प्रगतीपथावर असलेल्या कंपनीला येत असलेल्या मागणीत अचानकपणे घट झाली तर काय होईल? कंपनी खिळखिळी होत चालल्याची भावना मालकाच्या मनात आली तर चूक नाही. अशा परिस्थितीत हातपाय गाळून न बसता ही परिस्थिती नेमकी कशामुळे निर्माण झाली याचा अभ्यास केला पाहिजे. तरच त्यातून मार्ग काढणं शक्य होईल. भारत फोर्जच्या बाबा कल्याणींनी हेच केलं. आपल्या ग्राहकांच्या गरजांमध्ये बाजारपेठेमधल्या बदलांमुळे मूलभूत बदल झाले असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आपण यातून बाहेर पडण्यासाठी अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज त्यांना जाणवली. हे केलं नाही तर यशोशिखरावरून आपण लवकरच कंपनीला टाळं लावण्याकडे वाटचाल करण्याचा कल्पनेपलीकडचा धोका सत्यात अवतरू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं. जिद्द आणि परिपूर्ण तयारी यांच्या जोरावर बाबा कल्याणींनी भारत फोर्जबरोबरच भारताचं नावही जागतिक पटलावर नेलं ते कमालीच्या अडचणींवर मात करूनच.
एखादी कंपनी खूप कष्ट घेऊन जेव्हा वर येत असते तेव्हा तिला आणखी यश मिळण्याची चिन्हं दिसायला लागल्यावर कंपनी आपल्या प्रगतीसाठी आणखी झटत राहते. आपल्याला आपल्या ग्राहकांकडून आणखी काम मिळण्याची चिन्हं दिसायला लागणं यासारखा दुसरा आनंद कुठल्याच कंपनीसाठी नसतो. खास करून अशी कंपनी उत्पादन क्षेत्रामधली असेल तर वाढत चाललेल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनी अत्यंत आक्रमकपणे आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ करायला लागते. असं असताना जर एकूण अर्थव्यवस्था ठीकठाक वाटत असेल आणि तरी अचानकपणे कंपनीला येत असलेल्या मागणीत घट झाली तर काय होईल? आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या ‘भारत फोर्ज’ नावाच्या उद्योगामध्ये रक्ताचं पाणी करून जीव ओतलेल्या बाबासाहेब नीळकंठ ऊर्फ ‘बाबा’ कल्याणींना अत्यंत अनपेक्षितपणे १९९६ साली असा धक्का सहन करावा लागला. ग्राहकांकडून विलक्षण वेगानं वाढत चाललेली मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्या उद्योगाची क्षमता खूप वाढवलेली असताना आणि ग्राहकांनी या मागणीच्या वाढीच्या दरात खूप वेग येणार असल्याचं सांगितलेलं असताना अघटित घडलं. ग्राहकांकडून येणारी मागणी अचानकपणे पार घटली. खूप मोठ्या प्रमाणावर उभी केलेली उत्पादन क्षमता, साठवून ठेवलेला कच्चा माल आणि हे सगळं हुशारीनं वापरून कंपनीला यशोशिखरावर नेणारं मनुष्यबळ या सगळ्याचं काय करायचं असा यक्षप्रश्न बाबा कल्याणींसमोर उभा राहिला.
