व्यवसाय करताना काय करावं हे सगळे सांगतात, मात्र काय करू नये हे कुणीच सांगत नाही. सुरूवातीलाच याविषयी माहिती असेल तर अनेक चुका टाळता येतात. त्यामुळे भविष्यात होणारं मोठं नुकसान टळतं. यावर खूप मित्र प्रश्न विचारतात, त्या सगळ्यांसाठी आज काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे.
त्या गोष्टी अशा आहेत…
निर्णय घेऊन विचार करण्यापेक्षा विचार करून निर्णय घ्या
घाईमध्ये किंवा भावनेच्या भरात कधीच निर्णय घेऊ नका. सर्व बाजूंनी सारासार विचार करून निर्णय घेण्याची कायम सवय लावून घेतली पाहिजे. अनेक उद्योजक निर्णय घेताना कॉमन सेन्सचा वापर सुद्धा करत नाहीत हे मी अनेकदा पाहिलंय. उद्योजकतेची सुद्धा एक नशा असते आणि ती धोकादायक असते. खरी आवश्यकता असते ती संयम राखून निर्णय घेण्याची. विचार करून निर्णय घेतला की नुकसान टाळता येतं.
‘कॅश फ्लो’ मॅनेजमेंट
आपल्या क्षमतांची कायम जाणीव असली पाहिजे. क्षमतेपेक्षा जास्त खर्च करायचा नसतो. कॅश फ्लो मॅनेजमेंट ज्याला आपण पैशाचं व्यवस्थापन असं म्हणतो, ते करणं जमलं पाहिजे. व्यवसायाच्या यशामध्ये हे मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. येणारा पैसा आणि जाणारा पैसा त्या प्रत्येक पैशाचा हिशेब तुम्हाला माहित हवा. आपल्याकडे किती पैसे आहेत आणि किती लागणार आहेत याचं गणित जमल्याशीवाय खरेदी किंवा इतर गोष्टींवर अवास्तव खर्च करायचा नाही. कर्ज घेतानासुद्धा आपल्या क्षमता आणि मर्यादा लक्षात घेऊनच कर्ज घ्यायचं, हे कायम लक्षात असू ठेवलं पाहिजे.
ग्राहकांशी तुटकपणे वागू नका
ग्राहक हा व्यवसायाचा कायम केंद्रबिंदू असतो. त्याचा कधीही विसर पडू देऊ नये. सगळा व्यवसाय हा ग्राहकांवरच अवलंबून असतो. त्याचबरोबर तुमचा दर्जा निश्चित करण्याचं कामही ग्राहकच करत असतात. ग्राहकांना जर योग्य सेवा मिळाली नाही तर तुमच्या विषयी वाईट मत तयार व्हायला काहीच वेळ लागणार नाही त्यामुळे त्यांच्याशी तुटकपणे वागू नका, त्यांच्याशी विश्वासाचं नातं तयार करा.
सावळा गोंधळ नको
व्यवसाय करताना आणखी एक महत्त्वाचं आहे, चोख हिशेब आणि गरजेची सर्व कागदपत्र नीट ठेवणं. भरावे लागणारे टॅक्स, इतर बीलं, त्यांच्या तारखा याचं योग्य नियोजन केलं पाहिजे. नाहीतर अनावश्यक दंड भरावे लागतात. नियोजन व्यवस्थित केलं तर नोटीसा आणि दंड भरण्यात तुमचा वेळ आणि पैसा वाया जाणार नाही. अनेकांना हा व्यवस्थितपणा जमत नाही त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते.
कुटुंबाकडे दुर्लक्ष नको
दररोजच्या कामाच्या धबडग्यात व्यस्त असताना कुटुंबियांनाही वेळ दिला पाहिजे. कुटुंब हे तुमची सपोर्ट सिस्टिम असतं. कौटुंबिक पातळीवर तुम्ही समाधानी नसाल तर तुमचा ताण आणि अस्वस्थता वाढेल. फक्त थोड्या पैशांसाठी आपल्या माणसांना दूर ढकलू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ला वेळ द्या. इतर गोष्टी करण्याच्या नादात आपण स्वत:ला विसरून जातो. तसं होऊ नये. सतत नवीन गोष्टी शिकत राहा आणि त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न कर. नियमित व्यायाम, योग, ध्यान या गोष्टी शरीराबरोबरच मनाचं आरोग्यही उत्तम ठेवतात. या चांगल्या सवयी दररोजच्या आयुष्याचा भाग झाल्यास ‘तन-मन-धन’ सगळच उत्तम राहिल.
Notice: This site uses cookies to provide necessary website functionality, improve your experience and analyze our traffic. By using our website, you agree to our legal policies.