बास्किन रॉबिन्स.. केक आणि आइस्क्रीमचा राजा
ग्राहकाची आवड कोणती, त्याला कुठली चव पसंत पडते याचा गांभीर्याने विचार करत तशा चवीची आणि तशा आवडीची नवनवी आइस्क्रीम शोधून काढणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव आइस्क्रीम ब्रँड म्हणजे अमेरिकेतला बास्किन रॉबिन्स. बास्किनची निर्मिती मॅसॅच्युसेट्स या अमेरिकी राज्यातल्या कॅन्टनची, 1945 सालातली. बास्किन आज ओळखलं जातं ते त्याने विकसित केलेल्या विविध चवींच्या 31 फ्लेवर्समुळे. परंतु पंचाहत्तरी उलटलेल्या बास्किन-रॉबिन्सच्या लेखी इतके कमी फ्लेव्हर्स कसे असू शकतील, हा विचारच फारसा कुणी करत नाही. आणि ते खरंही आहे. बास्किनने थोडेथोडके नव्हेत, तर तब्बल एक हजार फ्लेव्हर्स आतापर्यंत बाजारात आणले आहेत.
बास्किनची स्थापना केली ती बर्ट बास्किन आणि आयर्विन रॉबिन्स या दोघा ज्युईश मेव्हण्यांनी. तसे तर दोघांचेही मूळ व्यवसाय आइस्क्रीम उत्पादनाचेच. कॅलिफोर्नियातील ग्लेन्डेलमध्ये दोघांचेही स्वतंत्र व्यवसाय होते. एकाचा होता बर्टन्स आइस्क्रीम शॉप नावाने आणि दुसर्याचा होता स्नोबर्ड आइस्क्रीम या नावाने. स्नोबर्ड प्रसिद्ध होता त्याच्या 21 फ्लेवर्ससाठी. एखाद्या आइस्क्रीम उत्पादकाचे इतके फ्लेवर्स असणं ही संकल्पनाच तेव्हा नवीन होती. 1953 मध्ये दोघंही एकत्र आले आणि बर्टन्स-स्नोबर्डचं मिळून बनलं बास्किन-रॉबिन्स. 31 फ्लेव्हर्स हीच स्लोगन होती बास्किन-रॉबिन्सची आणि त्यासाठीच ते प्रसिद्धही होतं.
इस्राइल हा खरं तर अमेरिकेच्या अवाढव्य आकारापुढे टीचभर भासावा असा प्रदेश. इंग्रजी ही त्यांची मूळ भाषाही नव्हती. परंतु वर्षानुवर्षांच्या गुलामीतून बाहेर पडायचं; ज्या मायभूमीच्या प्राप्तीसाठी दोनेक हजार वर्षं वाट पाहिली, संघर्ष केला, त्या मायभूमीसाठी बुद्धी-कर्तृत्व सारं काही वेचायचं असं ठरवून जे शेकडो कर्तृत्ववान तरुण अमेरिकेत आले, त्यांतल्याच दुसर्या पिढीतले होते बर्ट आणि आयर्विन.. अशाच काही उद्योजकांनी सुरू केलेल्या उद्योगात आहे फेसबुक, गुगल, ओरॅकल, स्टारबक्स, वॉर्नर ब्रदर्स, डेल आणि असे आणखी किती तरी.
बर्ट शिकागोत राहायचा. 1942 मध्ये आयर्विनच्या बहिणीशी, शर्लेशी त्याचं लग्न झालं. त्याने काही काळ नौदलात नोकरी केली. 1946 मध्ये, मुदतीपूर्वीच त्याला निवृत्त करण्यात आलं आणि 1946 मध्ये तो कॅलिफोर्नियात आला. रॉबिन्स तेव्हा कॅलिफोर्नियात आइस्क्रीमच्या व्यवसायात होता. दोघांचं नातं होतंच. रॉबिन्सने बास्किनला सांगितलं, आइस्क्रीमच्या धंद्यात काय मजा आहे ती पहा आणि माझ्याबरोबर या धंद्यात उतर. रॉबिन्सने दिलेला कानमंत्र बास्किनने ऐकला आणि काही महिन्यांतच पॅसेडेनामध्ये स्वतःचं आइस्क्रीम पार्लर सुरू केलं. 1948 पर्यंत स्नोबर्डची पाच आणि बर्टनची तीन पार्लर्स सुरू झाली होती. ती उभयतांनी एकत्र केली आणि एकाच ब्रँडखाली दोन्ही व्यवसाय आणले. तसं करताना गिर्हाइकाला काही तरी नवीन द्यायचं याचं भान ठेवून त्यांनी 31 वा फ्लेव्हर बाजारात आणला, चॉकोलेट मिंट नावाचा.
पण एकत्रीकरण करताना आणि नवा फ्लेवर बाजारात आणताना त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की आपलं आपल्या जुन्या दुकानांकडे दुर्लक्ष होतंय. मग त्यांनी ती जुनी दुकानं त्या त्या मॅनेजरला चालवायला द्यायचा निर्णय घेतला आणि फ्रँचायझी नावाची संकल्पना तिथे जन्माला आली. 1985 साली रॉबिन्सने लॉस एंजेलिस टाइम्सला एक मुलाखत दिली. त्यात त्याने म्हटलं, की फ्रँचायझी हा शब्दही कुणी वापरला नव्हता किंवा उद्योगाच्या शब्दकोशात नव्हता, तेव्हा आम्ही पहिली फ्रँचायझी सुरूदेखील केली आणि ती यशस्वीपणे चालली. फ्रँचायझीचा हा सिलसिला असाच सुरू राहिला आणि खाद्यपदार्थांच्या व्यवसायात फ्रँचायझी सुरू करणारे आम्ही अमेरिकेतील पहिले उद्योजक ठरलो. अवघ्या एका वर्षात फ्रँचायझींची संख्या 40 वर गेली आणि वाढती मागणी ध्यानात घेऊन बास्किन-रॉबिन्सला बरबँकची डेअरी विकत घ्यावी लागली.
