Search

अस्सल देशी ‘हेअर ऑईल’चा अमेरिकेत केला यशस्वी व्यवसाय

एखाद्या समारंभात आजूबाजूला स्टायलिश हेअऱ कट, कलर्सनी रंगवलेले केस, सुंदर केशरचना केलेल्या अनेकजणी असल्या तरी दाट, लांबसडक केसांची एखादी महिला सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. गीता पंडीत याही कायम त्यांच्या केसांमुळे लोकांच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरत आलेल्या! आपल्या केसांची निगुतीने काळजी घेणार्‍या. अगदी तरुण असल्यापासूनच स्वत:वरच प्रयोग करून विकसित केलेलं घरगुती नैसर्गिक तेलच त्या केसांना लावत आल्या आहेत. त्यांचे केस बघून लोक त्यांना तू केसांना काय लावतेस असा प्रश्न विचारायचे. त्यांनी केलेलं तेल त्या लोकांना फ्री देत असत. आज याच तेलातून त्यांचा व्यवसाय उभा राहिला आहे.
लोकांना जे हेअर ऑईल त्या फ्री द्यायच्या त्याचाच व्यवसाय करण्याचा निर्णय
गेली अनेक वर्ष पतीच्या नोकरीच्या निमित्ताने गीताताई अमेरिकेत असतात. डान्स शिकणं, तिथल्या लोकांसाठी कुकिंग क्लास घेणं अशा आवडीच्या गोष्टी करत त्या स्वत:ला बिझी ठेवत असत. पण मुलाचं लग्न झालं आणि मग थोडं रिकामपण त्यांना आलं. अजून काहीतरी करावसं वाटू लागलं . खूप अव्हेन्यूज त्यांना खुणावत होते. एकदा विचार करता, करता सहजच त्यांना वाटलं की जे तेल आपण लोकांना फ्री देतो त्याचंच व्यावसायिक उत्पादन सुरू केलं तर... आणि त्या क्षणापासून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

भारतात आणि अमेरिकेतही केसाच्या अनेक समस्या त्या कायम बघत होत्या. भारतात अनेकांना त्यांनी आपलं तेल दिलं होतं आणि त्याचा फायदा झालेलाही बघितला होता. मग व्यवसायिक दृष्टीने आपल्या या हेयर ऑईलचं उत्पादन करण्याचा विचार त्यांनी पक्का केला.

रासायनिक पदार्थ, प्रिझर्व्हेटीव्ह न वापरताऑल इन वन ‘गीताज हेयर ऑईल’ विकसित केलं
अधिक गुणवत्तापूर्ण आणि मोठ्या स्केलवर तेच तेल बनवायला त्यांनी सुरूवात केली. ज्यात आवळा, जास्वंद, मेथी, कढीपत्ता असे नैसर्गिक घटक आहेत. या तेलाच्या बाटलीवर एखाद्या हिरॉईनचा फोटो न टाकता स्वत:चा फोटो टाकून त्या स्वत:च आपल्या उत्पादनाच्या अ‍ॅम्बेसॅडर बनल्या. गीताताई सांगतात, “ हे तेल मी केवळ विकसितच केलं नाही तर वर्षानुवर्ष त्याचा वापर करून मी केसांची निगा राखली आहे आणि ते लोकांच्या लक्षात यावं यासाठी मीच त्याची अ‍ॅम्बेसॅडर बनले आहे. हे एक फूड ग्रेड ऑईल असून, त्यात कोणताही कृत्रीम रंग, सुंगधी द्रव्य किंवा रासायनिक पदार्थ, प्रिझर्व्हेटीव्ह वापरलेले नाहीत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात चटकन उचलून लावता येईल असं ‘ऑल इन वन’ असं हे गीताज हेअर ऑईल आहे. केसांची गळती थांबवून, वाढ होण्यासाठी, केसातला कोंडा जाण्यासाठी हे तेल उत्तम असल्याचं ग्राहकांचे रिव्ह्यू सांगतात. कोरड्या, फ्लेकी निर्जीव केसांना मऊपणा आणि तुकतुकीतपणा देण्याचं काम हे तेल करतं. कॅन्सर पेशंटसमध्ये किमोंनंतर डोक्याची स्कीन खूप संवेदनशील झालेली असते. असे रूग्ण निर्धोकपणे हे तेल लावू शकतात. त्यामुळे आराम मिळून डोक्यावर परत केस यायला मदत होते”.

