Search

Sports मध्ये होऊ शकतं उत्तम करिअर आणि व्यवसाय

  • Share this:
‘आमच्या मुलाला/मुलीला खेळाची खूप आवड आहे आणि त्याला तिला खेळाच्याच क्षेत्रात काम करायची इच्छा आहे’ हे वाक्य मी गेली काही वर्षे बऱ्याच वेळा ऐकले आहे. डोक्यात विचार आणि डोळ्यांत स्वप्न घेऊन तरुण मुले-मुली कधी एकटे तर बऱ्याच वेळेला त्यांच्या पालकांसोबत मला भेटतात तेव्हा हे वाक्य हमखास कानावर पडते. यात काही मुले-मुली आपल्याला काय करियर करायचे आहे याची चाचपणी करत असतात, तर काही मुले अशीही भेटतात ज्यांनी कॉम्प्युटर इंजिनियरिंग पूर्ण केलेले असते...इतकेच नव्हे, तर उत्तम कंपनीत नोकरीही करत असतात. पण त्यांना त्यात रस वाटत नाही. कारण त्यांना खेळाच्या क्षेत्रातच काम करायची इच्छा असते. मग अशा मुलांची समजूत काढता काढता नाकी नऊ येतात. हे सगळे बाजूला ठेवा आणि ऐका, की खेळाच्या क्षेत्रात काम करायची तयारी असली तर खरेच प्रचंड मोठी संधी आहे उद्योजक बनायची किंवा स्वत:करता काम करायची, म्हणजे सेल्फ-एम्प्यॉईड व्हायची. फक्त हे लक्षात ठेवा, की बाकी कोणत्याही क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रातही यशाचा मार्ग खडतर आहे, ज्याला शिक्षण, अविरत अभ्यास, चिकाटी आणि सातत्याची कास धरावी लागते.
 

खेळ आणि प्रशिक्षण
खेळ, मग तो कोणताही असो, त्यात झोकून देऊन कष्ट करायचे आणि मोठ्या स्तरावर खेळाडू म्हणून ठसा उमटवण्यासारखा स्वयंउद्योजकता हा मार्ग नाही. प्रशिक्षक मार्ग दाखवतील, पण तरीही अखेर ‘हा मार्ग एकला’ असतो.हे मी बऱ्याच वेळा बघितले आहे. पूर्वीच्या काळी खेळ खेळणे हा छंद होता. आता जमाना बदलला आहे. उच्च स्तरावर खेळणे हा १००टक्के स्वयंरोजगार झाला आहे. तुम्ही सर्वोत्तम खेळाडू बनून कोणत्याही खेळात देशाचे प्रतिनिधित्व केले तर त्यासारखे दुसरे काही नाही. जरी ती झेप घेता आली नाही तरीही उत्तम खेळाडू बनून चांगले उत्पन्न मिळू शकते हे आता शक्य झाले आहे. मग तुम्ही क्रिकेट, फुटबॉल किंवा अगदी देशी खेळ, म्हणजे कबड्डीचे उदाहरण घ्या. प्रो-कबड्डी लीग चालू झाल्यापासून किती मुलांना लक्षणीय प्रसिद्धी मिळाली आणि गावागावांतील किती मुले सधन झाली हे बघून मला खूप आनंद होतो. कितीतरी खेळाडूंना त्या त्या खेळाने सक्षम बनवले आणि सधनही बनवले.
 

म्हणूनच मला एका अर्थाने हा स्वयंरोजगारच वाटतो. हे सांगत असताना एक गोष्ट स्पष्ट करणे नितांत गरजेचे आहे. ते म्हणजे उत्तम खेळाडू बनल्यावर काय आर्थिक फायदे होतात हे बघून उत्तम खेळाडू बनता येत नाही. काही विद्वान पालक लहान मुलाला पहिल्या प्रशिक्षण वर्गाला टाकतानाच ‘आमचा बंडू आयपीएल खेळेल का’ असे विचारून प्रशिक्षकांना बेशुद्ध पाडताना मी बघितले आहेत. अगोदर तुम्हाला सर्वस्व झोकून देऊन सर्वोच्च स्तरावर खेळायचे ध्येय गाठून दाखवावे लागते, मगच बाकीच्या गोष्टी आपोआप घडतात. एखादे आंब्याचे झाड लावून त्याचे संगोपन करण्यासारखा हा लांब प्रवास असतो हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
 

समजा, प्रयत्न करून सगळे जमून आले नाही आणि खूप मोठा खेळाडू बनता आले नाही तरीही खेळाच्या क्षेत्रात निष्णात प्रशिक्षक बनून तुम्ही यशस्वी उद्योजक बनू शकता. दुसऱ्या बाजूला सर्वोच्च स्तरावर खेळून झाल्यावर उर्वरित जीवनात माजी खेळाडू प्रशिक्षक बनून मोठे योगदान देतात हे जागोजागी बघायला मिळते.  
 