कुठल्याही कंपनीसमोर जेव्हा अचानकपणे अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी सुरुवातीला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी काही ठरावीक छापाच्या गोष्टी करतात. उदाहरणार्थ सगळ्या खर्चांमध्ये कपात करणं, खास करून वायफळ प्रकारचे खर्च एकदम बंद किंवा कमी करणं, कामाचे दिवस आणि तास घटवणं, त्यातल्या त्यात अनुत्पादक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणं अशी पावलं उचलली जातात. बाबा कल्याणी आणि त्यांचे वरिष्ठ सहकारी यांनी हेच केलं. या जुजबी उपायांना कितपत यश येतं आणि तेवढ्यात बाह्य परिस्थिती सुधारते का याचा त्यांना आढावा घ्यायचा होता. तसं काही घडलं नाही. एखाद्या दीर्घकालीन आजारानं अचानकपणे विळखा घालावा त्याप्रमाणे भारत फोर्ज खिळखिळी होत चालल्याची भावना त्यांना अस्वस्थ करायला लागली. आठवड्यातून कामाचे तास कमी करत करत फक्त तीन दिवसांवर आले तरीसुद्धा काही फरक पडेना. जर आपल्या मालाला उठावच नसेल तर मुळात कामाचे तास कितीही कमी केले तरी त्यातून काय साधणार असा प्रश्न बाबा कल्याणींना भंडावून सोडायला लागला.
.. २ ..
बाबा कल्याणी मूळचे कराडजवळच्या कोले नावाच्या एका छोट्या खेड्यातले. त्यांचे वडील आधुनिक प्रकारची शेती करण्यावर भर देत असत. महाराष्ट्रामध्ये साखर उत्पादन महासंघ निर्माण करण्यामध्ये ज्या मोजक्या लोकांनी अगदी सुरुवातीला हातभार लावला त्यात त्यांचा मोठा वाटा होता. अगदी साध्या वातावरणात बाबा कल्याणींचं बालपण गेलं. पुण्यात पहिल्यांदा आल्यावर आपल्याला पुण्यातल्या माणसाला पहिल्यांदा अमेरिकेत गेल्यावर जसं वाटेल तसं वाटलं असं बाबा कल्याणी गमतीनं म्हणतात. लष्करी शिस्तीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकल्यामुळे बाबा कल्याणींमध्ये एकदम काटेकोरपणा आला. यानंतर लष्करी महाविद्यालयातच त्यांचं पुढचं शिक्षण झालं आणि नंतर पिलानीमधून त्यांनी इंजिनियरिंग पूर्ण केलं. लहानपणापासूनच त्यांना यांत्रिकी गोष्टींमध्ये खूप रस होता. छोट्या वस्तू उघडून बघणं, बिघाड दुरुस्त करणं असे अनेक उद्योग ते करत. दरम्यानच्या काळात बाबा कल्याणींच्या वडिलांनी पुण्यात भारत फोर्जची स्थापना केली. अर्थातच तेव्हा कंपनी एकदम छोटी होती. आपल्या वडिलांच्या उद्योगात लगेच पडायचा बाबा कल्याणींचा विचार असला तरी वडिलांनी त्यांना अमेरिकेमध्ये उच्चशिक्षण घेण्याचा पर्याय दिल्यामुळे त्यांनी तो स्वीकारला. एमआयटीसारख्या उत्कृष्ट महाविद्यालयामध्ये दोन वर्षं शिकल्यामुळे त्यांना अत्याधुनिक गोष्टी समजल्या. १९७२ साली ते आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये सहभागी झाले. तेव्हा भारत फोर्जमध्ये १८०० कर्मचारी होते आणि कंपनीची वार्षिक उलाढाल १० लाख अमेरिकी डॉलर्स होती. तीनच वर्षांमध्ये साधारण एवढ्याच कर्मचाऱ्यांसह उलाढालीचा आकडा आठ पटींनी वाढला! विलक्षण प्रभावी व्यवस्थापन कौशल्य, तांत्रिक बारकाव्यांविषयीचा आत्मविश्वास आणि प्रचंड कष्ट घेण्याची तयारी या जोरावर बाबा कल्याणींनी आपल्या वडिलांनी कष्टानं उभ्या केलेल्या उद्योगाचं सोनं केलं. उत्पादन क्षेत्रामधल्या अनेक कंपन्यांना लागणारे सुटे यांत्रिकी भाग उत्कृष्ट दर्जा राखत तयार करण्यासाठी भारत फोर्जचं नाव अग्रक्रमानं घेतलं जायला लागलं.
