Search

व्यवसायाची घडी नीट बसवायची असेल तंत्रज्ञानाचे बदल स्वीकारा

काळ ज्याप्रमाणे बदलतो त्याप्रमाणे उद्योजकाला बदलावं लागते. तो जर बदलला नाही तर त्याचा उद्योग काळाच्या ओघात नष्ट होतो. उदाहरणार्थ पूर्वी समाजजीवन  निवांत होतं. कृषि क्षेत्रातील कामं घड्याळाच्या काट्यावर नाही तर ऋतुचक्राप्रमाणे चालायची तेव्हा उद्योग व्यवसायही निवांत असायचे. पण काळ बदलला आणि दुकान बारा तास उघडे ठेवणे क्रमप्राप्त झाले. नंतर तंत्रज्ञानाने जग जवळ आले आणि इंटरनेटच्या सहाय्याने परदेशातही व्यवसाय करता येऊ लागला. स्वाभाविकच ज्यांनी आपल्या ग्राहकांना दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस सेवा देऊ केली ते पुढे गेले.
 

सन २००० च्या सुमारास वेबसाईट बनवणे आणि त्याद्वारे आपला व्यवसाय जगभर करण्याची चढाओढ सुरू झाली. जो तो डॉट कॉम बद्दल बोलू लागला. एखाद्या व्यवसायाची डॉट कॉम बेवसाईट नसेल तर तो उद्योग मागास समजायला लागले. अर्थात वेबसाईटवरून माहिती घेणं, ऑर्डर देणं, पैसे पाठवणं आणि आपल्या उत्पादन किंवा सेवेची नोंद ठेवणं सोपं व्हायला लागल. प्रत्येक व्यावसायिकाचीच वेबसाईट बनल्याने स्पर्धा वाढली. त्यातून व्यवसाय शोधणे आणि उत्पादनांच्या किंमतींची तुलना करणे अवघड जाऊ लागले मग मॉलप्रमाणे इकॉमर्सच्या वेबसाईटस आल्या. त्यांनी वेगाने घरपोहच सेवा देऊ केली. जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातल्या दुकानातले उत्पादन घरपोहच देता येऊ लागले. स्वाभाविकच अनेक उद्योगांना व्यवसायाच्या संधी मिळाल्या. उद्योजक आता आपल्या उद्योगाचा विस्तार जगभर करू लागले. एकाचवेळी स्थानिक आणि जागतिक गरजांचा विचार करणाऱ्या ग्लोकल उद्योगांची विभागणी होऊ लागली. आपल्या उद्योगात माहिती तंत्रज्ञानाचा वापर ही अपरिहार्यता बनली. 
   

ई कॉमर्सच्या वापराची सवय सर्वसामान्यांना होऊ लागली. किंबहुना तो जीवनाचा भाग बनला. प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा लॅपटॉप उघडून अनेक वस्तूंची तुलना करत खरेदी करणं ग्राहकांच्या अंगवळणी पडलं. पण यासाठी स्वतंत्र वेळ काढावा लागायचा. हा वेळ वाचवण्यासाठी आणि कुठेही, कधीही आणि केव्हाही खऱेदी करता यावी यासाठी मोबाईल ॲप्सचं तंत्रज्ञान विकसित झालं आणि हा वेग अतिशय वाढला. 

प्रत्येक उद्योग व्यावसायिकाला आपलं ॲप बनवणं क्रमप्राप्त झालं. आपल्याला हव्या त्या सेवेचे प्रत्येकाचे ॲप्स डाऊनलोड करणं अवघड जाऊ लागलं तेव्हा एकाच ॲपमध्ये सर्वकाही मिळणारे ॲग्रिगटर्स तयार झाले आणि सेवा अधिक सोपी व ग्राहकांना सोयीची होऊ लागली. गेल्या काही वर्षात ॲप्सचा दैनंदिन वापरही ग्राहकांच्या अंगवळणी पडला आहे. यातून उद्योग व्यावसायिकांकडे प्रचंड डाटा तयार होऊ लागला. या माहितीचे विश्लेषण करून ग्राहकांचा स्वभाव, आवडनिवड समजू लागली. प्रत्येक ग्राहकाच्या आवडीप्रमाणे त्याला व्यक्तिगत सेवा देण्यासाठी धडपड सुरू झाली. यातुन ग्राहकांना सेवा व वस्तुंची शिफारस करण्याची सुरूवात झाली. ग्राहकांना मिळणाऱ्या या व्यक्तिगत सेवेची प्रत्येकाला इतकी सवय झाली की आता तो दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रकारे व्यक्तिगत सेवेच्या सवयींमुळे उद्योगांकडे महाप्रचंड माहितीचा साठा जमू लागला.
 

