गुरु वठारेंची नाटकाच्या 'मॅनेजमेंट'मधून लाखोंची उलाढाल
वडिलांच्या हौशी नाट्य संस्थेची राज्य स्पर्धा, रेल्वेची स्पर्धा आणि कामगार नाट्य स्पर्धेतील नाटके पाहात मोठा झालेल्या गुरू वठारेंनी पुढे महाराष्ट्रातील व्यावसायिक नाटके सोलापूरकरांना दाखवून त्यांच्या सांस्कृतिक श्रीमंतीत वाढ केली. नाटकालाच स्वतःच्या उपजीविकेचे साधन मानले आणि व्यावसायिक नाटकांच्या 'मॅनेजमेंट'मधून त्यांनी लक्षावधी रुपयांची उलाढाल केली. हौशी रंगभूमीवरून व्यावसायिक रंगभूमीकडे झेप घेतली. आणि आता राज्य नाट्य स्पर्धांसाठी परीक्षक, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य अशी प्रगती साधली आहे. गुरू वठारेंनी आयुष्यभर 'नाटक एके नाटक' केले आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवला. नाटकाच्या भरभराटीच्या काळात दर आठवड्याला एक नाटक त्यांनी सोलापुरात मागवले, त्याचे व्यवस्थापन केले आणि रसिकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला.
सोलापुरातील ललित कला मंदिर ही नाट्य संस्था आणि नामदेव वठारे यांचे अतूट असे नाते. गुरू वठारेंचे ते वडील. रेल्वेमध्ये ते तिकिट तपासनीस होते. हौशी नाट्य व एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असे. ललित कला मंदिर या संस्थेचे वैशिष्ट्य असे की ख्यातनाम सिने-नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, गायिका अभिनेत्री फैय्याज यांच्यासह अनेक मान्यवरांनी या संस्थेत नाटकाचे पहिले धडे गिरवले आहेत. नामदेव वठारे त्यांच्यासमवेत होते. त्यामुळेच डॉ. पटेल किंवा फैय्याज यांच्यासह नाट्यसृष्टीतील सगळ्या ज्येष्ठ कलावंतांसाठी गुरू वठारे हा हक्काचा माणूस झाला आणि त्यांच्या सहवासाने गुरू वठारे 'सांस्कृतिक व्हीआयपी' झाला. कारण सोलापूरातील कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला, व्याख्यानमालेला; अगदी एखाद्या दुकानाच्या उद्घाटनाला कलावंताला निमंत्रण द्यायचं असेल तर गुरू वठारेंची शिफारस लागते. १९९५ सालापासून गुरू यांनी या क्षेत्रात जी मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि अर्थार्जनाबरोबरच माणसं कमावली त्याचं फलित म्हणून त्यांची प्रतिमा सोलापुरात 'लार्जर दॅन लाईफ' झाली. त्यांच्या जवळचे मित्र त्यांच्या उंचीवरून 'आकाराने लघु असला तरी कर्तृत्वाने गुरू आहे,' असे म्हणतात. 'मूर्ती लहान, पण कीर्ती महान' या म्हणीचं हे प्रत्यंतर !
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांचे प्राबल्य नव्हते, त्या काळात सोलापुरात होणाऱ्या कित्येक नाटकांची 'मॅनेजमेंट' त्यांच्याकडे होती. त्याखेरीज अनेक नाटके त्यांनी स्वतः मागवली. खूपदा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला, बऱ्याचदा खिशाला चाटही बसली. पण व्यवसाय म्हटल्यावर थोडे डावे-उजवे होणार म्हणून पुन्हा नव्या जोमाने ते कामाला लागले. 'रसिकराज' ही योजना राबवून वर्षभरात सहा ते सात दर्जेदार व्यावसायिक नाटकांचे प्रयोग सोलापूरकरांसाठी ते मागवत. त्यातून मोहन आगाशे, वंदना गुप्ते, भरत जाधव, प्रशांत दामले, कविता लाड, वैभव मांगले, अरूण नलावडे, इला भाटे यांच्यासारखे दिग्गज कलावंत सोलापुरात आले. 'संज्या छाया', 'सही रे सही', 'वाडा चिरेबंदी', 'एका लग्नाची पुढची गोष्ट', 'अलबत्या गलबत्या', 'वेलकम जिंदगी', 'राजाला जावई हवा', 'चि. सौ. कां. रंगभूमी', 'मदर्स डे', 'यू टर्न-२', 'श्री बाई समर्थ', 'चल तुझी सीट पक्की', 'आमच्या प्रेमाचे १३ दिवस', 'अनन्या', 'क्वीनमेकर', 'अ फेअर डील' अशी अनेक नाटके त्यांनी दाखवली. शिवाजी उपरे यांचीही त्यांना या उपक्रमात उत्तम साथ मिळाली होती.
