Search

जो दुसऱ्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला

  • Share this:
उद्योजकांसाठी सर्व कर्मचारी आवश्यक असले तरीही त्यातील काही निवडक खास मर्जीतले असतात. या खास मर्जीतल्या मंडळींशिवाय उद्योजकाचे पान हलत नाही. ही मंडळी उद्योजकांसाठी एवढी महत्त्वाची का ठरतात याची अनेक कारणे आहेत. 
पहिल्या कॅटेगरीतल्या मंडळींना आपण ‘होय बासंबोधूया. यातील काहीजण उद्योजकाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून कंपनीमध्ये असतात. कंपनीच्या खडतर प्रवासात, चढ-उतारात, कठीण काळात त्यांनी कंपनीला निस्वार्थ भावनेने साथ दिलेली असते. काही मंडळींनी कंपनीच्या लहान असण्यापासून तिला मोठे करण्यात मोलाचे योगदान दिलेले असते. त्यासाठी अगदी स्वतः मार्केटमध्ये जाऊन, दुकानात, दारोदारी फिरून कंपनीचा माल विकलेला असतो. स्वतः जाऊन मालाची डिलिव्हरी केलेली असते. एखाद्या प्रोजेक्टच्या अंमलबजावणीचे काम उद्योजक या मंडळींवर सोडतात व ते अत्यंत चोखपणे वेळेवर होईल याची उद्योजकांना खात्री असते.

 चाणक्य :  कल्पना सत्यात उतरवण्यासाठी उद्योजकांना साथ देणारे साथीदार 
दुसऱ्या कॅटेगरीतल्या मंडळींना आपण चाणक्य म्हणूया. ही मंडळी उद्योजकांसाठी कंपनीतील विकिपीडिया असतात. कंपनीतील सर्व प्रॉडक्ट्स, टेक्नॉलॉजी, काम कसे करायचे, कोणाकडून काम व्यवस्थित होईल या सर्वांची या मंडळींना नेमकी जाण असते. त्यामुळे कंपनीतील महत्त्वाच्या कामांची जबाबदारी बऱ्याच वेळा उद्योजक या लोकांवर सोडतात. उद्योजकांकडे केवळ चांगल्या कल्पना व जिद्द असून भागत नाही. त्या कल्पनांना सत्यात उतरवू शकणाऱ्या साथीदारांची उद्योजकांना गरज असते. चाणक्य मंडळी हेच काम करतात. कंपनीमध्ये त्यांना उद्योजकांचा उजवा हात मानले जाते. उद्योजकांपर्यंत कोणता निरोप अथवा फीडबॅक पोहोचवायचा असेल तर तो चाणक्यांमार्फत पोचवला जातो. महत्त्वाच्या निर्णयाआधी उद्योजक चाणक्यांशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेतात.
तज्ज्ञ मंडळींना चांगली वागणूक व लाभ देऊन त्यांना खुश ठेवण्याकडे उद्योजकांचा कल असतो
 तिसऱ्या कॅटेगरीतल्या मंडळींना आपण ‘तज्ज्ञ’ म्हणूया. या मंडळींना कंपनीतील अकाउंटन्समधील खाचाखोचा, कायद्याच्या त्रुटी, विशिष्ट प्रदेशात सेल्स करायची क्लृप्ती, कंपनीचे लीगल प्रॉब्लेम्स, रिसर्च आणि डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमधील काम अशा गोष्टींचे सखोल ज्ञान असते. याबाबतीत कंपनीला आलेल्या समस्यांना सोडवण्यात त्यांनी उद्योजकांना मदत केलेली असते. आपापल्या क्षेत्रात एक्सपर्ट असल्याने उद्योजक कंपनीच्या नाजूक बाबींसाठी त्यांच्यावर अवलंबून असतात. कंपनीला भेडसावणाऱ्या संवेदनशील गोष्टीचे ज्ञान (उदाहरणार्थ कोर्ट केसेस, कंपनीला आलेल्या नोटिसा, ग्राहकांच्या तक्रारी, सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क, प्रॉडक्ट क्वालिटीमधील त्रुटी) या मंडळींना असल्याने उद्योजकही त्यांच्याशी अदबीने वागतात. ही मंडळी आपली कंपनी सोडून गेल्यास कंपनीतील संवेदनशील बाबी बाहेर पडतील, कंपनीतील गोपनीय तांत्रिक ज्ञान स्पर्धक कंपन्यांना अनायासे मिळेल अशी भीती उद्योजकांना वाटत राहते. त्यामुळे या मंडळींना चांगली वागणूक व लाभ देऊन त्यांना खुश ठेवण्याकडे उद्योजकांचा कल असतो.

