Search

 नव्या संधी: ‘बुद्धीबळ शिकवणं हा पूर्ण वेळ उद्योग होऊ शकतो’

अलीकडे मुलांमध्ये चंचलता वाढलेली आहे. एका जागी बसून स्थिर चित्ताने एखादी गोष्ट करणं त्यांना फारसं जमत नाही असा तक्रारीचा सूर बऱ्याचदा ऐकायला मिळतो. त्यावर उपाय म्हणून चित्रकला, जिम्नॅस्टिक्स आणि बुद्धीबळ यापैकी एक शिकणे असा उपाय डॉक्टर सांगतात. योग्य प्रशिक्षण मिळालं तर या तीनही प्रकारांमध्ये नैपुण्य मिळवता येतं. मात्र त्यापैकी चित्रकला आणि जिम्नॅस्टिक्स या दोन प्रकारांसाठी मुळात काही गुण अंगभूत असावे लागतात. बुद्धीबळासाठीही ते लागतात, पण सरावाने ते अवगत करता येतात. त्यामुळे शहरांमध्ये अलीकडे बरेचसे पालक आपल्या मुलांना बुद्धीबळ शिकायला प्रवृत्त करतात. अर्थातच त्यासाठी उत्तम प्रशिक्षकांची गरज शहरांमध्ये नेहमीच भासते. कला-क्रीडा प्रबोधिनी या आपल्या संस्थेमार्फत पुण्यातील केतन खैरे गेली बारा वर्षं अनेक विद्यार्थ्यांना बुद्धीबळ शिकवत आहेत. बुद्धीबळ शिकवणे हा पूर्ण वेळ उद्योग होऊ शकतो इतका मोठा वाव या क्षेत्रात असल्याचं केतन सांगतात. केतन यांचा बुद्धीबळाबरोबरचा प्रवास कसा सुरु झाला हे समजून घेण्यासारखं आहे. 

 
केतन व्यवसायाने खरं तर इंटिरियर डिझाईनर. शाळेत दहावीत असल्यापासूनच त्यांनी बुद्धीबळ शिकायला सुरुवात केली होती. पण त्यावेळी आपण करिअर म्हणून पूर्ण वेळ याला देऊ शकू की नाही अशी शंका असल्यामुळे त्यांनी इंटिरियर डिझाईनिंगच्या कोर्सलादेखील प्रवेश घेतला. त्यावेळी एक-दोन मुलांना बुद्धीबळ शिकवायला त्यांनी सुरुवात केली होती. एकीकडे इंटिरियर डिझाईनिंगचा आपल्या व्यवसाय सांभाळून केतन आज अनेक इतक्या विद्यार्थ्यांना बुद्धीबळ शिकवत आहेत. बुद्धीबळाचे क्लासेस सुरु करण्यासाठी त्यांना ’दे आसरा फाउंडेशन’च्या टीमकडून अनेक पातळ्यांवर सल्ले मिळाले. व्यवसाय वाढीसाठी त्याचा खूपच उपयोग झाला. 

 
बुद्धीबळाच्या स्पर्धा जागतिक पातळीवर वयाच्या सातव्या वर्षापासून खेळता येतात. त्यानंतर दर दोन वर्षांनी वेगवेगळ्या वयोगटात त्या खेळता येतात. सातव्या वर्षी तयारी पूर्ण करायची असेल तर बुद्धीबळ शिकण्याची सुरुवात वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षापासून करता येते. ज्यांना स्पर्धेत भाग घ्यायचा नाही, हौस म्हणून शिकायचं आहे, त्यांना कुठल्याही वयात शिकता येतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बुद्धीबळ खेळण्याने अनेक फायदे मिळतात. बैठक स्थिर होण्यासाठी या खेळाचा उपयोग होतोच, पण तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागते. पराभव पत्करण्याची सवय लागते. व्यवस्थापन कौशल्य नकळतपणे अंगवळणी पडतं. कमी वेळात अचूक निर्णय घेणं, खेळावर बारकाईने लक्ष ठेवणं, प्रतिस्पर्ध्याची चाल कशी असेल याचे अंदाज बांधणं वगैरे सवयींचे परिणाम अभ्यासावर आणि एकूणच आयुष्यावर सकारात्मक झालेले आढळून येतात. सातत्याने बुद्धीबळ खेळल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. या सगळ्यामुळे बुद्धीबळ खेळण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसतो. अलीकडे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी बुद्धीबळ शिकावं यासाठी खास वर्ग घेतले जातात. 
 

