Search

फक्त ३० हजार रुपयांमध्ये सुरू करता येवू शकतो हा व्यवसाय

आपल्या घराचा, ऑफिसचा एखादा कोपरा तरी हिरवागार असावा असं प्रत्येकालाच वाटतं. पण ही हौस भागवण्यासाठी कधी जागा कमी पडते तर कधी वेळ. काहीवेळा दोन्ही असलं तरी पुरेसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे ही हौस भागवता येत नाही. नेहा जोशी-नातू यांनी या अडचणी लक्षात घेतल्या आणि प्रत्येकाची बागेची हौस पूर्ण करण्याच्या दृष्टीने इकोमेट इकोलॉजिकल सर्व्हिसेसची स्थापना केली. इकोमेट नेमकं काय काम करतं ते आता आपण बघूयात. 

 

पावसाळा सुरू झाला की काही दिवसांतच हिरव्यागार चैतन्याने सृष्टी भरून जाते. डोळ्यांना सुखावणारी ही हिरवळ आपल्या घरात, आजूबाजूला असावी असं सगळ्यांनाच वाटतं. हीच गोष्ट लक्षात घेऊन आपल्या मातीशी नाळ जोडणारा व्यवसाय पुण्यातील नेहा जोशी- नातू यांनी 2013 साली इकोमेट इकोलॉजिकल सर्व्हिसेस या नावाने सुरु केला. घरात ठेवता येणारी झाडे वेगवेगळ्या आकर्षक कुंड्यांमध्ये उपलब्ध करून देणं, ही त्यांची खासियत आहे. घर सजावटीसाठी, इतरांना भेट म्हणून देण्यासाठी ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा उत्पादनांची निर्मिती नेहा करतात.
 

झाडांची आकर्षक सजावट करून ती भेटवस्तू म्हणून देता येतात
नेहा यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून पर्यावरणशास्त्र या विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. लँडस्केप डिझाईन या विषयातील पदविका त्यांनी पूर्ण केली. लँडस्केप डिझाईनच्या व्होकेशनल कोर्ससाठीही त्या शिकवतात. नेहा यांची दे आसरा फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर लाइव्ह मुलाखत यापूर्वी झाली आहे. पर्यावरणशास्त्र या विषयातलं शिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय करण्याची जिद्द यातून 2013 साली इकोमेट इकोलॉजिकल सर्व्हिसेसची सुरुवात त्यांनी त्यांच्या घरातूनच केली. 2017 साली त्यांनी स्वत:चा स्टुडीओ सुरु केला. हे क्षेत्र नवीन होतं. त्यामुळे झाडांची आकर्षक पद्धतीने मांडणी आणि सजावट करून ती भेटवस्तू म्हणून देता येतात किंवा घर सजावटीसाठी वापरता येतात ही कल्पना लोकांमध्ये रुजायला वेळ लागला. 
 

 

भेट देण्याबरोबरच उत्पादनं स्वत:साठी वापरावीत लोकांना असं वाटलं पाहिजे 
नेहा म्हणतात “ बहुतांश वेळा आपल्याला भेट म्हणून आलेल्या गोष्टी आपण इतरांना देतो. परंतु मला माझी उत्पादनं वेगळी हवी होती. ती घेतल्यावर लोकांनास्वत: वापरावी असं वाटावं, शिवाय ती खिशाला परवडणारी असावीत हा विचार होता. सुरवातीला काही वर्ष मी नोकरी करून व्यवसायासाठी भांडवल साठवले. वेगवेगळे प्रयोग करत गेले. माझ्या उत्पादनांसाठी लागणारी झाडे माझ्याच मित्राच्या फार्म हाऊसवर वाढवलेली असतात त्यामुळे या झाडांबद्दल मी निश्चिंत असते. ग्राहकांची मागणी, गरज आणि त्यांच्या बजेटप्रमाणे मी त्यांना सत्तर ते पंधराशे रुपयांच्या रेंजमध्ये ही उत्पादने देते. 
 

