जाणून घ्या यशस्वी उद्योगाचे ३६ मंत्र
उद्योजकता ही अंगभूत असते, मात्र उद्योजकतेसाठी आवश्यक असणारे अनेक गुण विविध मार्गांनी शिकून, अनुभव घेऊन अंगी बाणवता येतात. चौफेर प्रगतीसाठी ते बाणवावे लागतात. यशस्वी उद्योजकाचे बरेचसे निर्णय हे त्याच्या मानसिक तयारीवर अवलंबून असतात. ही मानसिक तयारी उत्तम होण्यासाठी प्रत्येक उद्योजकानं आवर्जून वाचावं असं ‘यशस्वी उद्योगाचे ३६ मंत्र’ हे पुस्तक गिरिश जाखोटिया यांनी लिहिलं आहे. डॉ. गिरिश जाखोटिया हे जागतिक दर्जाचे औद्योगिक सल्लागार आहेत. साठहून अधिक कंपन्या आणि बँका यांना त्यांनी उद्योजकीय सल्ला दिलेला आहे. छोट्यामोठ्या उद्योजकांसाठी कार्यशाळा ते आयोजित करत असतात. मराठी उद्योजकांबद्दल त्यांना विशेष आस्था असल्याने उद्योजकीय लिखाण ते सातत्याने करत असतात. यशस्वी उद्योगाचे ३६ मंत्र या पुस्तकात त्यांनी उद्योजकांनी पुन्हापुन्हा पठण करावेत असे मंत्र दिले आहेत.
उद्योग करावा नेटका असं लेखक सांगतो. नेटका उद्योग करण्यासाठी मुळात उद्योजकतेचा पाया भक्कम पाहिजे. आपण उद्योग करु शकतो का याची चाचणी घेतली पाहिजे. उद्योजकतेच्या काही कसोट्या लेखकाने सांगितल्या आहेत, त्या आपण पार करु शकतो का याचा अंदाज आपला आपल्यालाच घेता येतो. पैशाचा हव्यास ही गोष्ट वाईट आहे असं आपली परंपरा सांगते, शिकवते. पण उद्योग करताना संपती निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक असतं. ती व्यवसायाच्या वाढीसाठी, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अशा अनेक कारणांसाठी गरजेची असते. त्यामुळे संपत्तीची निर्मिती आणि संपत्तीचा हव्यास या वेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे संपत्तीची निर्मिती करण्यासाठी संपत्तीचा ध्यास असणे उद्योजकासाठी आवश्यक आहेच.
उद्योगासाठी सतत विविध गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. उद्योग करण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक युक्त्या, क्लृप्त्या असतात की ज्यामुळे वेळेची, पैशांची बचत होऊ शकते. त्यांची माहिती करुन घेणे आणि शिकलेल्या या गोष्टी आपल्या उद्योगात कल्पकतेने वापरणे उद्योजकाला जमले पाहिजे. त्यासाठी काहीवेळा जोखीम पत्करावी लागते. संपत्ती निर्माण करण्यासाठी या गोष्टी वापराव्या लागतात. या सगळ्यासाठी डोळे उघडे ठेवून स्पर्धक उद्योजकांच्या पद्धती, इतर उद्योग व्यवसायामधली तंत्रमंत्रं यांचं निरीक्षण करावं लागतं. कोणत्याही उद्योजकाला त्याचे संपर्क वाढवावे लागतात. त्यासाठी निरनिराळ्या औद्योगिक संघटना, औद्योगिक शिबिरं यांच्याशी नियमित संपर्कात राहून आपले औद्योगिक संबंध प्रस्थापित करणं, जपणं आणि संपर्काचं जाळं जास्तीत जास्त वाढवणं उद्योगाच्या वाढीसाठी नेहमीच किफायतशीर ठरतं.
हे वाचलंत का?
