Search

शिक्षण फक्त दहावीपर्यंत, आज जगातल्या ८० देशांमध्ये व्यवसाय

मित्रांनो, क्विक हिल ग्राहकांनी अगदी डोक्यावर घेतलं पण ते भारतभर सगळीकडे पोचवण्यासाठी त्याचं मार्केटिंग हा आता आमच्यासमोर प्रश्‍न होता. या टप्प्यावर म्हणजे २००२ साली आम्ही बराच विचार करून एक धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे ‘क्विक हील’च्या प्रवासात आणखी एक टर्निंग पॉइंट आला. आमचा हा निर्णय यशस्वी ठरला तर सर्वच प्रश्न सुटणार होते आणि फसला तर मात्र आम्ही कर्जाच्या खाईत बुडणार होतो. पण तरीही हे धाडस करायचं आम्ही ठरवलं. कारण आता मोठा विचार करण्याशिवाय पर्याय दिसत नव्हता. मोठा विचार म्हणजे मार्केटिंगचा उत्तम अनुभव असलेली मंडळी मिळवणं आणि आपल्या उत्पादनाचं पूर्ण मार्केटिंग त्यांच्या हाती सोपवणं. 
 

केवळ दहावीपर्यंत शिक्षण असलेल्या आणि मंगळवार पेठेमध्ये छोटेखानी भाड्याचं ऑफिस असलेल्या माझ्यासारख्या माणसाला अशी माणसं सहजी मिळणार नव्हती, पण मिळतील तेव्हा मिळतील म्हणून वाट पाहण्यातही अर्थ नव्हता. मी एक धमाका करायचा निर्णय घेतला आणि तसा तो केलाही. खिशात अतिशय कमी पैसे असताना मी थेट ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये अर्ध्या पानाची जाहिरात दिली. त्यात मार्केटिंग, एच.आर. आणि ॲडमिनच्या सीनियर पोस्टसाठी माणसं हवीत असं लिहिलं.

 
प्रत्यक्षात मला फक्त मार्केटिंगची माणसं हवी होती. पण ज्या कंपनीची ही जाहिरात आहे ती बडी कंपनी आहे असा भास निर्माण करणं आवश्यक होतं, तरच हुशार आणि अनुभवी मंडळी ॲप्रोच होतील हे मला माहिती होतं. पण खरंच अशी माणसं आली तर त्यांना पगार देण्यापुरते पैसेही त्यावेळी माझ्याकडे नव्हते. कारण होते नव्हते ते सगळे पैसे मी त्या जाहिरातीवर खर्च केले होते. 

एखादी कंपनी जेव्हा नोकरभरतीसाठी ‘टाइम्स’सारख्या वर्तमानपत्रात अर्ध्या पानाची जाहिरात देते तेव्हा अर्थातच अनेक उमेदवारांचं त्याकडे लक्ष वेधलं जातं. ‘क्विक हील’च्या बाबतीतही नेमकं तेच झालं. अनेकजण मुलाखतीसाठी आले. त्यापैकी तिघांची मी मार्केटिंगसाठी निवड केली. एकाला नाशिकला पाठवलं, एकाला मुंबईला पाठवलं आणि तिसऱ्याला पुण्यातलं काम पाहायला सांगितलं. तिघंही कामाला लागले. मी तिघांना प्रोत्साहन देत होतो, पण महिना संपल्यावर या तिघांचे पगार कुठून द्यायचे, हा विचार मनाला वारंवार छळत होता.
 

पण हा छळ फार काळ झाला नाही. कारण नाशिकला सुरू केलेल्या कामाला अपेक्षेपेक्षा खूपच जास्त प्रतिसाद लाभला. पहिल्या महिन्यातच एक ते दीड लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. नव्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचा प्रश्न तर सुटलाच, पण वेगवेगळ्या गावांत टीम्स उभ्या केल्या पाहिजेत हे धोरणही खरं ठरलं. मग मात्र आम्ही मागे वळून पाहिलं नाही. एकामागोमाग एक वेगवेगळ्या शहरांमध्ये ऑफिसेस उघडत राहिलो. जशा आम्ही ब्रांचेस वाढवत गेलो तसा सेल्स वाढत गेला. ग्रोथ जवळपास १००% होती.
 

आता आमचा संघर्षाचा काळ संपला होता. पुढचा काळ हा कंपनीची आर्थिक घडी स्थिरस्थावर करण्याचा, व्यवसायाचा सर्व बाजूंनी विस्तार करण्याचा आणि नावलौकिक वाढवण्याचा होता. ‘टाइम्स’च्या त्या जाहिरातीमधून मिळालेल्या तिघांपैकी अभिजित जोर्वेकर यांनी कंपनीची मार्केटिंगची आघाडी मजबूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, संजयने कंपनीमध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंटची टीम उभी केली, तर कंपनीची सर्वांगीण वाढ होण्यासाठी मी स्वत: कार्यरत राहिलो.
 

या सगळ्या प्रवासात काही वेळा आमची फसवणूक झाली. पण चुकतमाकत अनुभवांमधून आम्ही शिकत गेलो, अजूनही शिकत आहोत. 
 

‘क्विक हील’ हा सध्या भारतातला क्रमांक एकचा ब्रँड आहे. जगातल्या महत्त्वाच्या अँटीव्हायरस ब्रँड्‌‍समध्ये त्याची गणना केली जाते. जगातल्या अनेक प्रमुख देशांमध्ये कंपनीची कार्यालयं आहेत. एकूण ऐंशी देशांमध्ये या कंपनीची उपस्थिती आहे. भारतातल्या सदतीस प्रमुख शहरांमध्ये त्यांची मोठमोठी कार्यालयं आहेत. पुण्यातलं कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आलिशान कार्यालयात आता व्यवस्थापकीय संचालक म्हणून मी काम बघत आहे. आर्थिक यशाबरोबरच ‘क्विक हील’ने मिळवलेली विश्वासार्हताही खूप मोठी आहे. लहान मूल आईच्या कुशीत जसं निश्चिंत असतं, तसं संगणक वापरणारे अनेकजण आपल्या कॉम्प्युटरमध्ये ‘क्विक हील’लोड केलं की निर्धास्तपणे काम करू शकतात.

 
सध्या कंपनीत हजाराहून अधिक कर्मचारी काम करतात. त्यामध्ये मॅनेजमेंट, इंजिनियरिंग आणि फायनान्समधलं उच्च शिक्षण घेतलेले अनेकजण आहेत. ते पाहून मला गंमत वाटते, मनात येतं, संपूर्ण कंपनीत सर्वांत कमी शिक्षण घेतलेला मीच आहे.
 

जगभरातले गुंतवणूकदार आता आमच्याकडे येत असतात, त्याची सुरूवात कशी झाली, हा अनुभव आमच्यासाठी कसा होता याविषयी पुढच्या भागात सांगेनच. या लेखात तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचं उत्पादन, सेवा उत्कृष्ट असणं जितकं गरजेचं तितकंच त्याचं प्रभावी मार्केटिंग होणं हेही आवश्‍यक आहे. त्यासाठी त्या क्षेत्रातल्या तज्ञांची मदत घेणं व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतं. चांगल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक उद्योगवाढीसाठी आवश्यक बाब असते. 
 

– कैलास काटकर
क्विक हीलचे संस्थापक आणि सी.ई.ओ