काही मंडळी उद्योजकाच्या लेखी, खास स्थान निर्माण करून कंपनीमध्ये ‘पॉवर सेंटर’ बनतात
कंपनी जशी मोठी होते तशी उद्योजकांची बारीकसारीक तपशीलांवरची पकड सैल पडते. कंपनीच्या दैनंदिन व्यवहारात उद्योजकांचे लक्ष कमी होते. या सगळ्या गोष्टी मग ते आपल्या खास मर्जीतल्या मंडळींवर सोडतात. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना जोखीमही मोठी असते. त्यामुळे निर्णय घेण्याआधी उद्योजकांना त्यासंबंधी कोणाशीतरी मसलत करण्याची गरज भासते. या सगळ्या गोष्टी हेरून ही मंडळी कंपनीमध्ये स्वतःचे खास स्थान निर्माण करतात आणि यथावकाश कंपनीमध्ये ‘पॉवर सेंटर’ बनतात. खालच्या स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे उद्योजकाशी भेट संभाषण होत नसल्याने ही खास मंडळी म्हणतील तेच उद्योजकाचे ब्रह्मवाक्य असे मानून कर्मचारी निमुटपणे त्यांचे ऐकतात. मग खास मंडळींचे प्रभावक्षेत्र व सामर्थ्य वाढत जाते.
उद्योजकांच्या वरदहस्तामुळे ‘ग’ ची बाधा झालेली मंडळी ‘हम करे सो कायदा’ या तत्वाने वागतात  
या तिन्ही कॅटेगरीतली मंडळी कंपनीला महत्त्वाची असली तरीही त्यांच्यावर अतिविसंबणे धोक्याचे ठरते. कितीही कर्तबगार असली तरी या कर्मचाऱ्यांनाही स्वतःच्या मर्यादा असतात. त्यामुळे जसजशी कंपनी मोठी होते, नवीन क्षेत्रात प्रवेश करते तशा यांच्या क्षमतेच्या मर्यादा उघड्या पडतात. यातील अनेक मंडळींना उद्योजकांच्या वरदहस्तामुळे ‘ग’ ची बाधा झालेली असते. मग ‘हम करे सो कायदा’, उद्योजकांचे कान भरणे, मनाला येईल तसे वागणे अशी यांची वर्तणूक होते. काही मंडळी वारंवार आपले महत्त्व उद्योजकांवर बिंबवून स्वतःसाठी घबाड पदरात पाडून घेतात. माझ्या माहितीतल्या एका कंपनीमध्ये असाच एक चाणक्य दरवर्षी नोकरी सोडायची धमकी देऊन उद्योजकाकडून भरपूर लाभ मिळवायचा. 

डोईजड झालेल्या लोकांना वेळीच अटकाव केला नाहीतर कंपनीची कामगिरी खालावत जाते 
या मंडळींना प्रश्न विचारणारे कोणी नसल्याने उद्योजकांशिवाय ते फारसे कोणाचे ऐकत नाहीत. सुरुवातीचा काळ सोडल्यास त्यांना नंतर फारशी भरीव कामगिरी करायची गरजही वाटत नाही. कंपनीमध्ये काम करण्याची  ते स्वतःची एक शैली निर्माण करतात.  अशाच एका कंपनीमध्ये  उद्योजक  साध्या विचारसरणीचा  असून  मारुती  कारनी  कंपनीत यायचा. खास मंडळी मात्र  मर्सिडीजसारख्या  पॉश कारचा वापर करायचे.  कंपनीमधील महत्त्वाचे निर्णय त्यांच्याकडे असल्याने बऱ्याचदा ‘कुंपणाने शेत खाल्ल्याच्या’ घटनाही घडतात. काही वेळेस उद्योजकांना हे कळले तरीही ते हेतू पुरस्सर अशा घटनांकडे डोळे झाक करतात. कारण आता ही मंडळी डोईजड झालेली असतात.

दुर्दैवाने अशी मंडळी कंपनीसाठी कर्करोग ठरू शकतात. त्यांना योग्य वेळीच अटकाव केला नाही तर कंपनीची कामगिरी खालावत जाऊ शकते. 

त्यावर  उद्योजकांना  करता येणारे उपाय आपण पुढील लेखात बघूया. 


deAsra फाउंडेशन उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचं काम करते. deAsraकडे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. अधिक माहिती - Expert consultation
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.

सलील चिंचोरे 
chinchoresalil@gmail.com