बुद्धीबळ हा खेळ नुसता खेळ नसून खेळ आणि कला यांचा तो संगम आहे. या खेळाला आता ग्लॅमर मिळालेलं आहे. एकूणच सगळ्या खेळांना आता चांगले दिवस आलेले आहेत. पण बैठ्या खेळप्रकारांपैकी बुद्धीबळ या खेळाची सर्वाधिक क्रेझ असल्याचं आढळून येतं. बुद्धीबळ शिकवणं हा उद्योग तेजीत आहे तो यामुळेच. या उद्योगाला नेमकी किती संधी आहे याचं उत्तर केतन यांनी अगदी स्पष्ट शब्दांत दिलं. ते म्हणाले, फक्त पुण्याचा विचार केला तरी आजची पुण्याची लोकसंख्या आहे ३५ लाख. त्यापैकी १० लाख मुलं आहेत असं मानू. १०० मुलांमागे एक प्रशिक्षक असा विचार केला तरी १० हजार प्रशिक्षकांची गरज फक्त पुण्यातच आहे. त्यात पुन्हा एक प्रशिक्षक जास्तीत जास्त २५ मुलांना एका वेळी शिकवू शकतो. आता या हिशेबाने विचार केला तर बुद्धीबळ शिकवणे या उद्योगाची एकूण गरज सहज लक्षात येते. चांगले प्रशिक्षक मिळत नाहीत अशीच उलट सध्या या क्षेत्रातली तक्रार आहे.

 
केतन खैरे यांच्या कला-क्रीडा प्रबोधिनीचे आठ प्रशिक्षक आहेत. पुण्यातल्या ५० शाळांमध्ये ते बुद्धीबळाचे वर्ग घेतात. याशिवाय पुण्यात तीन ठिकाणी केतन यांचे स्वतंत्र बुद्धीबळाचे वर्ग आहेत. तर त्यांची एकूण १८ सेंटर्स आहेत. जागतिक बुद्धीबळ संघाने बुद्धीबळ शिकवण्यासाठी एक खास ट्रेनिंग प्रोग्रॅम तयार केलेला आहे. तो केल्यानंतर बुद्धीबळ शिकवणं सुरु करता येतं. मात्र अव्वल दर्जाचं प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकाकडे स्वत:च्या खेळातून मिळवलेले किमान १८०० पॉईंट्स असणं गरजेचं आहे. असा प्रशिक्षकच पूर्ण वेळ प्रशिक्षक म्हणून काम करु शकतो. २५०० पॉईंट्स मिळवणारा खेळाडू ग्रँडमास्टर समजला जातो.
 

उद्योग म्हणून बुद्धीबळाचे वर्ग घेणं अनेकदृष्ट्या सोपं आहे. या उद्योगाला इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट नाही. कमीत कमी जागेत तो करता येतो. त्यामुळे जागेसाठी गुंतवणूक हा मुद्दाच रहात नाही. स्वत:च्या घरी, विद्यार्थ्यांच्या घरी, सोसायट्यांच्या हॉलमध्ये, शाळांमध्ये कुठेही त्याचं प्रशिक्षण देणं शक्य आहे. अक्षरश: एखादेवेळी बुद्धीबळाचा पट हातात धरुन उभं राहून सुद्धा ते शक्य आहे. वैयक्तिक पातळीवर शिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना यातून बऱ्यापैकी पैसे मिळतात. प्रत्येक विद्यार्थ्यामागे साधारण ५००-६०० रुपये असा त्याचा दर आहे. शिवाय हे क्लास आठवड्यातून दोन किंवा तीन वेळाच घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थीसंख्या वाढवणं शक्य होतं.

 
अलीकडे बुद्धीबळाचं ऑनलाईन कोचिंगही उपलब्ध आहे. प्रशिक्षक म्हणून असा ऑनलाईन उद्योग करणंही शक्य आहे. त्याचा फायदा जगभरात कुठेही विद्यार्थी असतील तरी उद्योग करता येतो. ऑनलाईन शिक्षणाला तर आणखी जास्त पैसे मिळतात. सध्या एका सेशनसाठी १५०० रुपये असा त्याचा दर आहे. 

 
बुद्धीबळ खेळण्यासाठी अनेक ॲप्सदेखील उपलब्ध आहेत. त्यात एका मिनिटापासून हवं तितका वेळ बुद्धीबळ खेळण्याची सोय आहे. मात्र त्यावर कसं खेळायचं याविषयी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेतलेलं हितावह ठरतं. शिवाय मोबाईलवर हा खेळ खेळताना त्याच्या आहारी जाणार नाही ना याचं भानही ठेवावं लागतं.

 
बुद्धीबळ खेळणाऱ्यांना किंवा खरंतर सगळ्याच खेळाडूंना कधी नैराश्‍य येत नाही असं म्हणतात. याचं कारण पराभव पत्करण्याची सवय त्यांना झालेली असते. बुद्धीबळ शिकवणाऱ्या प्रशिक्षकांना हा उद्योग उद्योजक म्हणून कधी पराभूत होऊ देत नाही हेही तितकंच खरं. 
 

– वृषाली जोगळेकर (युनिक फीचर्समध्ये कार्यरत, उद्योजकता विकासासह विविध विषयांवर लेखन) vrushali.joglekar@uniquefeatures.in