Search

नगरकर सराफ: बावनकशी व्यवसायाची सोनेरी कहाणी!

सराफी व्यवसाचा पाया आहे तो म्हणजे ग्राहकांचा विश्वास. त्याच्याच बळावर या व्यवसायात यशस्वी होता येतं. आज अनेक ब्रॅंडस या व्यवसायात आले आहेत. पण तरीदेखील या ब्रॅंडसच्या स्पर्धेला जराही न घाबरता सचोटी आणि विश्वासाच्या बळावर काही सराफी व्यावसायिक आपली दिमाखदार वाटचाल करत आहेत. नगरकर सराफ हे त्यापैकी एक आघाडीवर असलेलं नाव. नगरकरांची तिसरी पिढी आता पिढीजात व्यवसायाला आधुनिकतेचा साज चढवत व्यवसायाची वाढ करत आहे.  

या व्यवसायाचा १९५४ साली पंढरपूरहुन येऊन प्रसाद नगरकर यांच्या आजोबांनी छोटे दुकान सुरु केले. सायकल वर जाऊन ते दागिने विकत. त्याकाळात पुण्यात एका विशिष्ट भागात सगळा सराफी व्यवसाय एकवटलेला असताना तुळशीबागेसारख्या ठिकाणी दुकान सुरु करणे हे धाडसी कामच म्हणावे लागेल. आजोबांनी जन्म दिलेल्या या व्यवसायाचं संगोपन पुढे प्रसाद यांचे काका आणि वडील यांनी केले. चांगलं बाळसं धरून व्यवसायाची गाडी वेग पकडायला लागली. आणि याच काळात प्रसाद यांच्या काकांचं निधन झालं. त्यांच्या वडिलांना व्यवसायाचा डोलारा एकट्याने सांभाळणे कठीण होऊ लागले होते. मग प्रसाद यांनी दहावी झाल्यानंतर दुकानात जायला सुरुवात केली. वडिलांना मानसिक आणि औद्योगिक आधार देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. लहानपणापासून अंतराळवीर बनण्याचे स्वप्न मनात बाळगले असताना काकांच्या आकस्मिक जाण्याने प्रसाद यांच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. 

सुरुवातीची काही वर्ष फक्त व्यवसाय निरीक्षणात, पद्धत समजून घेण्यात आणि वेगवेगळ्या प्रकारची रत्ने अभ्यासण्यात गेली. ग्राहकांशी वार्तालाप, त्यांची आवड निवड, वडिलांची ग्राहकांशी बोलण्याची पद्धत आणि ग्राहक व वडील यांच्यातील निर्माण झालेलं घट्ट नातं आणि असलेला विश्वास हा प्रसाद यांच्यासाठी आश्चर्यजनक होता. पदव्युत्तर शिक्षण घेताना व्यावहारिक ज्ञान त्यांना दुकानातील अनुभवांनी मिळत गेले. व्यवसायातील बारकावे लक्षात यायला सुरुवात झाल्यावर प्रसाद यांना व्यवसायाला एका नवीन आणि आधुनिक धाटणीची गरज आहे असे लक्षात आले. वडिलांच्या विचारसरणीला धक्का न देता आधुनिकतेचा साज चढवायचे मोठे आव्हान प्रसाद यांच्यासमोर उभे होते.    

हळूहळू प्रसाद यांनी लोगो डिझाईनिंग, ब्रॅण्डिंग, प्रॉडक्शन युनिट, हेड ऑफिस या सगळ्या संकल्पना अमलात आणायला सुरूवात केली. ही सगळी उलाढाल इतक्या कमी वर्षात करणे हे सोप्पे नक्कीच नव्हते. दुकानात यायला सुरुवात करण्याच्या आदल्या रात्री वडिलांनी दिलेला मोलाचा सल्ला प्रसाद यांना पदोपदी उपयोगी येतो. ‘एकवेळ पैसे कमी मिळू देत, पण पैसे कमावण्यासाठी ग्राहक आणि त्यांचा विश्वास तोडू नकोस, एक ग्राहक जोडलास तर दहा कुटुंब जोडली जातील’. काकांनी आणि वडिलांनी तयार केलेला वटवृक्ष अजून मोठा करण्याचे काम प्रसाद हे लीलया करत आहेत. आज नगरकरांच्या शाखा जयपूर, गोकाक आणि मुंबई येथे कार्यरत असून पुण्यात आणि महाराष्ट्रात इतरत्र शाखा उभारण्याचे काम सुरु आहे. मुंबईतील ठाणे येथे लवकरच नवीन शाखेचे उदघाटन होणार आहे. 

वेगवेगळ्या प्रकारचे दागिने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न आणि अपार कष्ट करावे लागतात. भारतभर फिरून ते दागिने आपल्यासोबत पुण्यात आणण्याचे जिकीरीचे काम त्यांनी केले. दागिन्यांमधील वेगळेपण आणि वैशिष्ट्य हे कायम टिकवण्यासाठी प्रसाद नगरकर आणि त्यांचे सहकारी सचोटीचे प्रयत्न करत असतात. प्रसाद यांचा स्वभाव हा मुळातच जिद्दी. जे काही करायचं त्यात आपण सर्वोत्कृष्टच. हे एकच ध्येय मनाशी बाळगून इतक्या कमी वयातच ते यशाच्या शिखरावर आहेत.   

