Search

सचिन तेंडुलकर, राज ठाकरेही आहेत हर्षवर्धनच्या ‘कोल्हापूरी’ ब्रँडचे चाहते!

कोल्हापुरी चप्पल ही महाराष्ट्राची शान आहे, पादत्राणाच्या दुनियेत त्याची वेगळी ओळख आहे. त्या चप्पलचा येणारा विशिष्ट करकर असा आवाज चप्पल परिधान करणा-या व्यक्तीला रांगडं मर्दानी व्यक्तिमत्व बहाल करतो. महाराष्ट्रातल्या तरुण वर्गाकडे एक तरी कोल्हापुरी चप्पल असतेच. हर्षवर्धन पटवर्धन हे देखील कोल्हापुरी चपलेचे निस्सिम चाहते होते. या चप्पलचा दिमाखच तसा भारदस्त होता. नेहमी हिच चप्पल वापरत असल्याने कोल्हापुरी चपलेचे काही गुण तसेच दोष देखील त्यांच्या लक्षात येत होते. एकतर कोल्हापुरी पादत्राणे एकाच रंगात, त्याच ठराविक पारंपरिक डिझाईनमधे उपलब्ध असतात. आणि  मुख्य म्हणजे ती कडक असतात. त्यात मऊपणासाठी कोणतेही फोम वगैरे न वापरल्याने सतत टोचतात आणि गुळगुळीत फरशीवर अथवा थोड्याशा पाण्यावर सहज घसरणारी असतात. 

हे दोष नसतील अशी कोल्हापुरी चप्पल आपण का बनवू नये याचा विचार करता करता अगदी सहजपणे त्यांचा या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. तोही इतका कळतनकळत, की व्यवसाय सुरु झाल्याचे लक्षातच आले नाही असं हर्षवर्धन या व्यवसायाच्या बाबतीत सांगतात. कारण व्यवसायाचे नाव ठरले नव्हते, त्यासाठी लागणारी जागा, मुख्य म्हणजे भांडवल. याची काहीही तयारी नसताना मित्रांकडून चप्पलेची मागणी येत गेली आणि व्यवसाय सुरु झाला.

खरंतर त्यावेळी हर्षवर्धन पटवर्धन परदेशातून व्यवस्थापनाची उत्तम पदवी घेऊन भारतात परतले होते. शिवाय त्यांच्या घराण्याचा ‘प्रसन्न टूर्स & ट्रॅव्हल’ हा व्यवसाय चांगला जोमाने चालू होता. त्यामुळे वेगळा काही व्यवसाय केलाच पाहिजे याची काही गरज नव्हती. काही काळ हर्षवर्धन यांनी घरच्या व्यवसायात लक्ष घातलं खरं पण त्यांचं मन मात्र तिथे फारसं रमलं नाही. आपला काहीतरी वेगळा व्यवसाय सुरु करावा अशी मनात इच्छा होती. मूळची कोल्हापुरी चप्पलेची आवड होतीच. तिलाच संपूर्ण जगात पोहचावयाचे स्वप्नही होते. मग त्याच उद्योगाची सुरूवात झाली. कोल्हापुरी चप्पलेचे मूळ डिझाईन तेच ठेवून त्यात थोडेफार बदल करुन एखादे सगळ्यांना आवडेल असं चप्पलचं डिझाईन, तेही विविध रंगात आणि मुख्य म्हणजे मऊ, टोचणार नाहीत अशी पादत्राणं बनवायचं त्यांनी ठरवलं आणि चॅपर्स फूटवेअर ब्रॅड उदयाला आला.

