प्राण्यांच्या काय किंवा माणसाच्या काय, प्रत्येक अर्भकाला जन्मानंतरचा काही काळ आपल्या आईवडिलांची कूस, आपलं घर आणि आसपासचा परिसर यांचा कम्फर्ट झोन आवश्यक असतो. प्रत्येक बाळाच्या वाढीसाठी खरंतर तो अपरिहार्य असतो. पण मोठ्या शहरांमध्ये जन्मणाऱ्या मुलांना हल्ली तो मिळेनासा झाला आहे. अर्थात त्यामागची कारणंही तशीच आहेत.
सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बहुतांश महिला या नोकरी किंवा व्यवसायासाठी घराबाहेर जात असल्यामुळे त्यांचा घरात असण्याचा वेळ खूपच कमी झाला आहे. त्यांच्या कामाच्या वेळा आठ ते दहा तास असतातच पण शहरातली अंतरं पाहता त्या दररोज किमान बारा तास घराबाहेर असतात. शिवाय घरात असताना स्वयंपाक, इतर कामं आणि झोपेचा वेळ लक्षात घेता फार कमी वेळ त्या त्यांच्या बाळासाठी देऊ शकतात. त्यामुळेच बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेला स्पर्श, वातावरण आणि त्यातून निर्माण होणारा कम्फर्ट झोन निर्माण होणं दुरापास्त झालेलं आहे.
असं म्हणतात की आपल्यासमोर उपस्थित होणारा प्रत्येक प्रश्न हा येताना त्याच्याच पोटात एक उत्तर घेऊन येत असतो. मुलांच्या वाढीच्या बाबतीतही नेमकं हेच होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात पाळणाघरांची निर्मिती होणं हे या प्रश्नावरचं त्यातल्या त्यात योग्य आणि व्यावहारिक असं उत्तर आहे. या पाळणाघरांची निकड किती तीव्र होती हे गेल्या काही वर्षांत प्रकर्षानं जाणवत आहे. गंमत म्हणजे इतर अनेक उत्पादनांप्रमाणेच पाळणाघरांच्या फ्रँचाईसी देण्याला सुरुवात झाली आहे. उत्तम तऱ्हेनं पाळणाघर चालवणं, त्याचं फायदेशीर व्यवसायात रुपांतर करणं आणि फ्रँचाईसीजची संख्या वाढवून त्याचा विस्तार करणं या प्रक्रियेचं उत्तम उदाहरण म्हणजे आजोळ पाळणाघर हे आहे.
आजोळची माहिती मिळवण्यासाठी या संस्थेच्या प्रवर्तक आणि संचालक असलेल्या मोनिका कुलकर्णी यांच्याशी बोलणं हा एक सुंदर अनुभव होता. शाळेत असतानाही सतत मॉनिटर असलेल्या मोनिकाताईंमध्ये इतरांवर प्रभाव टाकण्याची कला आणि क्षमता आहे. या बाईंनी आयुष्यात काहीही केलं असतं तरी त्यावर आपली हुकूमत गाजवली असती असं त्यांच्याशी बोलताना वाटत राहतं. खरं तर कोणत्याही उद्योजकाला आवश्यक असणारे गुण मोनिकाताईंमध्ये उपजतच आहेत. आजोळचं रुपांतर एका यशस्वी फ्रँचाईसी चेनमध्ये करताना नेमक्या याच गुणांचा उपयोग झाला.
मोनिकाताईंना लहान मुलांची आवड त्यांच्या शाळेच्या वयापासूनच होती. त्या शाळेत असताना ग्राउंडवर चालणाऱ्या मुलांच्या ॲक्टिव्हीटीजसाठी शिकवायला जात असत. मुलांची ही मोनिकाताई लाडकी होती. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोनिकाताईंचं लग्न झालं. मुलांची त्यांना इतकी सवय झाली होती की मुलांसाठी काहीतरी करावं असं सतत वाटत होतं. मग जवळच्या एका ग्राउंडवर त्यांनी मुलांसाठी संध्याकाळी ॲक्टिव्हीटीज सुरु केल्या. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यावेळी मुलांशी, पालकांशी बोलताना त्या भागात छोट्या मुलांसाठी चांगली शाळा नाही असं त्यांच्या लक्षात आलं. पालकांच्या आग्रहास्तव मग त्यांनी छोट्या मुलांची शाळा राहत्या घरात सुरु केली. या शाळेलाही खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. शाळेत येणारी बहुतांशी मुलं पाळणाघरातून येत असत.