उद्योग सुरु करताना आणि केल्यानंतरही अधूनमधून उद्योजकाने स्वत:ची कुवत तपासण्यासाठी आपली बलस्थानं कोणती, त्रुटी कोणत्या याचं विश्लेषण केलं पाहिजे. बऱ्याचदा उद्योग यशस्वी झालाय असं वाटायला लागलं की उद्योजक आता आपल्याला सगळं येतंय, समजतंय अशी भूमिका घेतात आणि नकळत आपल्या उद्योगाच्या प्रगतीला आडसर ठरतात. हे टाळण्यासाठी असं विश्लेषण करणं आवश्यक ठरतं. आपल्यातल्या त्रुटींवर मात कशी करता येईल ते बघितलं पाहिजे.
तसंच स्वभावात आणि वागण्यात उद्योजकाला लवचिकता सांभाळावी लागते. पुरवठादार, वित्तसंस्था, कर्मचारीवर्ग, ग्राहक या साऱ्यांना घेऊन उद्योजकाला उद्योग पुढे न्यायचा असतो. आपल्या तत्त्वांशी ठाम रहात पण या सगळ्यांना संतुष्ट ठेवत उद्योजकाला निरनिराळे निर्णय घ्यावे लागतात. ही एक प्रकारे कसरत असते. पण त्यासाठीच स्वभावामध्ये आणि वागण्यामध्ये लवचिकता ठेवणे आवश्यक असते.
उद्योग कोणता निवडावा यासाठी सुद्धा लेखकाने आठ कसोट्या सांगितल्या आहेत. बाजारपेठ, व्यवसायनिती व पद्धती, भांडवल उभारणी, तंत्रज्ञान, कर्मचारी, नफ्याचे प्रमाण, विक्रीचे तंत्र, सरकारी धोरण आणि वेळोवेळी करायचे प्रयोग असे ते निकष आहेत.
उद्योगात कुटुंबातले सदस्य सहभागी होणार असतील तर त्यांच्या जबाबदाऱ्या, अधिकार आणि कर्तव्यं यामध्ये सुस्पष्टता असायला हवी. बऱ्याचदा मराठी उद्योजकांमध्ये बुजरेपणा आढळून येतो. तो यशस्वी होण्यासाठी मारक ठरतो. हा बुजरेपणा काढून टाकणे उद्योजकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. बदलाचे नियोजन करण्यासाठी लागणारी मनाची प्रगल्भता टिकवून ठेवणं गरजेचं असतं. उद्योजकीय अडचणी, यश अपयश इत्यादी गोष्टींची मनमोकळी चर्चा कर्मचाऱ्यांसमवेत, कुटुंबियांसमवेत करायला हवी. त्यामुळे मनावरचा ताण हलका होतो आणि जबाबदारीची आणि यशापयशाची वाटणी होते, त्यांच्याकडून काही उपयुक्त सूचना मिळू शकतात.
प्रत्येक उद्योजकाला आपल्या उद्योगाचे मापदंड निश्चित करणं आवश्यक असतं. म्हणजे उत्पादनाची पद्धत, गुणवत्ता, सेवा, किंमत आणि नफ्याचं प्रमाण अशा सगळ्या गोष्टी यात येतात. सचोटीने उद्योग करणे हे दीर्घकाल यशस्वी ठरण्यासाठी गरजेचे असते. संपत्ती निर्माण करण्याच्या नादात गैरमार्गाने ती निर्माण होत नाही ना याचं भान ठेवावं लागतं. उद्योगासाठी होत असणाऱ्या खर्चावरचं नियंत्रण ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी खर्चाचं विश्लेषण अचूकपणे करता येणं गरजेचं असतं.
