मेडिकल क्षेत्रातल्या व्यवसाय संधी, फक्त ३० तासांचा कोर्स!
फॅशनेबल वस्त्रप्रावरणांकडे आपणा सर्वांचं कायम लक्ष असतं. नवनवीन छटा आणि रंगसंगती असलेल्या ऋतूनिहाय पोषाखांची विविध माध्यमांमधून बरीच चर्चा होत असते. मात्र असं एक क्षेत्र आहे की, ज्यास विशिष्ट प्रकारची वस्त्रप्रावरणं अतिशय मोठ्या प्रमाणावर लागत असूनही त्याविषयी आपल्याकडे अल्प किवा अजिबातच चर्चा होत नाही. त्याबद्दल बहुतेक सर्वजणच अनभिज्ञ असतात. हे क्षेत्र म्हणजे वैद्यकीय.
आरोग्यविषयक समस्या किंवा प्रश्नांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चाललीय. त्यामुळे या क्षेत्राचा विस्तार एखाद्या मोठ्या उद्योगासारखा झालाय. या क्षेत्रासाठी फॅशनेबल वस्त्रप्रावरणांची गरज भासत नसली तरी, दवाखाने ते भव्य अशी कार्पोरेट रुग्णालये यांना चादरी, अर्भे, पडदे, ऊशा, रुग्णांना घालावयाची वस्त्रे, डॉक्टर, नर्सेसची वस्त्रे, मुखपट्टी, मलमपट्टी, रुमाल आणि आणखीही इतर वस्त्रे यांची गरज मोठ्या प्रमाणावर भासत असते. हे क्षेत्र नव्या आणि जुन्या दोन्ही उद्योजकांसाठी उत्पन्नाचं चांगलं स्त्रोत ठरु शकतं.
याविषयाचं महत्व आणि व्याप्ती इच्छुकांच्या लक्षात यावी म्हणून, सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल स्कूल ऑफ टेक्सटाइल ॲण्ड मॅनेजमेंट, या संस्थेनं मेडिकल टेक्सटाइल मॅनेजमेंट हा ३० तास इतक्या अल्पमुदतीचा प्रशिक्षण कम अभ्यासक्रम सुरु केला आहे. ही संस्था भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रातील शिक्षण -प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास वाव देणारी आपल्या देशातील ही महत्वाची संस्था समजली जाते.
हा अभ्यासक्रम/प्रशिक्षण ऑनलाइन पध्दतीने करता येतो. कोणत्याही विषयातील पदवीधर हा अभ्यासक्रम करु शकतात.
काय शिकाल?
(१) वैदयकीय क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या वस्त्रप्रावरणाची निर्मिती आणि तंत्र, (२) या वस्त्रप्रावरणाचं विपणन (मार्केटिंग), नियामके, नाविण्यपूर्ण बाबी, दर्जा आणि गुणवत्ता परीक्षण, (३) या क्षेत्रात उद्योग सुरु करण्यासाठीचे कौशल्य.
संपर्क भ्रमणध्वनी- ८८७०४७९६९५
ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन इन द टेक्सटाइल इंडस्ट्री-
काय शिकाल?
(१) वस्त्रोद्योग आणि फॅशन तंत्रज्ञान उद्योगात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रभावी व सुलभतेनं वापर करुन व्यवसायवृध्दी.
(२) वस्त्रोद्योग आणि फॅशन तंत्रज्ञान उद्योगासाठी आवश्यक निर्मिती प्रक्रिया, तंत्र, कार्यान्वयन आणि पुरवठा साखळी.
हे अल्पमुदतीचं प्रशिक्षण असलं तरी, त्याचा उपयोग ब्लॉकचेन तंत्रज्ञान आधारित उद्योगात रोजगार आणि स्वंयरोजगार मिळवण्यासाठी होऊ शकतो.पुरवठा साखळीला डिजिटल माध्यमात रुपांतर करण्यासाठी सुयोग्य अशी विदा (डेटा) गोळा करणं आणि आपल्या उद्योगाच्या गरजेनुसार ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचं कौशल्य प्राप्त करता येतं.
या प्रशिक्षणाला कोणत्याही विषयातील पदवीधराला प्रवेश मिळू शकतो. हे प्रशिक्षण ऑनलाइन पध्दतीने दिलं जातं. या प्रशिक्षण/अभ्यासक्रमाचा कालावधी केवळ १५ तास आहे.
संपर्क भ्रमणध्वनी- ९८९४२९०७४०
०००
नॉनवोव्हन फॅब्रिक्स
जी वस्त्रप्रावरणं साधारणत: विणली जात नाहीत आणि ज्यांचा वापर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, वाहने, गृहपयोगी वस्तू, बांधकाम आदींमध्ये केला जातो, त्यांचा समावेश या वर्गवारीत होतो.
या प्रकारातील कापड किंवा वस्त्र हे तंतू किंवा प्लॅस्टिकला रासायनिक पध्दतीने आणि यंत्राने किंवा औष्णिक पध्दतीने एकत्र आणून तयार केलं जातं. असं वस्त्र/कापड एखाद्या सछिद्र सपाट पत्र्यासारखं असतं. या पक्रियेत शिवणे किंवा विणणे या तंत्राचा वापर केला जात नाही. तंतूना धाग्यामध्ये रुपांतर करण्याची गरज नसते.
(काही उदाहरणे-बस/ रेल्वे/ विमानातील एअर प्युरिफायर, चहा - कॉफीच्या छोट्या बॅग/सॅचेट, फरशी पुसण्याचं किंवा कोरडे करण्याचं कापड, खूर्ची किंवा सोफ्याखालील डस्ट कव्हर, गालीच्याच्या खाली वापरलं जाणारं कापड, सलूनमध्ये वापरण्यात येणारं विशिष्ट प्रकारचं कापड, बॅटरीमधील कॅथोड आणि ॲनोडला विलग करण्यासाठी वापरण्यात येणारं सूक्ष्म थर असलेलं कापड, वाहनांच्या पृष्ठ भागावरील चटई, इत्यादी.)
अशा प्रकारच्या नॉनवोव्हन कपड्यांच्या क्षेत्रातही रोजगार/स्वंयरोजगाराच्या विपुल संधी दडलेल्या आहेत. सध्या या क्षेत्राची झपाट्यानं वाढ होताना दिसते आहे. या संधींची माहिती नव उद्योजकांना व्हावी म्हणून नॉनवेव्हन टेक्सटाइल मॅनेजमेंट हा प्रशिक्षण/ अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. कालावधी- ३० तास. कोणत्याही विषयातील पदवीधरास हे प्रशिक्षण करता येतं. प्रशिक्षण शुल्क १० हजार रुपये.
काय शिकाल?
(१) नॉनवोहन कपड्यांचं सध्याच्या काळातील महत्व.
(२) नॉनवोहन कपड्यांची निर्मिती, तंत्रज्ञान, नियामके, वाणिज्यिक बाबी, प्रकिया, यंत्र सामग्री आदी.
हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर या प्रकारातील कापडाच्या विविध उपयोगाबद्दलचं ज्ञान प्राप्त होते. तांत्रिक वस्त्रोद्योग (टेक्निकल टेक्सटाइल्स) या क्षेत्रात स्वत:चा उद्योग किंवा रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या बाबी लक्षात येतात.
संपर्क-ईमेल-skill@svpitm.ac.in
व्यवसाय सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल तर त्यासाठी कर्ज घेणं आवश्यक असतं. deAsra फाउंडेशन कर्ज मिळवून देण्यासाठी सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. अधिक माहिती-Business Loan.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.
– सुरेश वांदिले
ekank@hotmail.com