Search

खोट्या चेकचा चमत्कार, परत आला आत्मविश्वास

  • Share this:
एका उद्योजकाचा व्यवसाय पार डबघाईला आला होता. बाजारात प्रचंड मंदी होती. त्याच्या उत्पादनाला अजिबात उठाव नव्हता. त्यामुळे पैशांची आवक जवळजवळ बंद झाली होती आणि तो मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर होता. कर्मचार्‍यांचा पगार देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून ते नाराज झाले होते. अनेक 'सप्लायर्स, कॉन्ट्रॅक्टर्स आणि सब कॉन्ट्रॅक्टर्सची बिले थकली होती. त्यामुळे त्यांचे तगादे सुरु झाले होते.  वेळेवर सरकारी करांचा भरणा न केल्यामूळे सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, एक्साईजची माणसे येऊन पैश्यासाठी तगादा लावत होती, नोटिसांवर नोटिसा पाठवत होती. विजेचे  बिल वेळेवर न भरल्याने कारखान्याची वीज तोडली गेली होती, पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. बँका तसेच इतर वित्तीय संस्थांचे कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यामूळे देणेकऱ्यांनी कोर्टात खटले दाखल करायला सुरवात केली होती. बाजारातील पत, प्रतिष्ठा पार धुळीला मिळाली होती. आर्थिक टंचाई तर प्रचंड होती. या एकूणच तंगीमूळे तो पार वैतागला होता. या चक्रव्युहातून कसे बाहेर पडावे हे त्याला समजत नव्हते. तो गांगरून, गोंधळून गेला होता. डिप्रेशनमध्ये जाऊ लागला होता. मनात आत्महत्येचे विचार पण येऊ लागले होते. पण आत्महत्या हे काही यावरचे सोल्युशन नाही हे पण त्याला समजत होते.

कंटाळून तो एके दिवशी एका बागेतल्या एका बाकावर जाऊन विचार करीत बसला असताना तेवढ्यात तेथे एक म्हातारबुवा आले. 'तुम्ही फार उदास दिसता! तुम्हाला कसली चिंता आहे का? मला सांगा!' म्हातारबुवा म्हणाले. उद्योजकाने आपली सर्व कर्म कहाणी त्यांना सांगितली. त्यामुळे त्याला जरा हलके वाटू लागले. म्हातारबुवांनी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले, 'मला वाटते मी तुम्हाला मदत करू शकेन!' त्यांनी खिशातून चेकबुक काढले, त्या उद्योजकाचे नाव विचारले, त्याच्या नावाने चेक फाडून हातात ठेवला आणि म्हणाले 'हे पैसे घ्या! आत्तापुरते तरी हे पैसे पुरतील. याचा वापर करा. बरोबर एक वर्षाने याच ठिकाणी माझे पैसे परत करायला या!' असे म्हणून ते म्हातारबुवा निघून गेले.

उद्योजकाने त्या चेकवर नजर टाकली आणि तो आश्चर्याने बघतच राहिला. कारण तो चेक 50 लाख रुपयांचा होता व त्यावर सही रतन टाटांची होती. टाटांसारखे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ उद्योजक आपल्याला मदत करत आहेत हे बघून त्याला भरुन आले. घरी येऊन त्याने तो चेक तिजोरीत काळजीपूर्वक ठेवला. दुसर्‍या दिवशी चेक बँकेत टाकायचे त्याने ठरविले.

दुसरा दिवस उजाडला आणि त्याचे विचार बदलले. त्याने कांही दिवस आपल्या पद्धतीने प्रयत्न करायचे ठरविले. 50 लाख रुपयांच्या त्या चेकमुळे त्याच्या मनाला मोठे बळ मिळाले होते. हा चेक त्याने 'आणीबाणी' प्रसंगी लागला तरच वापरायचा असे ठरवून कपाटात ठेऊन दिला. अगदी जरुरी पडली तरच हा चेक बँकेत टाकायचे त्याने ठरवले.