हेही वाचा-
उद्योजकांनो, या 4 गोष्टींची काळजी घ्या, कर्ज घेताना येणार नाही अडचण
ड्रायव्हिंग करत असाल तर हे नियम तुम्हाला माहिती असलेच पाहिजे…
उद्योगांना पूरक अशा अनेक सरकारी योजना असतात, त्यांची माहिती करुन घेऊन आपल्या उद्योगासाठी त्यांचा वापर करुन घेता येतो. व्यवसायवाढीसाठी आपलं असलेलं मार्केट टिकवून ठेवणे आणि नवीन बाजारपेठ शोधत राहणे हे प्रत्येक उद्योजकाला सतत करावे लागते. उद्योगासाठी लागणारा कच्चा माल व्यवस्थित आला तर बाहेर पडणाऱ्या पक्क्या मालावर नियंत्रण ठेवता येईल. पक्क्या मालाचं वितरण सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी वितरक नेमावे लागतात. त्यामुळे पुरवठादार आणि वितरक निवडताना उद्योजकाला विशेष काळजी घ्यावी लागते. उद्योगाचा जवळजवळ एक तृतियांश नफा या दोघांना आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे उद्योजकाला मिळत असतो.
कर्मचारी हा प्रत्येक उद्योगाचा महत्त्वाचा घटक असतो. आपल्याकडच्या कामासाठी योग्य, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक, त्यांना त्यांच्या कामाच्या प्रमाणात पात्रतेनुसार वेतन, त्यांच्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजना, त्यांचे कामाचे तास, कामाचं वातावरण, सुट्ट्या या सगळ्या गोष्टींची काळजी उद्योजकाला घ्यावी लागते. कर्मचारी हा उद्योग परिवाराचा सदस्य होण्यासाठी अथक आणि ठोस प्रयत्न करावे लागतात.
इतर उद्योजकांची कामाची पद्धत उद्योजकाने जरुर अभ्यासावी. त्यासाठी निरनिराळ्या उद्योजकांशी संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. गुजराथी, मारवाडी, सिंधी, पंजाबी, शेट्टी, रेड्डी ही मंडळी कोणती व्यावसायिक तंत्र वापरतात ते अभ्यासले पाहिजे. मात्र असे उद्योजकीय संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी त्यांची चांगली पारख केली पाहिजे. मराठा तितुका मेळवावा या उक्तीप्रमाणेच उद्योजक तेवढा मेळवावा ही उक्ती उद्योजकाने अमलात आणली पाहिजे.
उद्योगाच्या सुरुवातीपासून अथवा व्याप वाढल्यानंतर त्यात भागीदार घेण्याची शक्यता असते. उद्योगात भागीदार असेल तर त्याच्याबरोबर असलेल्या संबंधांची विशेष काळजी घ्यावी लागते. ते कौशल्याचं काम आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे भागीदार निवडणं आणि तो टिकवणं त्याच्या संस्कृतीचं, संस्कारांचं परीक्षण करावं लागतं. त्याची व्यावसायिक कार्यक्षमता, त्याची जबाबदारी, त्याने व्यवसायाला देण्याचा वेळ या गोष्टींबद्दल भागीदारांमध्ये स्पष्टता आणि पारदर्शकता असली पाहिजे.
उद्योगाला वित्तपुरवठा करणाऱ्या बँका आणि इतर वित्तीय संस्था यांच्याबरोबर उद्योजकाने सलोख्याचे संबंध प्रस्थापित करायला हवेत. त्यांना लागणाऱ्या कागदपत्रांची वेळोवेळी पूर्तता आणि कर्जाची मुदतीमध्ये केलेली परतफेड या गोष्टी काटेकोरपणे अमलात आणाव्या लागतात. आपला उद्योग जिथे असेल तिथल्या परिसरातील लोकांशी संवाद साधला पाहिजे. आपल्या गावात हा कोण उपरा आला अशी भावना त्यांच्या मनात आली तर ती उद्योगासाठी त्रासदायक ठरु शकते.
तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा? या, deAsra सोबत कनेक्ट व्हा!
Grooming आणि Beauty क्षेत्रात आहेत अमर्याद संधी, फक्त थोडी वाट वाकडी करा