तेव्हा बहुतेक सगळ्या कंपन्यांचा भर कामं बिगरयांत्रिकी पद्धतीनं करण्यावर असे. मानवी कौशल्यावर सगळं अवलंबून असे. यामुळे रोजगारनिर्मितीला जास्त वाव मिळत असला तरी कंपनीच्या यशावर खूप मर्यादा येतात हे बाबा कल्याणींच्या लक्षात आलं. आपल्याला जर आणखी मोठी भरारी घ्यायची असेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दर्जा गाठायचा असेल तर आपल्या कामात सुसूत्रता तर असली पाहिजेच; पण शिवाय आपल्या उत्पादनांमध्ये सातत्य असलं पाहिजे आणि जगाच्या पाठीवर कुठेही आपली उत्पादनं एकसारख्या सर्वोत्तम दर्जाची आहेत असं लोकांनी म्हटलं पाहिजे असा ध्यास त्यांनी मनाशी घेतला. तसंच आपल्याला मोठी मजल मारायची असेल तर आपल्या ग्राहकांच्या मनात आपल्याविषयी संपूर्ण विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि यासाठी त्यांनी आपल्या कारखान्यांना भेट दिल्यावर ते एकदम खूश व्हायला हवेत अशी खूणगाठही त्यांनी मनाशी बांधली. याच उद्दिष्टापोटी १९८७ साली त्यांनी आधुनिकीकरणावर भर दिला. खरोखरच ते काळाच्या पुढे होते असं म्हटलं पाहिजे. १९८७-८९ या काळात तब्बल १५० कोटी रुपये खर्चून बाबा कल्याणींनी एका जर्मन कंपनीनं तयार केलेली अत्याधुनिक यंत्रं आपल्या उत्पादन विभागात बसवली. तसंच तेव्हा काम करत असलेल्या कामगारांना प्रशिक्षण देण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धोके असल्याचं लक्षात घेऊन त्यांनी सरळ नवे उत्साही तरुण कामावर नेमून जुन्या कर्मचाऱ्यांना व्हीआरएस घेण्याचा पर्याय दिला. काही काळ यामुळे कंपनीत अस्थैर्य माजलं; पण बाबा कल्याणींनी सगळी परिस्थिती अगदी प्रामाणिकपणे आपल्या कर्मचाऱ्यांसमोर मांडल्यामुळे गोष्टी चिघळल्या नाहीत. उलट बहुसंख्य कामगारांना बाबा कल्याणींची धोरणं पटली.
काही काळातच रॉकवेल या प्रसिद्ध अमेरिकी कंपनीनं आपल्या स्थानिक उत्पादन केंद्राला टाळं ठोकून भारत फोर्जकडून फोर्जिंग बनवून घ्यायला सुरुवात केली. यामुळे भारत फोर्जला एकदम मोठा व्यवसाय मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठरतसुद्धा आपले पाय रोवण्याची संधी कंपनीला मिळाली. त्यापाठोपाठ १९९०-९१ साली भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्याला वेग आल्यानंतर भारत फोर्जची घोडदौड आणखी प्रचंड वेगानं सुरू झाली. आपल्याला आपल्या ग्राहकांच्या गरजा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याची गरज असल्याचं बाबा कल्याणींच्या लक्षात आलं. त्यानुसार त्यांनी व्यूहरचना आखली आणि ग्राहकांशी संवाद साधत आपल्या उत्पादनामध्ये खूप वाढ केली.
तेवढ्यात १९९६ साली अचानकपणे फासे उलटले!
.. ३..
आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांनिशी बाबा कल्याणींनी परिस्थितीचा आढावा घेतला. आजूबाजूचा कानोसा घेतल्यानंतर आणि काही तज्ज्ञ मंडळींशी बोलल्यानंतर अर्थव्यवस्थेमधून अधूनमधून येते आणि साधारणपणे १२-१८ महिने टिकते तशी ही मंदी नाही हे त्यांच्या लक्षात आलं. एकूणच आपल्या ग्राहकांच्या गरजांमध्ये बाजारपेठेमधल्या बदलांमुळे मूलभूत बदल झाले असल्याचं बाबा कल्याणींच्या लक्षात आलं. आपण यातून बाहेर पडण्यासाठी अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज त्यांना जाणवली. हे केलं नाही तर यशोशिखरावरून आपण लवकरच कंपनीला टाळं लावण्याकडे वाटचाल करण्याचा कल्पनेपलीकडचा धोका सत्यात अवतरू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं.
अगदी तातडीनं आपल्या आर्थिक नुकसानाला त्यांनी आळा घालण्यासाठी महागड्या कर्जांचा आढावा घेतला. कंपनीकडे असलेल्या मालमत्तेचा आढावा घेण्यात आला. नुकसानकारक किंवा फार नफा मिळवून न देणाऱ्या गुंतवणुकी विकून टाकण्यात आल्या. यातून मिळालेला पैसा वापरून १९९७-९८ साली कंपनीनं तब्बल १०० कोटी रुपयांची दोन कर्जं तातडीनं फेडून टाकली. तसंच याच्या बदल्यात अमेरिकेमध्ये व्याजदर कमी असल्याचा फायदा उठवून कंपनीनं अमेरिकेमधून कर्जं घेतली. २००४ सालापर्यंत भारत फोर्जवरच्या एकूण कर्जांपैकी ८८% हिस्सा परदेशी बँका आणि वित्तसंस्था यांच्याकडून घेतलेल्या कर्जांचा झाला. फक्त आपल्या मुख्य उद्योगाशी संलग्न असलेली मालमत्ताच आता कंपनीच्या ताळेबंदावर दिसायला लागली. शिवाय उत्पादनासाठीचा आणि नियमित कामकाजावरचा खर्च कमी करण्यावर कंपनीनं भर दिला. तांत्रिक सुधारणा करणं, कुठे वायफळ खर्च होतात हे बघून ते बंद करणं, ऊर्जाबचत, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या न सांभाळणाऱ्या कामगारांना व्हीआरएस घेण्यासाठी उद्युक्त करणं अशी अनेक पावलं उचलण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दर्जा टिकवून धरण्यासाठी कायझन, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट अशा संकल्पना राबवण्यात आल्या. याखेरीज बिट्स पिलानीशी करार करून आपल्या कर्मचाऱ्यांना उत्पादन क्षेत्राशी संबंधित असलेला इंजिनियरिंगचा अभ्यासक्रम नोकरी करतानाच पूर्ण करता येईल यासाठीची सोय बाबा कल्याणींनी करून दिली. आपल्याकडे साचून राहणाऱ्या कच्च्या मालाचं प्रमाण कमी करण्यासाठी कंपनीनं ठरावीक पुरवठादारांकडूनच असा माल घ्यायला सुरुवात केली. विनाकारण खूप मोठ्या प्रमाणावर कच्चा माल मागवून ठेवणं टाळण्यासाठी ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट (एससीएम)’चा वापर सुरू झाला. याखेरीज कंपनीच्या मनुष्यबळाचा पूर्ण आढावा घेण्यात आला. यात व्यवस्थापनाच्या किती पातळ्या असाव्यात याचा फेरविचार करून आधुनिक काळाशी सुसंगत अशी रचना आखण्यात आली. उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विशेष योजनांची अंमलबजावणी करण्यात आली.
