Search

आनंदी राहा, फिट राहा! पत्रकार ते सेलिब्रिटी योगा ट्रेनर

पत्रकारिता आणि योगाभ्यास ही कमालीची वेगळी क्षेत्रे आहेत. परंतु माणसाच्या आयुष्यातील काही वळणे कसा बदल घडवतील हे सांगता येत नाही. यालाच आव्हान समजून ते सकारात्मक पद्धतीने परिस्थिती हाताळून या दोन्ही क्षेत्रांना समान न्याय राखी शेळके देत आहेत. पत्रकार ते सेलिब्रिटी योगा ट्रेनर असा त्यांचा प्रवास अचंबित करणारा आहे. सुरूवातीला पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेऊन त्यामध्ये बरेच प्रयोग त्यांनी केले. त्यानंतर लग्न, मुलं या जबाबदाऱ्या आल्याने त्यांनी काही काळ करियरमधून ‘ब्रेक’ही घेतला. काही दिवसांनी पुन्हा एकदा त्या नोकरीमध्ये रूजू झाल्या.
 

इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये पत्रकारिता करत असल्याने तुमच्या दिसण्याला काही प्रमाणात महत्त्व असते. त्यामुळे राखी यांनी बाळंतपणामुळे वाढलेले वजन कमी करायला म्हणून योगासनांचा क्लास लावला. सुरूवातीला त्यांना अतिशय कंटाळा यायचा परंतु त्यांनी सातत्य राखले आणि सहा महिन्यांनंतर त्यांना बदल जाणवायला सुरूवात केली. पत्रकारिता क्षेत्रात असल्याने योगा करताना त्यांना असंख्य प्रश्न पडायला लागले. एक-एक आसनावर त्या अभ्यास करायला लागल्या. हे सर्व सुरू असतानाच कोरोनाची लाट आली, त्यांच्या आईला कर्करोगाचे निदान झाले. त्यांचे पती नेव्हीमध्ये असल्याने ते सुद्धा शिपवर असायचे. त्यामुळे आई आणि मुलगी या दोघींची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला व योगासनांची प्रॅक्टिस सुरूच होती.
 

प्रत्येक आसनाचे त्या सोशल मीडियावर फोटोज् टाकत होत्या. त्यावर त्यांना अतिशय सकारात्मक ‘कमेंट्स’ मिळत होत्या. पत्रकारिता क्षेत्रात असल्याने त्यांचा संपर्क दांडगा होता. योगासनांमुळे त्यांच्यात झालेला बदल पाहून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी विचारले. सोनाली कुलकर्णीला ट्रेनिंग देत असताना त्यांनां चांगलाच आत्मविश्वास मिळाला. सोनाली कुलकर्णी हिनंही राखी यांना प्रोत्साहन दिलं. याचाच परिणाम राखी यंनी अजून लोकांना ट्रेन करायचा असा विचार सुरू केला. अर्थात पत्रकारिता करत असतानाच्या जुन्या ऑफिसच्या सहकाऱ्यांनाही त्यांनी ट्रेनिंग दिलं आहे. राखी यांच्या योगा ट्रेनिंग नंतर त्यांच्या सहकाऱ्यामध्ये झालेला बदल पाहून भाजप नेते विनोद तावडे यांनी राखी यांचे विषेश कौतुक केले. यानंतर हळू हळू हेमांगी कवी, सावनी रविंद्र, अभिज्ञा भावे, मयुरी देशमुख असे अनेक सेलिब्रिटी त्यांच्याकडून योगा ट्रेनिंग घेत आहेत. 
 

आसनांच्या पलीकडील योगा सांगायला हवा
योगासने आणि प्राणायम म्हटले की लोकांना खूप रटाळ वाटायला लागतं. दररोज त्याच- त्याच गोष्टी व्हायला लागतात. त्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक आसनाची गोडी लागायला हवी, असं राखी आवर्जून सांगतात. त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला शीर्षासन, जलनिती करता येते. कोणत्याही उंचीचा आणि वजनाचा माणूस या सर्व गोष्टी नक्कीच करू शकतो. फक्त त्याचा परिपूर्ण अभ्यास आणि आवड असणे गरजेचे आहे. प्रत्येकामध्ये अशी आवड निर्माण करणे त्याला तसा आत्मविश्वास देणे मार्गदर्शकाचे काम असते. योगासने किंवा व्यायाम करायला उत्सुक असणाऱ्यांचा बऱ्याचदा फक्त वजन कमी करण्याकडे कल असतो. त्यामुळे योगा ट्रेनरने प्रत्येक आपल्या विद्यार्थ्याच्या कमी करू इच्छिणाऱ्या भागाशी निगडित ट्रेनिंग ‘डिझाईन’ करायला हवे. त्यांच्या ट्रेनिंगचा हाच यु.एस.पी आहे असं म्हणायाला हरकत नाही. 

