणे, चालविणे व तो यशस्वी करणे हे आव्हानात्मक काम आहे. उद्योजकता वाढावी व उद्योजकांना बघ मिळावा, हे आमचे उद्दिष्ट आहे.”

 

सतीशकुमार म्हणाले, “स्वावलंबी भारत अभियान ही भारताची जन आकांक्षा आहे. भारताचे जन-मन या अभियानाचे नेतृत्व करत आहे. भारतात किमान २० कोटी लोक गरीबी रेषेखाली राहतात. आपल्याला गरीबी रेषा शून्य टक्क्यांवर आणायचा संकल्प करावाच लागेल. भारत २०३० पर्यंत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल हा आमचा संकल्प आहे. भारतातील बेरोजगारी ही नैसर्गिक नसून भारतावर लादलेली आहे. मागील ५ वर्षांत बेरोजगारी कमी करण्यासाठी केवळ सरकारांनी प्रयत्न केले, सामाजिक - आर्थिक संघटनांनी केले नाहीत. त्यामुळे बेरोजगारी दूर झाली नाही येत्या आठ-वर्षांत बेरोजगारी दूर होईल.”

 

अर्चना मीणा म्हणाल्या की स्वावलंबी भारत अभियान हे मानसिकता परिवर्तनाचे अभियान आहे. बेरोजगारी हे आजचे सगळ्यात मोठे संकट आहे. आपल्याला नवा भारत बनवायचा नाही तर जुन्याच भारताला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे. आपला समाज कधीही भांडवलवादी किंवा बाजारकेंद्रीत नव्हता. कोरोना महामारीने उपजीविकेचे संकट उभे केले. मात्र त्यातून एक नवी संधी उत्पन्न झाली, असे आर. सुंदरम म्हणाले.

 

यावेळी राधेश्याम चोयल यांनी Mysba या पोर्टलची माहिती दिली. यावेळी यशस्वी उद्योजक या डिजिटल पोर्टच्या हिंदी आवृत्तीचं डॉ. आनंद देशपांडे यांनी लोकार्पण केलं. या अभियानात स्वयंसेवक म्हणून सामील होण्याची मोठी संधी असून तुम्हीही या सामाजिक कार्यात आपलं योगदान देऊ शकता. त्याची सगळी माहिती Mysba या पोर्टवर उपलब्ध आहे.

 

वैशाली अपराजित

vaishali@deasra.co.in

deAsra फाउंडेशन