अर्थातच या अंतर्गत बदलांमुळे कंपनीची कामगिरी एका मर्यादेपर्यंतच सुधारणं शक्य होतं. मुळात आपल्या मालाला ग्राहकच नसेल तर या बदलांना काहीच अर्थ नाही याची बाबा कल्याणींना जाणीव होती. यामुळे त्यांनी भारतीय ग्राहकांवरचा भर कमी करून निर्यातीवर जोरदार लक्ष केंद्रित केलं. हे काम सोपं नव्हतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर विलक्षण स्पर्धा होती. मोठमोठ्या कंपन्यांशी सामना करणं भारत फोर्जच्या दृष्टीनं आवश्यक होतं. यासाठी आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे हे बाबा कल्याणींच्या लक्षात आलं. त्यांनी आपल्या उत्पादनांच्या रचनेशी संबंधित असलेल्या कामासाठी आता कॅड-कॅम वापरायला सुरुवात केली. ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊन द्विमितीय किंवा त्रिमितीय रचना सॉफ्टवेअरच्या साहाय्यानं करायची, त्यात सगळे बारकावे पक्के झाले की सीएनसी मशिनचा वापर करून योग्य प्रकारचे साचे किंवा इतर भाग तयार करायचे अशी पद्धत रुजली. यामुळे भारतात बसून अमेरिकी तंत्रज्ञांच्या कौशल्याचं काम भारत फोर्जमध्ये व्हायला लागलं. अमेरिकेमध्ये हेच काम करणं खूप खर्चिक असल्यामुळे परदेशी कंपन्या भारत फोर्जवर खूश झाल्या. हे काम फक्त स्वस्तात होतं म्हणून ते आपल्याला मिळता कामा नये याकडे बाबा कल्याणींनी कटाक्षानं लक्ष घातलं. आपले तंत्रज्ञ आणि कामगार हे अत्यंत कुशल असले पाहिजेत आणि ग्राहकाच्या गरजा ओळखून त्यांनी त्यात आपल्या परीनं आणखी काहीतरी भरीव करून दाखवलं पाहिजे असा त्यांचा उत्कृष्टतेचा आग्रह कायम टिकून राहिला.
परदेशी ग्राहक मिळवण्याबरोबरच फक्त एकाच प्रकारचं म्हणजे फोर्जिंगचं उत्पादन न करता फोर्जिंग वापरून बनवलेले वेगवेगळे भाग बनवायलाही भारत फोर्जनं सुरुवात केली. यामुळे आपोआपच त्यांच्या ग्राहकांची संख्या अजून वाढली. खरं म्हणजे असं करण्यात धोका होता. भारतामधल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे आक्रमकतेनं हे निर्णय घेताना बाबा कल्याणी कचरले नाहीत. आपण आत्ताच हे केलं नाही तर आपण लवकरच संपू याची त्यांना कल्पना होती. त्यांच्या या निर्णयाची फळं २००२-०३ साली फोर्ड आणि क्रायसलर यांच्यासारख्या कंपन्यांकडून मिळालेल्या ऑर्डर्समध्ये दिसून आली.
१९९७-९८ साली भारतामधल्या बव्हंशी कंपन्या तोट्यात असताना भारत फोर्जनं मात्र नफा कमावण्याची किमया करून दाखवली! आपल्या शेअरधारकांना उद्देशून त्यांनी कंपनीच्या वार्षिक अहवालात आपण अत्यंत आत्मविश्वासानं प्राप्त परिस्थितीचा सामना करत असल्याचं सांगितलं. असे चढउतार येणारच; पण शेअरधारकांनी आपली साथ दिली तर आपण कंपनीला यश मिळवून देणारच असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
२००४ सालच्या जानेवारी महिन्यात १८३९ साली स्थापन झालेली एक मोठी जर्मन कंपनी विकत घेण्यापर्यंत भारत फोर्जनं मजल मारली! त्यानंतर तर जागतिक महामंदीच्या काळाचा अपवाद सोडता कंपनीची घोडदौड सुरूच राहिली. जिद्द आणि परिपूर्ण तयारी यांच्या जोरावर बाबा कल्याणींनी भारत फोर्जबरोबरच भारताचं नावही जागतिक पटलावर नेलं ते कमालीच्या अडचणींवर मात करूनच.
Notice: This site uses cookies to provide necessary website functionality, improve your experience and analyze our traffic. By using our website, you agree to our legal policies.