‘‘जवळच्या व्यक्तीच्या वियोगाचं दु:ख हे नेहमीच जीवघेणं असतं. कसं ते माहिती नाही, पण त्या दु:खात असतानाच मी आनंदवनात गेले. प्रवासाच्या दरम्यान संयोजक माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण मी माझ्याच कोशात होते. कोणाशी बोलावंसं वाटत नव्हतं. आनंदवनात गेल्यावर मात्र तो कोश गळून पडला. माझ्यात नकळत बदल होत गेला. तिथे अशी कितीतरी माणसं होती ज्यांना गेल्या कित्येक वर्षांत त्यांचं असं कोणीही भेटायला आलं नव्हतं. जवळची व्यक्ती गमावल्याचं माझं दु:ख मोठं होतंच. पण आनंदवनात जे कुष्ठरुग्ण आणि अंध-अपंग होते त्यांना तर त्यांच्या घरातल्या लोकांनीच वाळीत टाकलं होतं. त्यांच्या दु:खाला पारावार नव्हता. पण तरीही ते सगळे भरपूर कष्ट करत होते. कला सादर करत होते. स्वत:सह इतरांनाही आनंदी करत होते. ते बघून माझ्या दु:खाची तीव्रता कमी वाटायला लागली. आमटे परिवारानं त्यांना आपलंसं केलं. त्यांना आपलंसं करण्यात मीसुद्धा खारीचा वाटा उचलू शकते, माझ्या जगण्याला त्यामुळे अर्थ मिळेल असं मला वाटायला लागलं. आनंदवनाशी संपर्क करुन मी पुन्हा तिथे गेले. मला पर्स बनवायला येतात. आनंदवनात काही दिवस राहून तिथल्या लोकांना मी २० प्रकारच्या पर्स बनवायला शिकवल्या. त्यांच्याबरोबर राहून त्यांच्याशी बोलताना, त्यांच्याबरोबर जेवताना आगळंवेगळं समाधान मिळालं मला. हा अनुभव ‘अमृतयात्रा’ने दिला. ’’
पुण्यातल्या एका महिलेचा हा अनुभव. अमृतयात्रासाठी मात्र हा अनुभव नवा नाही. वर्षानुवर्षं अनेक लोकांना असा अनुभव अमृतयात्रा देत आहे. याच अमृतयात्राचे संचालक नविन काळे हे आपल्या या महिन्याच्या यशकथेचे नायक आहेत.
कोणत्याही उद्योगाचं यश हे त्याच्या उलाढालीवर, नफ्याच्या वाढत्या प्रमाणावर ठरवलं जातं. अमृतयात्रा या मुंबईतल्या पर्यटन संस्थेचं यश मोजताना पैशांचा मापदंड लावण्याबरोबरच आणखीही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी बघाव्या लागतात. व्यवसायाचा भाग म्हणून पैसे मिळतातच, पण त्याबरोबरच अमृतयात्राला मिळतं ते एक अनोखं समाधान, प्रवाशांच्या संवेदना जागृत केल्याचं, त्यांचं आयुष्य काही प्रमाणात समृद्ध केल्याचं. असं काय वेगळेपण आहे अमृतयात्राच्या पर्यटन व्यवसायात हे समजण्यासाठी अमृतयात्राचा गेल्या दहा वर्षांचा प्रवास समजून घ्यायला हवा.
पार्श्वभूमी
एअर इंडियातून रिटायर्ड झालेले अनिल काळे आपली पत्नी आणि काही मित्र परिवारासमवेत एकदा आनंदवनाला भेट देण्यासाठी गेले होते. बाबा आमटे आणि आमटे परिवाराचं काम बघून अत्यंत भारावलेल्या अवस्थेत ते परत आले. पण परतीच्या प्रवासात त्यांच्या डोक्यात काहीतरी सतत घोळत होतं. आमटे परिवाराचं काम अनेकजणांना माहीत असतं, पण ते तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभवण्यातलं समाधान मोठं आहे.
हा अनुभव सगळ्यांनी घ्यायला हवा. त्यासाठी काहीतरी करायला हवं. आपणच का लोकांना आनंदवनाची सैर घडवू नये असा विचार मनात चमकला मात्र, घरी येताच त्यांनी तो बोलून दाखवला. विशेष म्हणजे घरातल्या मंडळींनी एकमुखानं त्याला मान्यता तर दिलीच पण शक्य तितका पाठिंबा आणि मदत देण्याचीही तयारी दर्शवली. काळे कुटुंबात उद्योजकतेची बीजं अशी अवचितपणे पडली आणि पुढे रुजलीसुद्धा.
