Ask Anand: माझ्या फर्मसाठी परवाने नाहीत, आयटी रिटर्नपण नाही, मला कर्ज मिळेल का?
सर नमस्कार,
इंजीनियरिंग चा डिप्लोमा पास झाल्यानंतर मी गेली बारा वर्षे एका प्रायव्हेट कंपनीत नगर येथे काम करतो. कंपनीच्या परचेस डिपार्टमेंट मध्ये कामाचा अनुभव असल्याने गेले तीन-चार वर्षे मी इंडस्ट्रियल पार्टस/ॲक्सेसरीज यामध्ये ट्रेडिंगचा बिजनेस करतो व छोट्या व्यावसायिकांना सप्लाय करतो. हा बिजनेस माझ्या मिसेस च्या नावावर आहे परंतु फर्मचा करंट अकाउंट, इतर परवाने अजून पर्यंत काढलेले नाहीत. तसेच मिसेस चे आयटी रिटर्न फाईल करत नाही. आता व्यवसाय वाढवण्याचा आमचा विचार आहे व बँकेकडून कर्जाची गरज आहे तर मला व्यवसायासाठी कर्ज मिळेल का? याबद्दल आपण मार्गदर्शन करावे.
प्रकाश शिंदे, अहमदनगर
प्रिय प्रकाश,
व्यवसाय वाढवण्याचा तू निर्णय घेतलास ही चांगली गोष्ट आहे.
व्यवसाय वृद्धी साठी बँकेकडून कर्ज घेताना खालील गोष्टींची प्रामुख्याने पूर्तता करणे आवश्यक आहे
१) व्यवसाय प्रोप्रायटरी असेल्याने पत्नीचा फोटो,पॅन कार्ड, आधार कार्ड, घरचा राहण्याचा पत्ता व व्यवसाय करत असलेल्या जागेचा पत्ता यांचे डॉक्युमेंटरी प्रूफ बँकेस देणे आवश्यक आहे. आता ई- केवायसी मुळे या गोष्टी सुलभ झाल्या आहेत.
२) व्यवसायासाठी उद्योग आधार रजिस्ट्रेशन म्हणजेच एम एस एम ई रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.
3) तसेच व्यवसायासाठी शॉप ॲक्ट रजिस्ट्रेशन अथवा ग्रामपंचायतीचे एनओसी जोडणे आवश्यक आहे.
४) आवश्यक असल्यास जीएसटी रजिस्ट्रेशन मिळवणे गरजेचे असते वरील सर्व गोष्टी ची पूर्तता करण्यासाठी देआसरा फाउंडेशन कडून तत्परतेने मार्गदर्शन मिळेल.
५) फर्मचे करंट अकाउंट ओपन करून व्यवसायाचे सर्व व्यवहार शक्यतो या बँक अकाउंट मधून करणे आवश्यक आहे. मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट कर्ज प्रकरणात बरोबर जोडावे लागते
६) तसेच आपला CIBIL स्कोर 750 चे रेंजमध्ये असेल तर कर्ज मिळणे सोयीचे जाते. सिबिल स्कोर हा तुमच्या क्रेडिट हिस्टरी (म्हणजेच कर्ज परतफेडची माहिती) व क्षमता दर्शवतो आणि याच वरच्या आधारावर बँका कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देतात. बँका किंवा वित्तीय संस्थांमध्ये सिबिल स्कोर ला खूपच महत्त्व आहे.
७) गेले दोन-तीन वर्ष आपण व्यवसाय करत असल्यामुळे आपण जमाखर्चाच्या नोंदी ठेवल्या असतीलच तरी त्याच्या आधारे मागील एक-दोन वर्षाचे नफा तोटा पत्रक व बॅलन्स शीटस तयार करून घ्यावे व व कमीत कमी शेवटच्या एका वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न भरावे. आपले इन्कम, इन्कम टॅक्स ब्रॅकेट मध्ये येत नसले तरी ही इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याने बँकेकडून कर्ज मिळवणे सोयीचे होईल.
८) सर्व आर्थिक व्यवहारांचे जमाखर्चा च्या नोंदी केल्याने व्यवसायात कॅश फ्लो मॅनेज करणे, व्यवसायाचा तुलनात्मक अभ्यास करणे, अशा प्रकारे कायदेशीर बाबींची पूर्तता करून आर्थिक शिस्त बाणवणे, व्यवसायाचे दीर्घकालीन वृद्धीसाठी गरजेची असते.
९) व्यवसाय वृद्धीचा आपला लिखित बिजनेस प्लॅन तयार केला तर चांगले होईल.
१०) मागील आर्थिक वर्षांचीं केलेली फानान्शियल स्टेटमेंट व बिझनेस प्लॅन या आधारे बँकेसाठी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे आवश्यक असते.
११) बँकर तुमचे लोन प्रपोजल तपासून बिझनेस व्हाएबलीटीजज करते. त्यानंतर मंजूर केलेले कर्ज हे नेमून दिलेल्या वेळेत परतफेड होईल हे पडताळण्यासाठी तुमची सविस्तर मुलाखत घेतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची एज्युकेशनल बॅकग्राऊंड, व्यवसायातील अनुभव मार्केट व कॉम्पिटिशन स्टडी व त्याची चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी व इतर बलस्थान याचाही मागोवा बँकर घेतो. व्यवसायाचे ठिकाणी कर्ज मंजुरी पूर्व व्हिजिट ही करतो.
अनेक जण व्यवसाय करताना परवाने काढणं, रिटर्न्स भरणं याकडे दुलर्क्ष करतात. शॉर्टकट्सचा हा प्रयत्न तात्पुरता फायद्याचा वाटत असेल मात्र भविष्याच्या दृष्टीने तो फायद्याचा नसतो. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांनी ही काळजी घेतली पाहिजे. सगळे व्यवहार पारदर्शन पद्धतीने केल्यास खूप गोष्टी सोप्या होतात आणि कुठलेही दडपण राहत नाही.
या सगळ्या प्रोसेसमध्ये deAsra फाउंडेशन मदतीसाठी कायम तत्पर आहे.
खूप खूप शुभेच्छा!
आनंद
https://twitter.com/anandesh
https://www.linkedin.com/in/ananddeshpande/