भविष्यातल्या अपयशाची भीती मनातून काढून टाका
परवा अचानक माझ्या घरी अमित नावाचा माझा एक जुना मित्र आला. जवळच त्याच्या ऑफिसचं काम होतं, म्हणून येणार होता. मात्र माझ्या घरी पोहोचता पोहोचताच त्याला फोन आला, की ज्या मीटिंगसाठी तो इथे आला होता ती दोन तास पुढे ढकलली आहे. त्याच्याकडे आता दोन पर्याय होते एक म्हणजे इथून पुन्हा त्याच्या मूळ ऑफिसकडे जाणं आणि दोन तासांनी पुन्हा येणं, ज्याच्यामध्ये त्याचा प्रवासातच एक दीड तासांचा वेळ जाणार होता. आणि दुसरा पर्याय म्हणजे माझ्या घरूनच काही काम इथे पूर्ण करणे. त्यानं अर्थातच दुसरा पर्याय निवडला. आम्ही मस्त कॉफी घेत आपापलं काम करायला सुरुवात केली. काही वेळाने कामात गढून गेलेल्या त्याच्या चेहऱ्यावरचा त्रस्त भाव बघून मी त्याला विचारलं, "काय झालं रे? कंटाळलास का तू कामाला?"
"हो ना. आता दहा वर्ष झाली मी या एकाच प्रोफाइलमध्ये आहे. खूप बोर होतं गं. पण आता काय करायचं?"
त्याला मी म्हणलं ,"मग तू प्रमोशनसाठी किंवा पुढच्या कोण्या पोस्टसाठी का नाही अप्लाय करत? तुझ्या बॉसची का नाही बोलून पहात? तुमचं चांगलं जमतं ना?!"
यावर अजून उदास होऊन तो म्हणला, "आमच्या कंपनीत कुठे गं आता या लेव्हलला प्रमोशन मिळणार? मी अनेक वर्ष आहे त्या याच लेवलला राहणार. इथून पुढचं प्रमोशन मिळणं शक्यच नाहीये. मी बॉसशी जरी बोललो तरी तो नाही म्हणणार हे मला माहितीये."
मी त्याला विचारलं, "हे कशावरून?"
तो म्हणला अग माझी कलीग आहे ना नमिता, तिनं दोन वर्षांपूर्वी विचारलं होतं. तेव्हा तिलाही नाही सांगितलं होतं त्यामुळे मलाही नाही सांगणार आहे, हे सरळच आहे.
कशाला कटकटीत पडायचं? त्यापेक्षा जे चाललंय ते बरं आहे.
"बरं." असं म्हणून ते संभाषण तात्पुरतं थांबवलं.
तो एका वैचारिक त्रुटीला बळी पडत होता हे स्पष्ट होतं. हे सर्व वेगळ्या पद्धतीने हाताळावे लागणार हेही माझ्या लक्षात आलं होतं. कोणती होती ही वैचारिक त्रुटी?
याला आपण भविष्यवाणी म्हणू शकतो. हा थेट निष्कर्षावर उडी मारण्याचा एक प्रकार.
या भविष्यवाणीच्या वैचारिक त्रुटीमध्ये व्यक्ती आपल्याला आत्तापर्यंत आलेल्या काही अनुभवांवरून, भविष्यात काय होणार आहे, याचं भाकित करते. आपण सर्वजण हे काही प्रमाणात करत असतो. आपल्या दैनंदिन आयुष्याच्या अनेक गोष्टींमधे हे करणं आपल्याला गरजेचेही असते. उदाहरणार्थ मला उद्याचा दिवस प्लॅन करण्यासाठी अगदी सामान्य, मूळ गोष्टींचं भाकीत करणे गरजेचे आहे. जसं की मी उद्या ऑफिसला जाणार आहे, माझी तब्येत ठीक राहणार आहे. बहुतांशानं इतर सर्व सहकारीही येणार आहेत. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेन्यू कार्ड वाचून आपल्याला कोणता पदार्थ आवडेल याचाही अंदाज बांधतो. सिनेमाचं पोस्टर, ट्रेलर पाहून तो आपल्याला आवडेल न आवडेल हेही ठरवतो. अशा प्रकारचं भाकीत करणं, ज्याला आपण अंदाज लावणं म्हणू शकतो, ते आपला रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला गरजेचे आहे आणि उपयोगी आहे.
जेव्हा ते आपल्या वैयक्तिक वा व्यावसायिक प्रगतीच्या आड येऊ शकतं, जेव्हा ते आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी नकारात्मक विचार आणि भावना रुजवून त्रासदायक ठरू शकतं तेव्हा मात्र ही भविष्यवाणी आपल्यासाठी निरोगी नाही.
वर आपण पाहिलेल्या अमितच्या उदाहरणांमध्ये नेमकं कुठे पाणी मुरत होतं? नेमकी कोणती गोष्ट अशी आहे जी त्याच्या विचारांमध्ये त्रोटक आढळते आहे? एक म्हणजे त्यानं पुरेशी माहिती नसताना देखील भविष्यामध्ये काहीतरी नकारात्मकच घडणार असं गृहीत धरलं. माझ्या एका सहकार्याला पूर्वी एखादी गोष्ट मिळाली नव्हती म्हणजे ती गोष्ट मला आज मिळू शकणार नाही किंवा भविष्यामध्ये मिळू शकणार नाही हे ते नकारात्मक गृहीतक.