काळे परिवाराला व्यावसायिक पार्श्वभूमी अजिबातच नव्हती. शिवाय आनंदवनासारख्या सामाजिक संस्थांच्या ट्रीप्सना लोक कितपत प्रतिसाद देतील याची शाश्वती नव्हती. त्यामुळे या उद्योगासाठी पैशांचं गणित कसं मांडायचं हेही कळत नव्हतं. थोडक्यात उद्योजकतेला पूरक किंवा पोषक अशी कोणतीच गोष्ट नव्हती. पण या सगळ्या प्रतिकूल गोष्टींना मागे सारत पुरुन उरणारी एक गोष्ट होती आणि ती म्हणजे ध्यास.
आनंदवनासारखं इतकं चांगलं काम लोकांनी बघितलंच पाहिजे याचा ध्यास आणि तो ध्यास पूर्ण करण्यासाठी असलेलं संवेदनशील मन. समाजाप्रति असलेल्या अशा संवेदना, जाणिवा जागृत ठेवण्याचं काम खरंतर वेगळ्या स्वरुपात अनिल काळे पूर्वीपासून करतच होते.
मुंबईतल्या गिरगावात चाळीत दोन खोल्यांचं त्यांचं छोटं घर होतं. मुलगा नविन सातआठ वर्षांचा असताना त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत या हेतूनं काळे दांपत्यानं आपल्या घरात एक वेगळी परंपरा सुरु केली होती, जी आजतागायत सुरु आहे. दरवर्षी गोकुळअष्टमीला एखादा साहित्यिक, कलावंत काळे यांच्या घरी हजेरी लावतो. अनेक मान्यवरांची भाषणं, अनुभवकथन असा कार्यक्रम गेली ३५ वर्षं अव्याहत काळे यांच्या घरी सुरु आहे.
प्रतिसाद वाढत गेला म्हणून घराऐवजी आता तो एखाद्या हॉलमध्ये होतो इतकंच. याच्याच जोडीला समाजात चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला ते एक पुरस्कारही देतात. त्यामुळे चांगलं काम करणाऱ्यांच्या शोधात काळे कुटुंबिय सतत असतंच. अनिल काळे यांनी अशा पद्धतीनं आपला सामाजिक जाणिवांचा वारसा कुटुंबियांमध्येही रुजवला आहे. त्यामुळेच आनंदवनाच्या ट्रीप्सचं नियोजन आणि व्यवस्थापन करताना त्यांना कुटुंबांचा पुरेपूर पाठिंबा सुरुवातीपासूनच मिळत गेला.
अमृतयात्रेला सुरुवात
ही पर्यटनसंस्था सुरु केली त्यावेळी नविन काळे एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पगारावर नोकरी करत होते. त्यांचा मुलगा अमृत त्यावेळी लहान होता. त्याच्या नावावरुन आणि कामाच्या हेतूलाही साजेसं असणारं नाव अमृतयात्रा हे नाव पर्यटनसंस्थेसाठी निश्चित झालं. नविन काळे नोकरी सांभाळून बुकिंग घेणं, हिशोब ठेवणं वगैरे कामं करत असत. पण लोकांना घेऊन जाणं, आणणं आणि मुख्य म्हणजे आनंदवन का बघायचं हे लोकांना समजावून सांगणं हे काम अनिल काळे स्वत:च करत असत. सुरुवातीला अगदी २-३ लोकांना घेऊन जायला त्यांनी सुरुवात केली.
व्यवसाय म्हणून खरंतर ते तितकं फायद्याचं नव्हतं. काहीवेळा तर त्यांचा तोटाच झाला. पण पैशांचा फायदा ते बघतच नव्हते. हळूहळू लोकांचा प्रतिसाद वाढायला सुरुवात झाली. एकट्याला सगळ्या ट्रीप्सचं व्यवस्थापन अवघड व्हायला लागलं. नविन काळे यांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. आता पूर्णवेळ अमृतयात्राचं काम बघायचं हे त्यांनी नक्की केलं.
