घडलेल्या प्रसंगाला तेवढ्यापुरतंच मर्यादित ठेवणंच फायद्याचं!
ओव्हर जनरलायझेशन टाळण्यासाठी सर्वप्रथम आपण विचारात व बोलण्यात वापरतो त्या काही नेहमी, कायम, कधीही अशा सूचक शब्दांना शोधण्यासाठी आपल्या विचारांचं व संवादांचं निरीक्षण केलं. तसंच स्वतःला त्रयस्थपणे काही प्रश्नही विचारून आपल्याकडून कळत-नकळत होणाऱ्या ओव्हर जनरलायझेशन युक्त संकल्पनांवा वा निष्कर्षांना आव्हान दिलं.
आपल्याकडे आवश्यक तितकी माहिती अथवा डेटा आहेत का?
पुरेसे ठोस व योग्य पुरावे आपल्याकडे आहेत?"
विरुद्ध अर्थाचे आपल्याला कधी काही अनुभव आले आहेत का?
असे ते काही प्रश्न.
त्यांची उत्तरं शोधताना स्वतःशी 100% प्रामाणिक आणि ओपन माइंडेड तसंच भावनाविरहित व अपक्षपाती राहण्याची गरज आहे. नाहीतर होणारा तोटा हा आपलाच आहे. कारण आपण मागे पाहिलेल्या विविध प्रकारच्या जनरलायझेशनमुळे आपलं आयुष्य सीमित होण्याची व मर्यादित राहण्याची शक्यता बळावते. उदाहरणार्थ मी सायकल चालवायला शिकत असताना सुरुवातीला एक दोन वेळा रस्त्यावर पडले, तर "माझ्यासाठी सायकलिंग बनलेलच नाही. माझ्याकडे सायकल चालवण्यासाठीची आवश्यक कौशल्य नाहीत. मला ते कधीच जमणार नाही." असं ओव्हर जनरलायझेशन करून मी जर पुन्हा सायकल चालवण्याचा किंवा ती चालवायला शिकण्याचा प्रयत्न केला नाही तर मी खचितच या अनुभवाला आणि कौशल्याला मुकणार आहे. अशावेळी आपल्याला आपला ओव्हर जनरलायझेशन सोडून इतरही अनेक शक्यता तपासायला हव्यात आणि त्या शक्यतांना आपल्या मनामध्ये जागा द्यायला हवी. म्हणजेच "आत्ता मला सायकल चालवायला जमलं नाही, मी पडले. पण मी सराव केल्यानंतर शिकू शकेन." या धर्तीवर विचार करणं, म्हणजेच नव्या शक्यतांना जागा करून देणे आहे.
इथूनच आपली तिसरी पायरी येते. ते म्हणजे आपल्या ओव्हर जनरलायझेशनच्या वाक्यांची भाषा बदलणं आणि त्याजागी निरोगी आणि सकारात्मक अर्थाची नवीन वाक्यं पेरणं. नवीन निरोगी वाक्य तयार करताना आत्ता घडलेल्या घटनेवर त्या घटनेला फक्त तेवढ्यापुरतं पाहणं आणि त्या घटनेवर ती तेवढ्यापुरतं समाधान शोधणे हे उपयोगी पडेल. जसं की एखाद्या नोकरीच्या इंटरव्यूमध्ये आपण जर चांगली कामगिरी करू शकलो नाही तर त्या इंटरव्यूला तेवढ्यापुरतं पाहणं वा तात्कालिक दृष्टीने पाहणं, त्या इंटरव्यूमध्ये आपल्या कामगिरीला देखील तात्कालीन दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. “मला आजच्या इंटरव्यूमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही.” हे वाक्य “मला कुठल्याच इंटरव्यू मध्ये चांगली कामगिरी करता येत नाही” याच्या जागी आपण घालू शकतो. याला जोडून पुढच्या विविध शक्यतांचाही विचार करू शकतो. त्यासाठी स्वसंवादामधे काही अजून सकारात्मक प्रश्नांची देखील मदत होईल. म्हणजे “आजचा माझा इंटरव्यू चांगला झाला नाही. मात्र पुढचे चांगले होऊ शकतात. आणि त्यासाठी मी काय प्रयत्न केले पाहिजेत?” किंवा “त्यासाठी मी कोणाची मदत घेतली पाहिजे?”
