मित्रहो, आपल्या आजूबाजूला अनेक किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, उसाचं गुऱ्हाळ चालवणारे, वडा-पावची विक्री करणारे, स्कूटर दुरुस्त करणारे गॅरेजवाले, फटाक्यांचे उत्पादन करणारे असे अनेक लोक दिसतात. त्यांना आपण काय म्हणतो ? .. व्यावसायिक .. बरोबर ?
पण जे आर डी टाटा, कुमार मंगलम् बिर्ला, मुकेश अंबानी, गौतम आदानी यांना आपण उद्योगपती म्हणतो. ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचे बिल गेट्स, ‘फेसबुक’चे मार्क झुकेरबर्ग, ‘गुगल’चे लॅरी पेज, आणि ‘अॅपल’चे स्टीव्ह जॉब्ज यांना आपण प्रभावशाली उद्योजक म्हणून ओळखतो. ‘झोमॅटो’ च्या दीपिंदर गोयल व पंकज चढ्ढा तसेच ‘बायजू’ कंपनीच्या रवींद्रन बायजू यांना तर आपण ‘युनिकॉर्न’ उद्योजक म्हणून सन्मानाने नावाजत असतो.
पुष्कळ वेळा सर्वसामान्य माणसं व्यापारी, व्यावसायिक, आणि उद्योजक हे शब्द समान अर्थाने वापरताना आढळतात. मित्रहो, तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर आधी या तीन संकल्पनांमध्ये काय फरक आहे हे जाणून घेऊन मग पद्धतशीरपणे यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
व्यापार म्हणजे दोन व्यक्ती अथवा संस्थांमध्ये होणारा खरेदी-विक्रीचा व्यवहार होय. अशा प्रकारे वस्तु किंवा सेवा विकणाऱ्यांना व्यापारी असे म्हणतात. रस्त्यावरचे फेरीवाले, भाजीवाले, किराणा दुकानदार मिठाई विकणारे हे सगळे व्यापारी असतात. व्यवसाय ही व्यापाराच्या तुलनेत अधिक व्यापक संकल्पना आहे. व्यवसाय या संकल्पनेत वस्तु किंवा सेवांचे उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्था (Industry), त्यांची विक्री करणाऱ्या व्यापारी संस्था (Traders), आणि या सगळ्यांना सहाय्य करणाऱ्या संस्था (Aids to trade or Supplementary Organisations) यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, मोटार तयार करण्याचा कारखाना, त्या विकणाऱ्या संस्था आणि त्यासाठी गुदाम सेवा पुरवणाऱ्या संस्था या व्यवसाय संस्था आहेत. अशा प्रकारच्या असंख्य व्यवसाय संस्था असू शकतात. मात्र उद्योजक (Entrepreneur) ही संकल्पना व्यावसायिक (Businessman) या संकल्पनेपेक्षा वेगळी आहे. यातील फरक लक्षात घेतला की मी ‘उद्योजक बना, केवळ आणखी एक व्यावसायिक नको’ असं का म्हणतोय ते लक्षात येईल.
नफा मिळवण्याच्या उद्देशाने उद्योग किंवा वाणिज्य विषयक कोणतीही कृती करणाऱ्याला व्यावसायिक असे म्हणता येईल. व्यावसायिकाकडे कोणतीही नवीन कल्पना नसते. कमीत कमी धोका पत्करून, प्रस्थापित आणि तीव्र स्पर्धात्मक बाजारपेठेत, आणखी एक व्यावसायिक म्हणून तो कामाला सुरवात करतो. ‘मी टू प्रॉडक्टस’ किंवा ‘कॉपी कॅट ब्रॅंड्स’ यांचं उत्पादन करणारा अथवा बाजारपेठेतील भाऊगर्दीत आणखी एक व्यावसायिक म्हणून सामील होणारा हा ‘ऑल्सो रॅन’ प्रकारचा फक्त एक ‘मार्केट प्लेयर’ असतो. तो उद्योजकाप्रमाणे ‘मार्केट लीडर’चा दर्जा प्राप्त करू शकत नाही. भाजी मंडईत बटाटे विकणाऱ्यांच्या रांगेत सामील होणारा हा आणखी एक व्यावसायिक असतो, पण त्याला उद्योजक म्हणत नाहीत.