या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांनी चेन्नई, कलकत्ता, कानपूर, आग्रा अशा विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्याबद्दलची सगळी माहिती गोळा केली. अभ्यास केला. मुळात काही लेदर मऊ तर काही कडक का याचा विचार केला. निरीक्षण केलं. त्यांवर प्रक्रिया करताना वापरल्या जाणा-या घटकांवर ते ठरतं. हिरडा, बाभूळ अशा वनस्पती वापरून बनवलेले चामडे कडक तर वेगवेगळी तेलं, जोडीला काही केमिकल्स वापरुन केलेले चामडे मऊ बनते. हे चामडे सडू नये, खराब होऊ नये, हवा, वारा, पाणी, किटकांपासून यांच संरक्षण व्हावे म्हणून यावर मोठी दीर्घ चालणारी प्रक्रिया असते. त्यानंतर मग ते चामडे वस्तू बनविण्याच्या प्रक्रियेत वापरण्याजोगे होते. हे सगळं हर्षवर्धन यांनी माहिती करुन घेऊन प्रयोग म्हणून यांवर काम सुरु केले.

मनात होत्या तशा चपला बनविण्यासाठी खास कोल्हापुरहून कारागीर आणून सुरुवातीला काही चपला त्यांच्याकडून हाताने बनविल्या. तेही विविध रंगांमध्ये. या चप्पलेची स्वत: चाचणी घेतली. चप्पला घालून टेकडी चढणं, मैदानावर धावणं असं करुन पाहिलं, प्रत्येक कसोटीत चपला उत्तीर्ण झाल्या. मग पुढे मित्रांच्या ग्रुपमधे लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाच्या चपला प्रसिध्द झाल्या. जिथून तिथून त्यांची मागणी होऊ लागली.

शनिवार पेठेत असलेल्या कारखान्यात चपला बनू लागल्या. लगेचच कर्वे रोडवर पहिले २०१५ मधे आऊटलेट सुरु झाले. आज २०२३ मधे चॅपर्स फूटवेअरमधे पंधरा कामगार, जोडीला हेड डिझायनरच्या सोबत काहीजणांची टीम असा जवळपास पंचवीस जणांचा स्टाफ काम करतो. चपलांवर अजूनही बरेचसे काम हाताने केले जाते, त्यासाठी प्रशिक्षित कारागीर चॅपर्समधे आहेत. लेदर कापणं, शिवणं यासाठी काही मशिन्स वापरली जातात.

जाहिरात सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर केली जात असली तरी ग्राहकांना चप्पल विकत घेताना पायात घालून बघायची असते. पायात चप्पल कशी दिसते? तिचा स्पर्श कसा आहे? हे बघून मगच खरेदी केली जाते. चप्पलेचा प्रकार, रंग हे डोळ्यांनी बघून कळत असले तरी प्रत्यक्षात पायात घालून बघण्यामुळे तिचा कम्फर्ट कळतो. आणि तो फिल महत्वाचा. जो नुस्त्या डोळ्यांनी कळत नाही. त्यामुळेच आज तीसहून अधिक रिटेलर्स, मॅालमधे विक्री, चॅपर्सचे स्वत:चे चार आऊटलेट ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. 

पुण्यात शनिवार पेठेत असलेल्या कारखान्यात एका महिन्यात बाराशे चपलांचे उत्पादन होते. साधारण तीन हजारांपासून चपलेच्या किंमती सुरु होतात. कंपनीचा टर्नओव्हर साडेतीन कोटी पर्यत पोहचला आहे. विविध क्षेत्रातील प्रसिध्द मंडळी जसं की सचिन तेंडुलकर, सेहवाग, महेंद्रसिंग धोनी, राज ठाकरे, आदित्य ठाकरे चॅपर्सचे नियमित ग्राहक आहेत.

भारतात चेन्नई लेदर हब म्हणून ओळखले जाते. मेलेल्या प्राण्यांच्या कातडीवर बरीचशी दीर्घ प्रक्रिया करुन अशा प्रकारचे लेदर बनवून ते चपलेसाठी वापरले जाते. बहुतांश वेळा तिथून लेदरची खरेदी होते. 