असंच एकदा एका मुलीला शाळा सुटल्यावर परत तिच्या पाळणाघरात सोडण्यासाठी मोनिकाताईंना स्वत:ला जावं लागलं. ती मुलगी शाळा सुटली की बऱ्याचदा रडायला लागायची. मोनिकाताईंनी त्या पाळणाघरातलं दृश्य बघितलं आणि त्या मुलीच्या रडण्याचं कारण त्यांच्या लक्षात आलं. तिला त्या पाळणाघरात जावसंच वाटत नसे. एका छोट्या अंधाऱ्या खोलीत ते पाळणाघर होतं. लहान मुलंच काय, पण मोठी माणसंही वैतागतील अशी ती जागा होती. जागेच्या मानानी तिथे बरीच छोटी मुलं होती. पाळणाघर कसं असू नये हे सांगण्यासाठी ते उदाहरण म्हणून ते चांगलं होतं. एक आजीआजोबा होते. आजोबा सतत खोकत होते. ते दृश्य बघून मोनिकाताईंना वाईट वाटलं पण त्याचवेळी चांगल्या पाळणाघरांची किती गरज आहे हे त्यांच्या लक्षात आली.
त्या मुलीला सोडून मोनिकाताई घरी आल्या ते मनात पाळणाघर सुरु करण्याचा विचार करतच. घरच्यांशी या विषयावर त्या बोलल्या तेव्हा सासऱ्यांनी त्यांना खूपच पाठिंबा दिला. मुलांना चांगल्या तऱ्हेनं सांभाळण्याची आज समाजाला मोठी गरज आहे, ती तू पूर्ण कर असं ते म्हणाले. मग पुन्हा घराच्याच एका भागात पाळणाघराची सुरुवात झाली. शाळेमुळे मोनिकाताई बऱ्याचजणांना आता माहिती झाल्या होत्या. मुलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन पालकांना कळला होता. पाळणाघर सुरु करायचं हा निर्णय पक्का झाला.
पण इतक्या वेगवेगळ्या वयोगटातली छोटी बाळं सांभाळायची तर त्यांचं संगोपनदेखील व्यवस्थित व्हायला हवं. मोनिकाताईंच बालपण पुण्यातच गेलेलं. शिवाय शिक्षण आणि लग्नानंतरही पुण्यातच वास्तव्य. त्यामुळे भारतीय परंपरेत मूल कसं वाढवतात ते त्यांना अवगत होतं. पण पाळणाघर चालवण्यासाठी ते पुरेसं नव्हतं. त्यासाठी मग मोनिकाताईंनी बालसंगोपन या विषयातलं विशेष प्रशिक्षण घेतलं. त्यांनी टीचर्स ट्रेनिंग कोर्सेस केले. बाल आणि किशोर मानसशास्त्र या विषयातील अनेक कोर्सेस केले. बालसंगोपनाचं शास्त्र त्यांनी नीट समजावून घेतलं. पुण्यातील चाळीसएक पाळणाघरांचा सर्व्हे केला. त्या पाळणाघरांची स्थिती बघून मोनिकाताईंना खूप वाईट वाटलं. अगदीच थोड्या पाळणाघरांमध्ये मुलांच्या सोयींचा विचार केलेला दिसत होता. मग पाळणाघरांच्या नेमक्या गरजा काय आहेत, कोणत्या सोयीसुविधांची आवश्यकता आहे याचा त्यांनी अभ्यास केला. त्यात आढळलेल्या बारीकसारीक गोष्टींचा विचार करुन काम सुरु केल्यामुळे पाळणाघर सुरु केल्यानंतर काहीच दिवसात ३०-४० मुलं पाळणाघरात यायला सुरुवात झाली. सुरुवातीला एक वर्ष वयाच्या पुढच्या मुलांनाच त्या प्रवेश देत असत. पण मग पालकांची गरज आणि मागणी ओळखून तीन महिन्यांच्या बाळांनाही पाळणाघरात प्रवेश द्यायला सुरुवात केली.