तसंच “या मुलीनं मला नाकारलं. पण कोणीतरी अशी मुलगी मला नक्की सापडेल जिचे विचार माझ्या विचारांशी जुळतील. मी मुलींचे विचार अजून चांगल्या प्रकारे कसे समजून घेऊ शकतो? स्वतःमधे, माझ्या काही बोलण्या-वागण्यामधे काही बदल करण्याची गरज आहे का? मी यासाठी कोणा तज्ञाची वा अनुभवी व्यक्तीची मदत घेऊ शकेन का? मी कशा प्रकारे या प्रक्रियेत स्वतःला सकारात्मक ठेवू शकतो?”
अशा प्रकारचे प्रश्न आपण स्वतःला विचारून सकारात्मक दिशेने आपल्या विचारांना देऊ शकतो. यातून आपला फायदा हा होईल की आपण एखाद-दुसऱ्या नकारात्मक अनुभवामुळे आपलं आयुष्य मर्यादित करणार नाही. आपल्या आयुष्यावरती विनाकारण सीमा आणणार नाही. आणि आपल्या प्रगतीचे रस्ते खुंटवणार नाही.
कुटुंबामध्ये आणि प्रेमाच्या नात्यांमध्ये सुद्धा ही गोष्ट वापरून पाहायला हरकत नाही. कधी आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपले काही वाद, भांडणं झाली, तर त्या गोष्टीला तात्कालीक नजरेने पाहणं, आणि तो वाद आणि ते भांडण का झालं ते शोधणं, तसंच तो वाद वा ते भांडण सोडवणं यावर काम करणं इष्ट राहील. या ऐवजी जर आपण ओव्हर जनरेलायझेशन केलं आणि “हा माझ्याशी कायम भांडतच राहतो” किंवा “ही माझ्याशी कायम भांडतच राहते” “माझी मुलं माझं कधीच ऐकत नाहीत.” अशा प्रकारे आपल्या विचारांमध्ये या वैचारिक त्रुटीला स्थान दिलं, तर आपल्या नात्यांमध्ये देखील कटूता येणे स्वभाविक आहे.
याचं कारण आपण आपल्या नात्यामधील व्यक्तींना जनरलायजेशनमुळे दूषित झालेल्या चष्म्यातून पाहत राहतो. अनेकदा त्यांनी केलेली कोणतीही कृती, आधीच दूषित झालेली आपली नजर, ही आपल्या त्यांच्याबद्दलच्या समज-गैरसमजांशी जोडत राहते. तसंच आपल्या निष्कर्षाच्या विरूद्ध त्यांनी काही केलं, सकारात्मक बदल घडवले, तरीही ते आपल्या मनापर्यंत या आधीच्या समजांच्या फिल्टरमुळे आहे तसं पोहोचू शकत नाही. नातं दुरूस्त करणं देखील कठीण होऊन जातं. संवादात अडथळे येतात. त्यामुळे सहाजिकच या वैचारिक त्रुटींमुळे त्या नात्यांना आपण आनंददायी करण्याची आणि टिकवण्याची संधीही गमावून बसतो. आपल्याला असंही वाटेल की एखादी व्यक्ती सतत एकसारखं त्रासदायक वागत असेल तर मात्र काय करायचं? तर अशावेळी आपण मागे स्वीकार व संवाद या गोष्टींबद्दल चर्चा केली होती तो उपाय अवलंबायचा. त्याविषयी पुढील काही भागांमध्ये आपण अधिक विस्तारानं बोलणारच आहोत.
मात्र आपला मानसिक त्रास व मनावर आलेला ताण कमी करणं हा उद्देश असेल, तर मात्र आपल्याला ओव्हर जनरलायझेशनच्या वैचारिक त्रुटीपासून लांब राहणं फायद्याचे ठरेल. आत्ताच्या घडलेल्या प्रसंगाला त्या प्रसंगाच्याच पुरतं मर्यादित ठेवून पाहणं हे उपयोगी ठरेल. त्यांना आपली चिडचिड, भीती व मानसिक त्रास खूप कमी व्हायला मदत होईल.
deAsra फाउंडेशन उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचं काम करते. deAsraकडे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. अधिक माहिती - Expert consultation
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.
डॉ. तेजस्विनी कुलकर्णी
dr.tejaswinikulkarni@gmail.com