Search

स्टार्टअप कसं सुरु कराल?

आपले प्रधानमंत्री हे स्टार्टअपचे पुरस्कर्ते आहेत. स्टार्टअप म्हणजे नव्या संकल्पनांसह स्वत:चा व्यवसाय किंवा उद्योग सुरु करणं. स्टार्टअपला सध्या महत्व येण्याचं कारण म्हणजे, स्वत:सोबत इतरांनांही रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देता येतात. काम मागणारे नाही तर काम देणारे व्हा, असं प्रधानमंत्री सातत्याने सांगत असतात, ते स्टार्टअपच्या माध्यमातून साध्य होतं. स्टार्टअप हे कुणालाही सुरु करता येतं. त्याला वयाची किंवा शिक्षणाची तशी कोणतीही अट नाही. नवसंकल्पना आणि परीश्रम करण्याची तयार असणारी व्यक्ती स्टार्टअपच्या क्षेत्रात उतरू शकते. काही स्टार्टअप हे भविष्यात उत्तम व्यवसाय किंवा उद्योगात रुपांतरीत होऊ शकत असल्याचं, जाणकारांच्या त्वरीत लक्षात येतं. रतन टाटांसारखे ज्येष्ठ उद्योगपतींनी काही नव्या स्टार्टअपमध्ये रुची दाखवून गुंतवणूकही केली आहे. जगभरात अशी बरीच उदाहरणं आढळतात. शून्यातून विश्व घडविण्याची क्षमता बऱ्याच स्टार्टमध्ये राहू शकते.

मग, स्वत:चा स्टार्टअप कसा सुरु करायचा? हा प्रश्न अनेक उत्साही आणि महत्वाकांक्षी तरुण-तरुणींना पडू शकतो. ही अडचण लक्षात घेऊन, उत्तरप्रदेश सरकारच्या सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योजकता आणि निर्यात प्रोत्साहन विभागाने इंस्टिट्यूट ऑफ आंत्रप्रिन्युरशीप या संस्थेच्या  सहकार्याने, दोन दिवस कालावधीचा, "हाऊ टू स्टार्ट यूवर ओन स्टार्टअप", हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे. उत्तरपद्रेश सरकारने उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगारासाठी प्राधान्य देण्याच्या हेतुने या संस्थेची स्थापना केली आहे.

हे प्रशिक्षण ऑनलाईन करता येतं. नव्याने सुरु करावयाच्या उद्योग /व्यवसायासाठी किंवा सध्या कार्यरत असणाऱ्या उद्योगासाठी निधीची उपलब्धता कशी करायची? या बाबीची सखोल माहिती दिली जाते. 

या प्रशिक्षणात पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे- 
(१) उद्योजकतेची संकल्पना आणि प्रक्रिया. 
(२) शासनाच्या सहकार्याने नवा व्यवसाय किंवा उद्योग कसा सुरु करायचा? त्यासाठी शासनाची धोरणे. 
(३) अर्थसाहाय्याच्या योजना. 
(४) प्रकल्प अहवालाच्या मूलभूत बाबी. 
(५) विपणना (मार्केटिंग) च्या संकल्पना, 
(६) प्रभावी व्यवसाय आराखडा. 
(७) वित्त व्यवस्थापन. 
(८) जोखीम व्यवस्थापन. 
(९) वाटाघाटीचे कौशल्य.
(१०) उत्पादकतेत वृध्दी करणे. 
(११) जीएसटी आणि व्यवसाय घडण/निर्मिती प्रकिया 

या प्रशिक्षणाचे शुल्क- ३ हजार रुपये. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना शासकीय ई- प्रमाणपत्र प्रदान केले जाते.

संपर्क - ए-१-२, इंडस्ट्रियल एरिआ, सरोजिनी नगर, कानपूर रोड, लखनौ -२२६००८
भ्रमणध्वनी- ८८००६०९८५६ ०५२२-२४७६०१२,
संकेतस्थळ- http://www.iedup.in/,
ईमेल- iedup.director@gmail.com
  

भारत सरकारने स्टार्टअप इंडिया हे पोर्टल सुरु केलं आहे. या पोर्टलवर नव्या उद्योजकांना किंवा उद्योग किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना स्वत:चं कौशल्य वृध्दींगत करण्यासाठी आणि नवं कौशल्य प्राप्त करण्यासाठी विविध उपक्रम, बाबी आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

स्टार्टअप सुरु करणाऱ्याची इच्छा किंवा महत्वाकांक्षा असलेल्यांसाठी, "स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्रॅम", हे ४ आठवड्याचं ऑनलाइन प्रशिक्षण या पोर्टलच्याच माध्यमातून घेता येतं. हे प्रशिक्षण मोफत दिलं जातं. ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या "अपग्रेड" या आघाडीच्या कंपनीच्या सहकार्यानं हे प्रशिक्षण सुरु करण्यात आलं आहे.

या प्रशिक्षणासाठी नाव नोंदवण्यासाठी स्टार्टअप इंडियाच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागते. त्यासाठी इच्छुकांना आपलं खातं (अकाउंट) उघडावं लागतं. ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. 

या प्रशिक्षणात पुढील काही बाबींचा समावेश करण्यात आला आहे-
(१) भारतातील काही प्रमुख उद्योजकांच्या यशकथा, त्यांना आलेले अपयश, त्यातून त्यांनी घेतलेली भरारी.
(२) विविध उद्योजकांसमवेत प्रत्यक्ष चर्चा.
(३) व्यवसाय किंवा रोजगार आराखडा करण्यासाठी साहाय्य.
(४) स्टार्टअप सुरु करण्यासाठी नवसंकल्पनेचा विचार, संभाव्य ग्राहक आणि व्यवसाय संधी.
(५) कंपनीच्या कायदेशीर बाबी आणि निधीची उपलब्धता.
(६) वित्त आणि लेखा विषयक मूलभूत बाबी.
(७) व्यवसाय नियोजनाची ओळख.
(८) गुंतवणुकदारांना समजून घेणे.
(९) गुंतवणुकदारांच्या मनात कंपनीबाबत सकारत्मक भूमिका निर्माण करणे

या प्रशिक्षणाची सुविधा इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर स्टार्टअप इंडियाकडून अधिकृत प्रमाणपत्र दिलं जातं. 

संपर्क-
संकेतस्थळ https://www.startupindia.gov.in/
टोल फ्री क्रमांक - १८००११५५६५.
 
नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल,  त्यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. अधिक माहिती - Business Planning and Ideas
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.


 
– सुरेश वांदिले
(राज्य शासनामधील वरिष्ठ पदावरून निवृत्त,
विविध विषयांवर लेखन)
ekank@hotmail.com