एका वर्षापेक्षा छोट्या बाळांसाठी मोनिकाताईंनी वेगळा विभाग केला आहे. छोट्या बाळांचा हा स्वतंत्र विभाग सुरु करण्यापूर्वी मोनिकाताईंनी छोट्या बाळांची काळजी घेणारी पाळणाघरं कशी चालवली जातात हे बघण्यासाठी काही अभ्यासदौरे केले. भारतात बंगरुळू, हैद्राबाद यासारख्या ठिकाणी त्यासाठी गेल्याच पण सिंगापूरची एक टूरही त्यांनी खास या कारणासाठी केली. भारतात छोट्या बाळांच्या पाळणाघरासाठी विशेष नियम असे काहीच नाहीत. पण सिंगापूरला त्यांना याबाबतीत बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आढळल्या. हे सगळं बघून, अभ्यासून पाळणाघरासाठी फरशी कोणती वापरावी, खिडक्या किती उंचीवर असाव्यात, पडदे कोणत्या रंगाचे, कापडाचे असावेत, यावर त्यांनी खूप विचार केला. भिंतींना चांगल्या क्वालिटीचाच रंग लावला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. छोट्या मुलांचे चिकट, खरकटे हात भिंतींना लागतात, भिंतींवर ते रेघोट्या काढतात. चांगला पेंट असेल तर कपड्याने पुसून भिंत पुन्हा स्वच्छ करता येते. मुलांसाठी वेगवेगळी चित्रं, पोस्टर्स लावताना ती त्यांना सहजपणे दिसतील अशा उंचीवर लावली. सर्वात आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बाळांना आपण आपल्या घरातच आहोत अशी भावना निर्माण केली. कारण ती तशी असेल तर ती बाळं लवकर रुळतात, रमतात हा यामागे विचार होता.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. बाळांना सांभाळणाऱ्या मावश्या हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो हे सहसा लक्षात घेतलं जात नाही. आजोळमध्ये मात्र याकडे आवर्जुन लक्ष दिलं जातं. बाळांना सांभाळणाऱ्या मावश्यांना मोनिकाताई विशेष प्रशिक्षण देतात. त्या वयात बाळाशी वागणूक कशी असावी याचा बारकाईने त्यांनी अभ्यास केला होता. शिवाय चाईल्ड सायकॉलॉजिस्टची नियमित मदत या कामासाठी सुरुवातीपासून त्या घेतात. बाळाला छान छान गोष्टी-गाणी सांगत जर जेवण भरवलं तर त्या बाळाला खाण्याची गोडी लागते. अर्थात हे सगळ्याच बाबतीत होतं. बाळांना त्या काळात प्रेम, माया आणि सुरक्षित भावना यांची मोठी गरज असते. हिडीसफिडीस केल्याने, चिडचिड केल्याने बाळंही पुढे तशीच होतात. याचं भान वेळोवेळी सांभाळावं लागतं.
पाळणाघरातली स्वच्छता याबाबतीत मोनिकाताई खूपच काटेकोर आहेत. मुलांकडून सांडलवंड होत असते, मुलांची शीशू साफ करणं असतं. ते वेळच्यावेळी व्हावं यासाठी मावशी लोकांच्या स्टाफला त्या विशेष ट्रेनिंग देतात. बाळाच्या वाढीच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने त्याला कधी आणि काय शिकवावं यावर बराच विचार झाला. मुलांचे खेळ, त्यांचं खाणंपिणं, झोप, विश्रांती अशा अनेक गोष्टी त्यात होत्या. त्यासाठी मोनिकाताईंनी एका चाईल्ड सायकॉलॉजिस्टला आपल्या कामात सहभागी करुन घेतलं आहे.