 
आसन करताना पायाच्या करंगळीपासून लक्ष देते
प्रत्येक माणसाचे शरीर आणि बांधा वेगवेगळा असतो. माणसाचे हात, पाय, इतर अवयव आणि त्याची लवचिकता यामध्ये फरक असतो. त्यामुळे एखादं आसन करताना प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी येऊच शकतात. म्हणूनच योगा बॅचमधील प्रत्येकाकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं. विद्यार्थ्याच्या पायाच्या करंगळीपासून हाताच्या नखापर्यंत सर्व ‘अलाईंमेंट्स’ व्यवस्थित होत आहेत ना याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याकडे योगा शिकण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला त्यासाठी सतत प्रेरणा देणंही आवश्यक आहे. हेच सगळे विचार डोक्यात ठेवून राखी यांनी त्यांच्या सेशनमध्ये घ्यायचं ट्रेनिंग स्वत: ‘डिझाईन’ केलं आहे. हल्ली प्रत्येकाचा कल वजन कमी करण्याकडे असतो. परंतु आपण ट्रेनर म्हणून सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. राखी यांच्याकडे शिकायला येणाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस हा वेगळा आणि ‘सरप्राईजिंग’ असतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रश्नांचे आणि शंकाचे निरसन त्या- त्या दिवशी व्हायला हवे. बॅच संपल्यानंतर कोणाच्याही मनात किंतू- परंतु राहता कामा नये यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात.
 

 

योगा ची परीक्षा देताना ९ ते १० तास अभ्यास केला
योगासनांचा अभ्यास करताना सुरूवातीला राखी यांनी प्रत्येक आसन यु-ट्युब वगैरेवरून बारकाईने पाहिले. त्यानंतर त्यांना आत्मविश्वास आला की आपण हे इतरांनाही तितक्याच सोप्या आणि ‘इंट्रेस्टिंग’ पद्धतीने शिकवू शकतो. इतरांना शिकवण्यासाठी अधिकृत परवाना किंवा प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्यांनी योगासने आणि प्राणायाम शिकवणाऱ्या एका इन्स्टिट्युटमध्ये केंद्र सरकारमधील आयुष मंत्रालयाच्या ‘वायसीबी’ (योगा सर्टिफिकेशन कोर्स) ला ऍडमिशन घेतली. आसनांचा अभ्यास असल्याने सुरूवातीला या कोर्सला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांना अपयश आलं. आसनांबरोबरच त्याची ‘थिअरी’ सुद्धा तेवढीच महत्त्वाची असल्यानं राखी यांनी ९ ते १० अभ्यास करून ८० टक्के गुण मिळवले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने ‘वायसीबी’ (योगा सर्टिफिकेशन कोर्स) ला सर्टिफाईड केलं असून जगभरामध्ये त्याला मान्यता आहे. त्यामुळे योगा इन्स्ट्रक्टर होण्यासाठी हा कोर्स अत्यंत महत्त्वाचा असल्याचंही त्या सांगतात.
 

शून्य भांडवलामध्ये आयुष्यभर काम करू शकतो
कोरोनानंतर जगभरामध्ये उत्तम आणि शाश्वत आरोग्यासाठी लोक योगाकडे वळायला लागले आहेत. त्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने जगामध्ये कोठेही योगाचं ट्रेनिंग देऊ शकता. त्यासाठी फक्त आयुष मंत्रालयाचं प्रमाणपत्र गरजेचं आहे. लोकांमध्ये आवड जोपासत, त्यांचा आत्मविश्वास वाढवत आणि ‘इंट्रेस्ट’ आणत, सोप्या पद्धतीने योगासनं शिकवायला हवीत. तुमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याने पहिल्या दिवशी केलेले आणि एक आठवड्यानंतर केलेले आसन यामध्ये फरक असतो. त्याची नेमकी प्रगती कशी होत आहे. यासाठी राखी प्रत्येकाचे फोटो आणि व्हिडीओज् काढत असतात. यामुळे त्या विद्यार्थ्याला सुद्धा आपली प्रगती दिसून येते आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो. योगासनांमधील ‘ग्रेसफुल अलाईन्मेंट’ शिकवल्याने तुमची ‘मोनोपॉली’ वाढत जाते. तुमचा त्यामध्ये हातखंड बसल्यावर तसेच त्यामध्ये सातत्य राहिल्यावर तुम्ही इतरांपेक्षा नक्कीच जास्त पैसे आकारू शकता. यामध्ये ऑनलाईन किंवा घरी जाऊन ‘पर्सनल’ ट्रेनिंग सुद्धा देऊ शकता. नावीन्य आणि सातत्य या बळावर शून्य भांडवलामध्ये या क्षेत्राची क्षितीजे अनेकांना नक्कीच खुणावतील.
 


– प्रणिता मारणे-वाघ
(मुक्त पत्रकार, विविध विषयांवर लेखन) pranita.marne27@gmail.com