पर्यटनसंस्था चालवायची म्हणजे व्यावसायिक दृष्ट्यासुद्धा ती फायदेशीर ठरायला हवी. त्यासाठी त्यात वैविध्य, नाविन्य असायला हवं. मूळ हेतूला धक्का न लावता मग यावरही विचार झाला. आनंदवनाप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर अनेक सामाजिक उपक्रमांविषयी लोकांना माहिती नसते. आनंदवनासोबतच अशा जागाही लोकांना दाखवाव्यात असा विचार काळे कुटुंबियांनी केला आणि मग आनंदवन, डॉ. प्रकाश आमटे यांचं हेमलकसा आणि डॉ. अभय बंग यांची गडचिरोलीतली सर्च ही संस्था अशी एक एकत्रित टूर ठरवली गेली. तर नगर जिल्ह्यातील अण्णा हजारे यांचं आदर्श गाव राळेगण सिद्धी, पोपटराव पवारांचं हिवरेबाजार, नगरमधलं स्नेहालय अशी आणखी एक टूर सुरु झाली. राजस्थानमधील जयपूर फूट बनवणाऱ्या गावाची सफर सुरु झाली, जळगावच्या मनोबल या यजुर्वेंद्र महाजन यांच्या संस्थेची ट्रीप सुरु झाली आणि अशा कितीतरी अनेक.
किती लोक एकावेळी नेले तर व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं सोयीचं होईल, कमीत कमी किती लोक नेले तर एक टूर परवडण्याजोगी होईल, या टूरबाबत लोकांच्या अपेक्षा काय असतील अशा अनेक गोष्टींचा गांभीर्याने विचार सुरु झाला. शिवाय व्यवसाय म्हणून आर्थिकदृट्यासुद्धा अशा ट्रीप्स फायदेशीर ठरणं आवश्यक होतं. कारण काळे कुटुंबाच्या चरितार्थाचं साधन म्हणून हाच व्यवसाय आहे. शिवाय व्यवसाय चालवण्यासाठी लागणारं ऑफिस, स्टाफचा पगार, इतर खर्च या सगळ्यासाठी पैसा हा आवश्यक आहेच. पैसा आणि सामाजिक संवेदना जागृत करणं हे एकाच वेळी साधण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात.
अशा टूर्स नेताना लोकांना आधी ओरिएंटेशन देण्याची गरज आहे हे यावेळी लक्षात आलं. त्यावर विचार झाला आणि मग इतर प्रवासी ट्रीप्स आणि या ट्रीप्समधला फरक लोकांना समजावून सांगणे, थोड्याफार गैरसोयींची कल्पना देणे, तिथल्या कामाची महती आणि वेगळेपणा समजावून सांगणे अशा गोष्टी आवर्जून सुरु केल्या. त्यामुळे ट्रीपची रंगतही वाढली आणि ट्रीपचा खरा हेतूही सफल व्हायला लागला.
हटके पण माहितीपूर्ण
सामाजिक पर्यटनाबरोबरच आणखीही काही हटके स्वरुपाच्या टूर्स अमृतयात्रा आजोजित करते. मात्र सगळ्या ट्रीप्सचा मुख्य हेतू समाजातील वेगळं आणि चांगलं काम लोकांसमोर आणणे हाच असतो. यात मग वीकेंडला मुंबई दर्शन नाईस वीकेंड या नावानं सुरु झालं. मुंबईतल्या अनेक चांगल्या जागा आणि त्यांचं महत्त्व मुंबईत अनेक वर्षं राहूनसुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नसतात. उदाहरणार्थ, धारावी म्हटलं की आडवीतिडवी पसरलेली झोपडपट्टी असंच चित्र अनेकांच्या मनात ठसलेलं असतं.
पण याच धारावीत महाराष्ट्र सरकारचं एक पक्षीउद्यान जवळपास २५ एकरांवर पसरलेलं आहे आणि त्यात अनेक प्रकारचे, विविध रंगांचे लाखो पक्षी वास्तव्यास आहेत हे फारसं कोणाला माहिती नसतं. मुंबईच्या आसपास सात किल्ले आहेत, त्याबद्दल लोकांना विशेष माहिती नसते. जहांगीर आर्ट गॅलरीबद्दल फारसं माहिती नसतं. तर मुंबईतल्या अशा खास वैशिट्यं असणाऱ्या जागांची ओळख करुन देणारी ही मुंबई सफारी असते.