आपण मागे ओव्हर जनरलायझेशन आणि कॅटॅस्ट्रोफाईझिंग या वैचारिक त्रुटींमध्ये पाहिली होती त्याच्याजवळ जाणारी ही विचार प्रक्रिया आहे. आपल्याकडे भविष्य सांगण्याची कोणतीही कला किंवा कौशल्य नाही. आपल्याकडे अशी भविष्यवाणी करण्यासाठी काही प्रस्थापित संशोधन पद्धती किंवा त्यासाठी लागणारी माहिती किंवा पुरेसा डेटा देखील नाही. जास्तीत जास्त वेळा असं होतं की हे भविष्य वर्तवताना आपण आपल्याला आलेल्या काही अनुभवांवरून ज्या भावना आपल्या मनामध्ये तयार झालेल्या आहेत, त्या भावनांना किंवा मनातून फक्त वाटणाऱ्या काही शक्यतांना आपण ठाम पुरावा म्हणून पाहतो. इथे वापरलेला गेलेला तर्क हा बहुतांशानं भावनिक असतो. आपल्या नकळत आपण आपल्या मनातील या भावनेवरून निघालेल्या निष्कर्षाला सत्य मानू लागतो आणि म्हणूनच आपण आपलं भविष्य आत्मविश्वासाने वर्तवतो. यात बारकाईनं लक्ष देण्याजोगी एक गोष्ट म्हणजे बहुतांश वेळा ते नकारात्मक अर्थाचं असतं. ‘मला या स्पर्धापरिक्षेत यश मिळणार नाही किंवा मला अमुक एक मुलगी पसंत करणार नाही, किंवा माझं केलेलं काम माझ्या क्लायंटला आवडणार नाही. मला पुढचा क्लाएंट लवकर मिळणार नाही.‘ ही काही उदाहरणं. मात्र यांपैकी कोणतेही भविष्य हे फॅक्ट्सवर किंवा शुद्ध पुराव्यांवर अवलंबून नाही.
ही वैचारिक त्रुटी जन्म घेते ती भविष्यातील अनिश्चितता व पुढे काय वाईट होईल याविषयी मनात असणारी अस्वस्थता यांमधून. आपण आपल्या मनामध्ये अजून एक पातळी खोलवर गेल्यावर इथे सापडेल: अपयशाची भीती, नकाराची भीती, तसंच अनिश्चितता हाताळण्यातील कौशल्याचा अभाव. मला अपयश येईल या विचाराने आपण प्रयत्न करायलाच जात नाही. त्यामुळे आपण परिक्षाच देत नाही आणि त्यामुळे नापास होण्याचा किंवा अयशस्वी होण्याचा प्रश्नच येत नाही. हे अपयशाचं मानसिक दु:ख टाळण्यासाठीचं एक जणु धोरणच होऊन बसतं. मात्र यातून आपला तोटा हा तात्पुरतं दु:ख टाळण्याच्या तुलनेत फार फार मोठा आहे. "माझं वजन हवा खाऊन सुद्धा वाढतं. मी कितीही व्यायाम केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही." या विचारांतून अनेक जण व्यायाम किंवा निरोगी आहार व इतर वजन कमी करण्याच्या मार्गाकडे जाण्याचंच टाळतात. त्यामुळे होतं असं की खरंच त्यांचं वजन कमी होऊ शकत नाही आणि त्यांची मूळ भावना वा समज अधिकाधिक पक्का होत जातो. त्यांच्या दृष्टीनं पाहिलं तर त्यांची भविष्यवाणी खरी होते. त्यामुळे पुन्हा ते याच मार्गानं पुढे जातात. हे चक्र असंच चालू राहतं आणि आपण आपल्या व्यवसायिक व वैयक्तिक आयुष्यात मिळू शकणाऱ्या आनंदाच्या व प्रगतीच्या संधी गमावून बसतो. तसंच आपलं आयुष्य मर्यादित झाल्याकारणानं आपल्याला कामातून, नात्यांमधील व एकूणच आयुष्यातून मिळणारं समाधानही अपूर्ण राहतं. साचलेल्या डबक्यातील पाण्याप्रमाणे ते नकारात्मक भावना व मानसिक तणावाने गढूळ होऊ लागतं. हे आपल्यासाठी व आपल्या मानसिक आरोग्यासाठी प्रचंड धोकादायक आहे. भविष्यवाणी ती वैचारिक त्रुटी सोनेरी हरणासारखी फसव्या चेहऱ्याने आपल्याला नकारात्मकतेच्या कैदेत घेऊन जाते. तिच्या कैदेतून कसं बाहेर पडायचं हे पुढच्या भागात विस्ताराने पाहू.
व्यवसायात अकाउंट्समधील नोंदी व्यवस्थित कशा ठेवाव्यात यासाठी deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. अधिक माहिती- Accounting Services
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.
डॉ. तेजस्विनी कुलकर्णी
dr.tejaswinikulkarni@gmail.com