या तेलाचं उत्पादन अमेरिकेत करणं हे मोठं आव्हान होतं. कच्चा माल, बॉटल्स कुठून आणायच्या, शिपिंग कसं करायचं असे अनेक प्रश्न होते. सुरूवातीला वैयक्तिक वापरासाठी भारतातून आणलेल्या काही बॉटल्सचा वापर त्यांनी केला. सगळा कच्चा मालही त्या भारतातूनच मागवत.
अमेरिकेत हेयर ऑईल म्हणजे काय हे लोकांना सांगण्यापासून विक्रीची सुरूवात केली
अमेरिकेतील लोकांच्या जीवनशैलीत सिरम, क्रीम्स अशी अनेक प्रसाधनं आहेत पण हेयर ऑईल मात्र त्यांना माहीत नाही. तेव्हा हेयर ऑईल म्हणजे काय हे सांगण्यापासून त्यांना सुरूवात करावी लागली. त्यासाठी लॉस अ‍ॅँजेलीसमधल्या छोट्या, छोट्या दुकानांमधून त्यांनी डेमो दिले. एक कोरियन महिला त्यांची पहिली ग्राहक ठरली. त्यानंतर एक मोठं इंडियन ग्रोसरी स्टोअर आणि एका सलोनला त्या अ‍ॅप्रोच झाल्या. तिथे काही बॉटल ठेवल्या.

To read more, Subscribe to Yashaswi Udyojak!

setShowModal

लॉसअ‍ॅँजेलीसमध्ये कढीपत्त्यावर बॅन असल्याने परत प्रॉडक्ट डेव्हलप केलं
उणे वीस डिग्रीतही तेल कसं पातळ राहील हे शोधून काढलं
मग लॉसअ‍ॅँजेलीसमधल्या एका इंडियन स्टोअरमध्ये त्या गेल्या. त्यांच्या लेबलवर त्यातल्या घटकांचं जे चित्र होतं त्यात कढीपत्ताही होता. तेव्हा त्या दुकानदाराने त्यांना सांगितलं की इथे कढीपत्त्यावर बंदी आहे. त्यामुळे मी हे ठेऊ शकत नाही. मग गीताताईंनी अ‍ॅमेझॉनवर जायचं ठरवलं. तर त्यांनीही कढीपत्त्यावर ऑब्जेक्शन घेतलं. मग परत रिसर्च करून कढीपत्त्याऐवजी तसेच गुणधर्म असलेला दुसरा घटक शोधून त्यांनी प्रॉडक्टमध्ये बदल केले.

खोबरेल तेलाच्या बेसमध्ये त्या त्यांचं तेल बनवतात. पण मिनियापोलीस, डेट्रॉईट, कॅनडा अशा ठिकाणी जिथे कायम बर्फ असतो तिथे हे तेल थिजतं. मग हे तेल गरम करून वापरायचं तर ग्राहक वैतागतो. परत खूप रिसर्च करून २-३ ब्लेण्ड एकत्र करून उणे वीस डिग्रीतही तेल कसं पातळ राहील हे त्यांनी शोधून काढलं.

‘ऊर्जा इन कॉर्पोरेट’ ही कंपनी स्थापन करून इबेवर रजिस्ट्रेशन केलं
एफडीए अप्रूव्हल घेऊन अ‍ॅमेझॉनवर प्रॉडक्ट आणणं हा एक खूप मोठा संघर्ष होता. एक, सव्वा वर्षं त्यांचा अ‍ॅमेझॉन बरोबर झगडा सुरू होता. दरम्यान ‘ऊर्जा इन कॉर्पोरेट’ नावाची एक कंपनी त्यांनी स्थापन केली. प्रॉडक्ट्ससाठी बारकोड त्यांनी विकसित केले. जगात कुठेही गेलं तरी त्यांच्या प्रॉडक्ट्सना बारकोड आहेत. अमेरिकेत इबेवर मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री होते. तिथे त्यांनी रजिस्टर केलं.