सुप्रसिद्ध पार्श्वगायक किशोरकुमार यांचं मूळ गाव मध्य प्रदेशातलं खांडवा. या गावी मध्य प्रदेश सरकारनं त्यांचं स्मारक उभारलेलं आहे. खांडवा गावातल्या गावकऱ्यांना आपल्या गावातून प्रसिद्ध झालेल्या या कलावंताचा अतिशय अभिमान आहे. किशोरकुमारच्या स्मरणार्थ अनेक वेगवेगळे कार्यक्रम तिथे सतत सुरु असतात. या सगळ्याचा अनुभव देणारी खांडवा या गावाची ट्रीप किशोरकुमारच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरलेली आहे.
संगीतप्रेमींसाठी आणखी एक अविस्मरणीय अनुभव अमृतयात्रा देते. कोणतंही गाणं कसं तयार होतं हे त्या क्षेत्रातील एका तज्ञ व्यक्तीकडून प्रत्यक्ष रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये समजावून सांगितलं जातं. गंमत म्हणून सहभागी लोकांकडून ते गाणं अगदी टेक-रिटेकसकट गाऊनही घेतलं जातं!
नेटकं नियोजन
या सगळ्या ट्रीप्सचं वेगळेपण नुसती त्यांची जागेची निवड इतकंच नाहीये. तर त्यांचं नियोजनही वेगळ्या स्वरुपाचं असतं. ट्रीपमध्ये प्रवासात ट्रेनमध्ये, बसमध्ये दिलं जाणारं जेवण हे महिला बचत गटांकडून बनवून घेतलं जातं. घरगुती चवीचं व्यवस्थित पॅकिंग केलेलं जेवण बघून लोक खुश होतात. प्रवासादरम्यान वाजवल्या जाणाऱ्या संगीताची अथवा दाखवल्या जाणाऱ्या सिनेमाची निवडदेखील काळजीपूर्वक केली जाते. भेट देण्याच्या ठिकाणाचा अनुभव आणि या साऱ्या गोष्टी एकमेकांशी सुसंगत असतील याचा विचार यामागे केलेला असतो.
ज्या गावांना भेटी दिल्या जातात तिथलं स्थानिक वैशिष्ट्य असणारं जेवणखाण, तिथली संस्कृती यांची ओळखही करुन दिली जाते. प्रवासात एकमेकांशी जास्तीत जास्त संवाद होईल यावर भर दिला जातो. तर परतीच्या प्रवासात जे अनुभवलं त्यावर अंतर्मुख होऊन विचार व्हावा यासाठी थोडा मोकळा वेळही दिला जातो. आपापला मोबाईल घेऊन लोक गेम्स खेळताहेत असं चित्र या ट्रीप्सदरम्यान सहसा त्यामुळे दिसत नाही.
नव्या पर्यटनस्थळांची ओढ
सगळ्यांनाच आनंदवनासारखं भव्यदिव्य काम उभं करणं शक्य नसतं. पण निदान आपण राहतो त्या परिसरातले स्थानिक प्रश्न ओळखून त्यावर तोडगा काढणं शक्य आहे. विज आणि पाण्याची बचत करणं, अन्न वाया न घालवणं, आपले लहानसहान इगोज दूर सारणं अशा सवयी लावून घेणं शक्य आहे. सामाजिक ट्रीप केल्यामुळे अनेकजण असा विचार करतात आणि अमलात सुद्धा आणतात. अमृतयात्राचं यश त्यातच सामावलेलं आहे.
चांगल्या कामाची लोकांना माहिती होणं हा उद्देश तर अमृतयात्राचा आहेच. पण त्यामुळे आपसुकपणे आणखीही काही चांगल्या गोष्टी नकळतपणे घडतात. उदाहरणार्थ या नव्या पर्यटनस्थळांकडे पर्यटक जास्त प्रमाणावर जायला लागल्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. तसंच या सगळ्या सामाजिक कामांना आर्थिक निधी सतत लागत असतो. भेट देणाऱ्या ज्या लोकांना अशी आर्थिक मदत करणं शक्य असतं ते तशा स्वरुपाची मदतही करतात आणि चांगलं काम करणाऱ्या या संस्थांना आधारही मिळतो.
