माणसांना सांभाळता आलं पाहिजे
कुठल्याही उद्योगात एखादं मोठं काम हे टीम वर्क असतं. कार्यक्षमता, अनुभव किंवा कामातली बांधिलकी या कुठल्याही कारणाने त्याच्यात एक व्यक्ती जर महत्त्वाची ठरत असेल तर त्या उद्योगातले डायनॅमिक्स मुळातच गडबडायला सुरूवात होते. असं जेव्हा घडतं तेव्हा तिथे त्या उद्योजकाने लक्ष घालण्याची गरज असते. कारण कुठल्याही टीममध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. कुणाकडे अनुभव कमी असतो पण बांधिलकी असते, कुणाकडे अनुभव असतो पण बांधिलकी नसते. कुणाकडे कौशल्य असतं पण बाकीच्या बाबतीत ढिसाळपणा असतो. अशी अनेक कॉम्बिनेशन्स असलेली माणसं कायमच कुठल्याही टीमचा भाग असतात. मग त्यांच्या सगळ्या गुणदोषांची मोट बांधून ते पूरक कसं होईल हे उद्योजकाला बघावं लागतं. हे कौशल्य त्याने आत्मसात केलं पाहिजे.
वरिष्ठ पदावर नेमणूक करण्यापूर्वी, टीमला सांभाळून कसं घ्यायचं या संदर्भात त्या व्यक्तिचं ग्रूमिंग केलं पाहिजे
समजा एखादी व्यक्ती कार्यक्षमता, अनुभव, कामातली बांधिलकी या तिन्ही स्तरावर वरचढ असेल आणि तिची नेमणूक वरिष्ठ पदावर करायची असेल तर त्या व्यक्तीचा वेगळा चौथा गुण म्हणजे टीमला सांभाळून कसं घ्यायचं तो ग्रूम करायला पाहिजे. नाहीतर टीमला बरोबर घेऊन जाणं तिला जमत नाही. तीचं नेतृत्व मुळात चुकीचं ठरतं. नेतृत्व हे लोकशाहीवादी, सर्वसमावेशक असणं नेहमीच सहाय्यक ठरतं. त्या व्यक्तिचं ग्रूमिंग केलं नाहीतर या अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर टीम मेंबर्सचंही ग्रूमिंग केलं गेलं पाहिजे. त्यांची कुठली बाजू लंगडी आहे त्याबाबत त्यांना माहिती दिली पाहिजे.
आत्ताच्या काळात कामाकडून चरितार्थाशिवाय अनेक अपेक्षा कर्मचारी करतात
गेल्या काही दशकांमध्ये काही नात्यांमध्ये प्रचंड स्थित्यंतर झाली आहेत, त्यांचे कंगोरे बदलले आहेत. त्यापैकी बहीण भावंडांचं नातं, मैत्रीचं नातं यातला गाभा कायम राहिला आहे. पण मालक-कर्मचारी, पती-पत्नी, पालक-मुलं यांच्यातल्या नात्याचा गाभा पूर्णपणे बदलला आहे. पूर्वी काम देणारा आणि करणारा यांच्या भूमिका स्पष्ट होत्या. आपण एकत्र काम करतो याचं कारण बिझिनेस आहे, आपण आपलं काम उत्तम केलं की बिझिनेस उत्तम होणार आणि त्याचा सगळ्यांना फायदा होणार हे सरळ होतं. काम देणार्यालाही तेच अपेक्षित होतं. बाकी गोष्टींची त्यात सरमिसळ नव्हती. आता कामाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. ते अर्थपूर्ण वाटलं पाहिजे, त्यातून माझी प्रगती झाली पाहिजे, नेटवर्किंग झालं पाहिजे, माझ्या प्रतिष्ठेत भर पडली पाहिजे. अशा वेगवेगळ्या अपेक्षा कर्मचारी करत असतो. त्यामुळे काम देणार्याचा रोलही बदलला आहे. स्वत: उद्योजकाकडेही ते गुण आहेत का हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
उद्योजक, कर्मचारी यांच्यातलं पर्सनल नातं आणि व्यावसायिक तत्व यांच्या सीमारेषा पुसट झाल्या आहेत
टीम मेंबर्सची आणि सुपरवायझरची वैयक्तिक उद्दिष्ट ही ऑर्गनायझेशनल गोलशी मॅच होताहेत की नाही हाही हल्लीच्या काळात कळीचा मुद्दा बनला आहे. ती उद्दिष्ट जुळत नसली तरी हरकत नाही. पण त्या व्यक्तिला ही समज देण्याची गरज असते की तू जर हे काम स्वीकारलं आहेस तर, तुला या, या गोष्टी करायला लागतील. पूर्वी ही स्पष्टता मालक आणि कर्मचार्यांमध्ये असायची. पूर्वी काही कर्मचारी आणि उद्योजक यांच्यात अगदी व्यक्तिगत, घरगुती संबधही होते. पण त्याचा परिणाम कामावर होत नसे. त्या संबंधांमुळे कामाच्याबाबतीत तडजोडीचा मुद्दा उपस्थित होतं नव्हता. आता या संबंधांमध्ये सगळी सरमिसळ होते आहे. उद्योजक आणि कर्मचारी यांच्यातलं पर्सनल नातं आणि व्यावसायिक तत्व यांच्या सीमारेषा पुसट झाल्या आहेत.