सुरेखा पुणेकर यांच्या गाजलेल्या 'नटरंगी नार'चे काही प्रयोग गुरू वठारे यांनी आयोजिले होते. महाराष्ट्र, कोकण, बेळगाव, गोवा कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम वितरण आणि व्यवस्थापन कार्यसमितीवर त्यांची निवड झाली आहे. नामदेव वठारे यांच्या स्मरणार्थ रोहिणी हट्टंगडी यांची मुख्य भूमिका असलेले 'आई, तुला मी कुठे ठेवू', डॉ. गिरीश ओक, सौरभ गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेले 'कहानी में ट्विस्ट', आणि झी गौरव, मटा सन्मानासह २५ पुरस्कार मिळवणारे 'लेझीम खेळणारी पोरं' या तीन नाटकांचा महोत्सव त्यांनी केला. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. एकावर्षी बालनाट्य महोत्सव घडवून बाळगोपाळांना नाटकांची मेजवानी त्यांनी दिली होती. 'रंगकर्मी' या संस्थेची स्थापना करून सोलापुरातील अनेक हौशी कलावंतांना त्यांनी संधी दिली. बालनाट्य, एकांकिका, संगीत मैफली, तीन व दोन अंकी नाटकांच्या प्रयोगांची निर्मिती त्यांनी त्यातून केली. सोलापूरातील नाट्य रसिकांची अभिरुची घडवण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले. अभिवाचन स्पर्धा, नाट्य लेखन स्पर्धा, वैयक्तिक अभिनय स्पर्धा असे उपक्रम राबवले.
'पु.ल.आठवणीतील गाणी', 'पहाटवारा', 'आई', 'गुदगुल्या', 'बोधीवृक्षाच्या छायेखाली', 'अमृतवेळा' अशा अनेक कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली. 'आई' या कार्यक्रमाचे तर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये त्यांनी प्रयोग घडवून आणले. 'रुपक', 'दोला', 'छेद' अशा नाटकांची निर्मिती त्यांनी केली. याखेरीज 'देवनवरी', 'तनमाजोरी', 'हे झाड जगावेगळं', 'डाऊन ट्रेन', 'तू वेडा कुंभार' अशा नाटकांचे नेपथ्य केले. त्यात भूमिकाही केल्या. 'रक्तबीज', 'रातराणी', 'सत्तेचाळीस एके सत्तेचाळीस', 'माझा खेळ मांडू दे' या नाटकांची निर्मिती त्यांनी केली.
२०२०, २१, २२ ही तीन वर्षे सगळ्यांसाठीच खडतर गेली. कारण या काळात कोरोनाने कहर केला होता. चित्रपटगृह, नाट्यगृहं त्यावेळी बंद झाली. ती सुरू व्हायला आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळायला खूप कालावधी गेला. त्याआधी एका मोठ्या आजारातून गुरू वठारे बरे झाले. या काळात हिंमत न हरता त्यांनी आपल्या कोकणातील संपर्कातून कोकमाचा व कैरीच्या पन्ह्याचा सिरप, तांदळाची कडबोळी, मालवणी खाजा, चिवडा, हापूस आंबा पोळी, मुरंबा, फणसाचे गरे, आंबावडी यांची विक्री घरोघरी सुरू केली. कोरोना काळ संपला, पण त्या काळात जोडलेल्या ग्राहकांना आजही ही सेवा देण्याचे काम ते करत आहेत. गुरू वठारे यांनी आपल्या मुलाला, रसिकला उत्तम शिक्षण दिले. आज तो 'एचपीसीएल रिफायनरी'त मोठ्या हुद्द्यावर आहे. फक्त नाटक हाच व्यवसाय सचोटीने करणाऱ्या आणि त्यावर स्वतःचे आयुष्य उभे करणाऱ्या गुरू वठारे यांचे यश नजरेत भरणारे आहे. वेगळ्या, खडतर वाटेवरून चालताना संकटं आली तरी न डगमगता त्यांनी यशाला गवसणी घातली, हे त्यांचे कर्तृत्व अनुकरणीय आहे.
गुरू वठारे : ९०११४७४४००