टेरारियम, कोकेडेमा, डिश गार्डन्सच्या कार्यशाळा 
लॉकडाऊनच्या काळात लोक घरी होते. त्यांना बागकाम करायला वेळ मिळाला. त्यातून झाडांबद्दल आवड निर्माण झाली. एकमेकांना भेटवस्तू द्यायला लोक आता झाडांची निवड करत आहेत. पर्यावरणात गेल्यावर झाडं, निसर्ग यांच्याकडून काय घ्यावे हे सुद्धा आपल्याला कळले पाहिजे. यासाठी नेहा ट्री वॉक्सचे आयोजन करतात. 
 
इकोमेट इकोलॉजिकल सर्व्हिसेसच्या अंतर्गत डिझाईनिंग, कार्यशाळा आणि घर सजावट या तीन गोष्टी प्रामुख्याने लोकांसाठी उपलब्ध केल्या जातात. घरातील बाल्कनीपासून ते ऑफिसमधील गार्डनचे लँडस्केप डिझाईनिंग करतात. ऑनलाईन माध्यामातून सल्लागार म्हणूनही त्या काम करतात. टेरारियम, कोकेडेमा, डिश गार्डन्स इ. कार्यशाळा त्या घेतात. म्हणजेच आपण पर्यावरणात ज्या गोष्टी बघतो त्याचा आपल्या घरात किंवा टेरेसवर सूक्ष्म स्वरूपात देखावा (मिनीएचर) तयार करणे. कोकेडेमा ही नवीन संकल्पना आहे. ज्यांना घरात माती पडलेली, झाडांमधून पाणी खाली आलेले आवडत नाही. त्यांच्यासाठी कोकेडेमा अतिशय उत्तम पर्याय आहे. यामध्ये लोकांना आवडणारी झाडे ते घरातच टांगून ठेऊ शकतात.ग्रीन गिफ्ट आणि घर सजावट यासाठी त्यांच्याकडे बहुतांश टेराकोटा व क्लेची उत्पादने आहेत. ज्यात झाडांचाही सामावेश होतो.
 

ट्रेंड ओळखून व्यवसायाचं स्वरूप बदला, नक्की यशस्वी व्हाल 
या व्यवसायातून रोजगाराचे उत्तम साधन निर्माण होते आहे . व्यावसायिक पातळीवर या क्षेत्राकडे पाहिल्यास माती विकणारे, माळी, पार्सल पाठवताना पॅकेजिंगसाठीच्या सामानाची डिलिव्हरी देणारे लोक अशा अनेकांसाठी रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्याचा ट्रेंड ओळखून या व्यवसायाचे स्वरूप बदलत नेले तर यात तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. समाज माध्यमांचा उपयोग करून आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करणं हा सक्सेस मंत्र आहे. त्यामुळे घर बसल्या अगणित लोकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचवता येतात. 
 

समाज माध्यमांचा उपयोग मार्केटिंगसाठी करताना प्रामाणिकपणा आवश्यक 
आपल्या व्यवसायाशी संबंधित गोष्टी लोकांपर्यंत पाहोेचल्या तर लोकांचा तुमच्याबरोबर संबंध वाढतो. डीआयवाय (डू इट युवरसेल्फ) म्हणजेच साहित्य घेऊन लोकांनी स्वतः एखादे उत्पादन बनवणे. असे किट्स ग्राहकांना उपलब्ध करून देणं, त्याचे व्हिडीओ लोकांपर्यंत पाहोचवणे, तुमच्याच उत्पादनांचा वापर ग्राहक किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकतात हे त्यांना दाखवणं यामुळे ग्राहक तुमच्या व्यवसायाकडे आकर्षित होतात. 
 

अर्थात प्रत्येक व्यवसायाला बहरायला लागणारा वेळ आणि कष्ट द्यावेच लागतात. परंतु सध्या उपलब्ध असलेल्या समाज माध्यामांचा प्रभावी वापर केल्यास आपला व्यवसाय एक मोठा ब्रँड बनायला वेळ लागत नाही. हीच रणनीती नेहा यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरली आहे. समाज माध्यमांचा उपयोग मार्केटिंगसाठी करताना प्रामाणिकपणा असणे आवश्यक असते. म्हणजेच एखाद्या उत्पादनाचा व्हिडीओ करून तुम्ही समाज माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवलात तर ते उत्पादन प्रत्यक्षही तसेच असले पाहिजे. 
 