आजोळची ओळख आता एक जबाबदार आणि संस्कारक्षम पाळणाघर अशी झाली आहे. पालकांचा आजोळवरचा विश्वास वाढत होता. त्यामुळेच मुलांची संख्या आता शंभरच्या वर जायला लागली. इतक्या मुलांसाठी जागा तर अपुरी पडायला लागलीच पण पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून पालक चौकशीसाठी यायला लागले. पालकांच्या सोयीसाठी त्या त्या भागातच आता आणखी सेंटर्स सुरु करावीत असा विचार झाला. मग २००९ साली गांधीभवनला आजोळची दुसरी शाखा सुरु झाली. अशीच मग कर्वेनगरलाही आणखी एक शाखा सुरु केली. यानंतर बावधन आणि सनसिटी सिंहगड रोड इथे त्यांच्या शाखा सुरु झाल्या. या नवीन शाखांसाठी मोनिकाताईंना त्यांच्या बहिणींची खूपच मदत होते. या शाखा सुरु केल्या तरी पण आता याची गरज आणखी वाढत जाणार आहे हे मोनिकाताईंच्या लक्षात आलं. त्यामुळे फ्रँचाईसी देण्याचं त्यांनी ठरवलं. मग सगळ्या शाखांमध्ये, फ्रँचाईसी सेंटर्समध्ये समानता असावी म्हणून मोनिकाताईंनी एक अभ्यासक्रम तयार केला. मुलांचा भाषाविकास, त्यांच्या हालचाली, त्यांची विचार करण्याची प्रवृती या सगळ्याचा विचार करुन हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे.
पाळणाघरांच्या बाबतीत अनेक वर्षं काम करत असल्यामुळे मोनिकाताईंनी अनेक गोष्टींचं निरीक्षण केलं. आपल्याकडे पाळणाघर चालवणं तितकसं प्रतिष्ठेचं मानलं जात नाही. त्यामुळे त्याची प्रचंड गरज असूनही पुरेशी पाळणाघरं नाहीयेत. या प्रतिष्ठेच्याच कारणामुळे सुशिक्षित महिला त्याकडे फारशा वळत नाहीत. शिकलेल्या महिला शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी बघतात. पाळणाघर चालवणं म्हणजे त्यांना कमी दर्जाचं काम केल्यासारखं वाटतं. मग शिक्षण पुरेसं नाही, त्यामुळे नोकरी करता येत नाही आणि मग उत्पन्नाचं दुसरं काही साधन नाही म्हणून महिला हे क्षेत्र निवडतात असं त्यांना आढळून आलं. अर्थात याला काही अपवाद आहेत. पण दुर्दैवानं ते कमी आहेत.
या सगळ्या निरीक्षणांच्या आधारावर मोनिकाताईंनी मग आपलं फ्रँचाईसी मॉडेल खूप विचारपूर्वक बनवलं. केवळ आपला व्यवसाय वाढावा हा उद्देश यामागे अर्थातच नव्हता. समाजाची मोठी गरज भागवणं आणि मुलांचा विकास उत्तम व्हावा हा हेतू होता. आपण उत्पादन करत असलेली उत्तम वस्तू शहरातल्या अनेक भागात लोकांना मिळावी म्हणून तिचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करुन तो माल इतर दुकानांना पोचवणं हे इतर फ्रँचाईसीजसाठी असलेलं सोपं तत्त्व आजोळच्या फ्रँचाईसीजसाठी लागू होत नाही. इथे एक बालसंगोपनाचा एक महत्त्वाचा विचार, एक तळमळीची सेवा जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचवायची आहे. त्यामुळे आजोळची फ्रँचाईसी देणं आणि घेणं हे दोन्ही जबाबदारीचं काम आहे.
आजोळची फ्रँचाईसी घेणारी महिला किमान ग्रॅज्युएट असावी. बऱ्याचदा बाळांना काही औषधं, टॉनिक्स वगैरे द्यायची असतात. शिकलेली महिला असेल तर नीट वाचून ती ते देऊ शकेल. तिने चाईल्ड सायकॉलॉजीचा अभ्यास असेल तर अतिउत्तम. ती स्वत: उत्साही, मुलांबद्दल ममत्व असणारी असावी. तिच्याकडे किमान १२०० चौ. फुट तळमजल्यावरची जागा आणि त्याच्याभोवती थोडी मोकळी जागा असावी. मोकळ्या जागेत मुलं जास्त मोकळी रहातात असं अनुभव सांगतो. त्यामुळे शक्यतो फ्लॅट नसावा. आजोळची टीम फ्रँचाईसीचा एक मोठा इंटरव्ह्यू सुरुवातीला घेते. त्यात विचारलेल्या प्रश्नांवरुन त्या बाईचा दृष्टीकोन कळतो. व्यवसाय करते म्हटल्यावर पैसे तर मिळवावे लागतातच. पण तिचा हेतू निव्वळ पैसे मिळवण्याचा असून चालत नाही.