त्याने नव्या जोमाने कामाला सुरवात केली. थोडेसे आत्मपरीक्षण करून केलेल्या चुका शोधून काढल्या. उत्पादनाची गुणवत्ता वाढवित असताना अनावश्यक खर्चाला फाटा देऊन 'कॉस्ट कटिंग करायला सुरवात केली. त्याच्या उद्योगाची पुनर्बांधणी केली. योग्य कामासाठी योग्य व्यक्ती किंवा प्रत्येक व्यक्तीस योग्य काम हे धोरण ठरविले.
जरुर नसलेले, अयोग्य, आळशी, कामचुकार, बेशिस्त कर्मचार्‍यांना घरी पाठविले. 'कॅश फ्लो' वर बारीक लक्ष ठेवायला सुरूवात केली. स्वतः मार्केटमधे फिरुन ग्राहकांना भेटायला सुरूवात केली. जुन्या ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याबरोबरच नवीन ग्राहक शोधायला सुरवात केली. काही महिन्यातच त्याच्या मेहेनतीला फळे येऊ लागली. त्याला मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या. त्याचा 'कॅश फ्लो' वाढला. सर्वांचे पैसे चुकते करुन आणि सर्व कर्ज फेडून तो कर्जमुक्त झाला. त्याच्या कष्टाला आणि व्यवसायाला परत बरकत येऊ लागली. त्याची बाजारातील पत आणि प्रतिष्ठा वाढू लागली. पुन्हा एकदा त्याचा उद्योग उत्तम आर्थिक पायावर उभा राहिला. हे सगळे केवळ सहा महिन्यांच्या आतच घडले. 

आता त्याला रतन टाटांच्या 50 लाख रुपयांच्या चेकची जरुरी नव्हती. त्यांनी टाटांचे आभार मानून हा चेक परत द्यायचे ठरविले. ठरल्याप्रमाणे तो एक वर्षाने त्या बागेत चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे म्हातारबुवा आले. तो म्हातारबुवांना चेक परत करुन आपली यशोगाथा सांगणार होता, तेवढ्यात एक नर्स घाईघाईने तेथे आली. तिने त्या म्हातारबुवांना पकडले आणि म्हणाली, 'माफ करा! हे मनोरुग्ण आहेत. जवळच्या वेड्यांचा इस्पितळतले ते एक पेशन्ट आहेत. ते मधेच गायब होत असतात. स्वतःला 'रतन टाटा' समजतात! यांनी तुम्हाला काही त्रास तर दिला नाही ना?' असे म्हणून ती नर्स त्यांना घेऊन गेली.

तो उद्योजक थक्क होऊन बघतच राहिला. म्हणजे त्याला मिळालेला 'रतन टाटा' यांचा 50 लाख रुपयांचा चेक हा खोटा किंवा बोगस होता. पण या 'खोट्या किंवा बोगस चेक' नेच हा चमत्कार केला होता. पैसा, मग तो खरा असो, आभासी असो किंवा खोटा असो, महत्वाचा नसतोच. महत्त्वाचा असतो तो 'आत्मविश्वास'. त्या खोट्या चेकमुळे त्या उद्योजकाचा गमावलेला आत्मविश्वास परत आला. या बळावरच त्याने आपला व्यवसाय संकटातून बाहेर काढू शकला.  

उद्योग व्यवसायाची कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसलेले, गरीब किंवा टिपिकल मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेले, शिक्षण नसलेले किंवा अर्धवट शिक्षण असलेले, खिशात एक दमडीही नसलेले अनेक जण यशस्वी उद्योजक बनले ते आत्मविश्वासाच्या बळावरच. यामध्ये बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ज, मार्क झुकेरबर्ग, लॅरी ऍलिसन, धीरूभाई अंबानी अशी कितीतरी उदाहरणे आहेत.

‘आत्मविश्वास’ हेच कुठल्याही धंद्याचे मुख्य भांडवल आहे.

जगा, पण 'आत्मविश्वासाने' जगा! आपल्या आत्मविश्वासाला केव्हाही तडा जावू देऊ नका!

(श्री. दिनेश फडणीस यांच्या सौजन्याने)

 


 नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल,  त्यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. अधिक माहिती-Business Planning and Ideas
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.

उल्हास जोशी

 joshiulhas5@gmail.com