या व्यवसायात रस असणार्‍यांनी जीवन विज्ञानातील कोणत्याही विषयात शिक्षण घेणे महत्वाचे असते. शिवाय यासाठी लागणारे इतर छोटे छोटे अभ्यासक्रम पूर्ण केले तर या विषयातील ज्ञान सखोल होण्यास मदत होईल. सुरवातीला भारतभर जेव्हा नेहा कुरिअर करत असत तेव्हा 10 पैकी 6-7 पार्सल फुटत होते. मग त्या ग्राहकांना पैसे परत करत. यानंतर नेहा यांनी अशा वस्तूंचे पॅकिंग कसे करायचे याबद्दल बरीच माहिती मिळवली. वेगवेगळे प्रयोग केले. पॅकिंग नीट झाले आहे की नाही हे कळण्यासाठी त्यांनी पार्सल उंचीवरून खाली टाकले. जेणेकरून ते कुठे आपटल्यास आतील वस्तूवर काय परिणाम होईल ते कळेल.
 

हल्ली घरात, ऑफिसच्या जागेत झाडं ठेवण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. नेहा या फुलं देणार्‍या झाडांपेक्षा कमी सूर्यप्रकाश लागणार्‍या, चार भिंतीच्या आत राहतील अशा झाडांचे उत्पादन आणि त्यापासून वस्तूंची निर्मिती करतात. त्यामुळे त्यांना स्टुडीओची जागा तशीच लागणार होती ज्यात एखादी बाल्कनी असली तरी चालणार होते. परंतु ज्या लोकांना फुलं देणार्‍या, सूर्यप्रकाश लागणार्‍या झाडांची आवश्यकता असते त्यांना आपल्या कामाची जागा मोकळी आणि प्रकाश येणारी असावी लागते. शिवाय पाण्याची उपलब्धताही असली पाहिजे. या क्षेत्रात नव्याने येणार्‍या लोकांसाठी नेहा सांगतात, “या क्षेत्रात काम करताना साधारण 20 ते 45% नफा असतो. प्रत्येक उत्पादनामागे ही टक्केवारी वेगवेगळी असते”. 

 

या व्यवसायासाठी किमान 30,000 रुपये खेळते भांडवल असणे गरजेचे आहे
सुरुवातीला तुम्ही घरूनही हा व्यवसाय सुरु करू शकता. केवळ एक लॅपटॉप आणि थ्री डी डिझाईन करता येईल अशा सॉफ्टवेअरची गरज असते, जेणेकरून ग्राहकांना तुम्हाला डिझाईन दाखवता येते. काम सुरु करण्याआधी काही दिवस नोकरी केल्यास अनुभव मिळतो आणि भांडवलाचीही सोय होते. या व्यवसायासाठी किमान 30,000 रुपये खेळते भांडवल असणे गरजेचे आहे. या क्षेत्रात काही वेळा ग्राहकांवर आपण विश्वास ठेवला तरच ग्राहक आपल्याला निवडतात. पूर्वीपासूनचे ग्राहक असल्यास कित्येक वेळेला आधी कुरिअर पाठवावे लागते, मग ते पैसे देतात. या शिवाय तुमची उत्पादने पुनर्विक्रीसाठी देऊन तुम्ही आर्थिक कमाई वाढवू शकता.
 

सुरुवातीलानातेवाईक, परिचितांना कामं करून दिली पाहिजेत 
नवीन लोकांनी सुरुवातीलाच व्यावसायिक कामे घेण्यापेक्षा आधी आपल्या घरातील लोकांना, नातेवाईकांना त्यांची कामं करून दिली पाहिजेत, ज्यात लागणार्‍या साहित्याचे पैसे घ्यायचे पण कामाचे घ्यायचे नाहीत. यामुळे पुढील काम करायच्या आधी ग्राहकांना दाखवायला तुमचं काम तयार असतं.

या सर्व प्रवासात नेहा यांना सासर आणि माहेरच्या दोन्ही कुटुंबांचा भक्कम पाठींबा मिळत आहे. त्याच्याच बळावर त्यांचा हा व्यवसाय दिवसेंदिवस बहरत आहे.
 


सनिका घळसासी 
ghalsasi.sanika@gmail.com 

Related Posts