यशस्वीपणे उद्योग चालवायचा आहे? मग ‘अर्थ’साक्षर व्हा!
तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचंय? यंत्रसामुग्री, किंवा यांत्रिक उपकरणं, अथवा इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स उत्पादित करणारा कारखाना सुरू करायचाय ? .. तुमच्याकडं उच्च बुद्धिमत्ता असेल, आयआयटी किंवा एखाद्या प्रतिष्ठित कॉलेजातील अभियांत्रिकीची पदवी तुम्ही घेतली असेल, तांत्रिक कौशल्य व पुरेसे भांडवल असेल, तर तुम्ही हा कारखाना सुरू करू शकाल. पण तो चालू ठेवून, त्यात वाढ करायची असेल, किंवा वेगळ्या भाषेत, तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचे असेल, तर तुम्हाला ‘अर्थ’साक्षर व्हावंच लागेल. ‘अर्थ’साक्षर म्हणजे उद्योजकाला आर्थिक व्यवस्थापन (Financial Management) म्हणजे काय याचं मूलभूत ज्ञान आणि त्याचा सुयोग्य वापर करण्याचं कौशल्य असायला हवं.
तुम्ही म्हणाल- माझा भागीदार आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी स्विकारेल, किंवा सगळे फायनान्शियल मॅटर्स माझ्या कंपनीतील एखादा हुशार चार्टर्ड अकाऊंटंट बघेल ना! हरकत नाही, मी या दोघांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेत नाही. पण तरीही मला वाटतं, यशस्वी उद्योजक होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येकाला फायनान्शियल अकाऊंटिंग, कॉस्ट अकाऊंटिंग आणि मॅनेजमेंट अकाऊंटिंगमधील मूलभूत संकल्पना माहीत असायलाच हव्यात. यातील पहिला टप्पा म्हणजे फायनान्शियल अकाऊंटिंगमधील बुककीपिंग व अकाऊंटन्सी म्हणजे काय, दैनंदिन आर्थिक नोंदी (Financial Records) कशा ठेवल्या जातात, ट्रायल बॅलन्स- ट्रेडिंग व प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट कसे व का तयार केले जातात, बॅलन्सशीट म्हणजे काय, तो केव्हा व का तयार केला जातो, फंड फ्लो आणि कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करण्याचे काय फायदे होतात, या किमान गोष्टी ठाऊक असायला हव्यात.
उद्योग-व्यवसाय म्हटला की वस्तु / सेवांचे उत्पादन व विक्री करून नफा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. याकरता उद्योजक-व्यावसायिक आवश्यक भांडवल गोळा करणे, कच्चा माल खरेदी करणे, उत्पादित वस्तूंची विक्री करणे, जाहिरातीसारखे असंख्य खर्च करणे, व्याज मिळवणे, वगैरे अनेक गोष्टी रोख अथवा उधार स्वरूपात वर्षभर करत असतात. यांना व्यावसायिक व्यवहार (Business Transactions) असे म्हणतात. हे सर्व व्यवहार हिशेबपुस्तकात पद्धतशीरपणे नोंदवण्याला ‘बुक-कीपिंग’ (Book-keeping) असे म्हणतात. अकौंटन्सी (Accountancy) ही तुलनेने व्यापक संकल्पना आहे. बुक-कीपिंग म्हणजे हिशेबपुस्तकात वर्षभर नोंदी ठेवणे हा अकौंटन्सीचा एक भाग आहे. पण याशिवाय तिच्यामध्ये हिशेबपुस्तकांचे विश्लेषण करून आर्थिक स्थितीचे आकलन व अर्थबोध होण्यासाठी ट्रेडिंग-प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट आणि बॅलन्सशीट तयार करणे, फंड फ्लो व कॅश फ्लो स्टेटमेंट्स बनवणे, यांचाही समावेश होतो. आता यातील काही संकल्पना अगदी थोडक्यात व सोप्या इंग्रजी शब्दांचा वापर करून (कारण मराठी शब्द विशेष प्रचलित नसल्याने अवघड वाटू शकतात.) समजावून घेऊ.
वर्षभर होणारे व्यावसायिक व्यवहार ‘डबल एंट्री सिस्टिम’(Double Entry System) चा वापर करून, प्रथम ‘जर्नल’(Journal) नावाच्या हिशेबपुस्तकात नोंदवले जातात. ‘डबल एंट्री बुक-कीपिंग सिस्टिम’ नुसार व्यावसायिक व्यवहारात प्रत्येक ‘नावे’ किंवा ‘देणे’ (Debit) रकमेचा परिणाम दुसऱ्या कोणाला तरी ‘जमा’ किंवा ‘येणे’ (Credit) स्वरूपात असतो. मग विविध प्रकारची खाती (Ledger Accounts) उघडून त्यांची एकत्रित स्वरूपात खरेदी, विक्री, तसेच इतर खर्च विचारात घेऊन ‘ट्रायल बॅलन्स’ (Trial Balance) बनवला जातो. ट्रायल बॅलन्स म्हणजे एका विशिष्ट दिवशी सर्व लेजर अकाउंट्सचे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स दाखवणारे स्टेटमेंट असते. साहजिकच योग्य प्रकारे व्यवहार नोंदवले असतील तर ट्रायल बॅलन्सच्या डाव्या बाजूची म्हणजे डेबिट साईडची एकूण रक्कम ही बरोबर उजव्या बाजूच्या क्रेडिट साईडच्या रकमेइतकीच असते.