1953 ला उभयतांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं. दोघांचे दोन उद्योग एकत्र झाले होते पण त्याला नवं ब्रँडनेम द्यायचं बाकी होतं. बास्किन-रॉबिन्स हे नाव ठरलं. 1949 मध्ये दुकानांची संख्या 49 वर गेली होती. 31 फ्लेवर्स लोकांच्या चवीला पसंत पडू लागले होते. 31 फ्लेवर्स म्हणताना महिन्याच्या 31 दिवसांसाठी रोज एक नवा फ्लेवर अशीच संकल्पना मनात होती. 1960 मध्ये दुकानांची संख्या 100 च्या वर गेली. 1967 साली बास्किन-रॉबिन्स नावाचं आइस्क्रीम साम्राज्य विकताना खिशात 12 दशलक्ष डॉलर्स पडले होते. कंपनी विकली जाऊनही रॉबिन्स पुढली 11 वर्षं कंपनीच्याच सेवेत राहिला, आणि 1978 साली निवृत्त झाला.
मधली एक घटना सांगायचीच राहिली. 1953 साली बर्ट आणि आयर्विनने कार्सन-रॉबर्ट्स अँडव्हरटायझिंग कंपनीकडे प्रसिद्धीचं, ब्रँडिंगचं काम सोपवलं आणि त्यांनी नावाला छान रंगरूप दिलं. 31 हा आकडा, पिंक आणि ब्राऊन रंगांचे पोलका डॉट्स आणि सर्कसच्या जाहिरातीसाठी वापरली जाणारी विशिष्ट आकाराची अक्षरं वापरून बास्किन-रॉबिन्सचं ब्रँडिंग झालं आणि कॅलिफोर्नियातलं ग्लेन्डेलचं दुकान पहिलं सजलं. आज ही विशिष्ट शैलीतली अक्षरं, त्यासाठी वापरले जाणारे विशिष्ट रंग मिरवणारी बास्किन-रॉबिन्सची नऊ हजारांहून अधिक दुकानं जगभरात विखुरली आहेत.
रॉबिन्स कल्पक होताच, परंतु तो विलक्षण मनस्वी होता. त्याने आणि त्याचा मेहुणा बास्किनने महिन्याच्या 31 दिवसांसाठी 31 फ्लेवर्स देणारा 31 हा आकडा वापरला खरा, पण प्रत्यक्षात त्याने बनवलेल्या फ्लेवर्सची संख्या हजाराच्या घरात गेली असावी. न्यूयॉर्क टाइम्सला 1973 साली दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटलं होतं, “मला आवडला नाही असा एकही फ्लेवर यात नाही. काही काही फ्लेवर तर आम्ही त्या त्या काळाची गरज म्हणून किंवा स्मृती म्हणून निर्माण केले आणि लोकांना ते आवडले. उदाहरणार्थ, मानव चंद्रावर उतरला तेव्हा त्या घटनेची स्मृती जागती राहावी म्हणून आम्ही ल्युनार चीजकेक नावाचा एक फ्लेवर बनवला आणि तो लोकांना आवडला.” 1964 च्या सुमारास बीटल्सचं अमेरिकेत पेव फुटलं. त्याची स्मृती म्हणून तुम्ही एखादा फ्लेवर आणणार की नाही, अशी विचारणा पत्रकारांनी रॉबिन्सकडे केली आणि त्याने तत्क्षणी होकार देत म्हटलं, “होय, आमचा नवा फ्लेवर येतो आहे, बीटल नट नावाचा. अवघ्या पाच दिवसांत हा फ्लेवर बनवण्यात आला, उत्पादित करण्यात आला आणि ग्राहकांपर्यंत तो पोचलाही.
रॉबिन्सने मग ओर्गॅनिक दुधाचा वापर आइस्क्रीममध्ये सुरू केला. आज बास्किन-रॉबिन्स हा ब्रँड जगाच्या पाठीवरील 50 देशांत पोचला आहे. अमेरिकेतल्या ए पासून ते येमेनमधल्या वाय पर्यंतची सारी अल्फाबेटस त्यानं आपल्या कवेत घेतली आहेत. बास्किन-रॉबिन्स हा ब्रँड आता डंकिन डोनटस या सुख्यात कंपनीने घेतला आहे.भारतात हा ब्रॅंड आला 1993 साली आणि आता इथल्या 230 शहरांमधून त्याची 800 च्या वर दुकानं आहेत.
बास्किन आणि डंकिन हे दोन ब्रँड्स आता जगभरात उपलब्ध झाले आहेत. बर्ट आणि रॉबिन्स दोघंही आता हयात नाहीत, मात्र त्यांनी सुरू केलेल्या ब्रॅंडला भरपूर आयुष्य लाभेल यात शंका नाही.
हॉटेल व्यवसायाकरता लागणारे लायसन्स आणि रजिस्ट्रेशन याकरता deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.
सुधीर जोगळेकर
sumajo51@gmail.com