आजोळ पाळणाघर म्हटलं की लोकांच्या मनात एक विशिष्ट स्टँडर्ड, दर्जा राखणारं पाळणाघर अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. ही प्रतिमा निर्माण करण्यामध्ये मोनिकाताईंचे कष्ट आणि या व्यवसायाप्रती असणारी तळमळ आहे. त्यामुळे फ्रँचाईसी असली तरी लोक आजोळ हे नाव बघून येतात. आजोळचा हा विश्वास फ्रँचाईसीसुद्धा देणार आहे याची खात्री देण्यासाठी फ्रँचाईसी घेताना आजोळकडे काही रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवावी लागते. त्याशिवाय फर्निचर, रंग, पडदे, खेळणी यावर काही खर्च करावा लागतो. जागा भाड्याची असेल तर त्या जागेचं डिपॉझिट आणि भाडं याचा खर्च असतो. साधारणपणे तीन मुलांमागे एक मावशी यानुसार मावशींची नेमणूक करावी लागते. आजोळची फ्रँचाईसी घेणाऱ्या महिलेला ट्रेनिंग अनिवार्य आहे. फ्रँचाईसी सुरु करताना तर ते घ्यावं लागतंच. पण नंतरही दर महिन्यात ते घ्यावं लागतं. साधारणपणे दहा मुलं पाळणाघरात आली की व्यवसायाचा ब्रेक इव्हन पॉईंट येतो. पंधरा मुलं झाली की चांगले पैसे मिळायला लागतात.
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अलीकडे बऱ्याचदा पालकांना सुद्धा मुलांच्या संगोपनाबद्दल पुरेशी माहिती नसते. मग इंटरनेटवर वाचून किंवा मित्रमैत्रीणींच्या सल्ल्याने ते मुलांचा आहारविहार वगैरे गोष्टी ठरवतात. खरं तर प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याच्या गरजा, आवडीनिवडी वेगळ्या असतात. त्यामुळे वाचलेल्या माहितीच्या आधारे मुलांना वाढवता येत नाही. याचं भान आजच्या नवीन आईबाबांना देण्याची गरज मोनिकाताईंना प्रकर्षाने वाटते. त्यामुळे नुकतीच त्यांनी पेरेंटिंग स्कूल अशी अभिनव संकल्पना अमलात आणली आहे. तीन महिन्यांपासून तीन वर्षांच्या बाळांचे पालक असणाऱ्यांसाठी ही पालक शाळा आहे. शनिवार-रविवारी पालकांसाठी ही शाळा घेतली जाते. बालसंगोपनाबद्दल, मुलांच्या खाण्यापिण्याबद्दल त्यात पालकांचं मार्गदर्शन केलं जातं. यालाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मुलांसाठी पालक हे आदर्श असतात, त्यामुळे त्यांचं प्रशिक्षण आवश्यक आहे.
सध्या पुण्यामध्ये आजोळच्या आठ फ्रँचाईसीज आहेत. त्याशिवाय नाशिकला एक आहे. पुढच्या वर्षभरात पुण्यात आणखी सात फ्रँचाईसीज सुरु होत आहेत. त्याबरोबरच कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद आणि नवी मुंबई इथे देखील आजोळच्या फ्रँचाईसीज सुरु होणार आहेत. पुण्यामध्ये नांदेड सिटी इथे आजोळची फ्रँचाईसी सुरु झाली. त्या भागातली गरज इतकी होती की एका वर्षाच्या आत तिथेच त्या बाईंनी आजोळचं आणखी एक सेंटर सुरु केलं. दर महिन्याचं या फ्रँचाईसीचं उत्पन्न दीड ते पावणे दोन लाखांच्या घरात आहे.
आजोळची ही यशकथा फ्रँचाईसीजच्या माध्यमातून चालूच राहणार आहे. आपल्याला असलेली मुलांची आवड, त्यांच्या निकोप आणि सर्वांगीण वाढीसाठी असलेली तळमळ आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असलेले गुण यांचा वसा मोनिकाताई फ्रँचाईसीजना देत आहेत. हे सगळं मोनिकाताई करतात याचं कारण त्यांचं एकच स्वप्न आहे. त्यांच्या प्रत्येक फ्रँचाईसीमधल्या प्रत्येक बाळाला पाळणाघरात निवांतपणे विसावता यावं.
Notice: This site uses cookies to provide necessary website functionality, improve your experience and analyze our traffic. By using our website, you agree to our legal policies.