विविध खेळांत निष्णात प्रशिक्षक बनण्यासाठी आता अधिकृत अभ्यासक्रम आहेत. क्रिकेट, टेनिस, फुटबॉल, बॅडमिंटनच्या खेळात पातळ्या आहेत. क्रिकेट संघटना त्यांचे अभ्यासक्रम राबवतात तसेच त्याच्या पुढच्या पातळीवर जायच्या परीक्षाही आयोजित करतात. रस असला तर पुण्यात अतुल गायकवाड म्हणून निष्णात आणि उच्चशिक्षित क्रिकेट प्रशिक्षक आहे, जो तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल.  
 

पत्रकारिता
खेळाची आवड असली आणि त्याचा उत्तम अभ्यास असला तर तुम्हाला क्रीडा पत्रकारही होता येईल. फक्त त्याकरता मनातील विचार मांडता येण्याचे कौशल्य गरजेचे आहे. खेळ पत्रकार होऊन तुम्ही यशस्वी उद्योजक बनू शकता आणि त्याकरता विविध अभ्यासक्रम आहेत. खेळ पत्रकार होण्याकरता कोणताही खेळ अंग झोकून खेळलेला असलात तर तुम्हाला पत्रकार म्हणून तो मांडताना तारतम्य कसे राखावे हे आपोआप समजेल.
 

फ्री लान्स स्पोर्टस्‌‍ जर्नेलिस्ट म्हणजेच मुक्त क्रीडा पत्रकारिता हा उद्योग मी गेले ३० पेक्षा जास्त वर्ष करतो आहे. कोविड महामारीनंतर या क्षेत्रात वृद्धी होण्याची शक्यता वाढते आहे. कारण नोकरी देणे कंपन्यांना परवडणारे नाही. हा उद्योग किंवा व्यवसाय किंवा स्वयंरोजगार काहीही म्हणा; वरकरणी दिसायला फार आकर्षक आहे; पण राबवायला तेव्हढाच कर्मकठीण.
 

क्रीडा पत्रकारितेची चार दालने मला स्पष्ट दिसतात, जी तुम्ही एकेकटे किंवा मिळून सगळीसुद्धा करू शकता. लेखन पत्रकारिता हा सर्वांत जुना प्रकार आहे. ज्यात तुम्ही वर्तमानपत्रं, मासिकं किंवा वेबसाइटकरता लेखन करून व्यवसाय करू शकता. भारतातील विविध शिक्षणसंस्था पत्रकारिता अभ्यासक्रम चालवतात. मासकॉम म्हणजेच मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रमही लोकप्रिय आहे. कोणत्याही सामन्याचे वार्तांकन असो वा खेळाडूची घेतलेली मुलाखत असो तुम्हाला चपखल भाषेत योग्य वर्णन करता येते का यावर सगळा खेळ अवलंबून असतो.
 
दुसरे दालन टीव्ही किंवा दृक्‌‍श्राव्य माध्यमाचे आहे. कॅमेऱ्यासमोर उभे राहून न अडखळता खेळाचे वर्णन करता येण्यावर तुमचा व्यवसाय अवलंबून असतो. कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त माहिती देणे हे या दालनात यशस्वी होण्याचे गमक असते.
 

तिसरे दालन फक्त ऑडिओ म्हणजे श्राव्य माध्यमाचे आहे. या दालनात रेडिओवर बातम्या देणे किंवा क्रीडाविषयक कार्यक्रम करणे हे आहे. तसेच तरुण पिढीत तुफान लोकप्रिय असलेले ‘पॉडकास्ट’ हे माध्यम सर्वांकरता उद्योजक बनायला खुले आहे. चांगला आवाज असला तर त्याचा मोठा फायदा या क्षेत्रात मजल गाठायला होऊ शकतो.
 