भरभरून प्रतिसाद
अमृतयात्राकडे आता दहा लोकांची एक डेडिकेटेड कोअर टीम आहे. ट्रीप्सचं लोकेशन ठरवणं, तारखा ठरवणं, त्याप्रमाणे तिकडच्या लोकांशी बोलणं, प्रवाशांशी संवाद साधणं असं काम हे लोक करतात. यासाठी टूरिझम क्षेत्रातला अनुभव फारसा उपयोगी पडत नाही तर समाजाप्रति असलेली संवेदना, चांगल्या समाजोपयोगी कामाचं कौतुक, त्यात रस वाटणं या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळेच या टीमचे सगळे सदस्य उच्चशिक्षित तर आहेतच पण सामाजिक कामांविषयीची त्यांची आस्था, तळमळ वाखाणण्याजोगी आहे. ट्रीपचं बुकिंग, अकांउंट्स इत्यादी कामांसाठी आणखी वेगळा स्टाफ आहे.
अमृतयात्राला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढता आहे. निव्वळ मौजमजा असं अमृतयात्राच्या ट्रीप्सचं स्वरुप नसल्यामुळे त्यांच्याबरोबर येणारे बहुतांशी प्रवासी संवेदनशील आणि एकूण चांगल्या प्रवृत्तीचेच असतात. त्यामुळे सहसा त्रास होत नाही. त्यातून एखाददुसरा प्रवासी थोडासा कटकट्या निघाला तरी अमृतयात्राची टीम त्याला सांभाळून घेते.
अमृतयात्राच्या या वैशिष्ट्यांमुळेच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने सामाजिक पर्यटनासाठी त्याला मान्यता दिली आहे. एमटीडीसीची मान्यता मिळालेली अधिकृत सामाजिक पर्यटनसंस्था म्हणून अमृतयात्रा ही पहिली पर्यटनसंस्था आहे.
आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक मंडळींना अमृतयात्राने सामाजिक तीर्थस्थळांच्या यात्रा घडवून आणल्या आहेत. या आगळ्यावेगळ्या कामाबरोबरच अमृतयात्रा आणखी एक उपक्रम राबवतं. तो म्हणजे स्वयंम टॉक. वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञांची प्रेरणादायी भाषणं या कार्यक्रमातून सादर केली जातात. मुख्य म्हणजे दिवसभर होणाऱ्या या कार्यक्रमांना लोक आवर्जून तिकीट काढून जातात. जास्तीत जास्त अर्ध्या तासाचं एक भाषण अशा सहा भाषणांचा एका दिवसभराचा हा कार्यक्रम असतो. स्वयंम टॉकला मिळणारा प्रतिसाद आश्चर्यकारक आहे.
आगळावेगळा उपक्रम
लोकांना चांगल्या गोष्टी ऐकण्याची, बघण्याची मनापासून इच्छा असते आणि समाजात चांगलं काम करणारी माणसं, संस्थाही आहेत हे काळे कुटुंबियांच्या लक्षात आलं आहे. या दोहोंमधला दुवा अमृतयात्रा आणि स्वयंम टॉक यांच्यामार्फत काळे कुटुंबिय करत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगळी, चांगली कामं होत असतात.
मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी ही कामं दाखवणारी, अनुभवायला लावणारी महाराष्ट्र दर्शन अशी एक मोठी सहल आयोजित करण्याचं अमृतयात्राचं स्वप्न आहे. त्यासंदर्भात त्यांचं कामही सुरु आहे. एखाद्या चांगल्या हेतूचा पाठपुरावा करत त्याला उत्तम व्यावसायिक स्वरुप कसं देता येऊ शकतं याचं अमृतयात्रा हे एक आदर्श उदाहरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
(सध्या कोरोनामुळे एकूणच पर्यटन उद्योग अडचणीत आहे, अमृतयात्राने सुद्धा सध्या टूर्स बंद ठेवल्या आहेत. पण वातावरण सुरळीत झालं की पुन्हा त्या नव्या जोमाने सुरू होतील हे नक्की. तोवर अमृतयात्रा टीम कोणता उद्योग करते आहे हे लवकरच तुम्हाला वाचायला मिळेल.)
Notice: This site uses cookies to provide necessary website functionality, improve your experience and analyze our traffic. By using our website, you agree to our legal policies.