Search

महिलांना व्यवसायासाठी सुवर्ण संधी, या सरकारी योजनेचा लाभ घ्या!

दोन वर्षापूर्वी जोरात असलेला पर्यटन व्यवसाय एकदमच बसला. मात्र गेल्या वर्षापासून या व्यवसायाने पुन्हा मोठी उभारी घेतली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ८० लाख पर्यटक काश्मिरमध्ये गेले. गेल्या ५० वर्षातील ही सर्वाधिक संख्या. यंदासुध्दा अशी परिस्थिती दिसून आली. सर्वच प्रकारचे निर्बंध आता जवळपास उठल्याने काश्मिरच नव्हे तर देश आणि परदेशातही पर्यटकांचा जाण्याचा ओघ वाढता राहिला. 

पर्यटनामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाच्या अमाप संधी असून त्याचा फायदा वेगवेगळ्या पध्दतीने घेतला जातो. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय या राज्यातील पर्यटन व्यवसायात महिला ठळकपणे दिसतात. त्यांना बऱ्याच सोयी-सवलती केंद्र आणि संबंधित राज्य सरकारे देत असतात. महाराष्ट्र सरकारने आता पर्यटन क्षेत्रात अधिकाधिक महिलांनी व्यावसायिक म्हणून यावे यासाठी वैशिष्ट्यपूर्ण धोरण तयार केले असून ते "आई" या खास जिव्हाळ्याच्या नावाने ओळखले जाईल. हे महिलाकेंद्रित धोरण असून महिलांच्या सुरक्षित पर्यटन आणि प्रवासावर मुख्य लक्ष केंद्रित करण्यात येईल. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कृतीदलाची स्थापना केली जाईल.

या धोरणामध्ये (१) महिला उद्योजकता विकास, (२) महिलांकरिता पायाभूत सुविधा, (३) महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, (४) महिला पर्यटकांसाठी खास तयार केलेली (कस्टमाईज्ड) उत्पादने, (५) सवलती व प्रवास या बाबींचा समावेश आहे.

धोरणाची वैशिष्ट्ये
(१) पर्यटन संचालनालयाकडे नोंदवलेल्या राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील महिलांमार्फत चालवण्यात येणाऱ्या किंवा त्यांच्या मालकीचे असलेल्या प्रत्येकी १० हॉटेल, होमस्टे, रेस्टारेंट, पर्यटन आणि प्रवास (टूर ॲण्ड ट्रॅव्हल एजंसी) संस्था यांना विशेष सोयी-सवलती दिल्या जातील. (२) उपरोक्त नमूद बाबींसाठी बँकाकडून कर्ज घेतले असल्यास १५ लाख रुपयांच्या कर्जाच्या रकमेवरील व्याजाची रक्कम १२ टक्क्यांच्या मर्यादेत, पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा ७ वर्षे कालावधीपर्यंत किंवा ४.५ लाख रुपयापर्यंतच्या मर्यादेत (या तीन पैकी जे आधी घडेल ते) जमा केली जाईल. हे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक.  अर्थातच यासाठी पुढील काही अटी आणि शर्ती असतील- (अ) कर्जाचे हप्ते वेळेवर भरायला हवेत, (ब) पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक सर्व परवानग्या आवश्यक. (क) महिलांच्या मालकीच्या ट्रॅव्हल आणि टूर कंपनीमध्ये ५० टक्के महिला कर्मचारी असणे आवश्यक. (ड) महिलांच्या मालकीच्या हॉटेल/रेस्टारेंटमध्ये ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर महिला कर्मचारी असणे आवश्यक.

(३) पर्यटन संचालनालयाकडे नोंदवलेल्या महिला सहल संचालक (टूर ऑपरेटर्स), सहल मार्गदर्शक, महिला वाहन चालक, इतर महिला कर्मचारी यांना केंद्र व राज्य शासनाच्या विमा योजनेमध्ये सहभागी करुन घेतले जाईल. त्यांचा वार्षिक विमाहप्ता पहिल्या ५ वर्षासाठी शासनामार्फत भरण्यात येईल. (४) एमटीडीसी(महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ)चे औरंगाबाद येथील पर्यटक निवास, राज्यातील पहिले पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास आणि खारघर नवी मुंबई येथील अर्का रेस्टॉरंट, पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालवण्यात येईल. (५) एमटीडीसीच्या टूर ऑपरेटर्स मार्फत आयोजित पर्यटन सर्किट पॅकेजेसमध्ये महिला पर्यटकांना २० टक्के सूट. ही रक्कम एमटीडीसी मार्फत संबंधित टूर ऑपरेटरला दिली जाईल. (४) १ ते ८ मार्च या कालाधीत साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिवस/ आठवड्यानिमित्त तसेच वषभरात इतर २२ दिवस म्हणजेच एकूण ३० दिवस पर्यटन महामंडळाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही रिसॉर्टस, निवासस्थान यामधील ऑनलाइन दरात ५० टक्के सवलत. (५) पर्यटनस्थळी महिला बाईक सेवा सुरु करण्यात येईल. (६) महिला पर्यटक टूर ऑपरेटर्ससाठी अनुभवात्मक टूर पॅकेजचे आयोजन. (७) महिलांसाठी साहसी सहली व ट्रेकिंग टुर्सचे आयोजन. (८) महिला  पर्यटकांसाठी एक दिवसीय सहल व शहर सहलींचे आयोजन. (८) शारीरिक आणि मानसिक अपंग असणाऱ्या दिव्यांग महिला पर्यटकांसाठी विशेष सहलींचे आयोजन. (९) महिला बचत  गटांना त्यांच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्ट/निवास्थानी जागा उपलब्ध करुन दिली जाईल. (१०) एमटीडीसी रिसॉर्टसमध्ये पाच वर्षापर्यंतच्या मुले असणाऱ्या पर्यटकांसाठी पाळणाघर उभारले जातील. (११) अपंग किंवा वृध्द महिला पर्यटकांना लिफ्टजवळील खोल्या प्राधान्याने उपलब्ध करुन दिल्या जातील. (११) महिलांसाठी विशेष खेळ आणि मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पर्यटन संचालनालयात महिला पर्यटन धोरण कक्षाची स्थापन करण्यात येईल.

संपर्क- एमटीडीसी, मफतलाल हाऊस, पहिला माळा, एचटी पारखे मार्ग, १६९,बॅकबे रिक्लेमेशन, आयसीआयसीआय बँकेच्या बाजूला, चर्चगेट मुंबई-४०००२०, दूरध्वनी- ०२२-४१५८०९०२, संकेतस्थळ-mtdc.co.


 व्यवसायाचं नियोजन सुरू असताना आपली बिझनेस आयडिया खरच व्यावहारिक आहे की नाही हे तपासणं महत्वाचं आहे. यासाठी deAsra फाउंडेशनची IDEA VALIDATION  ही सेवा तुम्हाला फायद्याची ठरू शकते.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.

– सुरेश वांदिले

ekank@hotmail.com