सोशल मिडिया 
चौथे आणि सध्याचे सर्वात चलती नाणे म्हणजे सोशल मीडिया. फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या चार फ्लॅटफॉर्मवर ठसा उमटवून तुम्ही उत्तम पैसे कमावू शकता आणि ते सुद्धा स्वयंउद्योजक बनून. तंत्रज्ञानाचा अभ्यास, त्यातील नवीन प्रकार सतत अभ्यासून ते अंगीकारणे जमायला हवे. झालेल्या गोष्टींवर त्वरित भाष्य करून ते रंजक पद्धतीने मांडता येणे ही या क्षेत्रात जम बसवण्याकरता मेख आहे हे लक्षात ठेवा.
 

चारपैकी कोणतेही दालन असो, भाषेवरचे प्रभुत्व आणि खेळाचे सखोल ज्ञान हे दोन पायाचे दगड या क्षेत्रात यश मिळवायला लागतात. ’पी हळद आणि हो गोरी’ असे यशाचे समीकरण नसून प्रदीर्घ काळ मेहनत करून नाव कमावणे, ठसा उमटवणे आणि तो सातत्य राखत जोपासणे जमले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.
 

सपोर्ट स्टाफ उद्योजकता
खेळ, मग तो कोणताही असो, त्यात यशस्वी होण्याकरता खेळाडूला चांगल्या प्रशिक्षकासोबत चांगला सपोर्ट स्टाफ असणे नितांत गरजेचे असते. सपोर्ट स्टाफ म्हणजे कोण? यातील दोन क्षेत्रे उच्च शिक्षणाची आहेत. ती म्हणजे स्पोर्ट्‌‍स मेडिसिन डॉक्टर आणि फिजिओथेरपी. त्याला साथ लागते फिजिकल ट्रेनर, योगासन तज्ज्ञ आणि मसाज स्पेशालिस्टची. ही तीनही दालने स्वयंरोजगाराकरता खुली आहेत. माझा चांगला मित्र महेंद्र गोखले याने चांगल्या स्तरावर क्रिकेट खेळून झाल्यावर हाती असलेली चांगली नोकरी सोडून स्वत:ला पूर्णवेळ फिजिकल ट्रेनर म्हणून या कामात वाहून घेतले आणि तो यशस्वी उद्योजक बनला आहे. चांगला ट्रेनर बनायलाही देशात आणि खासकरून परदेशात उत्तम अभ्यासक्रम आहेत, जे विविध खेळांकरता उत्तम व्यायाम काय असतो त्याची माहिती आणि प्रशिक्षण देतात.
 

मसाज स्पेशालिस्ट म्हणूनही स्वत:चा व्यवसाय करता येतो हे भारतीय क्रिकेट संघासोबत गेले काही वर्षे उत्तम काम करून मुंबईच्या अरुण कानडेने दाखवून दिले आहे. यातही अभ्यास आहेच. स्नायूंची माहिती आणि ते मोकळे करायला नक्की काय करावे लागते हे अभ्यासाने आणि त्यानंतर अनुभवाने जाणता येते. हे असे क्षेत्र आहे जिथे ज्ञान सतत वाढवत ठेवावे लागते. एकदा का त्यात तुम्ही निष्णात झालात तर प्रत्येक मोठ्या स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूकरता मसाज स्पेशालिस्टची गरज लागतेच.
 

तिसरे दालन आहे योगासनतज्ज्ञ. अगोदर योगासन हे फक्त काही मोजके भारतीय खेळाडू अभ्यासायचे. आता नोवाक जोकोविचपासून ते तमाम महान खेळाडू योगासने करून लवचिकता वाढवायला आणि श्वसनावर नियंत्रण ठेवायला योगासनांचा अभ्यास नित्यनियमाने करतात. पुण्यातील अय्यंगार इन्स्टिट्यूट याचे अभ्यासक्रम चालवते.  
 

मैदानाची देखभाल
खेळाची मजा तेव्हाच येते जेव्हा त्या खेळाचे मैदान सुंदर देखभाल केलेले असते. क्रिकेटच्या खेळात बाहेरील मैदानाइतकेच खेळपट्टीला महत्त्व आहे. आपल्याकडे अजून तरी मैदानाची देखभाल करणाऱ्या माणसाला तेवढे मोल दिले जात नाही हे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते. पण या कमतरतेमध्येच यशस्वी उद्योजक बनायची संधी दडलेली आहे. अजूनतरी या क्षेत्राचे अधिकृत प्रशिक्षण दिले जात नाहीये. सगळे स्वयंशिक्षण आणि अनुभवांवर आधारित आहे.  
 

