Search

‘नायका’: महिलेने सुरू केलेली पहिली भारतीय युनिकॉर्न कंपनी!

एका महत्त्वाच्या कॉन्फरन्ससाठी मुक्ता बेंगलोरला जाणार होती. त्यासाठी प्रेझेंटेशनची जय्यत तयारी तिने केली. कॉन्फरन्समध्ये घालायला छान फॉर्मल्सची खरेदी केली. सगळी कामं अगदी मनासारखी पार पाडून आत्मविश्वासाने ती एअरपोर्टला जायला टॅक्सीत बसली. वाटेत तिच्या एका कलिगला तिने पिकअप केलं आणि तिला बघताक्षणीच मुक्ताला एकदम कॉप्लेक्स आला. खरं तर कामात, प्रेझेंटेशनमध्ये मुक्ताचा हात धरू शकेल असं त्यांच्या टीममध्ये कोणीच नव्हतं. पण हलक्याशा मेकअपने तिच्या कलिगचा जो कायापालट झाला होता, त्याने मुक्ताचा आत्मविश्वासच डळमळीत झाला एवढं खरं. नकळतपणे तिने आपली पर्स उघडली, तर एका साधारण कॉम्पॅक्टशिवाय मेकअपचं काहीच सामान तिच्याकडे नव्हतं. फ्लाईटची वेळ होत आली होती आणि बेंगलोरला पोहोचल्यावर लगेच तिचं सेशन सुरू होणार होतं. त्यामुळे मेकअपचं साहित्य विकत घेणं आता शक्यच नव्हतं. अगदी खट्टू होऊनच ती एअरपोर्टवर उतरली आणि पुढे चालू लागली. अगदी सहज तिची नजर उजव्या बाजूच्या एका दुकानाकडे गेली आणि तिचे डोळेच लकाकले. घाईघाईने ती आत शिरली. विशेष म्हणजे ती वापरत असलेल्या दोन-तीन विशिष्ट ब्रॅंड्सचं सगळं मेकअप साहित्य तिथे होतं. पुढच्या पाच मिंनिटांमध्ये तिने आपली खरेदी केली आणि हसर्‍या चेहेर्‍याने ती फ्लाईटमध्ये जाऊन बसली. हा सगळा मूडचेंजर गेम घडून आला तो ‘नायका’ नावाच्या मेकअप स्टोअरमुळे. 
सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रात ‘नायका’ ही कंपनी फायर ब्रँड ठरली आहे 
फाल्गुनी नायर यांनी 2012 मध्ये पुरुष आणि महिलांसाठी ऑनलाईन सौदर्यंप्रसाधाने पुरवण्याच्या उद्देशाने ‘नायका’ या ई कॉमर्स कंपनीची स्थापना केली. सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रात त्यांची ही कंपनी फायर ब्रँड ठरली आहे. वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप, शंभरपेक्षा जास्त स्टोअर्सद्वारे त्यांची कंपनी आरोग्य आणि फॅशन उत्पादनांची विक्री करत आहे. अलीकडच्या काळात मोठमोठ्या मॉल्समध्ये, एअर पोर्ट्सवर ‘नायका’च्या अद्ययावत शो रूम्स दिसायला लागल्या आहेत. केवळ आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी नाही तर स्मार्ट, इंप्रेसिव्ह लूकसाठी कॉर्पोरेट क्षेत्रातच नाहीतर सगळ्याच क्षेत्रात महिला साजेसा मेकअप करताना दिसतात. त्यांना सहजगत्या मेकअपचं साहित्य उपलब्ध व्हावं याउद्देशाने आपली कारकीर्द अगदी वेगळ्या क्षेत्रातली असतानाही फाल्गुनी यांनी हे पाऊल उचललं. 

फाल्गुनी यांनी सिडनेहॅम कॉलेज आणि आयआयएम अहमदाबादमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर बँकिंग गुंतवणूक आणि ब्रोकिंग सेक्टरमध्ये 20 वर्ष काम केलं. या क्षेत्रात वावरतांना महिलांची दर्जेदार सौंदर्य प्रसाधनांची गरज त्यांच्या प्रकर्षाने लक्षात आली आणि ज्या वयात अनेक जणांना निवृत्तीची स्वप्न पडतात. त्याच वयात म्हणजे पन्नाशीमध्ये कोटक महिंद्रमधली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून 2020मध्ये त्यांनी ‘नायका’ ही कंपनी सुरू केली. एका महिलेनी सुरू केलेली ही पहिली भारतीय युनिकॉर्न कंपनी ठरली.

