Search

आधुनिक सांदीपनी- ऑनलाइन ई-लर्निंग प्लॅटफॉर्म !

सध्याच्या काळात उद्योजकांपुढचे कर्मचाऱ्यांच्या संबंधीचे मोठे आव्हान म्हणजे मनुष्यबळाला  सतत  व्यवसायसंबंधीचे शिक्षण  देऊन त्यांना अद्ययावत ठेवणे.  आतापर्यंत  कर्मचाऱ्यांची शिक्षणाची गरज  कंपनीतील  अनुभवी व ज्येष्ठ  कर्मचारी  पूर्ण करत होते. आता मात्र कर्मचाऱ्यांचे  सर्व स्तरातील  कंपनी सोडून जाण्याचे प्रमाण बघता सध्या सर्वच कंपनीत अनुभवी कर्मचाऱ्यांची वानवा आहे. या पार्श्वभूमीवर  आता उपलब्ध असलेले  ऑनलाइन  ई-लर्निंग  प्लॅटफॉर्म  महत्त्वाचे  व उपयुक्त ठरू लागले आहेत.

ऑनलाइन अभ्यासक्रमाकडे जाण्यापूर्वी ऑनलाइन शिक्षण (E-Learning) म्हणजे काय हे समजून घेऊया. ऑनलाइन शिक्षण म्हणजे ऑनलाइन आणि व्हर्च्युअल माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना दिले जाणारे शिक्षण. तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यासाठी अभ्यासक्रम आणि व्याख्याने विद्यार्थ्यांना इंटरनेट पोर्टलद्वारे उपलब्ध करून दिली जातात आणि त्यांना मोबाईल किंवा संगणक उपकरणाद्वारे प्रवेश मिळू शकतो. ऑनलाइन कोर्स विनामूल्य रेकॉर्ड केलेल्या सामग्रीच्या वापराद्वारे किंवा थेट माध्यमातून समाविष्ट केला जाऊ शकतो. ऑनलाइन कोर्स पद्धतींमध्ये इंटरएक्टिव्ह व्हिडिओ सत्र, थेट व्याख्याने, रेकॉर्ड केलेली व्याख्याने, ऑनलाइन असाइनमेंट, केस स्टडी, PDF, ईबुक, PPT सादरीकरण अशा साधनांचा समावेश होतो. कार्यरत व्यावसायिकांसाठी शॉर्ट टर्म क्रॅश कोर्सदेखील उपलब्ध आहेत.  
अशा ऑनलाइन कोर्सेसचे अनेक फायदे आहेत. ऑनलाइन कोर्समध्ये शिकण्याची सामग्री कोणत्याही वेळी, कोठूनही उपलब्ध असते. परीक्षा, असाइनमेंट आणि ऑनलाइन वर्ग वेळापत्रक ऑफलाइन अभ्यासक्रमांपेक्षा बरेच लवचिक आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या तारखा निवडण्याचे बरेच स्वातंत्र्य दिले जाते. ऑनलाइन कोर्सेसमध्ये वर्ग, फळा, लेक्चरसाठी शिक्षक अशा गुंतवणुकीची गरज नसल्याने हे कोर्सेस अत्यंत वाजवी दरात उपलब्ध असतात. ऑनलाइन कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या सोयी व गतीनुसार कोर्सचा पाठपुरावा करण्याचा फायदा आहे. या ऑनलाइन ई-पोर्टलवर विविध विषयांवर अक्षरशः हजारो कोर्सेस उपलब्ध आहेत. कर्मचारी त्यांच्या गरजेनुसार व बजेटनुसार त्यातील संबंधित चांगले कोर्सेस निवडून शिक्षण घेऊ शकतात. बऱ्याच जणांना ऑनलाईन कोर्सेस नेहमीच्या कॉलेजमध्ये मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा कमी गुणवत्तेचे व मानाचे वाटतात. मात्र यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ऑनलाइन कोर्सेस हे नेहमीच्या कोर्सेस इतकेच महत्त्वाचे व मूल्यवान आहेत.

