चांगल्या सवयीतून करा कंपनीचा कायापालट!
कॉर्पोरेट जगतात कंपनीचे कल्चर टारगेट केंद्रित असते. वर्षाला, तिमाहीला किंवा महिन्याला उद्योजक कंपनीचे टार्गेट ठरवून सगळ्या टीमला त्या टार्गेटच्या मागे लावतात. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांची चर्चा होते व त्यातून अनेक प्रोजेक्ट्स कंपनीमध्ये पूर्ण केले जातात. ते करण्यासाठी उद्योजक व वरिष्ठ टीमचे नेतृत्व, त्यांची धडाडी व बाकी सर्व टीमचे सहकार्य महत्त्वाचे असते. परंतु एका अर्थाने या थोड्या वरवरच्या गोष्टी झाल्या. एक- दोनदा टारगेट पूर्ण करणाऱ्या टीमला तेच टार्गेट कायम पूर्ण करायची सवय कशी लावता येईल?
यशस्वी खेळाडू, यशस्वी क्रीडा जगतातील संघ, कॉर्पोरेट क्षेत्रातील दीर्घायुषी व वैशिष्ट्यपूर्ण कंपन्या या सर्वांच्या अभ्यासातून एक समान निष्कर्ष निघतो. या सर्वांनी आपल्या कामगिरीला शाश्वत बनवण्यासाठी काही सवयी आखून घेतल्या व त्याचे कठोर पालन केले. विराट कोहली सारख्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने स्वतःच्या फिटनेससाठी आहार, व्यायाम व विहार याबद्दल अत्यंत शिस्तीच्या सवयी लावून घेतल्या. परिणामी, काही वर्षात संपूर्ण क्रिकेट जगतात तो सर्वात फिट खेळाडू म्हणून ओळखला जाऊ लागला. जी गोष्ट व्यक्तींना लागू होते ही तशीच ती कंपन्यांनासुद्धा लागू होते.
एखाद्या विषयाबद्दल आपल्या कंपनीचे वर्तन कसे असावे याचा नीट विचार करून उद्योजकांनी त्यासंबंधीच्या सवयी टीमला आखून द्याव्या. आर्थिक काटकसर, ग्राहक सेवा, समस्या निवारण, सेल्स प्लॅनिंग, कामगिरीचा आढावा, कर्मचाऱ्यांना प्रेरणा, टीमवर्क, गुणवत्ता, सुरक्षा, एक्सलन्स अशा अनेक विभागांमध्ये उद्योजक वेगवेगळ्या सवयी लावू शकतात. यासंबंधी आपण आता काही प्रकार व उदाहरणे बघुयात.
प्रत्येक कंपनीला आपल्या ग्राहकांची योग्य काळजी घ्यायची असते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना काही सवयी लावणे अत्यावश्यक असते- उदाहरणार्थ कस्टमरकडून आलेल्या ई-मेलचे 24 तासात उत्तर देणे, कस्टमरकडून आलेल्या समस्येचे 48 तासात निराकरण करणे, कस्टमरशी बोलताना (ते कितीही वयाचे असो) त्यांना सर किंवा मॅडम म्हणून संबोधित करणे, तक्रार सोडवल्यावर वरिष्ठांनी त्या ग्राहकाला स्वतः फोन करून कस्टमरला आश्वस्त करणे. कंपनीतील प्रत्येक निर्णयाला ग्राहकाच्या परिपक्षेतून बघणे गरजेचे असते. त्यासाठी ॲमेझॉन कंपनीमध्ये प्रत्येक मीटिंगला एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येते. ती खुर्ची ग्राहकासाठी राखून ठेवली असते. मीटिंगमधील निर्णय घेताना त्याचा खुर्चीत बसलेल्या काल्पनिक ग्राहकावर काय परिणाम होऊ शकतो यावर चर्चा होते. त्यानुसार निर्णयाचे स्वरूप बदलण्यात येते. ॲमेझॉन कंपनीत ही गोष्ट एखादे फॅड म्हणून न समजता ती एक सवयच बनली आहे.
सेल्स प्लॅनिंगसाठी दररोजची मॉर्निंग मीटिंग, आठवड्यातून एकदा आढावा बैठक, पुढील महिन्यासाठीची प्लॅनिंग मीटिंग अशा काही सवयी अर्थातच सर्वांना माहीत आहेत. आर्थिक काटकसरीबाबत बऱ्याच कंपन्या कर्मचाऱ्यांना आर्थिक शिस्त व सवयी लावतात. माझ्या माहितीच्या एका कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबर मी एकदा बाहेर जेवायला गेलो. जेवण झाल्यावर खाण्याचे बिल आले. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ते बिल काळजीपूर्वक तपासले. बिल अचूक असल्याची खात्री करूनच मग पेमेंट केले. मला त्याची गंमतच वाटली. मी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की कुठलेही पेमेंट करायच्याआधी ते बिल बारकाईने तपासायची आमच्या कंपनीतील प्रत्येकाला सवय आहे. त्यामुळे अनावश्यक व चुकीचे पेमेंट व्हायची शक्यता कमी होते.
डिस्नेलँड मनोरंजन पार्कमध्ये अगदी सीईओपासून प्रत्येक स्टाफला स्वच्छता व ग्राहक सेवेसाठी काही सवयी आखून दिल्या आहेत व त्याचे तंतोतंत पालन केले जाते. प्रत्येक कर्मचारी खिशात एक चिमटा बाळगून असतो. पार्कमध्ये कोठेही कचरा अथवा कपटा आढळल्यास तो पटकन चिमट्याने पकडून कचरापेटीत टाकला जातो. ही एक छोटी सवय आता सर्व स्टाफच्या (सीईओ सकट) दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
अशा सवयी लावण्यासाठी उद्योजकांना सुरुवातीला थोडे कष्ट घ्यावे लागतात. अशा गोष्टींची सवय नसल्याने साहजिकच कर्मचाऱ्यांचा अशा सवयींना सुप्त अथवा उघड विरोध होतो. “काय आता हे नवीन आणले? काय होणार आहे यांनी? उगाच काहीतरी!” अशा प्रतिक्रिया येणारच. मात्र त्याने डगमगून न जाता स्वतः त्याबाबत आदर्श घालून उद्योजकांनी त्या सवयींना कंपनीत रुजवावे. उद्योजक व वरिष्ठ वर्ग या सवयींच्या बाबतीत ठाम आहेत हे उमगल्यावर मग मात्र कर्मचारी त्या सवयी नीट पाडू लागतात. अनेक महिने या सवयी अंगवळणी पडल्यावर त्यांचा नकळत कंपनीच्या कल्चरमध्ये अंतर्भाव होतो. त्यानंतर एखादा नवीन कर्मचारी जॉईन झाल्यावर आजूबाजूला बघून या सवयी पटकन आत्मसात करतो (आपण भारताबाहेर गेल्यावर गपगुमान रांगेची शिस्त पाळतो तसे!).
असं म्हणतात की आपण जसा विचार करतो तसे बोलतो; जसे बोलतो तशी कृती करतो आणि जशी कृती करतो तशा आपल्याला सवयी लागतात. त्या सवयीतून आपले बरे-वाईट भविष्य घडते.
म्हणूनच कंपनीच्या उज्वल भविष्यासाठी कंपनीमध्ये योग्य सवयी रुजवणे महत्त्वाचे!
व्यवसाय सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल तर त्यासाठी कर्ज घेणं आवश्यक असतं. deAsra फाउंडेशन कर्ज मिळवून देण्यासाठी सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. अधिक माहिती- Business Loan.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.
सलील चिंचोरे
chinchoresalil@gmail.com