ट्रायल बॅलन्सच्या आधारे आर्थिक वर्षाच्या शेवटी व्यवसाय संस्थेचे ‘फायनल अकाउंट्स’ तयार केले जातात. यामध्ये ट्रेडिंग अकाऊंट (Trading Account), प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट(Profit & Loss Account), आणि बॅलन्सशीट(Balance Sheet) तयार केले जातात. वर्षभरातील व्यवसायाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार, तसेच विविध प्रकारचे खर्च-उत्पन्न वगैरे गोष्टी विचारात घेऊन ‘ट्रेडिंग अकाऊंट’द्वारे स्थूल नफा / तोटा (Gross Profit / Loss), व ‘प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट’द्वारे ‘निव्वळ नफा / तोटा’ (Net Profit / Loss) शोधून ठरवला जातो. निव्वळ नफा झाला असेल तर तो बॅलन्सशीटला भांडवलामध्ये (Capital) जमा केला जातो, आणि तोटा झाला असेल तर तो भांडवलामधून वजा केला जातो. बॅलन्सशीट हे व्यवसायसंस्थेची एका विशिष्ट दिवशी (आर्थिक वर्षाच्या शेवटी) आर्थिक स्थिती दाखवणारे स्टेटमेंट असते.
सोप्या शब्दात, बॅलन्सशीटमध्ये व्यवसायाच्या विशिष्ट दिवशी असणाऱ्या ‘अॅसेट्स’ (Assets) म्हणजे मालमत्ता आणि ‘लायबिलिटीज’ (Labilities) म्हणजे जबाबदाऱ्या दर्शवलेल्या असतात. यापैकी उजव्या बाजूला जमीन, इमारत, यंत्रसामुग्री, फर्निचर, कॅश वगैरे ‘अॅसेट्स’ दाखवलेल्या असतात. तर डाव्या बाजूला कॅपिटल, संड्री क्रेडिटर्स, बँका व इतर संस्थांकडून घेतलेली कर्जे वगैरे ‘लायबिलिटीज’ दाखवलेल्या असतात. जर हिशेबपुस्तकात वर्षभर सर्व नोंदी अचूक केलेल्या असतील, तर बॅलन्सशीटच्या दोन्ही बाजूची रक्कम ‘टॅली’ होती म्हणजे जुळते. व्यवसायसंस्था एकल व्यापारी (Sole Proprietorship), भागीदारी (Partnership) आणि संयुक्त भांडवल कंपनी (Joint Stock Company) अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असल्या, व फायनल अकाउंट्स तयार करण्याबाबत त्यांचे वेगवेगळे नियम असले तरी, फायनल अकाउंट्सबाबतचे त्यांचे मूलभूत स्वरूप मात्र अशाच प्रकारचे असते. आजकाल ‘टॅली’ या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा वापर यासंदर्भात मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
मात्र बॅलन्सशीटवरून एका विशिष्ट दिवशी व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी होती हे कळते. परंतु अमुक एका कालावधीत ‘अॅसेट्स’ आणि ‘लायबिलिटीज’मध्ये कसा बदल झाला, हे बॅलन्सशीटवरुन कळत नाही. याकरता लागोपाठच्या दोन बॅलन्सशीट्सचा अभ्यास करून ‘फंड फ्लो’ व ‘कॅश फ्लो स्टेटमेंट्स’ तयार केली जातात. दीर्घकालीन आर्थिक नियोजन करण्यासाठी, ‘चालू अॅसेट्स’ (Current Assets) व ‘चालू जबाबदाऱ्या (Current Labilities) यांच्यातील बदल दाखवणारे ‘फंड फ्लो स्टेटमेंट’ उपयोगी ठरते. तर अल्पकालीन आर्थिक नियोजन करण्यासाठी, फक्त रोख मिळकत(Cash Income) आणि रोख खर्च (Cash Expenses) यातील बदल दाखवणारे ‘कॅश फ्लो स्टेटमेंट’ उपयुक्त ठरते.
प्रत्येक यशाकांक्षी उद्योजकाकडे हे हिशेब-नोंदी ठेवण्याचे व स्टेटमेंट्स तयार करण्याचे उच्च दर्जाचे नैपुण्य/कौशल्य असेल असं नाही हे मान्य, पण यातील किमान मूलभूत संकल्पना समजून घेण्याइतपत ज्ञान मात्र असायला हवे, यात शंका नाही.
व्यवसायात अकाउंट्समधील नोंदी व्यवस्थित कशा ठेवाव्यात यासाठी deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. अधिक माहिती- Accounting Services
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.
डॉ. सुहास भास्कर जोशी
suhasbj@yahoo.co.in