उद्योजकांच्या माहितीसाठी मी अग्रगण्य ई-लर्निंग प्लॅटफॉर्मची यादी खाली देणार आहे:
https://www.udemy.com
https://unacademy.com
https://byjus.com/
https://www.coursera.org
https://www.khanacademy.org
https://www.linkedin.com › learning
https://www.masterclass.com
https://www.udacity.com
https://www.skillshare.com
तुम्ही या कंपन्यांचे कोर्सेस तपशीलवार अभ्यासू शकता. साधारणतः या कोर्सेसची 3 प्रकारात वर्गवारी करता येते- (1) Technical training- तांत्रिक शिक्षण (2) Behavioural Training-  विचार व वर्तनासंबंधीचे (3) Leadership Training- नेतृत्वासंबंधीचे शिक्षण.

कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी  प्रमुख पायऱ्या आहेत- 
प्रत्येक कर्मचाऱ्याची कामगिरी व क्षमता लक्षात घेऊन त्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण गरजेचे आहे याची यादी बनवा.
ऑनलाइन  ई-लर्निंग  प्लॅटफॉर्मचा अभ्यास करून ते शिक्षण परिपूर्णतेने देणारे कोर्सेस कुठे उपलब्ध आहेत ते शोधा.
प्रत्येक ऑनलाइन  ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर प्रत्येक कोर्ससाठी किती खर्च आहे ते स्पष्टपणे नमूद केलेले असते. कित्येक कोर्सेस तर मोफतही असतात. सर्व कोर्सेसचा खर्च तुमच्या बजेटप्रमाणे आहे का ते तपासा. खर्च बजेटपेक्षा बाहेर जात असेल तर महत्त्वाचे कोर्सेस प्राधान्याने यादीत समाविष्ट करा व बाकीचे कोर्सेस भविष्यासाठी नमूद करून ठेवा. 
 
संबंधित कर्मचाऱ्यांना एकत्र बोलून त्यांना या ऑनलाइन कोर्सेसची माहिती द्या. त्यांना या कोर्सेसमार्फत शिक्षण घ्यायचे आहे का ते तपासा. ऑनलाइन कोर्स करण्यासाठी कंपनीतील कामाव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना वैयक्तिक वेळही द्यावा लागतो. काही कोर्सेससाठी तर शनिवार व रविवार पूर्ण वेळ लेक्चर्स, होमवर्क, प्रोजेक्ट, असाइनमेंट यासाठी राखून ठेवावा लागतो.  म्हणूनच या सर्व वेळेचा विचार करून मगच कर्मचाऱ्यांनी कोर्सेससाठी स्वतःची संमती कळवावी. 

एकदाका कोर्सेसची लिस्ट व कर्मचाऱ्यांची संमती मिळाली की त्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मशी संपर्क साधून त्यांच्याशी कोर्सेस देण्याबाबत खर्चाची वाटाघाटी करा.  
हे कोर्सेस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य त्या डिजिटल म्हणजेच डेस्कटॉप, लॅपटॉप इत्यादी साधनांची पुरवणी करा.    
कर्मचारी ऑनलाइन कोर्सेस वेळेत पूर्ण करत आहेत की नाही हे वारंवार तपासत रहा व कोर्सेस वेळेत यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सर्वांसमोर सत्कार करून त्यांच्या पाठीवर  शाबासकीची थाप द्या. मधूनमधून कोर्सेस पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्या कोर्सचा  कंपनीतील कामासाठी कर्मचाऱ्यांना व कंपनीला कितपत फायदा झाला याची चाचपणी करा. 
या सर्व उपक्रमात उद्योजकांची भूमिका महत्त्वाची आहे. सध्याची बाजारपेठ व अर्थव्यवस्था  डिजिटल होत असल्याने उद्योजकांनी ऑनलाइन कोर्सेसला नाके न मुरडता स्पष्टपणे आधुनिक व प्रागतीक भूमिका घ्यावी. किंबहुना स्वतःही स्वतःच्या प्रगतीसाठी पूरक असे काही कोर्सेस  पूर्ण करावे व कंपनी समोर एक आदर्श ठेवावा. कंपनीतले कोर्सेस ऑनलाइन पूर्ण करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना सर्वांसमोर प्रोत्साहित करावे व वेळेत पूर्ण न करू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या  जाणून घ्याव्यात.


deAsra फाउंडेशन उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचं काम करते. deAsraकडे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. अधिक माहिती - Expert consultation
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.

सलील चिंचोरे 

chinchoresalil@gmail.com