भारतीय माणूस हा दागिन्यांकडे किंवा सोन्याकडे दोन प्रकारे बघतो,एक तर आवड म्हणून आणि दुसरं म्हणजे गुंतवणूक म्हणून. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी सोने भिशी आणि अर्थात दागिने स्वरूपात सोने येथे मिळते. दुकानात एकदा पाऊल ठेवल्यावर ग्राहक रिकाम्या हाताने परत जाणारच नाही हे निश्चित. सतत काहीतरी वेगळे आणि नाविन्यपूर्ण करत राहणे हेच नगरकरांच्या यशाचे द्योतक म्हणता येईल.  

आजकाल बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की ग्राहक आणि विक्रेता यांच्यापुरतेच मर्यादित संबंध असतात. परंतु जेव्हा स्वतः मालक तुमच्यासमोर तुमच्याशी अगदी घरातल्याप्रमाणे आपुलकीने बोलतो, तेव्हा तुम्हीसुद्धा तुमच्या मागण्या आणि तुमची आवड अगदी सोप्या शब्दात मांडू शकता. प्रसाद नेमकं हेच करतात. ते स्वतः ज्वेलरी डिझाइन करतात आणि त्यांच्या हाताखाली सुमारे २० ते २५ डिझायनर्स कार्यरत आहेत. त्यामुळे डिझाइनरच तुमच्यासमोर असल्यावर प्रत्येक गोष्टीतील बारकावे तुमच्यापर्यंत सहज पोहोचतात.   

दागिने हे वेगवेगळ्या वजनाचे आणि घडणीचे असतात. प्रत्येकालाच ते परवडतील असे नाही. मध्यम वर्गीय ग्राहकांची ही गरज ओळखून नगरकरांनी कमी वजनाचे परंतु त्याच घडणीचे आणि ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारे दागिने बनवायला सुरुवात केली. तसेच श्रीमंत लोकांसाठी “राजवाडा” या नावाचं दालन त्यांनी उभारलं आहे. जिथे विशिष्ट प्रकारचे आणि राजेशाही थाट असलेले दागिने उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील लोकांचा विचार करून त्यांच्या पसंतीनुसार आणि क्षमतेनुसार दागिने उपलब्ध करून देणं खरंच वाखाणण्याजोगं आहे. ग्राहकांची मागणी आणि त्याची लगेच पूर्तता होणार याची इथे निश्चिती आहे. 

अनेक लोक काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून मागणी करतात. त्यांच्यासाठी ब्लॅक डायमंड, ऑरेंज डायमंड, अनेक प्रकारची रत्ने, भारतात सहजासहजी न मिळणारी ब्रँडेड घड्याळे, सनग्लासेस दुकानात उपलब्ध आहेत. थ्रीडी मीना ही संकल्पना प्रथम राबवणारे नगरकर सराफच आहेत. व्यवसाय आखणी करताना प्रसाद यांनी ठरवल्याप्रमाणे आज नगरकर सराफ हे दागिने डिझाईनिंग पासून एक्स्पोर्ट पर्यंत प्रत्येक गोष्टीत सहभागी आहेत.

सोने व्यवसायात विक्रेता, डिझाइनर आणि कारागीर हे तीन महत्त्वाचे टप्पे मानले जातात. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे कारागीर. कलकत्ती डिझाईन, बेळगावी पद्धतीचे डिझाईन यासाठी विशिष्ट कारागीरच लागतो. या कारागिरांचा हा पिढीजात व्यवसाय असल्याने त्यांचे कुटुंबीय वगळता ही कलाकुसर सहसा कोणाला ज्ञात नसते. नगरकर यांच्याकडे या कारागिरांना सुद्धा ग्राहकांप्रमाणे पिढीजात जपलेलं आहे. 

प्रसाद त्यांच्या या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांच्या आईवडिलांनी लहानपणीपासून केलेल्या संगोपनाला देतात. चंद्रावर जाण्याची स्वप्ने बघणाऱ्या प्रसाद यांनी आता कितीतरी चंद्रहार बनवले आहेत. आयुष्यात अचानक आलेल्या या आव्हानाला प्रसाद यांनी तोंड देत व्यवसाय आणि ज्वेलरी डिझाईनिंग यालाच आपली पॅशन बनवली. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करा हे नगरकर यांचे ब्रीद आहे. तोंडात पिठीसाखर आणि डोक्यावर बर्फ हे वडिलांनी सांगितलेले यशाचे गमक प्रसाद अगदी तंतोतंत अमलात आणत आहेत. पिढीजात व्यवसायाला नवीन दागिन्यांनी नटवत आणि ग्राहकांचा विश्वास अधिकाधिक दृढ करत ही यशस्वी वाटचाल पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत चालूच राहील हे नक्की. 


deAsra फाउंडेशन उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचं काम करते. deAsraकडे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. अधिक माहिती - Expert consultation
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.

तन्मयी जोशी

tanmayee.joshi90@gmail.com