याउलट ‘फेसबुक’च्या मार्क झुकेरबर्गला, ‘बिग बास्केट’च्या हरी मेननला आणि ‘मेक माय ट्रीप’च्या दीप कालरा यांना उद्योजक म्हटले जाते. कारण उद्योजक अत्यंत वेगळी, नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन बाजारपेठेत प्रवेश करतो. त्याच्या आगळ्या-वेगळ्या व्यवसायाच्या स्वरूपामुळे त्याला बाजारपेठेत स्पर्धा नसली, तरी धोका होण्याची अनिश्चितता त्याच्यापुढे असते. पण त्याच बरोबर प्रचंड मोठा नफा, यश, नावलौकिक, प्रसिद्धी ही उद्योजकाला मिळू शकते. उद्योजक अमिताभ बच्चनच्या त्या प्रसिद्ध वाक्याला डोळ्यासमोर ठेवून जणू काही वागत असतात-“हम जहॅां खडे होते है, लाइन वहॅांसे शूरु होती हैं !” एका अर्थाने असं म्हणता येईल की, प्रत्येक उद्योजक हा व्यावसायिक असला, तरी प्रत्येक व्यावसायिक हा उद्योजक असत नाही.
म्हणून मी सुरवातीला म्हटलं की आपलं उद्दिष्ट हे छोटा व्यापारी किंवा व्यावसायिक होण्याइतपत सीमित ठेवू नका. उद्योजक होण्याचा विचार कायम मनात असू द्या. उद्योजकाकडून अशा प्रकारे नावीन्यपूर्ण कल्पना घेऊन सुरू होणाऱ्या उद्योगाला ‘स्टार्ट अप कंपनी’ (Start Up Company) असं म्हटलं जातं. आणि ज्या स्टार्ट अप कंपनीचं बाजारपेठ मूल्य हे एक बिलियन डॉलर्स इतकं असतं, तिला ‘युनिकॉर्न’ (Unicorn) कंपनी असं म्हणतात. आपल्या भारत देशात सरकारचे धोरण हे स्टार्ट अप कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचे असून, अमेरिका आणि चीन नंतर संपूर्ण जगात आपल्याकडे युनिकॉर्न कंपन्यांची वाढ वेगाने होत आहे. २०२२ सालापर्यन्त आपल्या देशात शंभरपेक्षा जास्त युनिकॉर्न स्टार्ट अप कंपन्या अस्तित्वात आलेल्या आहेत. लवकरच भारत देश हा जगाची ‘स्टार्ट अप कंपन्यांची राजधानी’ बनेल अशी अपेक्षा आहे. तेव्हा ‘नॉट फेल्युअर, बट लो एम इज क्राइम’ हे वचन लक्षात ठेवून उद्योगात उडी घ्यायला हवी.
पण उद्योजक होणं, आणि त्यातही यशस्वी उद्योजक होणं हे सोपं नसतं. त्याकरता ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करणारी सर्जनशीलता उद्योजकाकडे असावी लागते. पुरेसे भांडवल अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि कुशल मनुष्यबळ यांच्या जोरावर उत्पादकता वाढ साधायला हवी. व्यवसायसंस्थेतील कामांचा क्रम व वेळापत्रक ठरवून, वेळेचं सुयोग्य व्यवस्थापन करावे लागते. सर्वात महत्वाचे म्हणजे बाजारपेठेचा अभ्यास करून, संभाव्य विक्रीचा अंदाज बांधून आणि विपणन संशोधन करून, प्रभावी मार्केटिंग करावे लागते. ग्राहकांचे मानस शास्त्र समजावून घेऊन, परिणामकारक जाहिरात व विक्रय वृद्धी योजना राबवाव्या लागतात. आजुबाजूच्या पर्यावरणात घडणारे बदल लक्षात घेऊन सतत अचूक आणि वेळेत निर्णय घ्यावे लागतात. संवाद कौशल्य आणि वाटाघाटींचे कौशल्य आत्मसात करावे लागते. आणि सर्वात शेवटी प्रचंड कष्ट घ्यायची तयारी, दुर्दम्य उत्साह आणि प्रखर सकारात्मक वृत्ती असावी लागते. यातील काही गोष्टींचा विचार आपण या लेखमालेत करणार आहोत.
व्यवसाय सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल तर त्यासाठी कर्ज घेणं आवश्यक असतं.deAsraफाउंडेशन कर्ज मिळवून देण्यासाठी सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. अधिक माहिती-Business Loan.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्हीdeAsraसोबतसंपर्ककरू शकता.
Notice: This site uses cookies to provide necessary website functionality, improve your experience and analyze our traffic. By using our website, you agree to our legal policies.