सोशल मीडियाचा वापर, इबेवर प्रॉडक्ट लिस्ट करणे, इंटरनॅशनल शिपिंग ओपन करणे या सगळ्या गोष्टी स्वत: शिकत त्यांनी एक्सप्लोअर केल्या. आता नऊ देशांमध्ये उत्पादनांचं शिपिंग त्या करतात. त्यांचे ९०% ग्राहक हे रिपीट ग्राहक आहेत. Timeless Beauty फेसबुकवर आणि Geeta Pandit (@urja_Inc) असं इन्स्टाग्रामवर त्यांचं पेज आहे.

चमकदार, मॅनेजेबल केसांसाठी ऑईल बेस्ड सिरम आणि आयलॅशेष वाढवणारं आय जेल
अमेरिकेत लॉंयर असलेल्या त्यांच्या मुलाने, केस मॅनेजेबल होतील पण वास येणार नाही असं प्रॉडक्ट काढायला त्यांना सांगितलं. म्हणून खूप प्रयोग करून त्यांनी एक ऑईलबेस्ड इ जीवनसत्वाने परिपूर्ण असं सिरम काढलं. त्यासाठी लागणारी रोझमेरी गीताताई स्वत: उगवतात. दोन प्रकारे या सिरमचा वापर होतो. एक म्हणजे बाहेर जाताना दोन थेंब ते लावलं तर केस मॅनेजेबल होतात आणि चमकदार दिसतात. सध्याच्या काळात विशेषत: पुरुषांमध्ये कमी वयात टक्कल पडण्याची आणि स्त्रियांमध्ये केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. या तेलाचा वापर केल्यास अशा पुरूष आणि स्त्रियांना फायदा होतो.

आवळा, रिठा, शिकेकाई वापरून त्यांनी शांपूबार आणि पावडरही बनवली आहे. जी त्यांच्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.

अमेरिकेत खोट्या आयलॅशेष लावण्याची फॅशन आहे. त्याच्या ग्लुमुळे अनेकदा इन्फेक्शन्स होतात. डोळे चुरचुतात. त्यावर उपाय म्हणून गीताताई नैसर्गिकरीत्या त्यांना आयलॅशेष कशा वाढवता येतील याचा विचार करायच्या. त्याबरोबरच डोळ्यांभोवतीचे डार्क सर्कल्स, पफीनेस, सुरकुत्या या सगळ्या समस्यांवर प्रभावी ठरणारं ऑल इन वन आयजेल त्यांनी विकसित केलं आहे. हे इतकं प्रभावी आहे की त्याच्या वापरामुळे पन्नाशीच्यापुढे अनेक ग्राहकांच्या पापण्यांचे, भुवयांचे केस वाढले आहेत. सध्याच्या काळात अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे. त्यामुळे डोळे झोंबणे, ते लाल होणे, चुरचुरणे अशा समस्यांचा सामना या सगळ्याच वयोगटातल्या लोकांना करावा लागतो. पण या आयजेलच्या वापरामुळे डोळ्यांना आराम मिळून शांत झोप लागते आणि डोळे सतेज दिसतात असा अनेक ग्राहकांचा अनुभव आहे.

अवघ्या चार महिन्यांत भारतात काही लाखांचा व्यवसाय केला
एक ते दीड वर्षापूर्वी भारतात आपले प्रॉडक्ट्स आणण्याचा विचार त्यांनी केला, त्यासाठी इथे येऊन उत्पादन घेतलं. पण इथे आल्यावर लोकांना अ‍ॅप्रोच कसं व्हायचं हा प्रश्न फेसबुकने सोडवला. त्यातूनच ‘घे भरारी’शी त्या जोडल्या गेल्या. आणि त्यांच्या माध्यमातूनच त्यांचं पहिलं लाईव्ह त्यांनी केलं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गेल्या चार महिन्यात प्रदर्शनं, ‘घे भरारी’ आणि ‘या पेजच्या माध्यमातून काही लाखांचा व्यवसाय त्यांनी केला आहे.

ग्लोबलायझेशनच्या झपाट्यात पाश्चात्य उत्पादनांचा सुकाळ झाल्यामुळे अनेक पारंपरिक घरगुती पदार्थ, औषधं नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पण अशा घरगुती गोष्टींचा देशातच नाही तर परदेशातही व्यवसाय होऊ शकतो हेच गीताताईंच्या उदाहरणाने सिद्ध होत आहे.


deAsra फाउंडेशन उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचं काम करते. deAsra कडे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. अधिक माहिती -Expert consultation

अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.