टाटा ग्रुपच्या ‘टाटा क्लिक’ आणि अंबानी यांच्या ‘टिरा’ या ब्युटी ब्रँडसमोर नायकाने आव्हान निर्माण केलं आहे
लोकप्रिय भारतीय आणि आंतराष्ट्रीय ब्रॅंड्सच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री ही कंपनी करते. लॅक्मे, काया स्किन क्लिनिक, लॉरिअल पॅरिस यासारखे दोन हजार देशी-विदेशी ब्रॅंड्स आणि दोन लाख उत्पादनांची किरकोळ विक्री या सगळ्या माध्यमातून कंपनी करते. केवळ दुसर्‍यांच्या ब्रॅंड्सची विक्री करून कंपनी थांबलेली नाही. तर स्वत:ची 35,000 उत्पादने त्यांनी विकसित केली आहेत. कंपनीचं हेडक्वार्टर मुंबईत आहे. 2015 मध्ये कंपनीने फक्त ऑनलाईन आणि इतर सगळ्या उपलब्ध मार्गांनी आपल्या उत्पादनांची विक्री सुरू केली. या कंपनीने सिनेअभिनेत्री, लोकप्रिय माणसं यांच्यासह जवळपास 800 क्यूरेटेड ब्रँड तयार केले आहेत. अल्पावधीत कंपनीने केलेल्या घौडदौडीमुळे टाटा ग्रुपच्या कॉस्मेटिक्स ई-रिटेलिंग ‘टाटा क्लिक’ आणि मुकेश अंबानी यांच्या ‘टिरा’ या ब्युटी ब्रँडसमोर आव्हान निर्माण झालं आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात ‘नायका’च्या उत्पादनविक्रीत 35% वाढ झाली असून हा आकडा जवळपास 32 अब्ज डॉलर्स इतका होता.

शेअर बाजारात नोंदणी झाल्यावर दीड तासाच्या आत नायकाचे बाजारमूल्य ब्रिटानिया, गोदरेज  इंडिगोसारख्या कंपन्यांच्या बाजारमूल्याएवढे झाले
फोर्ब्सच्या रिअल टाईम श्रीमंत यादीत भारताच्या 13 महिला अब्जाधीश आहेत. त्यात फाल्गुनी नायर यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांची नेटवर्थ 2.5 अब्ज डॉलर आहे.

नायकाची होल्डिंग कंपनी असलेली एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स ही कंपनी शेअर बाजारात नोंदणी होणारी पहिली महिला नेतृत्व असणारी कंपनी बनली आहे. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर दीड तासाच्या आत नायकाचे बाजारमूल्य ब्रिटानिया, गोदरेज आणि इंडिगोसारख्या कंपन्यांच्या बाजारमूल्याएवढे झाले. नायकाच्या शेअरची किंमत मुंबई शेअर बाजारात ८९ टक्क्यांनी वाढून २,१२९ रुपये झाली. बाजारात नोंदणी होताना नायकाच्या शेअरची किंमत १,१२५ रुपये होती. सध्या कंपनीचा शेअर २,००० रुपयांच्या पातळीवर आहे. 

फाल्गुनी यांचे इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि अद्वैताची डिजिटल मार्केटिंगची समज या दोन्हींची सांगड घालत कंपनीला प्रगतीपथावर नेलं
अद्वैता नायर ही फाल्गुनी यांची लेक आईप्रमाणेच उच्चशिक्षीत असून आपल्या आईसोबत सुरुवातीपासूनच या व्यवसायात तिने काम केलं आहे. अद्वैताने येल विद्यापीठातून अप्लाइड मॅथेमॅटिक्समध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स केले. नंतर तिने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केलं. 2012 मध्ये अद्वैता अमेरिकेतील बेन अँड कंपनीत सल्लागार म्हणून काम करत होती. आईला व्यवसायासाठी झटताना बघून अद्वैताने आपली न्यूयॉर्कमधील मोठ्या पगाराची नोकरी सोडली आणि ‘नायका’च्या सहसंस्थापक पदी भारतात ती रुजू झाली. फाल्गुनी यांचे इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि अद्वैताची डिजिटल मार्केटिंगची समज या दोन्हींची सांगड घालत मायलेकींनी अनेक नवीन आव्हानं स्वीकारून कंपनीला प्रतिष्ठा मिळवून दिली. 2018 मध्ये, अद्वैताने नायका फॅशन लाँच केली. ‘नायका’ हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ प्रकाशझोतातली व्यक्ती असा होतो. फाल्गुनी आणि अद्वैता या मायलेकी त्यांच्या नवकल्पना धडाडीने प्रत्यक्षात आणून हे नाव सार्थ करत आहेत. 

नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल,  त्यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. अधिक माहिती-Business Planning and Ideas
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.

मृणालिनी ठिपसे 

mrunalinithipse@gmail.com