Search

व्यवसायासाठी ५० लाखांपर्यंत मिळू शकते कर्ज

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत विविध प्रकारचे व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज स्वरूपातील साहाय्य केलं जातं. हे व्यवसाय करणं सुलभ आणि सोईचं होण्यासाठी केंद्र शासनाने काही प्रकल्प अहवाल तयार केले आहेत. हे अहवाल “उद्यमी (https://www.udyami.org.in/project-reports)” पोर्टलवर ठेवण्यात आले आहेत. इच्छूक लाभार्थीस ज्या क्षेत्रात व्यवसाय सुरु करायचा असेल, तो या प्रकल्प अहवालांचा उपयोग, व्यवसाय सुरू करण्याआधी उपयोग करु शकतो. हे प्रकल्प अहवाल/व्यवसाय नियोजन अहवाल, तज्ज्ञांच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहेत. उद्योग/व्यवसायाच्या मूलभूत बाबींचं ज्ञान मिळावं म्हणून प्रतिरूप किंवा मूळ रचनेतील (प्रोटोटाइप) प्रकल्प अहवालही बघता येतात. भांडवल उभारणीसाठी उपयुक्त ठरू शकतील असे विस्तृत प्रकल्पसुध्दा उपलब्ध करुन दिले जातात.

पुढील व्यवसाय सुरू करण्यापूर्वी केंद्र शासनाचे प्रकल्प अहवाल वेब पोर्टलवर नक्की अभ्यासा        
 या वेबपोर्टलवरील, इंडस्ट्री अशी संपर्कसाखळी किंवा बटन दिसते. हे बटन क्लिक केल्यावर १९ उद्योगक्षेत्राची यादी समोर येते. या यादीतील हव्या त्या उद्योगक्षेत्रावर क्लिक केले की, त्या अंतर्गत येणारे व्यवसाय हे, “सिलेक्ट प्रोजेक्ट” असे नमूद असलेल्या खिडकी (विंडो)त दिसतात.

उदा. “इंडस्ट्री” नमूद केलेल्या खिडकीतील, स्मॉल बिझिनेस मॉडेल (१० लाख रुपयांच्या मर्यादेत असणारे लघु उद्योग प्रारूप) यावर क्लिक केल्यावर, “सिलेक्ट प्रोजेक्ट,” या खिडकीत  (१) बुक बायंडिंग (पुस्तक बांधणी), (२) बिन बॅग निर्मिती, (३) आदिवासी कलाकुसरीच्या वस्तू (ट्रायबल क्राफ्ट), (४) हॉकी स्टिक्स, (५) सॉफ्ट टॉइज, (६) टेराकोटा भांडी, (७) घुंगरु/ घंटी निर्मिती, (८) मुंज संमारंभाच्या सजावटीच्या वस्तू निर्मिती, (७) हाताने तयार करावयाचा गालीचा, (८) बासरी निर्मिती, (९) रेशीम गालीचा निर्मिती, (१०) चामडी पर्स, (११) ढोलक निर्मिती, (१२) गव्हाच्या दांडीपासून कलाकृती निर्मिती, (१३) ग्लास (काच) बल्ब शेल (कवच) , (१४) काचेची भांडी, (१५) काचेच्या बांगड्या, (१६) बांबू खूर्ची, (१७) बांबू तंतूकला साहित्य, (१८) केळीचे तंतू, (१९) हूक, (२०) ॲक्रॅलिक साइन बोर्ड, (२१) हाताने तयार करावयाचे दागिने, (२२) अत्तर निर्मिती (२३) पाणीपुरी तयार करण्याचे यंत्र, (२४) कापसाच्या वाती, (२५) मातीची भांडी निर्मिती, (२६) सॅनिटरी नॅपकीन, (२७) मेणबत्ती निर्मिती, (२८) चपाती निर्मिती यंत्र, या व्यवसायायाची यादी येते.

उदा. या यादीतील चपाती निर्मिती यंत्र (चपाती मेकिंग मशिन) यावर क्लिक करा. त्यानंतर “सर्च” या विंडोवर क्लिक करा. स्क्रीनवर चपाती मेकिंग यंत्राची चौकट दिसू लागते. त्याखाली, “रजिस्टार नाऊ” अशी खिडकी येते, त्यावर क्लिक करुन योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करता येते.

अशा प्रकारच्या २० उद्योग घटकांची यादी बघता येते. (उदा-सिमेंट आणि तत्सम उद्योग, केमिकल, पॉलिमर्स आणि खनिज उद्योग, वनोपज आधारित उद्योग, सेंद्रिय आणि फलोत्पादन शेती उत्पादन, पेपर तत्सम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उपकरणे, वैद्यकीय उपकरणे निर्मिती, कृषी आधारिेत अन्नपदार्थ प्रकिया उद्योग, सेवाक्षेत्र व्यवसाय/उद्योग, नारळाचा काथ्याची  (कॉयर) निर्मिती उत्पादन, कापड आणि वस्त्र निर्मिती, दुग्धजन्य पदार्थ आणि दूध उत्पादन इत्यादी) यातील प्रत्येक घटकात ३० ते ३५ व्यवसायांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चावर आधारित अनुदान दिलं जातं
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयामार्फत नियंत्रित केली जाते. राज्य स्तरावर खादीग्रामोद्योग विभाग ,जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत राबवली जाते. या योजनेंतर्गत सूक्ष्म उद्योजकता घटक स्थापन्यासाठी, निर्मिती क्षेत्रासाठी कमाल अर्थसाहाय्य ५० लाख रुपये आहे. सेवा आणि व्यवसाय घटकांसाठी कमाल साहाय्य २० लाख रुपये आहे. प्रकल्प खर्चावर आधारित अनुदान दिलं जातं. याचे दर ग्रामीण भागासाठी ३५ टक्के आणि नागरी भागासाठी २५ टक्के आहे. हा लाभ महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, अल्पसंख्याक संवर्ग , दिव्यांग, माजी सैनिक, तृतीय पंथी, आकांक्षित जिल्हे यांना दिला जातो. या संवर्गातील लाभार्थ्यांना केवळ ५ टक्के रक्कम स्वत:चा हिस्सा म्हणून भरावा लागतो. खुल्या संवर्गातील व्यक्तींना नागरी भागात १५ टक्के आणि ग्रामीण भागात २५ टक्के अनुदान दिलं जातं. लाभार्थ्यांचा हिस्सा १० टक्के असावा लागतो. लाभार्थ्याचे वय किमान १८ वर्षे असावे.

निर्मिती क्षेत्रातील उद्योग/व्यवसाय स्थापन्यासाठी १० लाख रुपयांपेक्षा अधिक प्रकल्प खर्च आणि सेवा क्षेत्रासाठी किमान ५ लाख रुपये प्रकल्प खर्चापेक्षा अधिक असल्यास किमान ८ वी उत्तीर्ण आवश्यक. इच्छुकांना कर्ज अनुदानासाठी अर्ज, (http://www.kviconline.gov.in/pmegpeportal/jsp/pmegponline.jsp)या पोर्टलवर जाऊन करावा लागतो. https://www.kviconline.gov.in/ या  संकेतस्थळावर या  योजनेची विस्तृत माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. व्यक्तिश: या योजनेसाठी अर्ज जिल्हा उद्योग केंद्रात देता येतो. अर्ज मराठीत देण्याची सुविधा आहे.


व्यवसाय सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल तर त्यासाठी कर्ज घेणं आवश्यक असतं. deAsra फाउंडेशन कर्ज मिळवून देण्यासाठी सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. अधिक माहिती- Business Loan.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.

– सुरेश वांदिले

sureshwandile@gmail.com