बॅडमिंटन, टेबलटेनिस यासारख्या खेळांत कोर्टाची देखभाल आटोपशीर असते, पण क्रिकेट आणि टेनिसच्या खेळात त्याची गरज मोठी असते. जर स्वत:हून या क्षेत्रातील अभ्यास केला, निष्णात लोकांच्या हाताखाली काम करून अनुभव घेतला तर यशस्वी उद्योजक बनायचा मार्ग खुला होऊ शकतो. प्रत्येक मैदानाला, खेळाच्या क्लबला, स्टेडियमला अशा अनुभवी माणसांची गरज असते. पारंगत झालात तर दोन-तीन मैदानांच्या देखभालीचा व्यवसाय केला जाऊ शकतो.

 
स्पोर्ट्‌‍स आणि प्लेअर मॅनेजमेंट
प्रत्येक खेळाची स्पर्धा यशस्वी प्रकारे भरवायची असेल तर त्या नियोजनाला स्पोर्ट्‌‍स मॅनेजमेंट म्हटले जाते. याच्याशी बरीच कामे निगडित असतात. तिकीटविक्री, प्रेक्षकांची व्यवस्था, स्वच्छता, टापटीप, संघांची व्यवस्था, प्रयोजकांची देखभाल, पाणी-लाइट-टॉयलेट यांचे नियोजन अशी असंख्य कामे या स्पोर्ट्‌‍स मॅनेजमेंटमधे येतात. काही संस्था याचे अभ्यासक्रम राबवतात. पण सत्य बोलायचे झाले तर यात अनुभवाचा भाग जास्त असतो. सुरुवातीला छोट्या स्पर्धांचे नियोजन यशस्वीप्रकारे करून दाखवले की मग मोठ्या स्पर्धांचे काम मिळू शकते.

 
सर्वांत जास्त ग्लॅमरस आणि पैसे कमावून देणारा खेळाच्या क्षेत्रातील भाग म्हणजे प्लेअर मॅनेजमेंट. जेव्हा कोणताही खेळाडू त्याच्या खेळाच्या क्षेत्रात प्रचंड यशस्वी होतो तेव्हा त्याचे आर्थिक व्यवहार, प्रायोजकतेचे करार, प्रवासाचे नियोजन हे सर्व करायला तज्ज्ञ माणसाचा सहकार लागतो ज्याला प्लेअर मॅनेजमेंट म्हटले जाते.
 

अत्यंत थकवणारे परंतु पैसा कमावून देणारे हे उद्योग आहेत. या क्षेत्रातील सगळ्यांचा ‘बाप’ म्हणजे इंटरनॅशनल मॅनेजमेंट ग्रुप. याचे सर्वेसर्वा होते मार्क मॅकोरमॅक. त्यांनी लिहिलेले ‘व्हॉट दे डोन्ट टीच यू ॲट हारवर्ड बिझनेस स्कूल’ हे पुस्तक म्हणजे या दोन क्षेत्रांत काम करणाऱ्यांकरता ‘गीता’ आहे. जरूर वाचा हे पुस्तक आणि काय या क्षेत्रात काम करता येऊ शकते याचा आवाका बघा.
 

एकंदरीतच, खेळाच्या क्षेत्रात उद्योजक बनायच्या खूप संधी उपलब्ध आहेत. एक लक्षात ठेवावे लागेल, की हे क्षेत्र २+२=४ असे नाहीये. इथे बऱ्याच दालनांचा अभ्यास अधिकृत प्रकारे करता येतो; तसेच बरीच दालने गृहपाठाची आहेत. तुमचा मार्ग तुम्हालाच आखावा लागतो. गेली ३० पेक्षा जास्त वर्षं फ्री लान्स स्पोर्ट्‌‍स जर्नेलिस्ट म्हणून उद्योजकता करूनही मला हे जाणवते आहे की सुधारणेला खूप वाव आहे. सतत नवनवे शिकत राहिले तर बरीच मजल अजूनही गाठता येईल.
 

कुठलाही खेळ म्हटला की खेळाडूंची टीम ओघाने आलीच. पण खेळांडूंप्रमाणेच प्रत्येक खेळात अनेक उद्योजकही आवश्‍यक असतात. खेळातल्या उद्योजकतेच्या संधी हेरुन उद्योग सुरु करणं अनेकांसाठी शक्य आहे. 

- सुनंदन लेले