आज बाजारात महिलांसाठी विविध कंपनींचे असंख्य प्रकार चपलांमधे उपलब्ध आहेत, मर्यादा येतात त्या पुरुषांच्या चप्पल प्रकारावर.  कित्येक पुरुषांना लग्न सभारंभात घालायला तसंच एरवी जीन्सवर घालायला देखील वेगवेगळ्या रंगातल्या, आकर्षक लेस असलेल्या, काही वेगळ्या प्रकाराची बक्कल, स्टर्डस् असलेली फॅशनेबल चप्पल हवी असते, पण पुरुषांच्या चप्पलांमधे प्रामुख्याने काळा आणि चॅाकलेटी हेच दोन पर्याय जास्त प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध असतात. हिच अडचण ओळखून चॅपर्सच्या चप्पला विविध रंगामधे अगदी लाल, पिवळा, निळा अशा रंगामधे उपलब्ध असतात. ग्राहकांना आवडेल असं वेगवेगळे नवनवीन काहीतरी सतत देण्यासाठी चॅपर्स कायम तयार असतो.

चोखंदळ ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार शूज बनवून देणं चॅपर्सने सुरु केले आहे. आपल्या आवडीचा रंग, लेस, सोल या सर्वांची निवड करुन शूजची ग्राहकावर व्यवस्थित ट्रायल घेऊन मगच हा असा शूज फायनल केला जातो. या शूजची किंमत दहा हजारांपासून सुरु होते. तसंच खास ग्राहकांसाठी लग्नसमारंभात जोधपुरी कुडत्यावर वापरायला चपलांबरोबर लोफर्स, मोजड्या, पठाणी सॅन्डल्सचे उत्पादन सुध्दा सुरु केले आहे. अशाच खास ग्राहकांसाठी एक आधुनिक सोय चॅपर्सने उपलब्ध करुन दिली आहे. यामधे दुकानात येऊन आपल्याला हवी तशी, आपल्या आवडीची चप्पल स्क्रीनवर डिझाईन करु शकता. चपलेचा रंग, बेल्ट, सोलचा प्रकार देखील ठरवू शकता. 

हौसेला मोल नसते याचा अनुभव नुकताच हर्षवर्धन यांनी घेतला. पायातल्या चपलेवर मनुष्याची ओळख होत असते असं म्हणतात. अशाच एका हौशी ग्राहकासाठी एक लाख किंमतीचा शूज चॅपर्सने बनविला, यासाठीचे खास लेदर इटलीवरुन मागवले गेले होते. भारतात बनलेला एवढ्या किंमतीचा पहिलाच शूज असल्याचे हर्षवर्धन यांचे म्हणणे आहे. 

हळूहळू पुण्याच्या बाहेरील ग्राहकांकडून चॅपर्स चपलेची मागणी वाढू लागली आहे त्यामुळे पुढच्या महिन्यात नाशिक इथे चॅपर्सचे आऊटलेट सुरु होत आहे.

आत्तापर्यत जवळपास पन्नास हजार ग्राहक चॅपर्स फूटवेअरशी जोडले गेले आहेत. परदेशात दुबई, इस्राईल, जर्मन, हॅागकॅाग पाकिस्तान अशा वीस देशांत चॅपर्सच्या पादत्राणांचे शौकीन आहेत.

महाराष्ट्रात, संपूर्ण देशातच नव्हे तर थेट परदेशात चॅपर्सची आउटलेट्स असतील. त्यादृष्टिने भांडवल, जागा, कारागीर, मनुष्यबळ, जोडीला आवश्यक ती सर्व मशिनरी या सर्वांची जुळवाजुळव करणं सुरु आहे. सुरवात छोट्या छोट्या पावलांनी झाली असली तरी आत्तापर्यत भारताच्या प्रत्येक राज्यांत चॅपर्सची चप्पल पोहचली आहे, अशीच पावलं टाकत टाकत हळूहळू दिमाखदारपणे जगभरात चॅपर्सची पादत्राणे पोहचायचे हर्षवर्धन पटवर्धन यांचे स्वप्न आहे..
हर्षवर्धन पटवर्धन- संपर्क नंबर  +91  9049043600


 व्यवसायाचं नियोजन सुरू असताना आपली बिझनेस आयडिया खरच व्यावहारिक आहे की नाही हे तपासणं महत्वाचं आहे. यासाठी deAsra फाउंडेशनची IDEA VALIDATION  ही सेवा तुम्हाला फायद्याची ठरू शकते.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.

भाग्यश्री चौथाई

bac100372@gmail.com