छोटी जागा आणि मोजकी साधनं, उत्तम व्यवसायाचं गणित साधलं!
कोरोना आणि त्यातून उद्भवलेली टाळेबंदी यामुळे वर्क फर्म होम, ऑनलाईन शिक्षण वगैरे गोष्टींची आपल्याला सवय झाली. पण रोहन पेंडसे यांनी त्यापूर्वीच त्यांचा उद्योग वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरू केला आणि यशस्वीपणे सुरू ठेवला. इंटिरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रातली 'मोझॅक डेकॉर' ही त्यांची कंपनी गेली दहा वर्षे virtually म्हणजे आपापल्या राहत्या ठिकाणाहून उत्तमरित्या सर्व प्रोजेक्ट्स manage करते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या दोन मैत्रिणी सहकारी म्हणून जोडल्या गेल्या. काही कंत्राटदार सोबत आहेत; जे वेळोवेळी सुतार, रंगारी, इलेक्ट्रिशीयन व लागतील तशी गडी माणसं पुरवितात. इतर सामानसुमान यांच्याबरोबरच येतं नि परत जातं. प्रत्यक्ष दाखवायला लागतील तेवढी काही samples सोबत ठेवली जातात, बस्स. आहे की नाही सुटसुटीत? इथे प्रत्येक ग्राहकाची गरज आधी व्यवस्थित समजून घेऊन मग त्याप्रमाणे कल्पना सुचविल्या जातात. अलिकडे अनेक co-working spaces उपलब्ध झाल्यामुळे गरजेप्रमाणे भेटून समोरासमोर बसून अपेक्षित कामांची यादी, एकूण आराखडा, डिझाईनस्, खर्च सादर केले जातात. नक्की करायचं काम आणि डिझाईनस् दोन्हीसाठी क्लाएंटकडून संपूर्ण सहमती आल्यावरच पुढची तयारी सुरू होते. कामाचं स्वरूप, त्यासाठी लागणारा वेळ, यात गुंतविली गेलेली माणसं अधिक इतर साधनं, हे सगळं गृहीत धरून दोघांच्या सोयीसाठी पैसे टप्प्याटप्प्याने आकारले जातात. आणि साहजिकच, जो आपल्या कामाकडे कला म्हणून बघतो, त्याच्यासाठी ग्राहकाच्या कल्पनेचा आविष्कार साकारता येणं, हे जणू रोज नव्या आनंदाचं आव्हानच असतं.
बरं हे असं व्यावसायिक आव्हानं जोखत पेलविण्याचं बाळकडू त्यांना पहिल्यापासूनच मिळत गेलं होतं. रोहन यांचे वडील, मुकुंदराव पेंडसे यांचा अनेक वर्षे मेटल प्लेट्स बनविण्याचा व्यवसाय होता. आपलं पदविका शिक्षण पूर्ण करून रोहन, या घरच्या व्यवसायात ग्राफिक डिझायनिंगचं काम पाहत होते. पण एवढ्याने समाधान मात्र मिळत नव्हतं. एके दिवशी स्वतंत्रपणे काही करण्याचं विचारचक्र सुरू झालं. पण "चालू व्यवसाय सोडून नवं काही निर्माण करण्यात किती काळ लोटेल, आणि वर त्यात निश्चित यश मिळेल की नाही?" या विचारांत बराच काळ गर्क असताना; मागून एक खंबीर आवाज ऐकू आला, "तुला जे काही करायचं आहे, त्यात माझा पूर्ण पाठिंबा आहे. माझी नोकरी चालू राहील, त्यामुळे घरची चिंता मुळीच करू नको." हे शब्द पत्नी पूजा रोहन पेंडसे यांचे होते जे आजतागायत त्यांचा विश्वास बनून सोबत आहेत. "आणि हेच माझ्या यशाचं खरं श्रेय आहे" हे ते आवर्जून सांगतात. या नंतर मात्र रोहन पेंडसे यांनी मागे न बघता पूर्णपणे आपल्या ध्येयाच्या दिशेने स्वतःला झोकून द्यायचं ठरवलं.
अर्थातच सुरुवातीचा काळ थोडा जास्त मेहनतीचा होता. एक दोन मित्र जे आर्किटेक्ट होते, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांच्याशी बोलून पहिली काही कामं त्यांच्या बरोबर करता आली. जोडीला त्यांनी Interior Designingचा कोर्स करायला घेतला. काही मोठ्या कंपन्यांबरोबर काम करत त्यांची planning, design, executionची पद्धत समजून घेतली. तसंच काही छोटी कामं करून देताना त्यांचं client handling, finance management, network building या गोष्टी बघून, शिकून घेतल्या. स्वतंत्रपणे कामं करताना अनेक अनुभवांना तोंड देणं शिकता आलं. साधारण २०१३ च्या मध्यात स्वतंत्रपणे काही करण्याचा निर्णय घेतला आणि २०१६ पर्यंत Mosaic decor नावाने कंपनी रजिस्टर केली. मग सकाळ वार्तापत्रातून काही महिने जाहिराती देत गेले. त्यात 'आम्ही बेसिक रंगकाम, दुरुस्ती, फर्निचरची कामे करून देतो' अशी जाहिरात दिली. दहा वर्षांपूर्वीची ही गोष्ट, त्यामुळे व्यवसायात उतरू पाहणाऱ्या मराठी माणसाला मदत करणारी काही मराठी माणसं मिळून गेली. त्यांना काम आवडलं, तशी त्यांनी पुढची माणसं जोडून दिली.
तशीच प्रमोशनसाठी फेसबुकची सुद्धा खूप मोठी मदत झाली. तिथे स्वतः कामात केलेले नवनवीन प्रयोग, त्याचे फोटो, व्हिडिओ, लोकांच्या प्रतिक्रिया, स्वतः साईटवर न जाता देखील सर्वांना प्रत्यक्ष पाहता आल्या. ही सगळी माहिती फक्त स्वत:च्या पेजपुरती मर्यादित न ठेवता रोहन यांनी फेसबुकवर विविध ग्रुप्स जॉईन केले आणि तिथेही ते आपल्या कामाच्या पोस्ट्स् टाकत गेले. यातून Mosaic decor हे नाव लोकांच्या नजरेत राहिलं. आणि कामाच्या वेळेला आपसूकच पुढे केलं गेलं. रोहन अभिमानाने सांगतात की, "आता, यावर्षी मी ब्रॅण्डिंगसाठी पैसे गुंतविले आहेत. या व्यतिरिक्त मार्केटिंगसाठी मी पहिल्या वर्षातल्या काही जाहिराती सोडता एकही रुपया खर्च केला नाही!"
आहे की नाही, interesting? आजच्या युगात उपलब्ध असलेल्या साधन - सुविधांचा सुयोग्य वापर करता आला तर..? तर थोड्या गुंतवणुकीत उत्तम व्यवसायकुशलता साध्य होऊ शकते!
स्वतःची अशी वेगळी ऑफिस स्पेस न वापरता देखील इतरांना त्यांच्या स्वप्नातली स्पेस तयार करून देणाऱ्यांच्या यशस्वीतेची ही छोटीशी कहाणी! कशी वाटली?
deAsra फाउंडेशन उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचं काम करते. deAsraकडे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. अधिक माहिती - Expert consultation
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.
प्रज्ञा वझे
pradnyablogworks@gmail.com