ग्राहकांना आकर्षित करण्यासाच्या चढाओढीतून आपल्या उत्पादन आणि सेवेची जाहिरात करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होऊ लागला. यातूनच डिजीटल मार्केंटिंगचं शास्त्र बनलं. या शास्त्राचा वापर करून ग्राहकांच्या वर्तवणूकीचा अभ्यास करून त्याला सेवा आणि वस्तूंची शिफारस होऊ लागली. प्रत्येक ग्राहकाच्या आवडीची, निवडीची, विचार करण्याच्या पद्धतीची, त्याच्या सोशल मीडियाच्या वापराची, त्याने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टसची, खरेदीची, त्याच्या चॅटिंगची माहिती जमा केली जाऊ लागली. ती साठवली जाऊ लागली आणि त्याचे विश्लेषण होऊ लागले. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या आणि साठवल्या जाणाऱ्या प्रचंड माहितीचे विश्लेषण करणे आणि प्रत्येकाला व्यक्तिगत सेवा देणं मानवी बुद्धिमत्तेच्या बाहेर होतं त्यामुळे सर्वच पातळीवर मशीन्सचा वापर होऊ लागला. ही मशिन्स चालवण्याकरता लागणाऱ्या मानवी बुद्धिमत्तेचा खर्चही प्रचंड होऊ लागला व यातूनच मशिन्स स्वतःच निर्णय घेतील असे शास्त्र विकसित होऊ लागले. 
कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास झाला. मर्यादित संस्था वापरत असणाऱ्या या तंत्रज्ञानाला गेल्यावर्षी ओपनएआयने खुले केले आणि चॅटजीपिटीची चर्चा सुरू झाली. अनेक एआय संस्था निर्माण होऊ लागल्या. गेल्या फक्त सहा महिन्यात शेकडो एआय कंपन्यांची निर्मिती झाली आणि आता व्यवसाय किंवा उद्योगाची पुढची पायरी म्हणून उद्योजकांना एआय तंत्रज्ञान वापराशिवाय पर्यायच उरलेला नाही. यामुळे शिक्षण क्षेत्रातही प्रत्येक संस्था आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सचे कोर्सेस घेऊ लागली आहे. एआय इंजिनिअर्सना जास्त मागणी वाढू लागली आहे आणि प्रत्येक उद्योग एआयचा वापर आपल्या उद्योगात कसा करता येईल याचा विचार करू लागला आहे. 

आपल्या उद्योगात एआयचा वापर कसा करता येईल हे पहाण्यासाठी खालील मुद्दे महत्वाचे ठऱतात. 
माहितीचा साठा (डेटा) – आपल्या उद्योगात कोणत्या प्रकारची माहिती गोळा होते, ती कशी मिळते, कुठे साठवली जाते, या माहितीवर प्रक्रिया कशी केली जाते. विश्लेषण करण्याच्या पद्धती काय आहेत, माहितीचे स्त्रोत कोणते आहेत, माहितीच्या विश्लेषणासाठी मशीन लर्निंगचा वापर होतो का असे अनेक प्रश्न विचारात घ्यायला हवेत. कोणती माहिती सर्वात महत्वाची आहे आणि एआयचा वापर करण्यासाठी येणारी माहिती पुरेशी आहे की ती बाहेरून घ्यावी लागेल याचा विचार व्हायला हवा.
 
ग्राहकांची खरी गरज – आपल्या उद्योगात एआयचा वापर करण्याची खरंच गरज आहे का याचा विचार प्रथम करायला हवा. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेण्यासाठी त्यांच्या कोणत्या खऱ्या समस्या आपला उद्योग दूर करणार आहे याचा विचार व्हायला हवा. केवळ तंत्रज्ञान उपलब्ध आहे म्हणून ते वापरले तर काहीच उपयोग नाही. एआयचा वापर करण्याकरता तितक्या मोठ्या प्रमाणात उद्योगाची वाढ करण्याचे नियोजन व तरतूदही हवी.

एआय टूल्सची माहिती – सध्या प्रत्येक उद्योगात एआयचा वापर कसा करता येईल यावर प्रचंड संशोधन चालू आहे. या संशोधनातून शेकडो एआय टूल्सची निर्मिती होत आहे. आपल्या उद्योग व्यवसायात कोणते संशोधन चालू आहे आणि नवी कोणती सोल्यूशन्स देणारी टूल्स तयार होत आहेत याबद्दल माहिती घेणे गरजेचे आहे. आपल्या व्यवसाय वाढीसाठी या टूल्सचा वापर कसा करता येईल व त्यातून व्यवसायाची वाढ कशी होईल याचा आराखडाही नीट तपासून पाहिला पाहिजे व त्याप्रमाणेच एआयचा वापर केला पाहिजे. 

नवं तंत्रज्ञान वापराचं धोरण – ज्याप्रमाणे सन २००० नंतर डॉट कॉमचा फुगा तयार झाला आणि नंतर तो फुटल्यावर अर्थव्यवस्थेत वास्तव वापर सुरू झाला त्याप्रमाणे नवे तंत्रज्ञान आले की अचानक मोठया प्रमाणावर प्रत्येक जण वापरू लागतो आणि त्यामुळे मागणी वाढते आणि स्पर्धेच्या नादात गरज नसतानाही मोठा खर्च करून नवे तंत्रज्ञान वापरले जाते आणि कालांतराने तेच तंत्रज्ञान स्वस्तात उपलब्ध झाल्याने बाजारपेठेतील मागणीचे आणि किंमतीचे सर्व अंदाज चुकतात व नुकसान होते म्हणून प्रत्येक उद्योजकाने आपल्या उद्योगातील एआय तंत्राच्या वापराबद्दलचे धोरण अभ्यास करून आखले पाहिजे आणि ते उद्योग वाढीला पूरक असले पाहिजे. अर्थात, यापुढील काळात आपल्या उद्योग व्यवसायातील एआयचा वापर अपरिहार्य ठरणार असल्याने सातत्याने अभ्यास तर चालूच ठेवला पाहिजे कारण बदल हीच एकमेव सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. 

नवीन व्यवसाय सुरू केल्यानंतर, बिझनेस च्या website Designing साठी deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.

प्रसाद मिरासदार

prasadmirasdar@gmail.com