सक्षम होण्यापासून कर्मचार्यांना सवलत द्यायला नको, काम स्वीकारलं की त्याने पूर्णपणे त्यात झोकून देऊन ते काम केलं पाहिजे.
जेव्हा एखादा कर्माचारी एखादं काम स्वीकारतो तेव्हा त्यासाठी त्याने स्वत:ला सर्वार्थाने सक्षम केलं पाहिजे. पण तसं होत नाही. ‘नाहीतरी ते एवढाच पगार देतात, मग आम्ही एवढच काम करू असा दृष्टिकोन असतो. तो पगार असा आहे आणि काम असं आहे, हे नोकरी स्वीकारताना कर्मचार्याला माहिती होतं, त्यामुळे उद्योजकाने सक्षम होण्यापासून त्याला सवलत द्यायला नको. पण वर सांगितलं तसं लॉजिक सगळ्यांच्या डोक्यात असतं. उद्योजकही असाच विचार करतो की आपण कमी पैसे देतोय तर अशीच माणसं मिळणार म्हणून पण ते अत्यंत चुकीचं आहे. कर्मचार्याने ते काम स्वीकारलं आहे तर त्याने पूर्णपणे देऊन ते करावं. कारण सगळं बिझिनेस मॉडेल त्याच्यावर उभं राहणार असतं, ही स्पष्टता उद्योजकाच्या आणि कर्मचार्यांच्याही डोक्यात असणं गरजेचं आहे.
कामाच्या पद्धतीला विरोध म्हणजे व्यक्तिला विरोध नसतो हे समजून घेण्याची वरिष्ठ पदावरील व्यक्तिकडे नसते
अनेक उद्योगांमध्ये वरिष्ठ, अनुभवी माणसं उत्कृष्ट काम करतात. त्यांना उद्योगातल्या खाचाखोचांची उत्तम माहिती असते. पण ही माणसं आपल्या कामाने स्वत:ला ओळखतात, त्यांचं काम, त्यांचं पद, त्यांच्या मालकाकडून त्यांना जो आदर मिळतो ते सगळं म्हणजेच त्यांचं व्यक्तिमत्व असं समजतात. अशी माणसं जिथेजिथे असतात तिथे गल्लत होते. जेव्हा नवीन, तरुण व्यक्ती येतात आणि त्यांच्या विचाराला आव्हान देतात, नव्याने काहीतरी मांडायचा प्रयत्न करतात, तेव्हा त्या व्यक्तींना त्यांना वैयक्तिक विरोध केला जातोय असं वाटतं. ती व्यक्ती आत्तापर्यंत ज्या पद्धतीने काम करत होती त्या पद्धतीला विरोध म्हणजे तिला विरोध किंवा तिचा अनादर करणं असं नसतं. हे समजून घेण्याची क्षमता त्या व्यक्तिकडे नसेल तर टीममधल्या इतर कर्मचार्यांचा कामातला इंटरेस्ट कमी होतो. हे टाळायचं असेल तर जुनीच मानसिकता घेऊन नव्याने काम केलं तर ते चालणार नाही याचं भान कर्मचार्यांमध्ये उद्योजक रुजवू शकला पाहिजे.
नवीन व्यवसाय सुरू केल्यानंतर, बिझनेस च्या website Designing साठी deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.
डॉ. शिरिषा साठे
shirisha1964@gmail.com